Halloween Costume ideas 2015

अल्माइदा : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(८७) ...आणि मर्यादांचे उल्लंघन करू नका.१०५ अल्लाहला अतिरेक करणारे अत्यंत अप्रिय आहेत.
(८८) जे काही वैध व विशुद्ध अन्न अल्लाहने दिले आहे ते खा व प्या आणि अल्लाहच्या अवज्ञेपासून दूर राहा ज्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवली आहे.
(८९) तुम्ही लोक ज्या निरर्थक शपथा घेता त्याबद्दल अल्लाह तुम्हाला परत शिक्षा करणार नाही पण ज्या शपथा तुम्ही जाणूनबुजून घेता, त्यांच्यासाठी तो जरूर तुम्हाला पकडील. (अशी  शपथ मोडण्याचे) प्रायश्चित्त हे होय की दहा गरिबांना त्या सर्वसाधारण प्रकारचे जेवण तुम्ही द्यावे, जे तुम्ही आपल्या मुलाबाळांना देता, अथवा त्यांना वस्त्रे द्यावीत किंवा एका गुलामाला मुक्त करावे आणि ज्याची अशी ऐपत नसेल त्याने तीन दिवसाचे उपवास करावेत. हे तुमच्या शपथांचे प्रायश्चित्त आहे की जेव्हा तुम्ही शपथ घेऊन ती मोडली असेल,१०६  आपल्या शपथांचे रक्षण करीत जा.१०७ अशाप्रकारे अल्लाह आपल्या आज्ञा तुमच्यासाठी स्पष्ट करीत आहे कदाचित तुम्ही कृतज्ञता दर्शवाल.
(९०) हे श्रद्धावंतांनो, ही दारू आणि जुगार व वेदी आणि शकून१०८ ही सर्व अमंगल सैतानी कामे होत, यांच्यापासून दूर राहा. आशा आहे की तुम्हाला यश मिळेल.१०९


१०५) ``मर्यादांचे उल्लंघन करणे'' म्हणजे हलालला हराम ठरविणे आणि अल्लाहने पवित्र ठरविलेल्या वस्तूंपासून असे दूर राहाणे जसे त्या अपवित्र आहेत. हा एक अतिरेक आहे. पवित्र  वस्तूंचा वापरात गरजेपेक्षा जास्त खर्च करणेसुद्धा अतिरेक आहे. हलाल (वैध) सीमेपलीकडे जाऊन हराम (अवैध) सीमेत प्रवेश करणेसुद्धा अतिरेक आहे. अल्लाहला या तिन्ही गोष्टी  नापसंत आहेत.
१०६) कारण काही लोकांनी हलाल वस्तूंना आपल्यावर हराम करण्याची शपथ खाल्ली होती. म्हणून अल्लाहने येथे शपथ घेण्याविषयीच्या आदेशाचे वर्णन केले आहे. एखाद्याने अनायासे  शपथ घेतली तर त्याला पूर्ण करणे आवश्यक नाही. कारण अशा शपथ घेण्यावर विचारणा होणार नाही. परंतु एखाद्याने हेतूसह शपथ घेतली आणि ती तोडली तर त्याचे प्रायश्चित  त्याला द्यावे लागेल. एखाद्याने पाप करण्याची शपथ खाल्ली तर त्याने आपली शपथ पूर्ण करू नये. (पाहा सूरह २ (अल्बकरा टीप २४३-४४ कफ्फारासाठी पाहा सूरह - ४ (निसा) टीप. १२५)
१०७) शपथांचे रक्षण करा म्हणजे शपथेला योग्य वापरात आणणे. व्यर्थ आणि गुन्हेगारीच्या कामात उपयोग करू नये. दुसरा अर्थ जर मनुष्य एखाद्या गोष्टींवर शपथ खातो तेव्हा  त्याला आठवणीत ठेवावे. आपल्या निष्काळजीपणाने ती शपथ विसरून जाऊ नये आणि त्याविरुद्ध कार्य करू नये. तिसरा अर्थ म्हणजे एखाद्या चांगल्यासाठी हेतूपुरस्सर शपथ खाल्ली  तर त्याला पूर्ण केले जावे आणि शपथ तुटली तर तिचा प्रायश्चित दिला पाहिजे.
१०८) वेदी आणि स्थान तसेच आस्ताने, फास आणि जुगार यांच्या तपशीलासाठी पाहा सूरह ५, टीप. १२ व १४ फासे टाकणे जुगाराप्रमाणे असले तरी या दोघांत अंतर आहे. अरबी भाषेत  फास्याला `अज़लाम' म्हणतात. फालगीरी (भविष्य पाहाणे) आणि चिठ्ठया टाकून भविष्य पाहाणे हे सर्व अनेकेश्वरवादी (शिर्क) आणि अंधविश्वासाच्या आधाराने चालते. यांना संयोगाच्या  कामासाठी आणि भविष्य काढण्यासाठी तसेच कसोटी आणि संपत्ती वाटपासाठी उपयोगात आणले जाते.
१०९) या आयत द्वारा चार वस्तूंना हराम (अवैध) केले आहे. एक दारू, दुसरे जुगार, तिसरे ती स्थानं व वेदी (आस्ताने) जिथे अल्लाहशिवाय दुसऱ्याच्या नावाने भक्ती करण्यासाठी  तसेच दुसऱ्याच्या नावाने भेट व बळी चढविण्यासाठी (कंदोरी) खास केले असेल. चौथी वस्तू फासे, नंतर उल्लेखित तिन्ही वस्तूंविषयी तपशील मागे आला आहे. दारूविषयी आदेशाचा  तपशील खालीलप्रमाणे आहे.
दारू हराम करण्याविषयी या अगोदर दोन आदेश आलेले होते. सूरह २ (अल्बकरा) आयत नं. २१९ आणि सूरह ४ (निसा) आयत ४३ मध्ये हे आदेश आले आहेत. आता या अंतिम  आदेशापूर्वी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एका भाषणात लोकांना सचेत केले की अल्लाहला दारू अत्यंत अप्रिय आहे. असंभव नाही की दारूला पूर्ण रूपाने हराम करण्याचा आदेश लवकरच  येईल. म्हणून ज्यांच्याकडे दारू उपलब्ध आहे त्यांनी ती विकून टाकावी. यानंतर काही कालावधीनंतर ही आयत अवतरित झाली. त्या वेळी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जाहीर केले की  आता ज्यांच्याकडे दारू शिल्लक असेल ते त्यास विकू शकणार नाही की पिऊ शकणारही नाही तर त्यांनी आपल्याकडील दारूला नष्ट करून टाकावे. म्हणून त्याच क्षणी मदीनेच्या  रस्त्यावर दारू फेकून देण्यात आली. काही लोकांनी विचारले, ``आम्ही यहुदी लोकांना भेट म्हणून देऊ शकतो का?'' पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``ज्याने ही वस्तू हराम  (अवैध) केली त्याने त्यास भेट म्हणून देण्यासही मनाई केली आहे.'' काहींनी विचारले, ``आम्ही दारूला शिरक्यात बदलून टाकतो.'' पैगंबर मुहम्मद (स.) यांनी यापासूनसुध्दा मनाई केली  आणि आदेश दिला की, ``दारूला फेकून द्या.'' एकाने आग्रह करून विचारले, ``औषधासाठी म्हणून वापरात आणली तर परवानगी आहे?'' सांगितले ``नाही, ती औषध नाही तर आजार   आहे.''
एकाने आणखी विचारले,`` हे अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.) आम्ही `फार थंड' क्षेत्रातील राहणारे आहोत आणि आम्हाला मेहनतसुद्धा जास्त करावी लागते. आम्ही दारू पिऊन श्रम  परिहार करून घेतो आणि सर्दी होण्यापासून आमचा बचाव करतो. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी विचारले, ``जे काही तुम्ही पिता त्याने नशा चढते का? त्यांनी होकारर्थी उत्तर दिले.  पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आदेश दिला, ``त्यापासून दूर राहा.'' त्यांनी सांगितले, ``आमच्या क्षेत्रातील लोक तर ऐकणार नाहीत.'' पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``त्यांनी जर   ऐकले नाही तर त्यांच्याशी युद्ध करा.'' हदीसकथन आहे की पैगंबर मुहम्मद (स.) यांनी दारू सेवन करणाऱ्यांबरोबर जेवण घेण्यास मनाई केली आहे. प्रारंभी त्या भांड्यांना ज्यात दारू  बनविली जात आणि प्यायली जात असे त्या भांड्यांचा वापर करण्यास पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मनाई केली होती. जेव्हा दारू हराम करण्याचा आदेश पूर्णत: लागू झाला तेव्हा या  भांड्यांवरची मनाई त्यांनी उठविली. `खम्र' म्हणजे द्राक्षाची दारू आहे. परंतु लाक्षणिक रूपात हा शब्द अरबीत गहु, ज्वारी, किसमिस, खजुर आणि मधाच्या दारूसाठी वापरला जात असे.  परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हराम त्या सर्व वस्तूंना ठरविले ज्यामुळे नशा उत्पन्न होते. हदीसमध्ये पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्पष्ट आदेश आहेत, ``प्रत्येक नशा निर्माण करणारी   वस्तू `खम्र' आहे आणि प्रत्येक वस्तू जी नशा निर्माण करते हराम आहे. प्रत्येक ते पेय जे नशा निर्माण करते हराम आहे आणि मी प्रत्येक नशा देणाऱ्या वस्तूंपासून मनाई करतो.''   माननीय उमर (रजि.) यांनी जुमाचा खुतबा देताना (प्रवचन) सांगितले, ```खम्र' म्हणजे प्रत्येक ती वस्तू जी बुद्धीला झाकून टाकते.''

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget