Halloween Costume ideas 2015

शेती व्यवसाय नियोजनबद्ध करावा


भारत हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो. भारतातील शेती अत्यंत सुपीक आहे. अर्थात त्यामुळे भारतीय लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. या देशात अगदी प्राचीन काळापासून कृषीसंस्कृतीला महत्त्व देण्यात आले आहे. या देशांतील सर्व सण उत्सव हे कृषीसंस्कृतीशी निगडित आहेत. अलिकडच्या काळात अत्यंत प्रगत, नियोजनबद्ध व आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. शेती हा उत्तम व्यवसाय म्हणून करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातात. तरीही म्हणावे तेवढे यश येत नाही, या पार्श्वभूमीवर व्यवसायात लागणारे कौशल्य, कष्ट व नियोजन तसेच दूरदृष्टीने निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

स्वतः शेतकरी, शासनाचा कृषी विभाग, जलसंपदा विभाग तसेच पाटबंधारे विभागाने परस्पर सहकार्याने योग्य व नियोजनबद्ध शेती व्यवसाय म्हणून केल्यास शेतीतून प्रचंड प्रमाणात विविध धनधान्य व फळफळावळ यांचे उत्पादन मिळू शकते.

पावसाळ्यात मृग नक्षत्र निघण्यापूर्वी शेतकऱ्यांनी अंतर्गत मशागतीची कामे पूर्ण केली पाहिजेत. मात्र ही अंतर्गत मशागतीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होत नाहीत, अंतर्गत मशागतीत नियोजनाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे खरीप हंगामातील पिके व अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही.

निर्धारित वेळेत शेतीची नांगरणी आवश्यक

पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करतात. पावसाळ्यात सुर्य दर्शन बहुधा कमी होत असते. त्यामुळे नांगरलेल्या शेतातील मातीला उन्हाचा स्पर्श जेवढा व्हावयास हवा, तेवढा होत नाही. त्यामुळे माती कसरहीत राहते. याकरिता शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी एक दोन महिने अगोदर संपूर्ण शेताची नांगरणी करून घ्यावी, म्हणजे खालची माती वर येऊन तीला आवश्यक तेवढा सुर्यप्रकाश मिळून संपूर्ण माती भाजून निघेल व तिच्यामध्ये कसदारपणा येईल. नांगरलेल्या किंवा वखरलेल्या मातीला पुरेशा प्रमाणात उन्हाचा तडाखा बसणे अत्यंत आवश्यक असते.

तलावातील किंवा धरणातील गाळ पसरला तर जमिनीचा पोत सुधारतो व उत्तम सुपीकता टिकून राहते.

उन्हाळ्यात तलाव व धरण क्षेत्र कोरडे पडते, अशावेळी तलावातील व धरणातील गाळ विनामूल्य काढून नेण्यासाठी आवाहन केले जाते.हा गाळ शेतात पसरला आणि तो शेतातील मातीशी एकरूप झाला तर सेंद्रिय खतांच्या अधिक लाभदायक होतो, त्यामुळे शेतातील माती अधिक कसदार होते व भरघोस उत्पादन मिळते,असा अनुभव आहे.

नांगरणी, वखरणी व कोळपणी योग्य प्रकारे होते, महत्वाचे...

नांगरणी, वखरणी व कोळपणी ही शेतीची महत्वाची कामे होत. ती योग्य प्रकारे व वेळेत होणे आवश्यक असते, या साठी शेतकरी वर्गाला दक्ष राहावे लागते.नांगरणी झाल्यावर मातीतील ढेकळे व्यवस्थित फोडून पसरली पाहिजे,  

वारंवार वाढणारे तण काढण्यासाठी वेळेवर भांगलण करायला हवी...

शेतातील उभ्या पिकांची योग्य वाढ व्हावी व दिलेल्या खतांची योग्य ती मात्रा त्यांना व्यवस्थित व प्रमाणात मिळावी, याकरिता शेतात वारंवार उगवणारे गवत व इतर वनस्पती म्हणजे तण वेळीच काढले जावे, यासाठी वेळेवर भांगलण करायला हवी. हल्ली तणनाशके ही वापरली जातात, पण त्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यानेच ते वापरावे, अन्यथा शेताचा पोत खराब होतो, पुढे उत्पादन घटू शकते.

पाण्याचे नियोजन महत्त्वाचे...

जर पर्जन्यमान पुरेसे झाले नाही, किंवा पावसाने दगा दिला तर शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या पाण्याच्या नियोजनासाठी अगोदरच प्रयत्न करावा लागतो. अन्यथा ऐनवेळी आभाळाकडे डोळे लावून बसावे लागते, शिवाय शेतकरी त्यामुळे हवालदिल होतो, म्हणून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असते.

मशागत व पेरणीचे नियोजन महत्त्वाचे...

"जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग नासला.." असं म्हणतात, हे सुभाषित शेतकऱ्यांच्या जीवनात तंतोतंत लागू पडते,कारण शेतकऱ्यांने शेतमजूर, सालगडी, किंवा बटाईदार यांच्या भरवशावर शेतीचे उत्पादन वाढेल किंवा भरघोस उत्पादन येईल, असे समजून स्वस्थ न बसता स्वतः जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे, प्रसंगी स्वतः शेतमालकाने शेतीची मशागत, पेरणी, चांगले व कसदार बी बियाणे, तसेच सेंद्रिय व रासायनिक खते तसेच खतांची मात्रा याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याकरिता सुसूत्र असे नियोजन महत्त्वाचे असते.

शासनाचे शेती अधिकारी, व शेती तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घ्यावे...

शेतीची आंतरमशागत व बाह्य मशागत याबाबत शेतकऱ्यांने जागरूक असले पाहिजे. शासनाचे शेती अधिकारी आणि शेतीतज्ञ यांचे आवश्यक त्या वेळी मार्गदर्शन घ्यावे. शासनाचे शेती अधिकारी त्यासाठीच नेमलेले असतात, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील रहावे...

शेती किफायतशीर व फायदेशीर झाली तरच या देशातील शेती आणि शेतकरी टिकणार आहे, तेंव्हा शासनाने सुध्दा शेतकऱ्यांना उत्कृष्ट बी बियाणे व खते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, तसेच पीक कर्ज व खावटी कर्ज माफक व्याजाने व कमीत कमी वेळेत देणे गरजेचे असते,  शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध सवलती व प्रशिक्षण याची ही तरतूद करावी. शासनाने शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत, मार्गदर्शन व सहकार्य करून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील रहावे.


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget