या आठवड्यात प्रशांत किशोर यांचे एक कथन मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे. त्यात ते म्हणतात,’’ भारतात मुसलमानांची लोकसंख्या 18 टक्के आहे. मात्र त्यांचा कोणी नेता नाही. मुसलमान राजकारणात कष्ट करू इच्छित नाहीत. त्यांना वाटते की, कोणी राहूल गांधी किंवा ममता बॅनर्जी मिळाली म्हणजे बस. आम्ही त्यांच्या मागे चालायला लागू. जोपर्यंत मुसलमान स्वतः चिंता करणार नाहीत, दुसरा कोणीही तुमची चिंता करणार नाही.’’ प्रशांत किशोर एक प्रथितयश राजकीय रणनितीकार आहेत. त्यांचे हे म्हणणे समोर येताच ते खरे आहे, असे गृहितधरून मुस्लिम समाजातून आत्मदोष देणाऱ्या प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पुढे आल्या. कोणी असदोद्दीन ओवेसी यांना उद्देशून मुस्लिम समाजाला दोष देवू लागला की, मुस्लिम समाज असदोद्दीन ओवेसी सारख्या महान मुस्लिम नेत्याला भाजपचा एजंट समजून त्यांचे नेतृत्व नाकारतो. तर कोणी जमियते उलेमा-ए-हिंद ही मुस्लिमांची राजकीय नेतृत्व करणारी संघटना असल्याचे म्हणणे मांडतो आहे. प्रशांत किशोर यांच्यासारखेच एक वक्तव्य सुखबीरसिंग बादल (माजी उपमुख्यमंत्री पंजाब) यांचेही आलेले असून, त्यात ते म्हणतात, ’’आम्ही फक्त दोन टक्के आहोत तरी पण राजकीयदृष्ट्या संघटित आहोत आणि भारतीय राजकारणावर प्रभाव ठेवून आहोत. मुसलमान 14 टक्के असूनही असंघटित आहेत आणि त्यांचा राजकारणात प्रभाव शुन्य आहे.’’
प्रशांत किशोर आणि सुखविंदरसिंग बादल या दोघांचेही म्हणणे मुदलातच चुकीचे आहे. याकडे कोणाचे लक्ष गेलेले नाही. संघाची ही घोषित नीति आहे की, ख्रिश्चन आणि मुसलमान वगळता बाकी सर्व जातीधर्मातील लोक हे हिंदू आहेत. म्हणून त्यांचे नेतृत्व स्वीकार्ह आहे. हेच तत्व भारतामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिमांचे राजकीय भविष्य निर्धारित करते. ख्रिश्चनांची संख्या नगण्य असल्यामुळे त्यांच्यावर जास्त चर्चा होत नाही. परंतु चर्चेसवर अधुनमधून होणारे हल्ले आणि मणिपूरची ताजी हिंसा यावरून ख्रिश्चनांचे अस्तित्व या देशात किती अस्विकार्ह आहे, हे दिसून येते. जी परिस्थिती ख्रिश्चनांची तीच मुस्लिमांची. भारतात काही लोकांना मुस्लिमांचे अस्तित्वच मान्य नाही. त्यांना ते नागरिकच समजत नाहीत. त्यांना उघडपणे पाकिस्तानला जाण्याचे सल्ले दिले जातात. त्यांना पावलोपावली आपली निष्ठा सिद्ध करावी लागते. त्यांच्याबद्दल उघडपणे म्हटले जाते की, त्यांनी घरवापसी करावी किंवा भारतीय समाजात दुय्यम स्थान निमुटपणे स्विकारून मिळेल ते काम करून कसेबसे जगावे. विशेष म्हणजे बहुसंख्य हिंदूंपैकी अनेक लोकांची या म्हणण्याला मुकसंमती असते. म्हणून मुस्लिमांचे राजकीय नेतृत्व या देशात कधीच बहरले नाही. मुस्लिमांवर झालेल्या अनन्वित अत्याचारांविरूद्ध बहुसंख्य हिंदू समाज शांत असतो. त्यांची हीच शांती मुठभर अतिवादी लोकांना शक्ती देते. मुस्लिम समाज हे सर्व जाणून आहे. मुसलमानांना या गोष्टीची चांगली कल्पना आहे की,’’ त्यांचे नेतृत्व कोणी स्विकारणार नाही. (आठवा ए.आर. अंतुले सारख्या धडाकेबाज नेत्याचे काँग्रेसने काय हाल केले होते ते) म्हणून नाविलाजाने मुसलमान आपल्या समाजातील नेतृत्वाचा गळा आवळून सो कॉल्ड राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी आणि तत्सम नेत्यांच्या मागे नाविलाजाने जातो. त्यामुळे मुसलमान हे आपले स्वतःचे राजकीय नेतृत्व उभे करण्यास प्रयत्न करत नाहीत किंवा ते यासाठी कष्ट करीत नाहीत, असे या दोन्ही महानुभावांचे म्हणणे अतिशय चूक आहे. उदाहरणादाखल महाराष्ट्रात झालेल्या मुस्लिम आरक्षणाच्या आंदोलनाचा दाखला देता येईल. पृथ्वीराजसिंह यांच्या मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातील मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण, सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये दिले होते. ते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होताच रद्द केले. यावरून व्यथित होऊन मुस्लिम समाजाने महाराष्ट्रभर लाखोंचे मोर्चे काढले. पण त्यांची तशी दखल घेतली गेली नाही जशी जरांगे पाटील यांच्या मोर्चांची घेतली जात आहे. मुसलमान समाज एखाद्या प्रश्नावर उग्र झाला तर त्याला पोलिस बळाचा वापर करून अशा पद्धतीने फोडून काढले जाते की ते स्वप्नातही उग्र होण्याचा विचार करत नाही आणि जेव्हा हा समाज शांतपणे लाखोंचे मोर्चे काढतो तर त्याच्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत नाविलाजाने मुस्लिम समाज कधी काँग्रेस तर कधी स.पा., कधी ब.स.पा. तर कधी जरांगे पाटील यांच्यासोबत स्वतःला केविलवाणेपणे जोडून घेतो व ही अपेक्षा करतो की, त्यांचा राजकीय फायदा होईल. ज्याप्रमाणे बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये हिंदू समाजाच्या नेतृत्वाला तिथले मुसलमान स्विकारत नाहीत तसेच भारतातील हिंदू समाज मुस्लिम नेतृत्वाला स्वीकारत नाहीत, हे कटू पण सत्य आहे. मुसलमान हिंदू उमेदवारांना आपली मतं देतो पण हिंदू मतदार मुस्लिम उमेदवाराला अपवादानेच मतदान करतात. हे सत्य स्वीकारूनच मग या परिस्थितीला कसे सामोरे जाता येईल, याचा विचार केला तरच भविष्यात काही फरक पडेल अन्यथा प्रशांत किशोर आणि सुखविरसिंह बादल यांचे ऐकूण स्वतःला दोष देऊन मुस्लिम समाज आत्मग्लानीमध्ये जाईल.
आणखीन एक उदाहरण उत्तर प्रदेशचे घेऊ. तेथील मागच्या निवडणुकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री अजय बिष्ट यांनी आपल्या राज्याची निवडणूक 80 टक्के विरूद्ध 20 टक्के अशी असल्याची घोषणा केली होती हे सुज्ञ वाचक विसरले नसतील, या घोषणेचा अर्थ काय? स्पष्ट आहे मुस्लिमांचे अस्तित्व सुद्धा त्यांना आवडत नाही,तर नेतृत्व कसे आवडेल? भारतात ज्या पद्धतीची संसदीय लोकशाही आहे त्या पद्धतीत बहुमताला महत्त्व प्राप्त आहे. अशा परिस्थितीत अल्पसंख्यांक बहुमत कोठून आणतील? कितीही मोठे नेतृत्व असले तरी त्याला प्रभावशुन्य करण्यासाठी किती वेळ लागतो. बॅ.असदोद्दीन ओवेसी यांचेच उदाहरण घ्या. त्यांच्या एवढा लायक आणि संविधानाचा उठता बसता जप करणारा दूसरा नेता देशात नाही. पण त्याच्या चांगुलपणाची माती करण्यामध्ये कोणीही काडीची कसर ठेवलेली नाही.
वरील सर्व घटना ह्या आपल्या देशबांधवांच्या मनामध्ये मुस्लिम समाजबद्दल काय भावना आहेत याच्या निदर्शक आहेत. 2022 मध्ये तर तथाकथित धर्मसंसदेमध्ये मुस्लिमांचे शिरकाण करण्याचे आवाहन करण्यात आले होत.
उपाय
प्रशांत किशोर यांच्या मताला महत्त्व देऊन डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा मुस्लिम समाजाने सत्य परिस्थिती डोळ्यासमोर ठेऊन आपली स्वतंत्र राजकीय नीति तयार करावी. तसे पाहता अलिकडे भारतीय मुस्लिमांची तात्काळ प्रतिक्रिया देण्याची जुनी सवय बदलली असून, अशा परिस्थितीत शांत राहण्यास प्राधान्य देण्यास त्यांनी सुरूवात केलेली आहे. ही चांगली बाब आहे. परंतु एवढ्यावरच समाधानी न राहता अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांना एक व्यापक रणनिती तयार करावी लागेल. विशेष करून मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या संदर्भात पुढाकार घ्यावा लागेल. त्यांनी एक रणनिती तयार करून तिच्याद्वारे मुस्लिमांचे मार्गदर्शन करायला हवे. कुरआन, हदीस आणि भारताच्या ऐतिहासिक वारशाचा अभ्यास करून मुस्लिमांना खालील प्रमाणे वागण्यासाठी मार्गदर्शन करता येईल.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
भारत आणि पाकिस्तानची फाळणी धर्माच्या आधारावर झाली असा सार्वत्रिक समज असला तरी हा समज अर्धसत्यावर आधारित आहे. फाळणी धर्माच्या आधारावर नव्हे तर धर्मावर आधारित राष्ट्रीयत्वाच्या भावनेतून झाली होती हे पूर्ण सत्य आहे. म्हणूनच संपूर्ण हिंदू पाकिस्तानामधून भारतात तर संपूर्ण मुसलमान भारतातून पाकिस्तानात गेले नाहीत. राष्ट्रीयत्वाची ही भावना अनेक कारणामुळे निर्माण होते. उदा. भाषा, संस्कृती इत्यादी. म्हणूनच मुस्लिम असूनही भाषा आणि संस्कृतीच्या कारणावरून 1971 मध्ये बांग्लादेश पाकिस्तानपासून वेगळे झाले. म्हणून धर्म हाच कुठल्याही राष्ट्राचा पाया असतो, असे म्हणणे तेवढे खरे नाही.
प्रत्येक समूह स्वतःच्या ओळखी संबंधी अत्यंत संवेदनशील असतो. अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे पूर्वी कबिले आपल्या ओळखी संबंधी संवेदनशील होते. भारतीय मानवी समुह ही भारतीय म्हणून जगात श्रेष्ठ समजला जावा हीच इच्छा मनात बाळगून आहे. यात हिंदू, मुसलमान, शीख, दलित, ख्रिश्चन सर्व सामील आहेत. फक्त हिंदूंनाच हा देश प्रिय आहे बाकीच्यांना नाही असा प्रकार नाही. मात्र राष्ट्रीय भावना जरी पवित्र असली तरी ती उदात्त नसते. उदा. कुठल्याही खेळात आपल्याच देशाच्या समुहाने विजय प्राप्त करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. दुसऱ्या देशांच्या चांगल्या खेळाडूंचे कौतुक करण्यापासून सुद्धा ही भावना माणसाला रोखते. ईश्वराच्या मालकीच्या पृथ्वीवर ईश्वराच्या लेकरांना कुठेही जाऊन राहण्याच्या स्वातंत्र्याला या नेशन स्टेटच्या भावनेने आघात पोहोचवलेला आहे.
आज भारतात 20 कोटी मुस्लिम समाज राहतो. यांच्या अस्तित्वाला स्विकारण्याशिवाय हिंदू बांधवांना गत्यांतर नाही. कारण एवढा मोठा समाज स्थलांतर करून दुसरीकडे पाठविणे शक्य नाही व दुसरा कोणी त्यांना स्विकार करण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजांनी एकमेकांच्या धार्मिक स्वातंत्र्यासह एकत्रित शांततेने राहिल्याशिवाय देश प्रगती करू शकणार नाही याची नोंद दोन्ही समाजांनी घेणे आवश्यक आहे. अलिकडे हिंदुत्ववादी शक्तींनी याच भावनेला छेद देत देशाला हिंदू राष्ट्रामध्ये बदलण्याची भाषा सुरू केली आहे. समजा यदाकदाचित ते याच्यात यशस्वीही झाले तरी जमीनीवरील परिस्थिती बदलू शकणार नाही. 20 कोटी अल्पसंख्यांकांच्या शक्तीला नामोहरम करणे कोणालाही शक्य होणार नाही. इतिहासात जर्मनीमध्ये हिटलरने तर इटालीमध्ये मुसोलीनीने असे वांशिक वर्चस्व स्थापनेचे प्रयत्न करून पाहिलेले होते पण ते यशस्वी झाले नव्हते. आज 21 व्या शतकात असे प्रयत्न करणे म्हणजे स्वतःला स्वतःच जगापासून विलग करून घेण्यासारखे होईल. हिंदुत्ववादी शक्तींना त्यांच्या संकीर्ण विचार धारेपासून रोखणे जरी मुस्लिमांना शक्य नसले तरी आपल्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल करणे शक्य आहे. असा बदल घडवून आणल्यास आज ना उद्या दोन्ही समाजामधील ओढाताण कमी होऊन खऱ्या अर्थाने गंगा-जमनी तहेजीब साकार होईल, यात शंका असण्याचे कारण नाही. हे लगेच होणार नाही यासाठी वर्षोनवर्षे योजनाबद्ध पद्धतीने मुस्लिमांना प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यासाठी खालीलप्रमाणे कुरआन आणि हदीसच्या शिकवणीपासून आपल्याला मार्गदर्शन मिळते.
’’मी जिन्न आणि माणसांना याशिवाय कोणत्याही अन्य कामासाठी निर्माण केले नाही की त्यांनी माझी भक्ती करावी’’ (कुरआन : सुरे अलजारियात: आयत क्र. 56)
कुरआनमधील सर्व आयातींपैकी बहुधा ही एकच अशी आयत आहे जिचा अत्यंत संकुचित अर्थ मुस्लिमांनी घेतलेला आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनाचा उद्देशच बदलून गेला आहे. भक्ती अर्थात इबादत याचा अर्थ एवढाच घेतला गेला की मुस्लिमांनी कलमा पठण करावा, नमाज अदा करावी, रोजे ठेवावेत, हज करावे, स्वतःचे जीवन होता होईल तितके पवित्र ठेवावे आणि एवढ्यावरच संतुष्ट व्हावे. वास्तविक पाहता ह्या आयातीचा उद्देश एवढा संकुचित नाही. इबादत या शब्दात संपूर्ण इस्लामी जीवनशैलीचा समावेश होतो. कुरआन ने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करणे म्हणजे इबादत होय. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करणे म्हणजे इबादत होय. कुरआन आणि प्रेषित सल्ल. यांनी ज्या कृत्यांना हराम ठवलेले आहे त्यांचे फक्त जीवनातून नव्हे तर समाजातून उच्चाटन करण्यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत संघटित प्रयत्न करणे इबादत होय. हा अर्थ घेऊन जर मुसलमान उठले तर त्यांच्या जीवनाची दिशाच बदलून जाईल आणि ते खऱ्या अर्थाने ’खैर उम्मत’ अर्थात कल्याणकारी समाज बनतील व भारताच्या निर्मितीमध्ये आपले योगदान देऊ शकतील. भक्तीचा असा व्यापक अर्थ न घेता केवळ स्वतःला नमाज, रोजा पर्यंत सीमित करून घेतल्यामुळे मुस्लिमांचीच नव्हे तर देशाची अपरिमित हानी झालेली आहे. देशामध्ये गुन्हे, अनैतिकता आणि वाईट गोष्टींची रेलचेल झालेली आहे. मुस्लिमांनी तात्काळ या आयातीवर गांभीर्याने पुर्नर्विचार करण्याची गरज का आहे हे प्रसिद्ध इस्लामी विद्वान मौ. अली मीयां नदवी रहे. यांनी खालील शब्दात नमूद केलेले आहे. ’आज हिन्दुस्थान के मुसलमान एक दानिशमंदांना (बुद्धीमन) और हकीकत पसंदाना (वास्तववादी) दीनी कयादत (धार्मिक नेतृत्व) के मोहताज हैं. आप अगर मुसलमानों को 100 प्रतिशत तहाज्जुद गुजार बना दें, सबको मुत्तकी-परहेजगार (चरित्रवान) बना दें लेकिन उनका माहौल से कोई तआल्लुक न हो, वो ये न जानते हों के मुल्क किधर जा रहा है? मुल्क डूब रहा है, मुल्क में बदअख्लाकी वबा (साथीचा रोग) की तरफ फैल रही है, मुल्क में मुसलमानों से नफरत पैदा हो रही है तो तारीख (इतिहास) की शहादत (साक्ष) है के फिर तहाज्जुद तो तहाज्जुद पंजवक्तों की नमाजों का पढना भी मुश्किल हो जाएगा. अगर आपने दीनदारों के लिए इस माहौल में जगह नहीं बनाई और उनको मुल्क का बेलौस (निस्वार्थी) मुखलीस (प्रामाणिक) और शाईस्ता (सभ्य), शहरी (नागरीक) साबित नहीं किया जो मुल्क को बे-राहरवी (दिशाहीनता) से बचाने के लिए हातपांव मारता है और एक बुलंद किरदार (चरित्र) पेश करता है तो आप याद रख्खें के इबादात व नवाफील और दीन की अलामतें तो अलग रहीं ये वक्त भी आ सकता है के, मस्जिदों का बाकी रहेना भी दुश्वार हो जाएगा. अगर आपने मुसलमानों को अजनबी बनाकर और माहौल से काटकर रख्खा, जिंदगी के हकायक (वास्तविकता) से उनकी आँखें बंद रहीं और मुल्क में होनेवाले इन्नलाबात (बदलाव), नए बननेवाले कवानीन (कायदे), अवाम (जनता) के दिलों दिमाग पर हुकूमत करनेवाले रूझानात (कल) से वो बेखबर रहे तो फिर कयादत (नेतृत्व) तो अलग रही जो खैर-उम्मत (कल्याणकारी मुस्लिम समुह) का फर्ज-ए-मन्सबी (जीवनाचे दायित्व) है, अपने वजूद की हिफाजत भी मुश्किल हो जाएगी.’’ (संदर्भ : कारवान-ए-जिंदगी, खंड 2, पान क्र. 373). कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’आणि आपल्या स्वतःवर इतरांना प्राधान्य देतात, मग ते स्वतः गरजवंत का असेनात. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक मनाच्या संकुचितपणापासून वाचविले गेले तेच साफल्य प्राप्त करणारे आहेत’’ (सुरे अलहश्र: आयत नं. 9) या आयातीत दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे मुस्लिमांना जमेल तेवढी लोककल्याणाची कामे करावी लागतील. तेव्हा कुठे त्यांच्याबद्दल देशबांधवांच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण होईल. आजमितीला सुक्ष्म लोकसमुह असून सुद्धा शीख बांधवांनी लोककल्याणाच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात आपला ठसा उमटविलेला आहे. 1984 साली झालेल्या शीख विरोधी दंगलीपासून धडा घेत त्यांनी लोककल्याणाच्या कामांचा झपाटल्यासारखा विस्तार केलेला आहे. आज ज्या-ज्या ठिकाणी लोक अडचणीत येतील त्या-त्या ठिकाणी सर्व प्रथम शीख बांधव मदतीला धावत जाताना दिसून येतात. मुस्लिम समाजामधील श्रीमंत लोकांनी आपल्याकडे या कामाची जबाबदारी घ्यावी. कारण द्वेष, मत्सर कितीही उच्च कोटीचा असो त्याच्यावर विजय द्वेष आणि मत्सराने मिळविता येत नाही. प्रेमानेच त्याच्यावर विजय मिळविता येतो. ही बाब सूर्यप्रकाशाएवढी स्वच्छ आहे. कुरआनमध्ये या संदर्भात खालील शब्दांत मुस्लिमांचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.
