(११२) अल्लाह एका वस्तीचे उदाहरण देत आहे. ती सुखासमाधानाचे जीवन व्यतीत करीत होती आणि चहूकडून तिला विपुल उपजीविका पोहचत होती की तिने अल्लाहच्या देणग्यांशी कृतघ्नता दर्शविण्यास प्रारंभ केला. तेव्हा अल्लाहने तिच्या रहिवाशांना त्यांच्या कृत्यांची फळे अशी चाखविली की भूक व भयाचे संकट त्यांच्यावर पसरले.
(११३) त्यांच्यापाशी स्वत: त्यांच्या लोकसमूहातूनच एक पैगंबर आला, परंतु त्यांनी त्याला खोटे लेखले. सरतेशेवटी त्यांना प्रकोपाने गाठले जेव्हा ते अत्याचारी बनलेले होते.३३
(११४) म्हणून हे लोकहो! अल्लाहने जी काही वैध आणि पवित्र उपजीविका तुम्हाला दिली आहे ती खा आणि अल्लाहच्या उपकाराबद्दल कृतज्ञ व्हा जर तुम्ही खरोखर त्याचीच बंदगी करणारे असाल.
३३) नगरीला नाव न उच्चारता उदाहरण म्हणून प्रस्तुत केलेले आहे. सदरहू भाष्यानुसार भय आणि भुकेचे जे अरिष्ट पसरण्याचा या ठिकाणी उल्लेख आहे त्याने, पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या नियुक्तीनंतर एका दीर्घ कालावधीपर्यंत जो दुष्काळ पसरला होता, तो अभिप्रेत आहे.
Post a Comment