बिल्कीस बानोच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर एका वर्तमानपत्राशी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सांगितले की आज खऱ्या अर्थाने माझ्यासाठी नवीन वर्षाचा दिवस आहे. मी आज आनंदाचे अश्रू ढाळत आहे. गेल्या दीड वर्षात मी आज पहिल्यांदा हसत आहे. माझ्या मुलांना जवळ घेत आहे. यासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत आहे, कारण या निकालाद्वारे न्यायालयाने सर्वांसाठी समान न्यायाचे जे आश्वासन दिले आहे ते आज प्रत्यक्षात दिसत आहे.
बिल्कीस बानो यांनी म्हटले आहे की माझ्या छातीवरून डोंगराएवढा एक दगड कुणीतरी काढून टाकला असे मला वाटत आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने न्याय म्हणजे काय याची जाणीव माझ्यात निर्माण झाली आहे. बिल्कीस बानोचे प्रकरण भारतीयच नव्हे तर जगभरातील लोकांना कमी-अधीस माहिती असेलच. ३ मार्च २००२ तारखेला गुजरातमधील दंगलीच्या वेळी ही घटना घडली होती. २१ वर्षीय बिल्कीससह तिच्या परिवारावर हिंसक जमावाने हल्ला केला. बिल्कीस बानोच्या तीन वर्षांच्या चिमुकलीला जमिनीवर आपटून मारून टाकण्यात आले. बाकीच्या कुटुंबियांचे रक्त सांडले. ५ महिन्यांच्या गर्भवती बिल्कीसवर १० लोकांनी बलात्कार केला. शेवटी ती मरण पावली म्हणून तिला सोडून संस्कारी बलात्कारी तिथून निघून गेले. हा खटला गुजरातमधून महाराष्ट्रात हलवण्यात आला कारण गुजरातमधील पोलीस आणि इतर लोकांनी खटल्यात बऱ्याच त्रुटी केल्याचे आढळून आले होते.
आज बरोबर २० वर्षांनी बिल्कीस बानो यांना न्याय मिळत आहे. पूर्वी न्यायालयाने संस्कारींना जन्मठेपेची शिक्षा दिली होती, पण बऱ्याच युक्त्या लढवून गुजरात सरकारने या सगळ्या बलात्कारींना माफ करून त्यांना सोडून दिले होते. २० वर्षे एक महिला आपल्यावर झालेल्या अत्याचारासाठी न्याय मागत राहिली. न्याय मिळाला तरी तो तिच्याकडून हिरावून घेतला गेला. २० वर्षे एका महिलेने एकट्याने कसे ह्या अत्याचाराचे कष्ट सहन केले असेल याची कल्पना करता येत नाही. आज ती म्हणते की मला असे वाटत होते जसे मी आज पहिल्यांदा श्वास घेत आहे. म्हणजे न्याय म्हणजे कोणत्या भावना असतात हेच सांगायचा तिचा प्रयत्न आहे.
बिल्कीस बानो यांनी न्यायाविषयी आपल्या ज्या उत्कट भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांचा संबंध तिच्या एकटीशी नाही. सामूहिक अत्याचार ज्या कुणा व्यक्तीवर वा समाजावर केला जातो त्याचे पडसाददेखील सामूहिकदेखील उमटतात. एखाद्या परिवारावर किंवा वस्तीमध्ये काही लोकांवर जर सामूहिक अत्याचार केले गेले तर बाकीच्या समाजावरदेखील त्याचा सामूहिक प्रभाव पडतो. सर्व नागरिकांना समान न्यायाची कल्पना आपल्या संविधानात मांडलेली आहे. जसे पवित्र कुरआनात हे सांगितलेले आहे की जर कुणी एखाद्या निष्पाप व्यक्तीची हत्या केली तर त्याचा अर्थ साऱ्या मानवजातीची हत्या केली असा होतो. अगदी तसाच जर एखाद्या व्यक्तीला, एखाद्या अल्पसंख्याक समाजाला न्याय नाकारण्यात आला तर साऱ्या अल्पसंख्याक समुदायाला तो नाकारणअयात आल्यासारखाच असतो. छातीवरच्या ज्या पर्वताएवढ्या ओझ्याविषयी बिल्कीस बानो बोलत आहे ते अशा प्रत्येक नागरिकाच्या छातीवर ठेवलेले असते, ज्यांना न्याय नाकारला जातो. म्हणून राष्ट्रीय संकल्पनेत सर्वांत महत्त्वाची विचारधारा म्हणजे साऱ्या नागरिकांना समान न्याय बिल्कीस बानो यांनी आपल्या भावना व्यक्त करून या संकल्पनेचा अर्थ विषद केला आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
आपल्या न्यायव्यवस्थेविषयी जेवढे बोलावे तेवढे कमीच आणि अधिक धोका हा की जर काही विचार प्रकट केलेच तर त्याची नोंद घेतली जाईल का? घेतली गेलीच तर त्याचा प्रभाव कसा आणि कुणावर पडणार? म्हणून लोक सहसा आपले विचार व्यक्त करताना बरीच काळजी घेत असतात. सर्वोच्च न्यायालयातील एका निवृत्त न्यायाधीशांनी आपले विचार व्यक्त करत म्हटले आहे की आता बाकीच्या जीवनात ते काही आर्थिक कायक्ष करणार आहेत. एक पर्यटन स्थळ बनवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. ते म्हणतात पैशाची त्यांच्याकडे कमतरता नाही. त्यांनी आपल्या विचारांत एकही शब्द असा सांगितला नाही की न्यायदानात ज्या त्रुटी आहेत किंवा इतर सामान्य माणसाच्या नायाविषयी काय समस्या आहेत त्याबाबत काहीतरी मी करेन. उलट त्यांनी असे सांगितले की काही राजकीय प्रकरणे न्यायालयात येतात तेव्हा त्यांना असे वाटते की राजकारणी लोक स्वतः ते का हाताळत नाहीत. न्यायालय विरोधी पक्षाच्या भूमिकेत काम करत नाही. एक आंतरराष्ट्रीय खरेदी व्यवहाराचे प्रकरण न्यायालयात गेले, त्यावर त्यांचे असे म्हणणे आहे की असे प्रकरण मुळातच नायालयात आणायचेच का? ते यासाठी असे तर म्हणत नसतील ना की या बाबतीत निर्णय देण्याचे साहस न्यायालयात नाही?
बिल्कीस बानो यांच्याविषयी न्यायालयाच्या निकालात आणि त्यावर ज्या भावना बिल्कीस बानो यांनी व्यक्त केल्या आहेत त्याचा अभ्यास न्यायाधीशांनी जरुर करावा. एका महिलेने आपले धैर्य सोडले नाही. २० वर्षांच्या काळात कधी कुणाशी भीती वाटत असल्याचे कुणाजवळ आपल्या व्यथा मांडल्या नाहीत. तिला माहीत होते आणि आहे की कुणा लोकांशी तिचा सामना आहे. तरी पण तिने न्यायाचा लढा सोडला नाही. आपल्या न्यायाच्या या लढ्यात भारतीय नागरिकांतील जे जगात सर्वांत सहिष्णू आहेत अशा सर्वांचे आभार मानले आहेत. “माझ्या मित्रांनी प्रत्येक वळणावर माझी साथ दिली, ज्यांनी सर्वांत द्वेष पसरलेला असताना मला प्रेमळ वागणूक दिली आणि वकील शोभा गुप्ता यांचे मी आभार मानते ज्या गेल्या वीस वर्षे माझ्याबरोबर चालत राहिल्या.”
- सय्यद इफ्तेखार अहमद
संपादक,
मो.: 9820121207
Post a Comment