![]() |
सकृत दर्शनी काही हदीसमध्ये महिलांना पुरूषाच्या तुलनेत कमी महत्त्व दिल्यासारखे वाटते. या हदीस ज्यांच्या संदर्भाने आलेल्या आहेत ते लोक विश्वासपात्र मानले जातात. तरी परंतु काही इस्लामी विद्वान अशा हदीसबद्दल शंका व्यक्त करतात. त्यांना खरे माणन्यामध्ये त्यांना संकोच वाटतो. त्यांचे मत आहे की, अशा हदीस रद्द करण्यात याव्या. मग त्या हदीसच्या कोणत्याही सन्माननीय संग्रहातील का असेनात. त्याचे कारण असे की, अशा हदीस महिलांचे स्थान कमी असल्याचे दर्शवतात. अशा हदीसबद्दल शंका यामुळे निर्माण होते की, त्यांचा अभ्यास संदर्भ सोडून व फक्त शब्दांवर जोर देऊन केला जातो. जेव्हा संदर्भापासून तोडून एखादी गोष्ट पाहिले जाते तेव्हा त्याचा अर्थ वेगळाच निघतो. कधी-कधी अर्थाचा अनर्थ होऊन जातो. हदीस समजण्यासाठी खालीलप्रकारे त्यांचे संदर्भ तपासायला हवेत. उदा. हजरत अब्दुल्लाह बिन उमर यांच्या संदर्भाने एक हदीस सांगितली जाते की, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फर्माविले, ’’ वाईटपणा तीन गोष्टींमध्ये आहे. 1. स्त्री 2. घर 3. घोडा.’’ (बुखारी : 5093). थोड्याफार शब्दांच्या बदलानीशी ही हदीस अनेक लोकांच्या संदर्भाने अनेक हदीस संग्रहामध्ये आलेली आहे. सकृतदर्शनी या हदीसमध्ये स्पष्टपणे तीन गोष्टींना वाईट म्हटलेले आहे. पण याच हदीस संग्रहामधील हीच हदीस याच हजरत अब्दुल्लाह बिन उमर रजि. यांच्या संदर्भाने खालील शब्दात आलेली आहे. ज्यात प्रेषित सल्ल. यांनी फर्माविले आहे की, ’’जर वाईटपण कशात असतं तर ते घर, स्त्री आणि घोड्यामध्ये असतं.’’ (संदर्भ : बुखारी 5094).
या हदीसमध्ये वापरलेल्या शब्दांकडे लक्षपूर्वक पाहिले असता, ’’जर’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आता या हदीसमध्ये असे कुठेच म्हटलेले नाही की स्त्री ही वाईट आहे. वरील हदीस क्रमांक 5093 जेव्हा आई आएशा रजि. यांच्यासमोर सादर केली गेली तेव्हा त्या चिढल्या आणि म्हणाल्या की, ’’ अल्लाह शपथ ज्याने कुरआन प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर अवतरित केला. प्रेषित सल्ल. यांनी कधीच म्हटलेले नाही. उलट त्यांनी असे म्हटले होते की, अज्ञान काळामध्ये लोक घर, स्त्री आणि घोडा यांना वाईट समजत होते. (संदर्भ : मसनद अहेमद 26034). दूसरी अशीच एक हदीस हजरत अबु हुरैराह रजि. यांच्या संदर्भाने सांगितली जाते की, प्रेषित सल्ल. यांनी फर्माविले, ’’स्त्री, गाढव आणि श्वान’’ हे जर नमाज अदा करणाऱ्यांच्या समोरून गेले तर नमाज तुटते’’ त्यापासून वाचण्यासाठी नमाज अदा करणाऱ्याने आपल्या समोर एखादी वस्तू ठेवावी. (संदर्भ : हदीस : मुस्लिम 511.).
जेव्हा ही हदीस आई आयशा यांच्या समोर सादर करण्यात आली तेव्हा त्या पुन्हा चिढल्या आणि कडक शब्दात हदीस सुनावणाऱ्यांची कानउघाडणी केली. त्यांनी फर्माविले की, तुम्ही लोकांनी तर स्त्रीला गाढव आणि कुत्र्याबरोबर आणून ठेवले आहे. जेव्हा प्रेषित सल्ल. नमाज अदा करत होते तेव्हा अनेकदा मी त्यांच्यासमोर दिवानवर झोपलेली असायची. मला काही गरज पडली तर उठून जायची. (संदर्भ : बुखारी 511). आई आयशा रजि. यांनी सांगितले की, माझ्या अशा वागणाल्या कधीच्रप्रतिबंध केला नाही ना कधी नाराजी व्यक्त केली. ही हदीस खरी असती तर त्यांनी मला नक्कीच समोरून हटायला सांगितले जाते. अशा अनेक हदीस संग्रहामध्ये ज्यांचा विपर्यास करून त्यांचा हदीसमध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हणून अशा हदीसवर विश्वास ठेवणे योग्य होणार नाही. स्त्रीला मनुष्य म्हणून पुरूषांपेक्षा जराही कमी दर्जा दिलेला नाही. केवळ कामाची वाटणी वेगळी केलेली आहे.
- डॉ. रजिउल इस्लाम नदवी, दिल्ली
पुस्तक : मेमारे जहाँ तू है
भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे
Post a Comment