'म्हैसूरचा वाघ' म्हणून प्रसिद्ध असलेला टिपू सुलतान हा एक महान द्रष्टा होता, ज्याने ब्रिटिश साम्राज्यवादी सैन्याच्या विस्तारवादी डावपेचांचा पर्दाफाश केला आणि आपल्या देशवासीयांना आणि देशी राज्यकर्त्यांना एकत्र येऊन ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढण्याचे आवाहन केले.
टिपूचा जन्म १० नोव्हेंबर १७५० रोजी कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील देवनहळ्ळी गावात हैदर अली आणि फातिमा फखर-उन-निसा यांच्या पोटी झाला. त्याने मार्शल आर्टचे योग्य प्रशिक्षण घेतले आणि वडिलांसमवेत अनेक युद्धांमध्ये भाग घेतला. १७८२ मध्ये आपले वडील हैदर अली यांचा युद्धभूमीवर मृत्यू झाल्यानंतर टिपू म्हैसूरचा शासक बनला.
म्हैसूरचा कार्यभार स्वीकारताना त्याने आपल्या लोकांना जाहीर केले - 'जर मी तुम्हाला विरोध केला तर मी माझे नंदनवन, माझे जीवन आणि माझे सुख गमावू शकतो. लोकांचा आनंद हाच माझा आनंद आहे. मला जे आवडतं ते चांगलं आहे असं मला वाटत नाही. परंतु, माझ्या लोकांची जी इच्छा आहे ती माझी इच्छा आहे, असे मी मानतो. जे माझ्या लोकांचे शत्रू आहेत ते माझे शत्रू आहेत. आणि जे माझ्या लोकांशी लढत आहेत ते माझ्याविरुद्ध युद्ध पुकारत आहेत असे समजले जाईल.'
टिपूने आयुष्यभर आपले वचन पाळले. हैदराबादचा निजाम आणि मराठ्यांच्या सततच्या आक्रमणांना सामोरे जाताना टिपू सुलतानने आपल्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत उत्तरेतील कृष्णा नदीपासून दक्षिणेतील दिंडीगलपर्यंत सुमारे ४०० मैल आणि पश्चिमेकडील मलबारपासून पूर्व घाटापर्यंत सुमारे ३०० मैलांपर्यंत आपले राज्य पसरवले.
टिपू सुलतानने आधुनिक व्यापार, उद्योग, शेती आणि स्थापत्य अभियांत्रिकीला प्रोत्साहन दिले. क्षुल्लक गुन्हेगारांना शिक्षा म्हणून वृक्षारोपण वगैरे समाजकार्य देऊन सुधारण्याचा प्रयत्न केला. टिपू सुलतान हा बहुभाषिक होता, तो कन्नड, तेलुगू, मराठी, अरबी, पर्शियन, उर्दू आणि फ्रेंच भाषेत पारंगत होता. शिक्षणाच्या प्रसारासाठी त्याने परिश्रम घेतले. टिपू आपल्या वडिलांप्रमाणे धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन बाळगणारा आणि सर्व धर्मांप्रती निःपक्षपाती होता. इंग्रजांनी टिपूला दक्षिण भारतातील आपला शत्रू क्रमांक एक समजले. हैदराबादचा ईर्ष्याळू निजाम आणि मराठे टिपूचे यश पचवू शकले नाहीत आणि त्यांनी त्याच्या विरोधात ईस्ट इंडिया कंपनीशी हातमिळवणी केली. या सर्वांनी म्हैसूर राज्याची राजधानी श्रीरंगपट्टणमवर हल्ला केला, ज्यामुळे म्हैसूरचे ऐतिहासिक चौथे युद्ध झाले.
टिपू सुलतान आपल्या जनतेचे व राज्याचे रक्षण करण्यासाठी श्रीगंगापट्टणमच्या रणांगणात उतरला, श्रीगंगापट्टणमच्या किल्ल्यात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा करणारा त्याचा दिवाण मीर सादिक व इतरांनी केलेल्या देशद्रोहामुळे टिपू सुलतानचा पराभव झाला. ४ मे १७९९ रोजी सायंकाळपर्यंत शत्रूशी लढताना त्याच्या किल्ल्याला चारही बाजूंनी वेढलेल्या युद्धभूमीत त्याचा मृत्यू झाला.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment