भारतीय प्रजासत्ताक दिन' हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी फार महत्त्वाचा आहे. दरवर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून गणला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य. हा अधिकार भारताच्या राज्यघटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली प्रत्येक नागरिकाला मिळाला आणि प्रजेची सत्ता सुरु झाली. हा समस्त भारतीय जनतेच्या जीवनातील एक महत्त्वाचा, मौल्यवान तसेच भाग्याचा दिवस आहे. याचे कारण असे की, या दिवशी आपल्या देशाची एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून निर्मिती झाली. या देशातील अनेक वीररत्नांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. साम्राज्यवादी ब्रिटिश सरकारला या देशातून हद्दपार करून भारतीय जनतेला स्वातंत्र्य मिळवून दिले. या अहिंसक अशा स्वातंत्र्य लढ्यातील एक वैशिष्ट्य असे की, ब्रिटिश सरकारच्या पारतंत्र्याच्या बेडीतून समस्त भारतीयांची सुटका झाली आणि दुसरे वैशिष्ट्य असे की, या देशात सर्वसामान्य जनतेची, अर्थात प्रजेची, म्हणजेच लोकांची सत्ता प्रस्थापित झाली. लोकांनी लोकांसाठी लोकांचे राज्य स्थापन झाले. त्यासाठी देशाला एका बलदंड संविधानाची निर्मिती होणे आवश्यक होते, ही गरज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओळखली व संविधान निर्मितीची जबाबदारी स्वीकारली.
भारतीय संविधान म्हणजे भारतीय जनतेसाठी घालून दिलेली जणू आचारसंहिताच आहे. घटना समितीच्या अथक प्रयत्नांतून, घटनेचे प्रमुख शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विद्वतापूर्ण अध्ययन आणि भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करून तयार केलेल्या संविधानाच्या मसुद्यातून भारतीय संविधान जन्माला आले. इतर व्यक्ती, स्थळ, महात्मे,अशा कुठल्याही गोष्टींना महत्त्व न देता केवळ भारतीय नागरिकाना अर्थात या स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक जनतेला दिनांक २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान समर्पित करण्यात आले. आपल्या भारत देशाला प्रजासत्ताक देश म्हणून ओळख निर्माण झाली...ती या दिवसापासून. जगातील "सर्वोत्कृष्ट आणि विशाल असे संविधान" तयार झाले. जगभरातील लोकशाही देशांमध्ये भारतीय संविधानाची ख्याती आहे. इतकेच नाही तर सर्व कायदे, कलम आणि परीशिष्टांची विस्तृत मांडणी हेही भारतीय संविधानाचे जागतिक वैशिष्ट्य आहे. जगात इतके विस्तृत आणि स्पष्ट उल्लेखित संविधान कोणत्याही देशाजवळ नाही. आजपर्यंत या संविधानाची समीक्षा अनेक नामवंत व आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ञांनी केली आहे. भारतातील समाज व्यवस्थेचा व सर्वांगीण परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व भारतीयांना भारतीय संविधानात न्याय देण्यात आला आहे. सामान्यातील सामान्य माणूस असो किंवा अत्यंत उच्चपदस्थ व्यक्ती असो, प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी मांडणी भारतीय संविधानात करण्यात आली आहे.
संविधानाबरोबरच काही मूल्येही अस्तित्वात आली. स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता ही त्यातील काही महत्त्वाची मुल्ये होत. या देशातील संविधान अंमलात येण्याच्या आधी या देशात प्रचंड विषमता होती. अशा परिस्थितीत खरा एकसंघ समाज निर्माण होणे, हे मुख्य ध्येय संविधानकर्त्यांच्या मनात होते. या देशातील प्रत्येक नागरिकाला दुसऱ्याविषयी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा वाटला पाहिजे, दुसऱ्याचे जे सुख दुःख ते आपले सुख दुःख वाटले पाहिजे, इतरांचे यश ते आपले यश वाटलें पाहिजे, तरच या देशात लोकशाही समाजवादाची निर्मिती झाली असे म्हणता येईल. संविधानाचा मसुदा तयार करण्यात आला, त्या वेळी अशा उदात्त मूल्यांचा विचार करण्यात आला होता, या मूल्यांची जपणूक होण्याच्या दृष्टीने या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विचारमंथन होणे आवश्यक आहे.
या देशाचे संविधान निश्चितच श्रेष्ठ आहे. त्याला राबविणाऱ्यांना वठणीवर आणण्याची गरज आहे. ही जबाबदारी प्रत्येक भारतीयांची आहे. आपली कर्तव्य आणि जबाबदारी या भारतीयांनी नीटपणे सांभाळली तर देशाचे चित्र बदलू शकेल.
संविधानाकडे या देशातील विकासाचा दस्ताऐवज म्हणून पाहायला हवे! संविधानातील तरतुदी कागदावर न ठेवता प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करायला हवा! राजकीय नैतिकता आणण्याचा आग्रह धरायला हवा! वैज्ञानिक दृष्टी बाळगणे आणि त्या वैज्ञानिक दृष्टीचा प्रचार आणि प्रसार करणे हे संविधानानुसार (कलम ५१-क नुसार) प्रत्येक भारतीयांचे मूलभूत कर्तव्य आहे. संपत्तीचे समान वितरण करण्यासाठी संपत्तीची सीमा निर्धारित करायला हवी! निर्धारित सीमेपेक्षा जास्त संपत्ती ही सरकारी खजिन्यात जमा करायला हवी! मग ती उद्योगपतींची असो, राजकारण्यांची असो, की मंदिर ट्रस्टची असो!
देश विज्ञानाच्या बळावर महासत्ता बनू शकतो. भारतात मानसिकता बदलण्याची गरज आहे. माणूस बदलला तर देशही बदलेल. देशाचा विकास होईल.
भारतीय संविधानातील कायदे आजच्याही परिस्थितीशी साधर्म्य साधणारे आहेत. आजच्या निर्माण झालेल्या परिस्थितीला बदलण्याची ताकत त्यांच्यात आहे. त्या कायद्यांचा वापर कसा करायचा याचा कृतिकार्यक्रम बनविण्याची गरज आहे.
सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे प्रजासत्ताक दिन हा आपल्या अस्मितेचा विषय झाला पाहिजे, हा दिवस राष्ट्रीय महोत्सव म्हणून साजरा केला पाहिजे, देशाची लोकशाही समाजवादाची प्रेरकशक्ती म्हणून भारतीय संविधानाकडे पाहिले गेले पाहिजे, मात्र दुर्दैवाने असे घडताना दिसत नाही, भारतातील बहुसंख्य जनता ही 'प्रजासत्ताक दिन' म्हणजे सुट्टी साजरी करण्याचा दिवस म्हणून पाहतात. या दिवशी मौजमजा, चैन करण्यात आनंद मानणारी मानसिकता वाढीस लागली आहे. अनेक सामाजिक व राजकीय प्रश्नांच्या बाबतीत सुद्धा हीच मानसिकता वाढीस लागली आहे. मग हेच काय प्रजासत्ताक राष्ट्राचे स्वरुप, असा प्रश्न मनात उपस्थित होतो. देशातील भ्रष्टाचाराचे स्वरूप दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रूप घेते आहे, भ्रष्टाचाराचा राक्षस सामान्य जनतेला गिळंकृत करीत आहे, यामुळे सामान्य जनतेचा घटना आणि लोकशाही या दोन्ही वरील विश्वास कमी होत चालला आहे, त्यामुळे देशातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात देशाचे फार मोठे नुकसान होत आहे.
धर्मधर्मातील व जातीजातीतील द्वेष वाढत चालले आहेत. त्यातून माणसा माणसांत व समाजा समाजांत फार मोठी दरी निर्माण झाली आहे. याशिवाय स्त्रियांवरील अन्याय व अत्याचार, वाढती महागाई, वाढते दारिद्र्य, बेसुमार बेरोजगारी यांसारख्या अनेक समस्यांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. कायदे पालनाबाबत कमालीची उदासीनता दिसून येत आहे. याकरिता प्रत्येक भारतीयाने संविधानाविषयी आदर व अभिमान बाळगून राज्य घटनेचे गांभीर्य ओळखून पालन केले पाहिजे.
- डॉ. सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)
Post a Comment