Halloween Costume ideas 2015

मुस्लिम समाजमन बदलत आहे

सभी का खून शामिल हैं यहाँ की मिट्टी में
किसी के बाप का हिंदुस्थान थोडी है

जगातील इतर मुस्लिमांपेक्षा भारतीय मुस्लिम हे वेगळे असून शांतीप्रिय आहेत. ते स्वतःला खरे भारतीय समजतात, म्हणून त्यांची कदर केली गेली पाहिजे.” 16 फेब्रुवारी 2019 रोजी दिल्लीमध्ये हिंदुस्थान टाईम्स लिडरशिप समीटमध्ये बोलताना अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बराक ओबामा यांनी वरील भाष्य केले होते. याची आठवण येण्याचे कारण म्हणजे सीएए/एनआरसी निमित्त भारतात मुस्लिम भावनांची होत असलेली अभिव्यक्ती होय. हातात तिरंगे झेंडे, संविधानाची प्रत, डॉ. आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची  छायाचित्रे घेऊन लाखोंच्या संख्येनी मुस्लिम समाज यानिमित्त रस्त्यावर उतरला.    
    मुस्लिम म्हटले की, दाढी, टोपी, बुरखा, लव्ह जिहाद, मांसाहार, आतंकवाद, हिरवे झेंडे, नारा-ए-तकबीरचा उद्घोष अशी एकंदरीत प्रतीमा नजरेसमोर उभी राहते. अर्थात ही प्रतीमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमांनी मुद्दामहून तयार केलेली आहे, हे वेगळे सांगायला नको. शिवाय मुस्लिम हे फक्त धार्मिक मुद्यावरच व्यक्त होतात, रस्त्यावर येतात असाही एक विचार डोक्यात पक्का बसलेला आहे. या विचार आणि प्रतीमेला छेद देणारे लाखोंचे मुस्लिम मोर्चे देशभरात निघाल्याने मीडियासहीत अनेक हिंदुत्ववादी गोंधळलेले आहेत. भारतीय मुस्लिमांच्या मानसिकतेसंबंधीचे सत्य सातासमुद्रापार राहणार्‍या बराक ओबामाच्या लक्षात आली ती गोष्ट इथल्या मुठभर कट्टर हिंदुत्ववाद्यांच्या लक्षात आली नाही हे भारतीय मुस्लिमांचेच नव्हे तर आपल्या लोकशाहीचेही दुर्दैव आहे.
    एनआरसीनिमित्त सुरू झालेले सरकारविरोधी आंदोलन जरी जामियामधून सुरू झाले असले तरी अल्पावधीतच या आंदोलनामध्ये धर्मनिरपेक्ष बहुसंख्य बांधवांनी एवढ्या मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदविला की, पाहता पाहता हे आंदोलन फक्त मुस्लिमांचे न राहता राष्ट्रीय झाले. म्हणून पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहासह मोहन भागवतसुद्धा चकीत झाले आहेत. याचा पुरावा हैद्राबाद येथील भागवतांच्या वक्तव्यातून मिळतो. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, संघ 130 कोटी भारतीयांना हिंदूच समजतो. म्हणजे ते मुस्लिमांना वेगळे समजत नाही, आपलेच समजतात. हा खुलासा जरी कोणाच्या पचनी पडला नसला तरी हा खुलासा करण्यासाठी भागवतांना बाध्य व्हावे लागले. यातच सर्वकाही आले.
    धर्माच्या नावावर पाकिस्तान बनलेला नव्हता, असे माझे म्हणणे कदाचित वाचकांना खोटे वाटेल परंतु, अखंड भारतात मुस्लिम समाजाच्या राजकीय अधिकारांना सुरक्षित करण्याची मागणी काँग्रेसने फेटाळल्याने पाकिस्तान बनला हे सत्य सुद्धा नाकारता येण्यासारखे नाही. जर का काँग्रेसने मुस्लिमांच्या राजकीय अधिकारांना मान्यता दिली असती तर देशाची फाळणी झाली नसती. या सत्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले जाते. ज्या मुहम्मदअली जिन्नाला कट्टर मुस्लिम समजल्या जाते त्याच्या एवढा इस्लामशी दूर आणि धर्मनिरपेक्ष नेता काँग्रेसमध्ये त्या काळात दुसरा नव्हता. जिन्नांनी मांडलेला मुस्लिम समाजाच्या राजकीय अधिकारांचा प्रस्ताव काँग्रेसने ठोकारल्याने चिडून जिन्ना मुस्लिम लिगच्या छावणीत गेले होते. मुस्लिम लीगसारख्या धर्माधारित पक्षामध्ये जाण्याएवढे धार्मिक जिन्ना खचितच नव्हते. येथे जिन्नांची स्तुती करण्याचा मुळीच उद्देश नाही फक्त वाचकांसमोर सत्यकथन करणे एवढाच उद्देश आहे. यातून मला हे सिद्ध करावयाचे आहे की, भारतीय मुस्लिम सुरूवातीपासूनच सच्चे भारतीय आहेत. त्यांचा धर्म जरी वेगळा असला तरी डीएनए 100 टक्के भारतीय आहे. आम्हाला भारतीय असण्याचा तेवढाच गर्व आहे जेवढा दुसर्‍या कुठल्याही समाजाला आहे. पाकिस्तान बनल्यावर एक स्वतंत्र इस्लामिक देशामध्ये जावून राहण्याचा पर्याय उपलब्ध असतांना, आठवडाभर जाण्यासाठी रेल्वेची मोफत सुविधा असतांनाही एक टक्क्यांपेक्षाही कमी मुसलमान पाकिस्तानमध्ये गेले होते हे सत्य 1951 साली झालेल्या जनगणनेतून सिद्ध झालेले आहे. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, भारतीय मुस्लिमांचा पिंड हा भारतीयच आहे. म्हणूनच तीन तलाक, बाबरी मस्जिदचा निर्णय त्यांच्या आस्थेच्या विरूद्ध गेला तरी ते रस्त्यावर उतरले नाहीत. मात्र देशाच्या राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वालाच जेव्हा सीएए, एनआरसीमुळे धोका निर्माण झाला तेव्हा ते रस्त्यावर उतरले. या सत्याकडेही दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही.
    उत्तर प्रदेश पोलिसांनी तर जणू मुस्लिमांच्या विरूद्ध अघोषित युद्धच पुकारले होते, अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झालेली असतांना उत्तर प्रदेश पोलिसांचे अनन्वित अत्याचार सहन करून सुद्धा उत्तर प्रदेश पोलिसांच्याच एका अधिकार्‍याचा जीव वाचविण्याचा उदारपणा एका मुस्लिम व्यक्तीने दाखविला. ही घटना भारतीय मुस्लिमांचा मूळ पिंड कसा भारतीय आहे, हे सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे.
    ज्यांची आस्था कुरआनवर आहे, ज्यांना शरियत प्राणापेक्षा प्रिय आहे त्यांनी एका हातात संविधान व दुसर्‍या हातात तिरंगा घेऊन रस्त्यावर उतरावे, ते ही कुठल्याही स्वार्थापोटी नव्हे तर देशाच्या धर्मनिरपेक्ष चारित्र्याच्या रक्षणासाठी या भावनेची कदर बहुसंख्य हिंदू बांधवांनीही केली.  मुस्लिमांच्या बरोबर ते ही रस्त्यावर उतरले. त्यांनीही लाठ्या खाल्या. ही बाब आपल्या लोकशाहीला बळकट करणारी आहे. कोणी कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न करो हिंदू-मुस्लिम संबंध इतिहास काळापासून दृढ होते आणि भविष्यातही राहतील, असा विश्‍वास या आंदोलनानिमित्त नव्याने निर्माण झालेला आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. 
    विशेषतः हिंदू आणि मुस्लिम समाजातील महिला व मुलींनी या आंदोलनामध्ये जी धाडसी भूमिका पार पाडली तिला तोड नाही. अलिकडच्या इतिहासामध्ये महिलांच्या अशा उत्स्फूर्त आणि व्यापक सहभागाचे उदाहरण शोधून सुद्धा सापडणार नाही. या आंदोलनाने हिंदू-मुस्लिम ऐक्याची नव्याने पायाभरणी केली. मोदींनी जेव्हा झारखंडमध्ये ”हिंसा करणारे कपड्यांवरून ओळखले जावू शकतात”, असे अशोभनीय विधान केले, तेव्हा अनेक हिंदू मुला-मुलींनी मुस्लिमांसारखा पेहराव करून, ”मोदीजी ! आता आम्हाला ओळखून दाखवा” असे म्हणून समाजमाध्यमातून त्यांना उघड आव्हान दिले. यात दिल्लीच्या महिला काँग्रेस कार्यकर्त्या अल्का लांबा यांनी हिजाब घालून भाजपला दिलेल्या आव्हानाने तर गहिवरून येण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
    मोदींनी दहा आणि अमित शहांनी तीन अशा एकूण 13 सभा घेऊन व त्यात अनुच्छेद 370 आणि एनआरसीची भलामन करून सुद्धा झारखंडच्या जनतेनी त्यांच्याविरूद्ध आपले मत नोंदविले. ही एनआरसीवर एका प्रकारची लिटमस टेस्ट होती, हे मान्य केल्याशिवाय गत्यंतर नाही.
    भारताच्या संविधान सभेमध्ये 30 मुस्लिम सदस्यांचा समावेश होता. संविधानावर त्यांच्या सह्या आहेत. तेव्हापासून ते आज 2020 पर्यंत ज्या-ज्या वेळेस मुस्लिमांना ज्या-ज्या क्षेत्रामध्ये संधी देण्यात आली त्या-त्या वेळेस त्यांनी त्या संधीचे सोने केले. मुस्लिमांनी या देशासाठी स्वातंत्र्यापूर्वीच नव्हे तर स्वातंत्र्यानंतरही रक्त सांडलेले आहे. शहीद अब्दुल हमीद पासून ते कारगीलचा शहीद कॅप्टन हनीफुद्दीन व हैद्राबादचा शहीद सरफराज खान पर्यंत अनेक मुस्लिमांनी या मातृभूमीसाठी रक्त सांडलेले आहे. क्रीडा, ज्ञान, विज्ञान, कला, कृषी कोणतेही क्षेत्र असो मुस्लिमांनी या देशाच्या प्रगतीसाठी स्वतःला वाहून घेतलेले आहे. असे करून आम्ही या देशावर उपकार केलेले नाहीत फक्त आपले कर्तव्य बजावलेले आहे. खंत एकाच गोष्टीची आहे की, या देशाला आपले माणून, पावलोपावली त्याचा पुरावा देऊनही कुठलाही छुटभैय्या नेता उठतो आणि मुस्लिमांना ’पाकिस्तान चले जाव’ ची जी भाषा बोलतो या गोष्टीचे दुःख वाटते. त्या पाकिस्तानला जाण्यासाठी आम्हाला सांगितले जाते जो पाकिस्तान एलओसीवर मुस्लिम राहतात हे माहित असतांनासुद्धा रात्रंदिवस गोळीबार करून त्यांचे जीवन संकटात टाकतो.
    मुस्लिमांना त्यांच्या पेहरावावरून नव्हे तर त्यांच्या या नवीन प्रतीमेवरून ओळखले जावे, ज्यात ते अभिमानाने संविधानाची प्रत आणि तिरंगा झेंडा मिरवत आहेत. हद्द तर मागच्या आठवड्यात किशनगंज येथील सभेत झाली. ओवेसी यांनी घेतलेल्या लाखांपेक्षा जास्त जनसमुदायाच्या सभेमध्ये चक्क राष्ट्रगीत गाऊन सभेची सांगता करण्यात आली. संविधान, तिरंगा, राष्ट्रगीत ही जी प्रतिके कालपर्यंत बहुसंख्यांकांची मानली गेली तीच प्रतिके जेव्हा आजच्या मुसलमानांची नवीन पीढि स्वतः होऊन अभिमानाने मिरवत असेल तर त्याची कदर केलीच गेली पाहिजे. अन्यथा 2009 साली मनमोहनसिंग यांनी निवडणुकीच्या काळात सांगूनच ठेवलं आहे की, ”मुस्लिमांना खास वागणूक दिली जाते, असे म्हणणार्‍यांनी लक्षात ठेवायला हवे की, एक टक्का मुस्लिमांना जरी असे वाटले की या देशात आपले भवितव्य नाही तर स्थिती हाताबाहेर जाईल”.
    देशभक्ती आणि राष्ट्रीयत्वाची परिभाषा मुस्लिमांनी आपल्या वर्तनातून या आंदोलनात नव्याने परिभाषित केलेली आहे. त्याची दखल बहुसंख्य बांधवांनी घ्यावी हीच नम्र विनंती करून मी थांबतो. जय हिंद !

- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget