जगभरातल्या राजकारण्यांची एकच चिंता असते. ज्या गोरगरीब जनतेला त्यांनी आपले हक्काचे मतदार समजून वेठीस धरलेले असते त्यांच्यावर त्यांनी आपला अबाधित अधिकार गाजवत राहावा. त्यांच्यावर आपली पकड सुटता कामा नये, ते जसे जीवन जगत आहेत तशाच गरीबीत खितपत त्यांनी राहावं. निवडणुकांच्या वेळी त्यांना आश्वासनांची खैरात द्यावी. त्यांना पुन्हा त्या आश्वासनांद्वारे आपल्याकडे गहाण म्हणून ठेवावे. आजवर तर जगात कोणता सत्ताधारी, राज्यकर्ता, राजकारणी असा उदयास आला नाही ज्याला खरोखरच आपल्या जनेतला गरीबीतून मुक्त करून एका सक्षम मानवासारखे जीवन जगण्यासाठी गोरगरीबांशी खऱ्या अर्थाने सहानुभूती असावी. निवडणुका, आश्वासने या भूलभुलय्यात देशाच्या निरक्षर, अत्यंत दुर्दैवी जनतेस अडकवून ठेवण्यासाठी वाटेल ते करतात. त्यांची एकमेव चिंता अशी की गरीबांची आर्थिक स्थिती सुधारू नये, त्यांना शिक्षणाच्या सोयी-सुविधा हव्या तशा मिळू नयेत, हेच सगळे प्रयत्न कोणत्याही देशाच्या सत्ताधाऱ्यांचा एकमेव आधार असतो. अशा आधारास जर कुणी आव्हान देणारा उभा राहिला तर तो सत्ताधाऱ्यांचा शत्रू ठरवला जातो. एकेकाळी बांग्लादेश स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशात कमालीची गरीबी होती आणि साहजिकच स्वातंत्र्यासाठी लढा देऊन ते जिंकल्यानंतर कोणत्याही देशाची परिस्थिती तशी होणारच होती. बांग्लादेशाचेही तसेच झाले. परिस्थिती इतकी दयनीय होती की त्या देशाला आंतरराष्ट्रीय केराची टोपली म्हटले जायचे. अशा परिस्थितीत जेव्हा बांग्लादेश गरीबीशी झुंज देत होता. आपल्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य आणि बळकटपणा देण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळेला मुहम्मद यूनुस नामक एक अर्थतज्ज्ञ समोर आले. त्यांनी गोरगरिबांना आर्थिक मदत पुरविण्यासाठी एक असाधारण योजना आखली, ती म्हणजे ज्या दुर्बल घटकांना कुणी आर्थिक साहाय्य किंवा बँक कर्ज देण्यास तयार नव्हते त्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. स्थानिक स्तरावर या योजनेला जे यश मिळाले त्यावरून त्यांनी ग्रामीण बँक उभारण्याचा निर्णय घेतला. १९८३ साली त्यांनी ग्रामीण बँकेची स्थापना केली. या बँकेला अनन्यसाधारण यश प्राप्त झाले. ल्या बँकेद्वारे त्यांनी एकूण ३४ अब्ज रुपये बिनव्याजी कर्जपुरवठा केला. एकूण एक कोटी लोकांना त्याचा लाभ झाला. सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की कर्जाच्या पतरफेडीची टक्केवारी ९७ इतकी आहे. मुहम्मद यूनुस यांच्या ग्रामीण बँकेच्या धर्तीवर जगभर १०० देशांत ही योजना राबविली जाते. मुहम्मद यूनुस यांच्या मानवतेच्या कल्याणासाठी सुरु केलेल्या या महान कार्यासाठी त्याना २००६ साली नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. 'बँकर ऑफ पुअर' असे त्यांचे कौतुक केले जाऊ लागले. मुहम्मद यूनुस यांचा जन्म १९४० साली चिट्टगाव (बांग्लादेश) मध्ये झाला. त्यांनी १९६९ मध्ये अमेरिकेतली एका विद्यापीठातून अर्थशास्त्रात पी.एचडी. ची डिग्री घेतली. बांग्लादेश स्वतंत्र झाल्यावर त्यांची चिट्टगाव विद्यापीठात अर्थशास्त्राच्या प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. आणि त्यानंतरच्या त्यांच्या प्रवासाचा तपशील वर दिलेला आहे. सध्या ते का चर्चेत आहेत याचे कारण असे की मुहम्मद यूनुस यांना ढाका येथील एका न्यायालयाने शिक्षा दिली आहे. शिक्षेचे कारण हे की त्यांनी ग्रामीण टेक्निकल कंपनीची स्थापना केली. त्याद्वारे त्यांनी मजूर कायद्यांचे उल्लंघन केले, या कंपनीच्या ६४ कर्मचाऱ्यांना पर्मनंट केले नाही, कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी निधीची स्थापना केली नाही. कंपनीच्या नफ्यातून ५ टक्के इतकी रक्कम त्यांनी कर्मचाऱ्यांना दिली नाही. अशा क्षुल्लक कारणासाठी न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यूनुस यांनी स्थापना केलेल्या कंपनीचा बांग्लादेशाच्या आर्थिक व्यवस्थेत ३४ टक्के इतका वाटा आहे. तर ज्या क्षुल्लक कारणावरून एका नोबेल पुरस्कारप्राप्त जगातला असा व्यक्ती ज्याने बांग्लादेशाच्या कोट्यवधि गरिबांची आर्थिक स्थिती सुधारली त्यांना तिथल्या शासनाद्वारे शिक्षा! ज्या योजनेद्वारे बांग्लादेशाची आर्थिक स्थिती इतकी सुधारली की जगभर त्याचे कौतुक केले जाते. मुहम्मद यूनुस यांच्या विरोधात कोणताही आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप नाही. हे शासनकर्ते जे अब्जावधींचे घोटाळे करतात आणि वर्षानुवर्षे गोरगरीबांना वंचित ठेवतात, त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एकही पाऊल उचलत नाहीत. उलट त्यांची हरप्रकारे पिळकवणूक करतात. रोजीरोटीच्या समस्येत त्यांना सदैव अडकवून ठेवतात, त्यांना कुठल्या न्यायालयाद्वारे कोणती शिक्षा का होत नाही, ज्या वेळी मुहम्मद यूनुस दुर्बलांसाठी झटत होते त्या वेळी सध्याच्या बांग्लादेशाचे पंतप्रधान जेलमध्ये होते. मुहम्मद यूनुस यांची चूक इतकीच होती की त्यांनी याच काळात एक राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार केला जर त्यांनी तसा पक्ष स्थापला असता तर शेख हसीनांचे राजकीय जीवन संपुष्टात आले असते. यूनुस यांनी नंतर कोण्ता राजकीय पक्ष न काढण्याचा निर्णय घेतला खरे, पण अशा व्यक्तीला जर बदनाम केले नाही आणि मोकाट सोडले तर हसीना वाजेद यांचे काय झाले असते? इतका हा प्रश्न आहे ज्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्याती आणि नोबेलविजेत्यांना जेलमध्ये डांबण्याची योजना आखली गेली.
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक, मो.: 9820121207
Post a Comment