’’आणि हे पैगंबर (स.), भलाई आणि दुष्टता एकसमान नाहीत. तुम्ही दुष्टतेचे त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे.’’(सुरे हामीम सज्दा, आयत नं. 34). वरील गोष्टी काही लोकांच्या पचनी पडणार नाहीत. कारण असे करण्यामध्ये त्यांच्यात स्वतःचा पराजय होत असल्याची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु, कुरआन आणि प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणी ह्याच आहेत. मुस्लिम जनसमुहाला उद्देशून कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’आता जगात तो सर्वोत्तम जनसमुदाय तुम्ही आहात ज्याला अखिल मानवजाती(च्या कल्याणा)साठी अस्तित्वात आणले गेले आहे. तुम्ही सदाचाराचा आदेश देता व दुराचारापासून प्रतिबंध करता आणि अल्लाहवर श्रद्धा बाळगता. या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती तर ते त्यांच्याकरिता उत्तम होते. यांच्यात जरी काही लोक श्रद्धावंत देखील आढळतात तरी यांचे बहुतेक लोक अवज्ञा करणारे आहेत.’’ (सुरे आले इमरान आयत नं. 110). या संदर्भात जमाअते इस्लामी हिंदचे संस्थापक मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी म्हणतात, ’’नबी सल्ल. को ये हिदायत दी गई है के, ख्वाह ये लोग तुम्हारे मुकाबले में कैसा ही बुरा रवय्या इख्तीयार करें तुम भले तरीके से ही मुदाफियत (बचाव) करना. शैतान कभी तुमको जोश में लाकर बुराई का जवाब बुराई से देने पर आमादा न करने पाए’’ (संदर्भ : तफहिमुल कुरआन खंड 3 पान क्र. 259). थोडक्यात अल्पसंख्यांकांनी बहुसंख्यांकांच्या तर बहुसंख्यांकांनी अल्पसंख्यांकांच्या अस्तित्वाला एकमेकाविरूद्ध न समजता राष्ट्रहितामध्ये सह अस्तित्वाच्या तत्वाला मान्य करून केवळ राष्ट्रीय प्रगतीकडे लक्ष दिल्यास भारत लवकरच महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही आणि या विपरित वर्तन झाल्यास बाहेरच्या शत्रूची गरज राहणार नाही. अशा राष्ट्रनिर्मितीची संकल्पना अशक्य नाही हे आपल्याला अमेरिकेच्या उदाहरणावरून लक्षात येईल. अमेरिका एक असे आदर्श राष्ट्र आहे ज्यात जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून येवून या राष्ट्राला महासत्ता बनविलेले आहे. तेथील अनेकतेतून एकतेच्या आदर्श तत्वाला हरताळ फासण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न सुजान अमेरिकी नागरिकांनी हाणून पाडला. याचे ताजे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे. या उदाहरणाची नोंद घेऊन स्वातंत्र्य सेनानींनी ज्या शक्तीशाली भारताची कल्पना केली होती तो प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करण्यास बांधिल आहोत. राष्ट्रनिर्मितीचा याशिवाय दूसरा मार्गच नाही, हे दोन्ही जनसमुहांना लक्षात घ्यावे लागेल. जय हिंद !
-एम. आय. शेख,
लातूर
Post a Comment