नववर्षाच्या सुरुवातीलाच देशातील वातावरण ढवळून निघाले, ते तरुण रक्तामुळे. एनआरसी, सीएएच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली तरुणाई न पटणाऱ्या नियमांना आम्ही धुडकावून लावू, असे सांगू पाहते आहे. त्यातच भरीत भर पडली आहे ती महिलाशक्तीची. बुरख्याच्या काळ्या पडद्याआड बंदिस्त असल्याची ज्यांच्यावर टीका करण्यात येते त्या मुस्लिम महिला या वेळी अन्यायी व्यवस्थेविरूद्ध अभूतपूर्व आंदोलनाचे नेतृत्व करताना पुढे आल्याचे देशभरातून आढळून आले. यातून एक स्पष्ट होते, की आजची महिला सक्रिय आहे. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल त्याचे काहीतरी मत आहे. स्वत:च्या हक्कांसाठी भांडण्यात गैर नाहीच, मात्र मार्ग सदनशीर व शांततेचा असल्यास नुकसान टळते आणि यशाच्या शक्यता वाढतात. त्यासाठी जनतेचा सरकारवर विश्वास असणे गरजेचे आहे. जनतेत स्वत:बद्दलची विश्वासार्हता वाढवणे ही सरकारची जबाबदारी आहे. निदर्शने, आंदोलने वा विरोध हा राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार असून, नागरिकांनी आंदोलन केले असेल तर त्यात गैर काय, विरोध करण्यात कोणता कायद्याचे उल्लंघन होते, असा सवाल करत दिल्ली उच्च न्यायालयाने गेल्या मंगळवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसी विरोध म्हणून भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या जामा मशिदीतील निदर्शनांना घटनाबाह्य ठरवणाऱ्या दिल्ली पोलिसांना आझाद यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान चांगलेच फटकारले. जेएनयुमध्ये मुलींनी स्वत:साठी मिळवलेले स्वातंत्र्य व त्या स्वातंत्र्याचा अनुभव घेत स्वत:ला घडवणाऱ्या तरुणी; जेएनयुच्या व आरक्षणाच्या असण्यामुळे स्वत:च्या कुटुंबात उच्च-शिक्षणाची प्रथमच संधी मिळत असलेले अनेक अल्पसंख्याक, दलित-आदिवासी विद्यार्थी व त्यानंतर त्यांची आरक्षणाप्रती वाढलेली संवेदना; मदरशात शिक्षण घेतल्यानंतर जेएनयुमध्ये प्रवेश घेणारे मुस्लिमधर्मीय विद्यार्थी व त्यांना घडणारी आधुनिक तत्त्वज्ञान व आधुनिकतेची ओळख; आसामसह ईशान्येच्या सर्व राज्यांमधून आलेले विद्यार्थी व त्यांनी निर्माण केलेली भाषिक व वांशिक अभिव्यक्तींची व्यासपीठे यापैकी कोणतीही बाब संघ परिवाराच्या तब्येतीला मानवणारी नाही. कायम बुरख्यात दिसणाऱ्या विद्यार्थिनी या आंदोलनांच नेतृत्त्व करत आहेत. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया ही दोन शैक्षणिक केंद्रं सीएए विरोधाचे केंद्र बनली आहेत. विशेष म्हणजे तेथील मोर्चा तरुण महिला सांभाळत आहे. शाहीन बाग या गरीब मुस्लिमबहुल वस्तीतील महिला दिल्लीच्या कडाकाच्या थंडीत दिवस- रात्र बसून सीएए विरोधात निदर्शने करत आहेत. हा कायदा राज्यघटनेच्या विरोधात असल्याने कडाक्याची थंडी आणि पोलिसांनी देशाच्या इतर भागात सीएए विरोधी आंदोलकांविरोधात केलेला बळाचा वापर, अशा परिस्थितीतही या महिला निषेधाच्या नव्या शब्दकोशाच्या भोई बनल्या आहेत. हिजाब आणि बुरख्यासह त्या स्वत:ची अस्मिता पणाला लावत आहेत. २०१२ साली दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर पहिल्यांदाच महिला मोठ्या संख्येने बाहेर पडल्या आणि आंदोलनात सहभागी झाल्या, असे बोलले गेले. मात्र मुस्लिम महिला याआधीच घराबाहेर पडल्या होत्या. २००२च्या गोध्रा दंगलीचा निषेध करण्यासाठी त्यांनी लढा दिला आणि त्यातल्या काही जणी आजही हा लढा देत आहेत. त्यातल्या अनेकींना आपण मुस्लिम आहोत आणि बुरखा हे धर्माने घालून दिलेले बंधन नाही तर आमचा स्वत:चा चॉईस आहे, हे सांगण्यात कसलीच भीती किंवा संकोच वाटत नाही. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीच्या रक्षणासाठी इतक्या मोठ्या संख्येने मुस्लिम महिला पहिल्यांदाच बाहेर पडल्या आहेत. हे एखादे धरण फुटल्यासारखे आहे. पंचविशीच्या आतील तरुणी पेटून उठल्या आहेत. सोशल मीडियाची ताकद त्यांना माहिती आहे. ‘इंडिपेण्डंट वूमेन इनिशिएटिव’ या फॅक्ट-फाइंडिंग टीमने जामिया मिलिया इस्लामियामधील महिलांचे म्हणणे जाणून घेत ‘अनअफ्रेंड : द डे यंग वूमेन टूक द बॅटल टू द स्ट्रीट’ नावाने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात ते म्हणतात, ‘आपल्या सामाजिक आणि राजकीय ताकदीवर विश्वास असणाऱ्या महिला मोठ्या संख्येने तिथे जमल्या होत्या. १५ डिसेंबर २०१९ रोजी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्याथ्र्यांवर अमानुष अत्याचार झाले. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात उठलेले विद्याथ्र्यांचे आंदोलन चिरडण्याचा जो प्रयत्न झाला त्यामुळे भारतातील कानाकोपऱ्यातील लाखो स्त्री, पुरुष आणि तरुण पेटून उठले. जामिया मिलियामध्ये आंदोलनात अग्रेसर असणाऱ्या सत्य, न्याय आणि समानतेच्या घोषणा देणाऱ्या भारताच्या तरुण महिला होत्या. त्यांच्या प्रेरणादायी प्रतिमा आमच्या मनावर कोरल्या गेल्या. यातल्या बहुतांश १९ ते ३१ वयोगटातल्या तरुण विद्यार्थिनी आहेत. मात्र काही सामान्य गृहिणी आहेत.’ मुस्लिम समाजातील महिलांमध्ये जाणिवेची सुरुवात तिहेरी तलाक आणि बाबरी मशीद निकालापासूनच झाली. मुस्लिम महिला नागरिकत्त्वासंबंधीच्या मुद्द्यावर लढा देत आहेत. त्या अर्थी या महिला अल्पसंख्याक नाहीत. त्या स्वत:च्या ओळखीसह बाहेर पडत आहेत. त्यांच्यात आत्मविश्वास आहे. त्यांच्या या आत्मविश्वासाला सलाम!
- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Post a Comment