इराणच्या सत्तावर्तुळातील दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली व्यक्तिमत्व आणि उच्च लष्करी अधिकारी मेजर जनरल कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने हवाई हल्ल्यात ठार केले आणि अनेक वर्षांपासून खदखदत असलेला अमेरिका-इराण दरम्यानच्या संघर्ष सरतेशेवटी नव्या युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. ‘राष्ट्रीय सुरक्षा पथका’चा सल्ला न जुमानता ट्रम्प यांनी इराणसोबतच्या अणुकरारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे बेफिकिरीचे होते. त्यानंतर इराणवर दबावाचा ट्रम्प यांचा प्रयत्नही निष्फळ ठरला. उलट सीरिया, येमेन आणि लेबनॉनमध्ये इराणच्या अस्थिरतेच्या कारवाया वाढीस लागल्या. ट्रम्प प्रशासनाचे कोणतेही उद्देश तिथे साध्य झालेले नाहीत. इराकसह आखातातील अन्य भागांतील अमेरिकी नागरिकांवरील संभाव्य हल्ले हाणून पाडण्यासाठी सुलेमानीला ठार करण्यात आल्याचे ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र ट्रम्प प्रशासनावर विश्वास ठेवणे कठीण आहे. अमेरिकी काँग्रेस (संसद) नेत्यांशी सल्लामसलतही करण्यात आलेली नाही. एकूणच परिस्थिती पाहता अमेरिकेचे परराष्ट्र धोरण कोलमडले आहे. ट्रम्प यांनी या हल्ल्याचा आदेश दिला. त्याआधी जॉर्ज बुश आणि बराक ओबामा यांच्या काळातही सुलेमानी यांच्यावर हल्ल्याबाबत विचार झाला होता. मात्र इराणसोबत अकारण युद्ध आणि तणावाची परिस्थिती ओढवू शकेल, या भीतीमुळे असा निर्णय घेण्यात आला नाही. राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्यानिर्णयाची योग्य प्रक्रिया या प्रकरणात पार पाडलेली आढळून येत नाही. स्वत:पुढील राजकीय संकट दूर करण्यासाठी ट्रम्प यांनी ही कारवाई केली असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण जागतिक राजकीय पटलावर अशी अनेक उदाहरणे आपणास पाहावयास मिळतील. अखेर अमेरिकेने ते साध्य केलेच. तेलाने समृद्ध असलेल्या आखातात पुन्हा एकदा सुडाग्नीचा वणवा भडकला आहे. अमेरिका आणि आखात यांच्यातील संघर्ष अनेक दशके जुना आहे. याला कारण आखातातील तेलाचे भांडार. या तेलाच्या राजकारणावर आपले वर्चस्व राहावे, ही महासत्तेची नेहमीच इच्छा राहिली आहे आणि त्यानुसारच अमेरिकेचे वर्तन सुरू आहे. ताज्या हल्ल्याचे कारणही यातच जडलेले आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि इराण यांच्यात अण्वस्त्र करार झाला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. अमेरिकेत सत्तापालट झाला. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले. इराण बरोबरच्या करारातून ट्रम्प यांनी माघार घेण्याची घोषणा केली. येथेच दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला. अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध आणले. भारतासह मित्र देशांना इराणकडून तेल खरेदी करायला बंदी घातली. इराणने अमेरिकेत मानवरहित ड्रोन पाडले, त्या वेळीच खरेतर अमेरिकेने हल्ल्याची तयारी केली होती. इराणचे सर्वेसर्वा खोमेनी यांच्या निकटवर्तींपैकी एक असलेले सुलेमानी यांच्या ‘ब्रेन'मुळेच इराणला एवढी ताकद मिळत असल्याचे अमेरिकेचे मत बनले होते. त्यामुळे थेट या अव्वल कमांडरवरच हल्ला करुन अमेरिकेने आपले इरादे स्पष्ट केले आहेत. ट्रम्प यांच्यावर महाभियोग सुरू आहे. शिवाय, अध्यक्षपदाची निवडणूकही तोंडावर आहे. त्या पाश्र्वभूमीवर आपण सक्षम व धाडसी नेता आहोत, हा संदेश देण्यासाठी ट्रम्प यांनी हल्ला करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. या हल्ल्याचा पहिला परिणाम लगेच दिसला. कच्च्या तेलाच्या किमती सुमारे चार टक्क्यांनी वाढल्या. युद्ध पेटल्यास पश्चिम आशियात वास्तव्यास असलेल्या सुमारे ८० लाख भारतीयांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल. इराणमध्ये भारताने उभ्या केलेल्या चाबहार बंदर प्रकल्पावरही परिणाम होणार आहे. तसे झाल्यास भारतीय अर्थव्यवस्थेवर नवे संकट येऊ शकते. इराण-इराक युद्ध, कुवेतचा संघर्ष आणि सद्दामचे उच्चाटन, १९९१ चे आखाती युद्ध, इस्रायल- अमेरिका- आखाती देश संबंध, तेल साठ्यावरील वर्चस्वाची लढाई यांमुळे हे वाळवंट सतत धगधगते आहे. वर्चस्वाच्या संघर्षाच्या या उकळत्या तेलाचा सुडाग्नी जगाला परवडणारा नाही. या हल्ल्याद्वारे अमेरिकेने संपूर्ण पश्चिम आशियाला असुरक्षित केले आहे. धार्मिक, वांशिक वर्चस्ववादाच्या संघर्षामुळे, तेलसंपन्न प्रदेशांवर नियंत्रण मिळविण्याच्या अमेरिकेच्या धोरणामुळे आधीच अशांत असलेल्या या टापूत आता युद्धाचा भडका उडण्याचा धोका निर्माण झाला आहे. सुलेमानी हे केवळ लष्करी अधिकारी नव्हते. ते इराणचे प्रमुख रणनीतिकार होते; इराणी रिव्हॉल्युशनरी गार्ड कोअर या समांतर सैन्यदलाच्या (आयआरजीसी) कुद्स दलाचे ते प्रमुख होते. या दलाच्या जोरावरच इराणने इराकसह पश्चिम आशियातील अन्य देशांत आपले वर्चस्व निर्माण केले होते. लेबेनान, सीरिया, येमेन आणि इराक या पश्चिम आशियातील अन्य देशांत इराणचे वर्चस्व वाढविण्याच्या धोरणाचे ते शिल्पकार होते. आपल्या बड्या नेत्याची अमेरिकेने केलेली हत्या इराण विसरणे शक्यच नाही. वास्तविक इराणबाबत ट्रम्प यांनी अनेकदा कोलांटउड्या मारल्या आहेत. बराक ओबामा अध्यक्ष असताना ट्रम्प यांनी युद्धविरोधी भूमिका घेतली होती. महाभियोगाच्या पाश्र्वभूमीवर ट्रम्प ‘इराण कार्ड' खेळत आहेत. गेल्या चार दशकांपासून अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध सतत बिघडत गेले आहेत. तेलसंपन्न आखातातील संघर्षाचे आर्थिक परिणाम जगासह भारताला जाणवणार आहेत.
- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४
Post a Comment