Halloween Costume ideas 2015

मुस्लिमांच्या भारतीयत्वाची गफलत

अल्बेरुनी हा मध्ययुगीन मुस्लिम दार्शनिक. भारतीय सभ्यतेचा, समाजाचा इतिहास त्याने ‘किताबुल हिंद’ या ग्रंथातून मांडला आहे. जगातल्या अनेक देशांत हा ग्रंथ भारतीय सभ्यतांच्या  अभ्यासासाठीचे महत्त्वपूर्ण साधन मानले जाते. हा अल्बेरुनी जेव्हा भारतात आला त्या वेळी त्याने भारतातल्या अनेक धर्मांना व त्याच्या संस्कृतींना पाहिले. त्यातला परस्परसंवाद पाहून  तो भारतावर प्रेम करायला लागला. त्याने भारतीय समाजाला भिन्न संस्कृतींचा एकात्मिक संघ ठरवले. जातींच्या उतरंडीत होणाऱ्या शोषणाला अधोरेखित करत त्याला भारतीयांच्या  जीवनाचे वैशिष्ट्य संबोधून त्यातली सौंदर्यस्थळे त्याने टिपली. भारतीयांच्या चालीरीती, लोकव्यवहार, भाषा, परंपरा, अवघ्या काही मैलांवर आढळणारा त्यातला बदल त्याला महत्त्वाचा  वाटला. म्हणून अल्बेरुनीला भारत हा देश निरनिराळ्या संस्कृतीचा आश्रयदाता वाटला. भारताला ‘संस्कृतींची माता’ ठरवण्याच्या जवळपर्यंत तो पोहोचला.
अनेकेश्वरवाद आणि एकेश्वरवाद, ईश्वरवाद आणि निरिश्वरवाद, निसर्गपूजन आणि ईश्वराच्या परलौकिक कल्पना, प्रेषितांचा सेमेटिक व जीवनव्यवहारातून जन्मलेला नॉनसेमेटिक धर्म  अशा परस्परविरोधी धर्मांची, पंथांची भारत ही जन्मभूमी... आश्रयभूमी. भारतात मानवी जीवनाच्या सभ्यतांमधल्या संघर्षाचा इतिहास खूप छोटा आहे. त्यामुळेच अल्बेरुनी हा दार्शनिक  भारतात सुखावला, स्थिरावला. त्याने इथे राहून ‘किताबुल हिंद’सारखे अजरामर ग्रंथ लिहीले. भारतीय संस्कृतीची सौंदर्यस्थळे त्याने आपल्या साहित्यातून जगासमोर आणली. पण त्याला  त्याकाळी धर्मावरून या देशात पुढे संघर्ष उद्भवतील, माणसांच्या झुंडी निर्माण होतील, धर्मभिन्नतेवरून माणसे माणसांनाच ठेचतील याची कल्पना कुणी दिली असती तर... तो भारतात  थांबला असता? भारताच्या सांस्कृतिक सौंदर्याने तो मोहित झाला असता? कुणास ठाऊक कस्रfचत त्याने भारतातील वास्तव्यही नाकारले असते. कस्रfचत त्याने भारतीय संस्कृतीची  सौंदर्यस्थळे आपल्या ग्रंथातून मांडलीच नसती.
पण हा अल्बेरुनी भारतात राहिला, भारतीय संस्कृतीचे गौरव आपल्या लिखाणातून करत राहिला. अखेरीस त्याने भारतीय उपखंडातच चिरनिद्रा घेतली. काळाने पुढे पावलं टाकली. पुढे भारताला काळाच्या प्रवासात मैलाचा दगड नव्हे तर एक माणूस सापडला. इतिहासातला ‘सच्चा माणूस’ म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल तो अमीर खुसरो. या खुसरोलाही भारताने वेड  लावले. भारताच्या सांस्कृतिक सुगंधाने खुसरो मोहित झाला. त्याच्यावर भारताची मोहिनी इतकी पडली की त्याने या देशाला ‘बहिश्त ए बर जमीन’ म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग म्हटले. हा  देश माझा आहे, असे तो गौरवाने सांगू लागला. (हस्त मेरा मौलीद व मावा वतन) त्याने भारतावर प्रेम करणं हे माझं धार्मिक कर्तव्य आहे, असं सांगताना लिहिलं- ‘दींज रसूल आमदाहे  कोई ज मरा दिन’. पण या देशात धर्मावरून भेद केला जातोय, हे त्याला बोचू लागलं. हा देश इतका सुंदर असताना तिथं असं काही घडणं योग्य नाही. त्याच्या या वेदना, हा विचार  त्याने आपल्या कवितेतून मांडल्या.
‘बरुं शुद दुई अज सरे तुर्क व हिन्दू,
के हिन्दोस्थान बा खुरासा यके खुद’
त्याने भारताला माणसांचा देश म्हटले. इथे तुर्क व हिंदू या भेदाच्या भिंती गळून पडतात. भारताबाहेरून भारतात परतल्यानंतर शेकडो वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या प्रियकरांना जितका  आनंद होतो तितकाच आनंद आपल्याला होत असल्याचे त्याने सांगितले.
‘गर वतन अज हिंद हासिल-ए-ऊ
बाज ब फिरदौस शुदी मंजिल-ए-ऊ’

हा देश माणसांचा राहावा, अखेरपर्यंत टिकावा अशी त्याची मनोकामना. यासाठी तो इश्काचा काफीर व्हायला निघाला. ‘काफिरे इश्क मन मुसलमानी मन दरकार निश्त’ म्हणत त्याने मी  इश्काचा काफीर आहे मला मुसलमानीची गरज नाही. माणसांवर प्रेम करणं ही माझी ईश्वरनिष्ठा असल्याचे नमूद केले. या खुसरोने ज्या देशासाठी शब्दांची, गीतांची, संगीताची पिरी,  फकिरी केली अशा खुसरोला या देशाने धर्मभिन्नतेवरून आपल्या सांस्कृतिक वारशातून तिलांजली दिली तर? हा देश माणसांचा देश राहील... हा देश खुसरोच्या कल्पनेतील ‘पृथ्वीवरील  स्वर्ग’ ठरेल? कस्रfचत याचंही उत्तर नाही असंच असेल. ज्या दिल्लीत त्याच्या नव्या शहांकडून आज भारतीयत्वाचा बाजार मांडला जातोय त्याच दिल्लीत खुसरोची कबर आहे.  माणसांच्या  शोषणाविरोधात आवाज बुलंद करणारा सुफी अवलिया हजरत निजामुद्दीन यांच्या मजारसमोर खुसरो विसावलाय. याच खुसरोचे पाय धुऊन त्याचे अमृत पिणारा, काव्यातून  इश्क वाटणारा गालीबदेखील इथून जवळच चिरनिद्रा घेतोय.
‘गालीब तिरे कलाम में क्योंकर मजा न हो?
