ज्ञान संपादन करणे हे माणूस असण्याचे लक्षण आहे. माणसाच्या जीवनात सर्वांत महत्त्वाचा टप्पा हा शैक्षणिक टप्पा असतो. शिक्षण पूर्ण करणे किंवा पदव्या मिळवणे ही ज्ञान संपादनाची एक पायरी असू शकते. पण माणूस आयुष्यभर ज्ञानाची तहान भागवत असतो. अगदी जन्मापासून मरेपर्यंत तो काही ना काही शिकत असतो. आयुष्य सुखकर व्हावे, मनःशांती मिळावी, संकटांना सामोरे जाता यावे किंवा समाजासाठी काही तरी करावे या उद्देशाने लोक ज्ञान मिळवतात. अगदी लहान मूल जेव्हा बोलणे शिकते तेव्हा त्याचा उद्देशही हाच असतो की त्याचे म्हणणे इतरांना समजावे आणि त्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात. निसर्गनिर्मात्याने मानवाची निर्मितीच अशी केली आहे की त्याने नेहमी ज्ञानाचे भुकेले बनून राहावे, त्यासाठी धडपड करावी.
आज मानवाने प्रत्येक क्षेत्रात एवढी प्रगती केली आहे, विज्ञान एवढे पुढे गेले आहे की प्रत्येक तथ्य पारखण्यासाठी हजारो स्त्रोत उपलब्ध आहेत. पण असे कितीतरी तथ्ये आहेत ज्याचा उलगडा करण्यासाठी विज्ञान कमी पडते किंवा शास्त्रज्ञ त्यासाठी आपली हिंमत दाखवत नाहीत. परंतु यापेक्षाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानाचा मूळ स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कित्येक गोष्टींचा उद्गम हा कुरआनमध्ये सापडतो. दीड हजार वर्षांपूर्वीच्या या धर्मग्रंथाचा आधार घेऊन कितीतरी संशोधने झाली आणि विज्ञानाच्या अनेक संशोधनाचा पाया रचला गेला. ही वेगळी गोष्ट आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे प्रत्यक्षपणे अध्यात्मिक किंवा धार्मिकतेचे बोट धरून चालत नाहीत. पण या गोष्टीला अमान्य कोणी करू शकत नाही की ज्या गोष्टी विज्ञानाने आज प्रयोगाअंती सिद्ध करून दाखवल्या आहेत त्यांचा उल्लेख आधीच या कुरआनमध्ये कशा ना कशा पद्धतीने आलेला आहे.
हीच उत्सुकता मला जेव्हा वनस्पतीशास्त्राविषयी वाटली तेव्हा मी कुरआनमध्ये याबद्दल काय उल्लेखित आहे याचा अभ्यास सुरू केला आणि मला भरपूर गोष्टी सापडल्या ज्या मी या लेखमालिकेद्वारे आपल्यासमोर मांडू इच्छितो.
जीवन हे माणसाला मिळालेली एक अनमोल देणगी आहे. या जीवनात विविध शास्त्रांचा अभ्यास करताना जर जीवशास्त्राचा अभ्यास सोडला तर विज्ञान अपूर्ण राहून जाईल. जीवशास्त्र ही विज्ञानाची अशी शाखा आहे ज्यामध्ये सजीवांचा अभ्यास केला जातो. यालाच जैवविविधता किंवा जीवविज्ञानही म्हटले जाते. जीवशास्त्राच्या असंख्य शाखांपैकी वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र या मुख्य शाखा आहेत. वाढ होणे, विकास होणे आणि प्रजनन करणे याबरोबरच शरीरात होणाऱ्या चयापचयेच्या रासायनिक क्रिया हे सजीवाचे गुणधर्म वनस्पतींमध्ये आढळतात आणि म्हणूनच वनस्पतींचा समावेश सजीवांमध्ये होतो. वनस्पतींचा शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे वनस्पतीशास्त्र किंवा वानसशास्त्र.
माणसाच्या आयुष्यात वनस्पतींचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. माणसाच्या मूलभूत गरजांची पूर्तता या वनस्पतींपासूनच होते असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. निसर्गकर्त्याने त्यांना आपल्यासाठी नैसर्गिक देणगीच्या रूपात अवतरित केले असल्याने त्यांच्या अभ्यासाचे मार्गदर्शन ही अवतरले आहे. या मार्गदर्शनाच्या अभावी माणूस त्याचा उपयोग करूच शकला नसता.
वनस्पतींची विविधता, शेतीच्या स्वरूपात त्यांची उपयोगिता आणि त्या शेतीसाठी लागणारे पोषक वातावरण जसे की पाऊस याबद्दल मार्गदर्शन करताना निसर्गकर्त्याकडून उदाहरणांसमेत मार्गदर्शन कुरआनमध्ये अध्याय अनआमच्या ९९ व्या आयतीत केले आहे.
"आणि तोच आहे ज्याने आकाशातून पाण्याचा वर्षाव केला. मग त्याद्वारे सर्व प्रकारच्या वनस्पती उगवल्या. मग त्याद्वारे हिरवीगार शेते व झाडे उगविली, मग त्याच्यापासून थरावर थर असलेले दाणे काढले आणि खजुराच्या फुलोऱ्यातून फळांचे घोसच्या घोस उत्पन्न केले जे ओझापायी झुकले जात आहेत आणि द्राक्षे, जैतून (ऑलिव्ह) व डाळिंबाच्या बागा ज्यांची फळे एक दुसऱ्याशी साम्य तर ठेवतात तरीसुद्धा त्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. या झाडांना जेव्हा फळे येतात तेव्हा फळे येण्याची व मग ती पिकण्याची प्रक्रिया जरा विचारपूर्वक पाहा, या गोष्टी संकेत आहेत त्या लोकांसाठी जे श्रद्धा ठेवतात."
या आयतीला विस्तृत करताना लक्षात येते की वनस्पतीशास्त्राच्या अनेक शाखांना एकत्रित प्रस्तुत केले आहे. सर्वांत प्रथम, वनस्पती कशा तयार झाल्या म्हणजे वनस्पतींची उत्क्रांती (Evolution) या विषयाला हात घातला आहे आणि त्या उत्क्रांतीने निर्माण न होता त्यांचा निर्माणकर्ता तोच म्हणजे अल्लाह असल्याची शाश्वती दिली आहे.
(क्रमश:)
- हर्षदीप बी. सरतापे
मो. ७५०७१५३१०६
Post a Comment