ज्याला धर्मांचा इतिहास आणि ईश-मार्गदर्शनाविषयी काही माहिती असेल त्याला हा विश्वास ठेवण्याशिवाय पर्याय नाही की ईश्वराने प्रत्येक राष्ट्र व समाजात माणसांच्या मार्गदर्शनासाठी आपले पैगंबर पाठवले. पृथ्वीवर जिथे कुठे मानवी जीवन आढळते तिथे अल्लाहचे पैगंबर पोहोचले आणि त्यांनी माणसांना मार्गदर्शन केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यापैकी बहुतेक जण एकमेकांबद्दल अपरिचित होते. त्यांचा काळही वेगळा होता आणि प्रदेशही वेगळा होता. मात्र येणाऱ्या प्रत्येक पैगंबराने एकच संदेश दिला की, लोकहो! अल्लाहची भक्ती करा आणि त्याची अवज्ञा टाळा. त्यांनी भक्तीचा अर्थही पूर्णपणे समजावून सांगितला आणि अवज्ञा काय आहे हेही स्पष्ट केले. एकमेव ईश्वर, अल्लाहशिवाय कुणीही भक्तीस पात्र नाही म्हणून अल्लाहशिवाय कुणाचीही भक्ती करू नका. त्याच्या अस्तित्वात कुणालाही सामील करू नका. त्याला आई-बाप नाहीत कि मुल-बाळ नाहीत. त्याच्यासारखा कुणीच नाही म्हणून त्याच्या गुण-सामर्थ्यातही कुणाला त्याच्या बरोबरीचा समजू नका. माणसांसाठी वैध काय आणि अवैध काय? योग्य काय आणि अयोग्य काय? म्हणजे हलाल काय व हराम काय हे ठरवण्याचा अधिकार फक्त अल्लाहचाच आहे, कारण तो आपला निर्माता, स्वामी आहे व आपण सर्व त्याचे दास आहोत, म्हणून एखाद्या गुलामाप्रमाणे अल्लाहची आज्ञापालन करा. त्याच्या प्रभुत्वात, गुण-सामर्थ्यात, हक्क व अधिकार क्षेत्रात कोणालाही सामील करू नका. प्रत्येक बंडखोर व्यक्ती किंवा शक्ती जी आपल्याला अल्लाहच्या आदेशांविरुद्ध चालवू इच्छिते त्याच्या मागण्या अमान्य करा. मग त्या मागण्या स्वतःच्या जीवाच्या असो, एखाद्या क्रुरकर्माच्या असो वा जुलमी व्यवस्थेच्या असो, त्यांना धुडकावून लावा. अशा सर्व बंडखोरांची भक्ती सोडून सर्वशक्तिमान एकमेव ईश्वर म्हणजे फक्त अल्लाहच्या भक्तीचा आग्रह धरणे हा प्रत्येक पैगंबराच्या संदेशाचा मुख्य मुद्दा राहिला आहे.
लोक जेव्हा पैगंबरांच्या मूळ शिकवणीपासून दूर गेले, तेव्हा त्यांच्या भक्तीच्या संकल्पनाही बिघडल्या. लोकांना वाटले की निर्मात्या ईश्वराचे ध्यान करून, उपासनेच्या काही मोजक्या विधी पुर्ण केल्या म्हणजे भक्ती झाली. अशा लोकांना सांसारिक जीवनात ईश-मार्गदर्शन रुचत नाही. हे लोक व्यावहारिक जीवनात, सामाजिक आणि राजकीय जीवनात कोणतेही नैतिक बंधन पाळू इच्छित नाही, म्हणूनच ते म्हणतात की धर्म म्हणजे ईश्वर आणि भक्त यांच्यातील खाजगी बाब आहे. काही लोकांना वाटले की माणूस थेटपणे ईश्वराची जवळीकता प्राप्त करू शकत नाही म्हणून कुणीतरी मध्यस्थ आवश्यक आहे. मग पुढे त्यांनी त्या मध्यस्थालाच ईशत्वामध्ये सामील केले. काही लोकांना वाटले की सांसारिक जीवनापासून दूर राहणे आवश्यक आहे कारण सांसारिक जीवनात मन लावणारी व्यक्ती ईश्वराच्या जवळ असण्याचा, आपल्या स्वामीचा निष्ठावंत दास असल्याचा दावा करू शकत नाही. मग येथे प्रश्न पडतो की भक्तीचा खरा अर्थ काय? यासंबंधी कुरआन व हदीसच्या अभ्यासातून जे महत्वपूर्ण निष्कर्ष निघतात ते असे की,
माणूस आपल्या निर्मात्या, स्वामीचा भक्त, दास आहे. त्याच्याकडे जे काही आहे, शरीर, आत्मा, संपत्ती, संतती, नातेवाईक, त्याच्या योग्यता व क्षमता या सर्व गोष्टींचा खरा मालक फक्त अल्लाह आहे. माणूस कशाचाही मालक नसल्यामुळे तो असा दावा करू शकत नाही की माझ्याजवळ असलेल्या वस्तूंमध्ये मला वाटेल ते करण्याचा, हवे तिथे खर्च करण्याचा, मुक्तपणे वापरण्याचा मला अधिकार आहे, कारण मुक्त अधिकार तिथे असतो जिथे मालकी हक्क असतो. माणसाकडे या सर्व गोष्टी एका निश्चित अवधीसाठी ठेवी म्हणून सुपुर्द करण्यात आल्या आहेत. या सर्व गोष्टी कधी देऊन तर कधी रोखून माणसाची परीक्षा घेतली जात आहे. या सर्व गोष्टी हाताळताना आपल्या स्वामीच्या इच्छेची काळजी घेणे हे माणसाचे काम आहे. दास तो असतो जो स्वामीने ठरवलेल्या उद्देशानुसार जगतो. माणसाच्या जीवनाचे उद्दिष्ट आपल्या मालकाची भक्ती करणे आणि जीवनाच्या प्रत्येक बाबतीत त्याच्या आज्ञांचे पालन करणे याव्यतिरिक्त दुसरे काहीही नाही. हे मान्य नसेल तर कोणतीही जबरदस्ती नाही. माणसाला मृत्यूनंतर आपल्या निर्मात्याकडेच परत जायचे आहे. मग त्याचा हिशोब चुकता करणे हे ईश्वराचे काम आहे. याशिवाय या सांसारिक जगातही माणसाने बंडखोरीची हद्द ओलांडली तर त्याचे गंभीर परिणाम इथेही भोगावे लागतात.
खरे पाहता आपला पालनकर्ता ईश्वर अत्यंत दयाळू आहे. त्याने आपल्या भक्तांना योग्य किंवा अयोग्य मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. कोण स्वत:च्या मर्जीने चांगली कामे करतो याची तो परीक्षा घेत आहे. भक्तांची शान हीच आहे की अल्लाहने माणसाला ज्या परिस्थितीत ठेवले आहे त्या परिस्थितीत समाधान मानावे. माणसाला तक्रार करण्याचा अधिकार नाही, पण नम्रपणे आणि आदराने आपल्या मालकाच्या सेवेत तो याचना करू शकतो व प्रार्थनेच्या स्वरूपात आपल्या गरजा मांडू शकतो. ... क्रमशः
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
Post a Comment