Halloween Costume ideas 2015

२०२०मधील देशापुढील आव्हाने!

नवीन वर्षात पदार्पण करत असताना अनेक चांगल्या वाईट घटनांच्या अनुभवातून पुढे जायचे असते. आधीचे वर्ष संपताना काही कडू-गोड आठवणींना आपण निरोप देतो आणि नव्या  वर्षात, नव्या उत्साहाने, उमेदीने नव्या आव्हानांना तोंड द्यायला सज्ज होतो. मागील वर्षाचा लेखाजोखा पाहताना एकूणच वातावरण बदलून गेलेले आहे. पहिले खरेखरे वातावरण ज्यात  पावसाने सर्वत्र अगदी नोव्हेंबरपर्यंत थैमान घातले व लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले. पूरजन्य परिस्थितीमुळे अब्जावधींचे नुकसान झाले. कित्येक राज्यांत शेकडो मृत्युमुखी पडले.  पूरग्रस्तांचे म्हणावे तसे पुनर्वसन सरकारतर्फे न झाल्याने पीडित लोक निराश आहेत. २०१६ मध्ये रोहित वेमुल्लाच्या आत्महत्येनंतर विद्यार्थी असंतोष उफाळला होता. गेल्या काही  वर्षात जेएनयुमधील आक्रोश अनेकदा रस्त्यावर प्रकटला. काश्मीरचे ३७० कलम रद्द करणे, राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, सामाजिक बाबतीत सरकारने बहुमताच्या  जोरावर सुधारित नागरिकत्व कायदा, प्रस्तावित राष्ट्रीय नागरिक नोंदणी व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी यावरून जे वातावरण तयार झाले ते लक्षात घेऊन, तारतम्य राखून केंद्र सरकार  योग्य विचार करील अशी अपेक्षा वर्षारंभी करावी काय? देशापुढे अनेक समस्या आहेत. तिहेरी तलाकला प्रतिबंध करणारा कायदा अस्तित्वात आला, रामजन्मभूमी संदर्भात संघ  परिवारास अनुकूल असा निर्णय न्यायालयाने दिला. त्या दोन्ही निर्णयांचा विशेष खळखळ न करता देशाने स्वीकार केला. आर्थिक विकासाचा दर सातत्याने घसरत चालला आहे, बेकारी  वाढत चालली आहे, वाढत्या महागाईने गरीबांना जगणे कठीण झाले आहे. पण या सर्वांकडे सरकारचे लक्ष आहे की नाही, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. आर्थिक बाबतीत मंदीच्या  झळा लागत असून अनेक कारखान्यांनी ले ऑफ व नोकर कपात केली आहे. मार्केट नसल्याने उत्पादन कमी होत आहे. पर्यायाने रोजगारही कमी होत  आहे. भाषा देशातील १३० कोटी  जनतेची करायची पण त्या जनतेला सुखाचे, समाधानाचे दिवस कसे दिसतील याचा विचार विशेषत्वाने करायचा नाही, याला काय म्हणायचे! गेल्या वर्षाच्या अखेरच्या महिन्यांमध्ये  हैदराबाद परिसरात घडलेल्या बलात्काराच्या घटनेने, महिलांकडे पूज्य भावनेने पाहावे, असे सांगणारा हाच का भारत देश, अशी शंका सर्वांच्या मनात निर्माण केली गेली! नवीन वर्षामध्ये, असे गुन्हे करण्याचे धाडस कोणीही नराधम करणार नाही, एवढा दरारा सर्वच राज्यांची पोलीस दले निर्माण करू शकतील का? महाराष्ट्रात सरत्या वर्षाच्या अखेरीस सरकार  अस्तित्वात आले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आलेले महाविकास आघाडीचे सरकार राज्यापुढील अनेक प्रश्न धडाडीने सोडविण्याच्या मागे लागेल, अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा  आहे. भारतातील मुस्लिम त्या विरोधात आपल्या देशात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. निश्चितच सुधारीत नागरिकत्व कायद्यामुळे देशातील मुस्लिमांचे भवितव्य धोक्यात आले आहे. धर्माचा निकष लावून कायद्यात सुधारणा करण्यात आल्याचा अनेकांचा आक्षेप आहे. विरोधकांना प्रत्युत्तर म्हणून कायद्याच्या समर्थनार्थ भाजपचे मोर्च काढले जात आहेत.  त्यातून समाजात संघर्ष आणि कटूता वाढत आहे, याचे भानही भाजप नेत्यांना असू नये हे जास्त गंभीर आहे. नव्या कायद्यावरून देशात हिंदू विरूद्ध मुस्लिम असे विभाजन बघायला  मिळत आहे. समाजात फूट पडत आहे. राजकीय व्होट बँकेसाठी हे असे होत राहावे असे सत्ताधारी पक्षाला अपेक्षित असल्याचे वाटते. देशाचे हिंदू राष्ट्र करण्यासाठी घटनेत बदल  करण्यात येत आहे. देशात मुस्लिमांची संख्या जवळपास पंचवीस कोटी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला ते परवडणारे  नाही. देशाची एकता व अखंडता याला तडा जाणार नाही याची खबरदारी राज्यकत्र्यांची आहे. कायद्याला विरोध करण्यासाठी तरुण वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरत  आहेत. देशातील दोन डझन विद्यापीठांमध्ये असंतोष प्रकटला याकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही. विद्यार्थी आंदोलन पोलिसी बळावर दडपण्याचा प्रयत्न केला तर त्याचे  परिणाम सरकारला व सत्ताधारी पक्षाला भोगावे लागतात, याचे इतिहासातून अनेक दाखले देता येतील. पोलीस कारवार्इंचा निषेध सर्व देशभर होतो आहे. संघटीत विद्यार्थी शक्ती ही  राजकारणाची दिशा बदलू शकते हा या देशाचा इतिहास आहे. देशात आर्थिक मंदीचे वातावरण, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न या पाश्र्वभूमीवर आपण नव्या वर्षात प्रवेश करतो आहे. प्रत्येक  व्यक्तीला जर वाटत असेल की मला या देशात मानाने जगणे शक्य आहे तसेच माझ्या कुटुंबालाही सुखी ठेवण्यासाठी पर्याप्त संधी आहेत, तरच खऱ्या अर्थाने डॉ. कलाम यांना अभिप्रेत  असलेला भारत बनला आहे, असे आपण म्हणू शकतो. सरकारनेही यातून बोध घेऊन नव्या २०२० सालामध्ये रोजगार, उद्योग व विकास वेगाने करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तसे  करतानाच जातीयवाद, धर्मवाद, भ्रष्टाचार व अराजकता यापासून सावध राहणे गरजेचे आहे.
- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget