Halloween Costume ideas 2015

भांडुप-सोनापूर येथे एन.आर.सी. व सी.ए.ए. विरोधात जन आंदोलन

Bhandup protest
मुंबई (भांडुप) (मंजुर पठाण)
एन. आर. सी. व सी. ए. ए. या नव्याने पारीत झालेल्या कायद्याच्या विरोधात भांडुप सोनापूर येथील जकरीया कंपाऊंडच्या मैदानात एका जन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले  होते. सदर आंदोलनात सर्व जाती धर्माच्या पुरूष-महिलांनी हजारोच्या संख्येने सहभाग घेतला. गेल्या शनिवारी जमात ए इस्लामी हिंद, भांडुप शाखेसह, पहल फाऊंडेशन व इतर  संघटनांकडून आयोजित आंदोलनाला कडेकोड पोलीस बंदोबस्तात व देशभक्तीवर आधारित गीताने सुरूवात झाली. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपले विचार मांडले.
सुरूवातीला मुफ्ती यांनी सांगितले की, एन. आर. सी. व सी. ए. ए. हा कायदा भारतीय संविधानाच्या विरूध्द असून तो मुसलमानांच्या माथ्यावर थोपला जात आहे. हा देश आमचा  असून जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. याच आंदोलना दरम्यान अली अहमद यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, तीन  तलाक, बाबरी मस्जिद व झुंडबळीच्या बाबतीत मुस्लिमांनी संयम राखीले मात्र संविधानात फेर बदल व मुस्लिमांना आपल्याच देशातून बाहेर काढण्याचा हा अंधकारमय कायदा आम्ही  खपवून घेणार नाही.
सरकारला हा कायदा मागे घ्यावाच लागेल. हा देश सहा हजारांपेक्षा जास्त भारतीयांचा देश असून प्रत्येकाला या ठिकाणी स्वातंत्र्याचा अधिकार आहे. व त्यानुसार अनेक जाती धर्माचे  लोक या ठिकाणी एकजुटीने राहत आले व राहत आहे. मात्र हे सरकार ही एकात्मता व बंधुता संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून आता या कायद्यासंदर्भात आम्ही गप्प  बसणार नाहीत. जमात ए इस्लामी हिंद, भांडुपचे अध्यक्ष शाकीर शेख यांनी सांगितले की, देशात अनेक ठिकाणी या कायद्याविरूध्द खूप मोठ्या प्रमाणात जन आंदोलने होत आहेत व  हे सरकार याबाबत आमच्या इतर धर्मिय बांधवांची दिशाभुल करीत आहे. जर हा कायदा अंमलात आला तर आपल्या इतर धर्मिय बांधवांना सुध्दा त्याची झळ सोसावी लागणार आहे.  यानंतर पंचशिल बुध्द विहार भांडुपचे संचालक सतीश सपकाळे यांनी सरकारचे दुटप्पी धोरण स्पष्ट करीत सांगितले की सरकार एक तर आंबेडकर साहेबांच्या संविधानात फेरबदल करून  त्याच्याविरूध्द जात आहे व दुसरे एका विशेष जातीसमूहाबाबत कायदा स्थापित करीत आहे. या सरकारच्या धोरणानुसार मुसलमानांनंतर मागासवर्गियांवर यांचे लक्ष आहे व पुढे जाऊन  ते विमुक्त जाती जमाती व आदिवासींबाबत पाऊल उचलणार याची शक्यता नाकारता येत नाही.
मोईनोद्दीन बरकातींनी सांगितले की आता जागे व्हायची वेळ आली असून सरकारला हे दाखविणे गरजेचे आहे की आम्ही एक होतो व एक आहोत. नियाज चौधरींनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, हे सरकार एन. आर. सी. व सी. ए. ए. सारखा कायदा घेऊन आले आहे जो भारतीय संविधानाच्या व लोकतंत्राच्या विरूद्ध आहे. या सरकारला जेंव्हा  रोजगाराबाबत विचारले जाते तर ते पाकिस्तानकडे बोट दाखविते. त्यांनी आवर्जून असेही सांगितले की पाकिस्तानशी युध्द करायला कोणी हरकत घेतली का? मात्र ते पाकिस्तानच्या  नावाखाली नागरिकांना धोक्यात ठेवत आहे. आझादनगर सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष नरसिंह तिवारी यांनी सांगितले की या मुंबईत माझे संपूर्ण आयुष्य गेले. मी एक सरकारी कर्मचारी  होतो व आता निवृत्त झालो, मात्र कुठल्याही ठिकाणी मला नागरिकत्व सिध्द करावे लागले नाही व काही ठिकाणी हा प्रश्न जरी उद्भवला तरी मी त्या ठिकाणी माझा डोमेसाईल अर्थात  रहिवाशी असल्याचा दाखलाच सादर केल्याचे आढळते. मात्र हा नवीन आलेला नागरिकत्वाचा कायदा हा सामान्य माणसाची गळचेपी करण्यासारखाच आहे. या व्यतिरिक्त त्यांनी सांगीतले  की माझे आयुष्य हे मुसलमानांसोबतच गेले. मुस्लिम मोहल्ल्यातच आजही माझे वास्तव्य आहे व यांच्याकडून मला कायम सहकार्यच प्राप्त झालेले आहेत, असेही त्यांनी आवर्जून  सांगितले. जमाल चौधरी यांनी सांगितले की या देशासाठी अनेकांच्या बलिदानासह आमच्या पुर्वजांनीही खूप बलिदाने दिलेली आहेत. इंग्रजांविरूध्द सर्वप्रथम मुस्लिमांनीच बंड पुकारले.  त्या संदर्भात त्यांनी अनेक उदाहरणे देत सांगितले की आमच्याचकडून आज आम्ही भारतीयअसल्याचा दाखला मागितला जात आहे ही लज्जास्पद बाब आहे.
रेहान खान ने सांगितले की, एन. आर. सी. व सी. ए. ए. हा कायदा लागू करून सरकार येथील एकात्मता व बंधुत्वाला ठेच पोचवित आहे. तसेच मुस्लिमांना देशाबाहेर काढण्यासाठी  आहे. या कायद्याला देशाच्या इतिहासात काळा  कायदा म्हणून संबोधणे काही चुकीचे नाही.
आंदोलनाच्या शेवटी असगर खान यांनी म्हटले की जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत अगदी शांततेने व कोणाच्याही धार्मिक भावना न दुखविता आम्ही असेच आंदोलने  चालूच राहणार. शेवटी राष्ट्रगीताद्वारे आंदोलन समाप्त करण्यात आले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget