मराठा आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा जाहीर पाठींबा असून, त्यासाठी सर्वोतोपरी मदतही करणे सुरू आहे. मराठा आरक्षण पदयात्रा बाराबाभळी (जि. अहमदनगर) येथे रविवारी मुक्कामी होती. मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी मुस्लीम समाजाने मदरशाची 85 एकर जागा सभेसाठी उपलब्ध करून देत सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे.
बाराबाभळी येथे दीडशे एकरवर मुक्कामाची व्यवस्था होती. त्यापैकी 85 एकर जागा ही मदरशाची आहे. जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मदरशातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनीही सेवा दिली असे, मदरशाचे विश्वस्त मतीन सय्यद यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चातही मुस्लीम समाजाच्यावतीने पाणी, सरबत वाटप करण्यात आले होते.
मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील व त्यांना साथ देणाऱ्या सर्वांचे जामिया मुहम्मदीया मदरसा यांच्यातर्फे स्वागत करणारा फलकही लावण्यात आला होता. चेअरमन शेख आसिफ रफिक, सेक्रेटरी सय्यद मतीन ख्वाजा, नदीमोद्दीन प्राचार्यकारी मोहम्मद शादाब यांनी पदयात्रेचे स्वागत केले. मदरसा परिसरात मनोज जरांगे पाटील यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या राहणे आणि जेवणाचीही व्यवस्था केली गेली. पदयात्रेत महिलांचा सहभाग आहे. त्यामुळे मदरशातील वसतिगृहामध्ये एक हजार महिलांची झोपण्याची व्यवस्था विश्वस्तांनी केली होती.रविवारी रात्री मराठा बांधवांनी याच मैदानावर भोजनही घेतले, तेथेही मदरशातील विद्यार्थ्यांनी सेवा दिली. याशिवाय मदरसा परिसरात भगवे झेंडे लावण्यासाठीही परवानगी देण्यात आली होती.
मनोज जरांगे पाटील यांना मदरशाच्या विश्वस्तांनी मराठी कुरआनची प्रतही यावेळी भेट दिली. विश्वस्त मतीन सय्यद म्हणाले, मराठा आरक्षणासाठी आमचा सदैव पाठींबा आहे. मदरशातील जरांगे पाटील यांच्या मुक्कामाचे आणि आयोजकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुस्लिम आरक्षणासाठीही लढा उभारणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
- बशीर शेख
Post a Comment