प्रेरणादायी सत्यकथा
ही कथा एका अशा मुलाची आहे जो लहान वयातच अनाथ झाला होता. वडिलांचे निधन झाल्यानंतर आई व आजोबांनी त्याचा सांभाळ केला. त्याने खूप शिकावे, ज्ञानी व्हावे, अशी त्याच्या आईची इच्छा होती. बालपणापासूनच आईने त्याला चांगले शिक्षण द्यायचे ठरवले. मुलगाही फार हुशार होता. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षण मिळवण्यासाठी परदेशात निघाला.
त्या काळात बगदाद हे ज्ञानाचे माहेरघर समजले जायचे. उच्च शिक्षण मिळवण्यासाठी दूरदूरून विद्यार्थी तेथे येत असत. वाळवंटी प्रदेश, पायी प्रवास करण्याच्या तयारीने, हा नवतरुणही बगदादला जायला निघाला. तेव्हा त्याच्या आईने त्याला चाळीस दिनार दिले. दिनार सुरक्षित राहावेत म्हणून आईने शर्टाच्या बगलेत आतल्या बाजूने ठेवून शिवून घेतले. दिनार इतके सुरक्षित होते की बाहेरून कोणालाही त्याचा पत्ता लागत नव्हता.
प्रवासाला निघताना आई म्हणाली, "हे बघ बेटा, मी तुला नेहमी सत्य बोलण्याचा सल्ला देते. कितीही कठीण प्रसंग आला तरी कधीही खोटे बोलू नकोस. खोटे बोलणे हे मोठे पाप आहे."
आईचा निरोप घेऊन नवतरुण काफिल्यासोबत बगदादकडे रवाना झाला. हा ताफा 'हमदान' येथून पुढे निघाला असता अचानक दरोडेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी काफिल्याची सर्व मालमत्ता लुटली; पण त्या मुलाकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही.
थोड्या वेळाने एक दरोडेखोर मुलाकडे आला आणि सहज त्याला विचारले, "तुझ्याकडे काय आहे?"
मुलाने सांगितले, "माझ्याकडे चाळीस दिनार आहेत."
सर्व जण आपली मालमत्ता वाचवण्याचा प्रयत्न करत असताना हा मुलगा सहज सांगतोय 'माझ्याकडे चाळीस दिनार आहेत!' तेव्हा दरोडेखोराला वाटले, हा उगाचच मस्करी करतो आहे. त्याच्याकडे जास्त लक्ष न देता तो पुढे निघून गेला.
त्यानंतर दुसरा दरोडेखोर आला, त्यानेही तोच प्रश्न केला. त्यालाही मुलाने सत्य सांगितले; पण त्यालाही वाटले हा मुलगा विनोद करतोय आणि तो निघून गेला. दोघांनी जाऊन ही घटना त्यांच्या प्रमुखाला सांगितली. सरदाराने त्यांना मुलाकडे पाठवले आणि ते मुलाला सरदाराकडे घेऊन गेले.
दरोडेखोर एका टेकडीवर बसून लुटलेल्या मालाची वाटणी करत होते. सरदाराने मुलाकडे पाहिले आणि विचारले, "खरे सांग, तुझ्याकडे काय आहे?"
मुलगा म्हणाला, "चाळीस दिनार आहेत."
सरदारने विचारले, "ते कुठे आहेत?"
मुलगा म्हणाला, "ते काखेखाली शर्टाच्या आत शिवलेले आहेत."
सरदारने मुलाचे शर्ट काढून उसवून पाहिले. खरोखरच त्यात चाळीस दिनार होते. आश्चर्यचकित होऊन सरदार म्हणाला, "आम्ही दरोडेखोर आहोत आणि जी काही संपत्ती मिळेल ती लुटतो. हे तुला माहीत आहे ना? मग तू आमच्यापासून हे लपवून का ठेवले नाहीस?"
मुलगा म्हणाला,"माझ्या आईने मला निरोप देताना मला सल्ला दिला होता की, नेहमी खरे बोलले पाहिजे. वाईट प्रसंग आला तरी खोटे बोलू नये. मग मी या चाळीस दिनारांसाठी खोटे कसे बोलू शकेन?"
हे ऐकून सरदार अंतर्मुख झाला. तो इतका भारावला की त्याच्या डोळ्यांत पाणी आले. त्याने एक थंड उसासा टाकला आणि म्हणाला, "अरे! तू तुझ्या आईचे शब्द पूर्ण केलेस आणि मी.... इतके दिवस अल्लाहला दिलेले वचन मोडत आहे. त्याच्या भक्तांना लुटत आहे."
असे म्हणत त्याने मान खाली घातली. आपल्या पापांचा प्रायश्चित्त करू लागला. दरोडेखोरीचा त्याग करण्याची घोषणा केली. तो आपल्या साथीदारांना म्हणाला, "तुम्ही स्वतंत्र आहात. मी हा मार्ग सोडला"
त्याच्या साथीदारांनी ही परिस्थिती पाहिली आणि त्याला म्हणाले, "तू दरोडेखोरीत आमचा नेता होता, आता तू बदललास, प्रायश्चित करून सत्मार्गाला लागलास. या मार्गातही तू आमचा सर्वांचा नेता आहेस. आम्हीदेखील हा मार्ग सोडतो."
सर्व दरोडेखोरांनी पश्चात्ताप केला आणि काफिल्याची सर्व मालमत्ता परत केली.
हे नवतरुण होते अब्दुल कादर रह. इराक मधील 'जीलान' या शहरात त्यांचा जन्म झाला होता. त्यावरून त्यांचे नाव अब्दुल कादर जीलानी (रह.) असे पडले. त्यांच्या एका सत्य बोलण्याने दरोडेखोरांनी सत्मार्ग स्वीकारला. खरोखरच सत्याची शक्ती अपरंपार आहे.
-सय्यद झाकीर अली
परभणी, 9028065881
Post a Comment