ईस्ट इंडिया कंपनी आणि त्याच्या साथीदारांच्या कारस्थानांविरुद्ध आणि दक्षिण भारतातील विस्ताराच्या ब्रिटिशांच्या महत्त्वाकांक्षेला आळा घालण्यासाठी आणि त्यांच्याशी अविरत लढा देण्यासाठी 'दक्षिण भारताचा नेपोलियन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या हैदर अली यांचा जन्म १७२२ मध्ये कर्नाटक राज्यातील देवनहळ्ळी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव फतेह मोहम्मद अली आणि आईचे नाव मुजीदान बेगम होते. त्यांनी कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नसले तरी त्यांनी मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले होते.
हैदर अली बुद्धीने तीक्ष्ण, इच्छाशक्तीने कणखर, एकाच वेळी अनेक कामे हाताळण्यास सक्षम आणि मनापासून शूर होते. १७४९ मध्ये म्हैसूर संस्थानाचा तरुण सैनिक म्हणून त्यांनी देवनहळ्ळी युद्धात भाग घेतला होता. त्यांच्या शौर्याची दखल घेऊन म्हैसूर राज्याचे मंत्री नंजाराज यांनी हैदर अली यांना 'खान' ही पदवी देऊन सन्मानित केले आणि म्हैसूर सैन्यातील बटालियनचे प्रमुख म्हणून पदोन्नती दिली.
हैदर अली हळूहळू १७५८ मध्ये म्हैसूर सैन्याचा कमांडर-इन-चीफ बनले. पुढे ते म्हैसूरचे शासक झाले. हैदर अली धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी सर्व धर्मियांना समान वागणूक दिली. मराठे आणि हैदराबादच्या निजामाला हैदर अली यांच्या यशाचा आणि लोकांमध्ये त्यांच्या प्रतिष्ठेचा हेवा वाटू लागला. ईस्ट इंडिया कंपनीच्या मदतीने त्यांनी म्हैसूरवर अनेकदा हल्ला केला. हैदर अली यांना सुरुवातीचे नुकसान झाले असले तरी त्यांनी यशस्वी प्रतिकार केला आणि ईस्ट इंडिया कंपनीसाठी आभासी दु:स्वप्न सिद्ध केले.
त्यानंतरही ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हैदर अलीला पुन्हा चिथावणी दिली ज्यामुळे जुलै १७८० मध्ये दुसरे म्हैसूर युद्ध झाले. ते आपला मुलगा टिपू सुलतानसोबत रणांगणावर गेले. हैदर अली यांनी आर्कोट काबीज केले, तर त्याचा मुलगा टिपूने ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याचा पराभव करून मद्रासपासून सुमारे ५० मैलांवर असलेल्या कांजीवरमवर ताबा मिळवला. यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्जला धक्का बसला. त्याने ताबडतोब कलकत्ता, मद्रास येथून आपले कमांडर जनरल सर आयर कूटे यांच्या नियंत्रणाखाली मुबलक निधीसह अतिरिक्त सैन्य पाठवले.
हैदर अलींना एकीकडे परकीय शत्रूशी लढावे लागले तर दुसरीकडे निजामाच्या सक्रीय पाठिंब्यासह त्यांच्याविरुद्ध बंड करणाऱ्या मलबार नायर आणि सरदारांना हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी चांगलाच धडा शिकवला.
हैदर अली आपल्या सैन्याला सलग विजयाकडे नेत असताना आजारी पडले आणि ७ डिसेंबर १७८२ रोजी नरसिंगरायुनी पेटा गावाजवळ, जे आता आंध्र प्रदेशातील चितूर जिल्ह्यात आहे, युद्धभूमीत मरण पावले.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment