मक्का येथील अनेकेश्वरवादी आपल्या काल्पनिक देवतांना प्रसन्न करण्यासाठी दोन कामे करायचे. एक तर हे की देवताच्या नावावर एखादा प्राणी नियुक्त करून त्याला सोडून द्यायचे. मग तो कुठेही हिंडत-फिरत असे. कुठेही तोंड मारून खात-पित असे. त्याला कुणीही रोखत नसे. यामागे लोकांची अशी समजूत होती की याद्वारे आमचा देव आमच्यावर प्रसन्न होईल आणि आमच्यावर कृपा करेल. गरजेच्या वेळी आम्हाला मदत करेल व आमच्या कुटुंबात व संपत्तीत बरकत देईल. तसेच आमचे आजार व दुःख दूर करेल. अशा प्राण्यांबद्दल त्यांची ही श्रध्दा होती की ते खाण्यासाठी वापरणे किंवा त्यांच्या दुधाचा उपयोग करणे वैध नाही. त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारे लाभ घेण्याला ते हराम मानत असत. जर आपण या प्राण्याचा कोणत्याही प्रकारे उपभोग घेतला किंवा त्याचे काही नुकसान केले तर आपला देव आपल्यावर रागावेल आणि त्याचा प्रकोप होईल अशी भीती त्यांना वाटत होती. तर हे अनेकेश्वरवादी केवळ त्यांच्या भ्रामक आणि व्यर्थ कल्पनांमुळे निसर्गकर्त्याने हलाल ठरवलेल्या म्हणजे वैध केलेल्या गोष्टींना हराम ठरवायचे. ज्याचा कुणालाही मुळीच अधिकार नाही. आपल्या निर्मितीसाठी काय वैध व काय अवैध आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त त्याच्या निर्मात्याचा आहे. त्याच्या अधिकार क्षेत्रात कुणाला सामील करणे सर्वात मोठे पाप आहे.
दुसरे हे की दुःखातून मुक्त होण्यासाठी किंवा एखाद्या कामात यश मिळविण्यासाठी अनेकेश्वरवादी आपल्या काल्पनिक देवतांना नवस बोलायचे. ते म्हणायचे की जर आमचे हे काम झाले किंवा हा त्रास टळला तर आम्ही अमुक देवस्थानाला प्रसाद म्हणून सोने-चांदी, रोख रक्कम, कापड व धान्य अर्पण करू, किंवा एखाद्या प्राण्याचा बळी चढवू, किंवा ते तिथे न देता गरिबांमध्ये वाटून देऊ. कधी ते हेही करायचे की त्यांच्या संपत्तीत आणि गुरांमध्ये त्यांच्या देवांचा वाटा ठरवत असत. या नवसांच्या बाबतीत बहुदेववाद्यांची अशी धारणा होती की ते खाणे किंवा वापरणे योग्य व अनुज्ञेय आहे.
मक्केतील अनेकेश्वरवाद्यांच्या या दोन्ही चालीरीतीसंबंधी अल्लाहने म्हटले आहे की,
या’अय्युहन्नासु कुलू मिम्मा फिल्-अर्जि हलालन तय्यिबन, वला तत्तबिऊ खुतुवातिश्-शयतानि, इन्नहु लकुम् अदुव्वुम-मुबीनुन.
अनुवाद :- लोकहो! जमीनीमध्ये ज्या वैध आणि शुद्ध गोष्टी आहेत त्यांचे सेवन करा, आणि सैतानाच्या पाऊलवाटेचे अनुसरण करू नका, निःसंशय तो तुमचा उघड शत्रू आहे.
( 2 अल्-बकरह : 168 )
म्हणजे ज्या गोष्टींना तुम्ही स्वतःसाठी हराम म्हणजे निषिद्ध ठरवल्या आहेत तुमच्या निर्मात्याच्या दृष्टीने त्या हलाल आणि शुद्ध आहेत, त्या खा; आणि अल्लाहच्या व्यतिरिक्त इतरांच्या प्रसन्नतेसाठी आणि उपासनेसाठी तुम्ही जे नवस बोलता आणि ज्यांना तुम्ही हलाल समजता, ते खाणे तुमच्यासाठी निश्चितच हराम आहेत.
या आयतीच्या संदर्भात मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी (र) यांनी लिहिले आहे की, खाण्या-पिण्याच्या बाबतीत अंधश्रद्धा आणि अज्ञानावर आधारित लादली गेलेली कर्मकांडांची सर्व बंधने मोडून काढा. (तफ्हीमुल कुरआन). या आयतीच्या संदर्भात स्पष्टीकरण करतांना मौलाना अब्दुल माजिद दर्याबादी (र) यांनी लिहिले आहे की,’म्हणजे त्यांच्या खाण्या-पिण्याची पुर्णपणे परवानगी आहे. आज्ञा नाही. म्हणजे ते खाणे अनिवार्य नाही.’( तफ्सिर ए माजिदी )
खाण्या-पिण्याच्या बाबतीत लोकांमध्ये असंतुलित वृत्ती दिसून येते. विश्व निर्मात्याने ज्या गोष्टींना मनाई केली आहे, त्यांच्या बाबतीत लोकांमध्ये विचारशून्यता आणि निष्काळजीपणा दिसून येतो. लोक हरामखोरीला वैध मानून त्यावर आनंदाने जगतात आणि ज्या गोष्टी विश्व निर्मात्याने वैध केल्या आहेत त्यांना मनाई करतात. इतरांची संपत्ती हडप करताना, ’लाच’ खाताना, त्यांना कसलीही ’लाज’ वाटत नाही. व्याजावर आधारित व्यवसाय चालवण्यात आणि त्यातून गरजूंचे रक्त शोषून घेण्यात त्यांना मजा वाटते. हव्यासापोटी भ्रष्टाचारातून कमावलेल्या संपत्तीने त्यांचे भरलेले पोट पृथ्वीच्या गोलाशी स्पर्धा करताना दिसते. अशीच माणसे ईश्वराने वैध केलेल्या ’खाण्याच्या’ गोष्टींना अवैध घोषित करतात आणि निर्मात्याने अवैध ठरवलेल्या ’पिण्याच्या’ गोष्टींना वैध म्हणून मान्यता देतात.
.......................... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment