हजरत हुजैफा म्हणतात, प्रेषित मुहम्मद (स) यांनी ताकीद दिली की रेशीमाची वस्त्रे परिधान करू नका. तसेच सोन्या-चांदीच्या भांड्यामध्ये पाणी पिऊ नका आणि जेवण करू नका. कारण या वस्तू जगात फक्त नाकारणाऱ्यांसाठी आहेत आणि तुमच्यासाठी परलोकात असतील. (बुखारी, मुस्लिम)
हजरत अम्र बिन शुएब (र) म्हणतात की प्रेषित मुहम्मद (स) यांचे विधान आहे की खा, प्या, दानधर्म करा आणि चांगली वस्त्रे परिधान करा पण यामध्ये काही अतिरेक करू नका. (अहमद, निसाई, इब्ने माजा)
प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, पांढरी वस्त्रे परिधान करा कारण ते जास्त स्वच्छ आणि चांगले दिसतात आणि आपल्या मयतांचा पांढऱ्या कपड्यांच्याच कफनमध्ये अंत्यविधी करा. (अहमद, तिर्मिजी, निसाई, इब्ने माजा)
हजरत आयेशा म्हणतात की एकदा अस्मा बिन्त अबू बकर प्रेषितांच्या सेवेत पातळ कापडाच्या वस्त्रात हजर झाल्या. प्रेषितांनी त्यांच्याकडून आपला चेहरा दुसरीकडे वळवला आणि म्हणाले की स्त्री तरुण वयात आल्यानंतर तर त्यांच्या शरीराचा कोणताही अवयव इतरांना दिसू नये, फक्त चेहरा आणि हात वगळून. (अबू दाउद)
प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले की माझ्या समुदायातील महिलांना सोने आणि रेशम वैध आहे पण पुरुषांसाठी निषिद्ध आहे. (तिर्मिजी, निसाई)
प्रेषित मुहम्मद (स) म्हणाले, अल्लहाने तुमच्यावर काही गोष्टी अनिवार्य केल्या आहेत त्या वाया घालवू नका. तसेच काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत त्यांचे उल्लंघन करू नका. त्याने तुमच्यासाठी बऱ्याच वस्तू निषिद्ध केल्या आहेत त्यांच्याजवळ देखील जाऊ नका आणि काही इतर वस्तूंविषयी अल्लाहने मौन बाळगले आहे. ही तुमच्यावर अल्लाहची कृपा आहे. तुम्ही अशा गोष्टींचा उहापोह करू नका. (अबू सआलबा खुर्रम, अद्दारकितनी)
- संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
Post a Comment