इंग्रजीतील 'द इम्मॉर्टल्स' अर्थात ‘अमर योद्धे’ (भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान दिलेल्या मुस्लिम वीरांची संक्षिप्त गाथा) हा संक्षिप्त चरित्रसंग्रह लेखक सय्यद नसीर अहमद यांच्या पंधरा वर्षांच्या शोधाचे, संशोधनाचे आणि श्रमाचे फळ आहे. आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ब्रिटिश वसाहतवादी राज्यकर्त्यांविरुद्ध जोरदार लढा देणारे सम्राट, राजे, सरदार, सेनापती, स्वातंत्र्यप्रेमी, विविध संघटनांचे नेते आणि धाडसी सर्वसामान्यांचा 'अमर योद्धे'मध्ये समावेश आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेण्याबरोबरच आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी झटणाऱ्या तसेच भारतीय उपखंडाच्या भौगोलिक-सामाजिक-राजकीय क्षितिजावर आपला ठसा उमटवणाऱ्या इतर काही जणांचाही यात समावेश आहे.
आपल्या भारतातील विविध समुदायांमध्ये सहिष्णुता, समन्वय आणि सलोखा साधण्यासाठी केलेले कोणतेही सकारात्मक प्रयत्न इष्ट आहेत. सामायिक प्रयत्न आणि बलिदानात प्रत्येक समाजाचा वाटा सविस्तरपणे आणि सर्व पुराव्यानिशी लोकांसमोर प्रकट करून इतिहासातील वास्तव आणि वस्तुस्थितीचे प्रबोधन करणे हा इतिहास लिहिण्याचा स्तुत्य मार्ग आहे.
व्यापाराच्या नावाखाली भारतात घुसलेल्या पण मर्यादा ओलांडणाऱ्या इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीकडून देशाच्या भवितव्याला असलेल्या धोक्याचा अंदाज घेणारा बंगालचा नवाब सिराज-उद-दौला हा पहिला भारतीय राजा होता. कंपनीचे दुष्ट डावपेच हाणून पाडण्यासाठी त्यांनी धाडसी पुढाकार घेतला. बंगालचे शेवटचे स्वतंत्र नवाब सिराज-उद-दौला यांचा जन्म १७३३ मध्ये झाला आणि त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी सत्तेची सूत्रे हाती घेतली.
सिराज-उद-दौला यांना त्यांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या त्रासाचा फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीने शेतकरी आणि व्यापाऱ्यांसह लोकांचे शोषण सुरू केले. त्यानंतर सिराज यांनी त्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला.
सुरवातीला ते यशस्वी झाले असले तरी शत्रूस क्षमा करण्याच्या वृत्तीमुळे त्यांना मोठी किंमत मोजावी लागली जी भारताच्या भवितव्यासाठी घातक ठरली. अशा प्रतिकूल परिस्थितीत सिराजची मावशी घासिती बेगम, तिचा दत्तक मुलगा शौकत जंग आणि त्याचा समर्थक व दिवाण राज वल्लभ यांचा मुलगा कृष्ण दास, सिराजचे मुख्य सेनापती व त्यांचे काका मीर जाफर, प्रभावशाली व्यापारी माणिक चंद, अमीरचंद आणि सावकार जगत सेठी यांनी रॉबर्ट क्लाईव्हसोबत सिराज यांची सत्ता उलथवून टाकण्याचा कट रचला होता.
सिराज यांना आपल्या विरोधातील टोळीची माहिती नसल्याने ते ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढण्यासाठी सुमारे ५०,००० सैनिकांसह प्लासी येथे पोहोचले. भारतीय इतिहासात एक महत्त्वाचे स्थान असलेल्या प्लासीच्या लढाईला २३ जून १७५७ रोजी सुरुवात झाली.
ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य केवळ ३२०० होते आणि त्यातील ब्रिटिश सैनिकांची संख्या केवळ ९५० होती. परंतु विश्वासघातकी प्रमुख सेनापती मीर जाफर आणि दुसरा सेनापती रॉय दुर्लभ यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याला मदत करण्यासाठी नवाब सिराज-उद-दौला यांना युद्धाच्या मैदानात एकटेच सोडले.
परिणामी सिराज-उद-दौला यांना पराभवास सामोरे जावे लागले आणि ते २४ जून रोजी राजधानी मुर्शिदाबादला परतले. तिथेही तरुण नवाबसाठी परिस्थिती प्रतिकूल होती. त्यांच्यापुढे कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने सिराज यांनी राजधानी सोडली.
दरम्यान, रॉबर्ट क्लाईव्ह ने मीर जाफरची बंगालचा नवाब म्हणून नेमणूक केली. मीर जाफरने आपला मुलगा मीर मिरान याला सैन्यासह सिराज यांना पकडण्यासाठी पाठवले. २ जुलै १७५७ रोजी तरुण सिराज यांना पकडून दरबारात आणून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.
इंग्रजांचा धोका ओळखून त्यांच्याविरोधात शौर्याने लढा देणारा 'पहिला योद्धा' म्हणून बंगालचा नवाब सिराज-उद-दौला भारतीय इतिहासात स्मरणात राहील.
लेखक : सय्यद नसीर अहमद
भाषांतर : शाहजहान मगदुम
Post a Comment