पिता हूं धोकर खुसरवी शिरी सुखन के पांव’

अल्बेरुनी, निजामुद्दीन, खुसरो, गालिब यांच्या प्रेमाची, त्यागाची, समन्वयाची, परंपरा भारतातील मुस्लिमांच्या सांस्कृतिक इतिहासात प्रत्येक ठिकाणी आढळते. ज्या रामजन्मभूमीवरून  आज हिंदू-मुसलमान समोरासमोर आले, ती अयोध्या जितकी हिंदूच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वाची, तितकेच मुस्लिमांच्या धार्मिक इतिहासात त्या शहराला महत्त्व आहे. हिंदू  संस्कृतीच्या ग्रंथात अयोध्यानगरी महाप्रलयानंतर मनूने वसवल्याचा दावा केला जातो, तर मुस्लिम, मुहम्मद (स.) यांच्यापूर्वीचे प्रेषित नुह यांनी महाप्रलयानंतर हे शहर स्थापल्याचे  मानतात. काही अभ्यासकांनी नुह हेच मनू असल्याचे म्हटले आहे. नुह यांच्याशिवाय अन्य काही इस्लामी प्रेषितांचे या शहराशी घनिष्ठ नाते आहे. इस्लामी प्रेषित परंपरेत हजरत आदम  हे पहिले तर हजरत शिस दुसरे प्रेषित मानले जातात. या हजरत शिस यांची अयोध्येत दर्गाह आहे. त्यांची तेथे कबर असल्याचे सांगितले जाते. इस्लाम धर्माप्रमाणे, सुफी अध्यात्माच्या इतिहासातदेखील अयोध्येला तीर्थस्थान मानलं गेलंय. १०० हून आधिक सुफींनी या शहरात वास्तव्य केल्याचा इतिहास आहे. त्यापैकी अनेकांच्या कबरी या शहरात आहेत. त्यामुळे अनेक  मुस्लिम कवी, विचारवंत आणि इतिहासकारांनी अयोध्येचा ‘मक्का खुर्द’ म्हणून उल्लेख केला आहे. पवित्र मक्का शहरानंतरचे महत्त्वाचे धार्मिक शहर म्हणून अयोध्येला भारतीय  इस्लामच्या इतिहासात सन्मान दिला जातो.
या अयोध्येच्या विकासासाठी अनेक मुस्लिम बादशहांनी मदत केली. अकबरपासून सुरू झालेला सहिष्णुतेचा हा वारसा अनेक मोगल बादशाहांनी पुढे चालवला. अयोध्या आणि अकबर हा  विषय विस्तृत मांडता येईल इतकी त्याची व्याप्ती आहे. आधुनिक भारतीय धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना मध्ययुगात याच अकबराने मांडली. ‘सुलह कुल’च्या माध्यमातून धार्मिक  समन्वयाचा संघ त्याने स्थापन केला होता. त्याने अनेक धर्मांच्या प्रतिनिधींना त्यात स्थान दिले. त्यांच्याशी चर्चा करून भारतातल्या मानवी समाजाची व्यवच्छेदकता त्याने अबाधित  राखली. हिंदूसाठी त्याने वेगवेगळे कायदे केले. काही जुने कायदे संपवून त्यांच्या अधिकारांची घोषणाही केली. या अकबराने आपल्या दरबारात निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना नवरत्न  म्हणून स्थान दिले. बिरबल, तानसेनसारखे हिंदू या नवरत्न समूहाचे भूषण होते. या नवरत्नातील अबुल फजल याने ‘आईन ए अकबरी’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला  अनेकांनी  मानवतेचा ‘आईन’ (संविधान) म्हटले. हा अकबर, त्याचे नवरत्न, अबुल फजल ते शंभर सुफी, इस्लामचे प्रेषित व त्यांचे अयोध्येशी असलेले नाते वर्तमान मुस्लिम समाजाच्या कोणत्या  भारतीयत्वाला अधोरेखित करतात. सावरकर भारतीय असण्यासाठी या भूमीला पुण्यभू मानणं महत्त्वाचं आहे, असे निक्षून सांगतात. अयोध्या आणि मुसलमान, खुसरो, निजामुद्दीन यांचा  हा इतिहास या देशाला कोणते धार्मिक पावित्र्य प्रदान करतोय, त्याला पुण्यभू ठरवतोय? मग मुस्लिमांना त्यांच्या या पुण्यभूपासून पारखे करणे योग्य आहे का? याचा विचार  सावरकरांचा गौरव करणाऱ्या वर्तमान शहांकडून केला जाणार आहे की नाही?
अकबराप्रमाणे दक्षिणेतही भारताच्या गंगा जमनी संस्कृतीचे अनेक शिलेदार जन्मले. सरस्वतीची आरती लिहिणारा इब्राहिम आदिलशहा हा तर हिंदूच्या श्रध्देचा विषय ठरला. हिंदूंनी  त्याला ‘जगद्गुरू’ ही पदवी दिली. भारतीय संगीतांच्या सुरांवर आधारित इमारती त्याने बांधल्या. ‘नवरसपूर’ ही कलानगरी त्याने वसवली. हिंदूच्या साप्ताहिक प्रार्थनेचा दिवस म्हणून  त्याने शुक्रवारची साप्ताहिक सुटी रद्द करून गुरुवारी दिली. इब्राहिमचे हे आदिलशाही राजघराणे ज्या बहामनींच्या अस्तानंतर स्थापन झाले त्याचा संस्थापक हसन गंगू बहामनी होता.  हसन हा साधा नोकर भारतात आश्रयाला आला. काही काळ तो गंगू ब्राह्मणाकडे चाकरीला होता. पुढे तो राजपदावर पोहोचला त्या वेळी त्याने या गंगू ब्राह्मणाची स्मृती जपत आपल्या  नावापुढे त्याचे नाव लावले. हा हसन असो किंवा आदिलशाहीचा संस्थापक युसूफशहा अथवा निजामशाहीचा काही काळ प्रमुख राहिलेला मलिक अंबर यापैकी कुणी गुलाम म्हणून तर   कुणी आश्रित म्हणून भारतात आले. या आश्रितांना भारताने राजपदाचा मान दिला. गुलामांना राजा करणारी, आश्रितांना सन्मान देणारी ही भारतीय संस्कृती व त्या संस्कृतीवर निष्ठा  ठेवणारे, बहामनी, आदिलशहा, अंबर आपण भारतीय इतिहासातून वगळू शकतो काय? त्यांनी घडवलेलं मुस्लिमांचं भारतीयत्व आपण दुर्लक्षित करू शकतो?
दक्षिणेत हैदर अली टिपू सुलतान यांच्या राजवटीलाही गंगा जमनी इतिहासात महत्त्व आहे. हैदरअली याने नायरांच्या अन्यायातून दलितांना मुक्ती दिली. त्याने अस्पृश्यांच्या सामाजिक  हक्क, अधिकारांसाठी अस्पृश्यता निर्मूलनाचा कायदा केला. त्याच्यानंतर टिपू सत्तेत आला. इंग्रजांच्या भांडवली वसाहतवादाला त्याने प्रखर विरोध केला. चौथ्या म्हैसूर युध्दात त्याला  वीरमरण आले. त्याच्या मृत्यूची बातमी श्रीरंगपट्टणमच्या सामान्य घरातील एका ब्राह्मण मुलीला समजली. त्या वेळी ती युध्दाचा कोणताही अनुभव नसताना आपल्या राजाच्या मृत्यूचा  बदला घेण्यासाठी, घरातली तलवार घेऊन तडक रणांगणात उतरली. लढता–लढता तिलाही वीरमरण आले. टिपूच्या मृतदेहाजवळ तिचाही मृतदेह आढळून आला. हे हैदरअली, टिपू आणि  त्यांच्यासाठी लढणारी ब्राह्मण मुलगी हे भारताच्या गंगा जमनी संस्कृतीचे शिलेदार आहेत. या तिघांनाही वगळून त्यांच्या आदर्शातून घडत गेलेल्या मुस्लिम समाजावर भारतीयत्वाची  वर्तमान परिमाणं लादणं कितपत योग्य असेल?
या गंगा जमनी संस्कृतीची सारी पाळेमुळे खणून काढण्याचा चंग आपण बांधलाय. मागच्या काही दिवसांत भारतातल्या अनेक मध्ययुगीन इमारती आपण उद्ध्वस्त केल्या. वली गुजराती   हा गुजराती अस्मितेचा प्रतीक ठरलेला कवी. या मुस्लिम कवीची कबर रस्त्याच्या विस्तारीकरणाचे कारण देऊन उद्ध्वस्त करण्यात आली. त्याने लिहिलेल्या गुजरातच्या गीतांकडे दुर्लक्ष  करण्यात आले.
‘गुजरात के फिराख से है खार खार दिल,
बेताब है सिने में अतिश बहार दिल,
मरहम नहीं इसके जख्म का जहां में,
शम्शीर ए हिङ्का से जो हुआ है फिगर दिलां’

वरीलप्रमाणेच दखनी काव्याचा, आद्यकवी मोहंमद कुली कुतुबशाहच्या गोवळकोंड्याच्या मागच्या काही भिंती पाडण्यात आल्या. कुतुबशाही वास्तू चारमिनारला खेटून आपण आपला  धर्मवाद उभा केलाय. मलिक अंबरने स्थापन केलेल्या औरंगाबादेत मागच्या पाच – दहा वर्षांत अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेक शहरांची नावे बदलण्यात आली. भारतीय  संस्कृतीच्या बहुसंख्यकीकरणाच्या अजेंड्यातून जगद्गुरू इब्राहिम आदिलशाहचा बिजापूर, हसन गंगू बहामनीची गुलबर्गा ही राजधानीदेखील सुटू शकली नाही. भारताचे ऐतिहासिक चारित्र्य  हिंदू आणि मुस्लिमांच्या समान योगदानातून घडलंय. पण आता आपण यातून मुस्लिमांना वगळण्याचं ठरवलंय. त्यांच्या संस्कृतीची पाळेमुळे खणून भारतीय मुस्लिमांची भारतीय  संस्कृतीतील प्रतीकं आपण नष्ट करत चाललोय. मुस्लिमांच्या संस्कृतीला, त्यांना उपरे ठरवण्याचा, त्यांच्या भारतीयत्वाच्या खुणा नष्ट करण्याचा हा राजकीय डाव मुस्लिमांच्या विरोधात  नसून तो भारताच्या विरोधात आहे.
भारताच्या मानवी चारित्र्याला या राजकीय कुरापती कलंकित करत आहेत. त्यातही दुर्दैव हा आहे की, हा भारत जेव्हा घडत होता, पारतंत्र्याच्या काळ्याकभिन्न अंधारातून उदयाला येत  होता, त्या वेळी कोणतीही भूमिका न घेणारे आज भारतीयत्वाची व्याख्या करत आहेत. त्या समाजाला भारतीयत्व सिध्द करायला सांगत आहेत, ज्या समाजाने बहादूरशहा जफरसारखा  १८५७ च्या उद्रेकाचा नेता जन्माला घातला, ज्याने भारतासाठी आपले राजपुत्र कुर्बान केले, त्याला स्वत:ला राजवैभव त्यागून रंगूनमध्ये वैफल्यात मरण पत्करावे लागले. त्याच्या मुली  अन्नान दशा होऊन मेल्या. आज भारतीयत्वासाठी सजवलेला हा बाजार बहादूरशहाच्या त्यागाची विटंबना करत नाही का? सांप्रदायिकता कोणत्याही स्वरूपात येवो ती वाईटच. त्याला  देशभक्तीचे वेष्टन लावले तरीही सांप्रदायिकतेला नैतिकता प्रदान करता येत नाही. पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर बॅ. जिन्ना म्हणाले होते, ‘हर एक हिंदुस्थानी मुसलमान को अपनी  सारी उम्र अपने हिंदुस्थानी होने का सबुत देते हुए गुजारनी पडेगी.’ दुर्दैवाने फाळणीचे एक नायक ठरलेल्या बॅ. जिना यांचे उद्गार खरे ठरवण्याची एकही संधी आजचे राज्यकर्ते सोडत  नाहीत. हिंदूमध्ये मुस्लिमांच्या भारतीयत्वाची गफलत पसरवून भाजप, संघ आणि संभ्रमित काँग्रेस भारताच्या भारतत्वावर आघात करत आहेत.

- सरफराज अहमद
सदस्य गाजीउद्दीन रिसर्च सेंटर सोलापूर.
मो.: ९५०३४२९०७६
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget