Halloween Costume ideas 2015

सीएए-एनपीआर-एनआरसीचा विरोध आणि हिंदूंची नवीन व्याख्या

राम पुनियानी
संपूर्ण देशात सीएए-एनपीआर-एनआरसीचा ज्या पद्धतीने विरोध झाला तो भविष्यात बराच काळ लक्षात ठेवला जाईल. हा विरोध स्वयंस्फूर्त होता, त्यात अनेक पक्ष, अनेक विचारधारा आणि अनेक सामाजिक आणि धार्मिक समुदाय सामील झालेले होते. असे म्हणण्याची गरज नाही की, हे विरोध प्रदर्शन एवढे मोठे आणि व्यापक होते की, भाजपा आणि तिचे सहयोगी यामुळे हादरून गेले. या जबरदस्त विरोधामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काही गोष्टी अशा बोलाव्या लागल्या ज्या सत्य नव्हत्या.
    दिल्लीच्या रामलीला मैदानामध्ये आयोजित एका सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ”एनआरसीबद्दल सरकारमध्ये कधीही कुठलीही चर्चा झालेली नाही”. त्यांच्या या दाव्याला माध्यमांनी तात्काळ आव्हान देऊन तो चुकीचा असल्याचे सिद्ध करून दाखविले. त्यांनी भाजपाच्या अनेक नेत्यांच्याच नव्हे तर खुद्द अमित शहांच्या संसदेतील भाषणाचा दाखला देऊन हे सिद्ध केले की, मोदी खोटे बोलले. अमित शहांनी एनआरसी संपूर्ण देशात लागू केली जाईल, असे बोलतानाचे व्हिडीओज मोठ्या प्रमाणात व्हायरल केले गेले. मोदींनी दुसरा दावा केला होता की, भारतात कुठेच डिटेन्शन सेंटर नाहीत. माध्यमांनी तोही दावा चुकीचा असल्याचे सिद्ध केले. देशात किती डिटेन्शन सेंटर सुरू आहेत? या संदर्भात जी अधिकृत माहिती उपलब्ध आहे, ती देशासमोर मांडली गेली. आपल्या सगळ्यांना माहित आहे की, एक डिटेन्शन सेंटर कर्नाटकामध्ये तयार होत आहे आणि हे ही (उर्वरित पान 2 वर)
सत्य आहे की, महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या सरकारचे डिटेन्शन सेंटर बनविण्याचे आदेश रद्द करून टाकले आहेत.
    भाजप सरकारच्या या अनावश्यक खेळीने त्यांच्या समर्थकांना आशा होती की, या खेळीचा विरोध फक्त मुस्लिमांकडून केला जाईल. परंतु संघ परिवाराला हे पाहून जबर धक्का बसला की, सर्व धार्मिक समुदायांनी, विद्यार्थ्यांनी आणि बहुसंख्य राजकीय पक्षांनी त्यातल्या त्यात जे एनडीएमध्ये सामील आहेत अशा जेडीयू आणि अकादल आदी पक्षांनीही सीएए-एनआरसीचा विरोध केला. यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की राष्ट्रीय महत्वाच्या मुद्यांवरसुद्धा भाजपा आपल्या सोबतच्या पक्षांना विश्‍वासात घेत नाही.
    आता एकीकडे मोदी या वादग्रस्त मुद्यांपासून वाचण्याचा मार्ग शोधत आहेत तर दुसरीकडे हिंदू राष्ट्रवादाचे प्रमुख प्रवक्ते संघ प्रमुख मोहन भागवत हे जाणून बुजून भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुस्लिमांना आश्‍वस्त करण्यासाठी त्यांनी असे विधान केले की, ” सभी 130 करोड भारतीय हिंदू हैं, अर्थात हर भारतीय हिंदू है.” त्यांची ही खेळी यशस्वी ठरणार नाही, कारण संघाचे राजकारण सर्वांनाच माहित आहे. हिंदूंच्या ओळखी संबंधीच्या प्रतिकांच्या मुद्यांभोवतीच संघ फिरतो हे सगळ्यांना माहित आहे. याशिवाय, जसे की बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणून ठेवलेले आहे की, ”देशात ज्या हिंदू धर्माचा आज उदोउदो केला जात आहे त्याचा मूळ आत्मा ब्राह्मणवाद आहे.”
    ख्रिश्‍चन असो, मुस्लिम असो, शिख असो किंवा बौद्ध हे काय स्वतःला हिंदू समजतील? हा प्रश्‍न पुन्हा-पुन्हा उभा केला जातो. संघ एकीकडे पवित्र हिंदू ग्रंथांवर आधारित हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचे आंदोलन चालवतो तर दुसरीकडे निवडणुकांचे समीकरण जुळवण्यासाठी बिगर हिंदूंना वेगवेगळे संदेश देत राहतो. संघाचे नेते हा खेळ यासाठी खेळतात की हिंदू धर्म पैगंबर आधारित नाही. तो भारतातील अनेक धार्मिक परंपरांचे मिश्रण आहे. या परंपरा ब्राह्मणवादीही आहेत आणि श्रमण (नाथ, तंत्र, भक्ती, शैव इत्यादी) ही. ब्राह्मणवाद, ऋग्वेद मधील ’पुरूष सुक्त’ वर आधारित आहेत. आणि जागतिक आणि लैंगिक पदक्रमेचा समर्थक आहे. इतर परंपरा मात्र समतामुलक आहेत.
    मुळात हिंदू धर्मातील विविधता ही हिंदू राष्ट्रवाद्यांसाठी नेहमीच एक डोकेदुखी राहिलेली आहे. हिंदू राष्ट्रवादी चिंतक वि.दा.सावरकर यांनी ’हिंदू’ या शब्दाला परिभाषित करतांना लिहिलेले आहे की, ज्याची जन्मभूमी आणि पुण्यभूमी दोन्ही सिंधू नदीच्या पुर्वेकडे असतील ते हिंदू. त्यांनी हिंदूत्व शब्दाची रचनाही केली. ज्याला साधारणपणे हिंदू धर्माचा पर्यायवाची शब्द मानले जाते, जे की बरोबर नाही. सावरकरांनी स्पष्ट शब्दात म्हटलेले होते की, भारतात हिंदूंचा दर्जा मुस्लिम आणि ख्रिश्‍चनांपेक्षा उच्च आहे. कारण की ही भूमी हिंदूंची भूमी आहे.
    एक अन्य प्रमुख हिंदूत्ववादी चिंतक माधव सदाशिव गोळवलकर हे जर्मनीच्या नाझी विचारसरणीमुळे फार प्रभावित झालेले होते. अल्पसंख्यांकांविषयी हिटलरनी अवलंबलेल्या नितीचे प्रशंसक होते. संघाच्या शाखा आणि त्यांच्याद्वारे संचलित केल्या जाणार्‍या शाळांमध्ये हे शिकविले जाते की, हिंदू हे मुस्लिम आणि ख्रिश्‍चनांपेक्षा उच्च आणि श्रेष्ठ आहेत. हीच धारणा हळूहळू सामुहिक सामाजिक विचारांचा भाग बनली. संघ अनेक वर्षांपासून आपल्या विचारधारेचा प्रचार करत आलेला आहे आणि आता स्थिती अशी बनलेली आहे की, सामाजिक ओळखीशी संबंधित मुद्यांना समाज फार महत्व देऊ लागलेला आहे. धर्माच्या भिंती अधिक उंच होतांना दिसत आहे. स्पष्ट आहे यामुळे आमची बंधुत्वाची भावना गंभीर संकटात सापडलेली आहे आणि यामुळेच आपल्या समाजाची आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसुद्धा बाधित झालेली आहे.
    1990 च्या दशकामध्ये जेव्हा भाजपा सत्तेच्या जवळ पोहोचू लागली तेव्हापासूनच तीने सर्व भारतीयांना हिंदू म्हणायला सुरूवात केली होती. मुरलीमनोहर जोशी मुसलमानांसाठी मुहम्मदीया हिंदू आणि ख्रिश्‍चनांसाठी ख्रिश्तीहिंदू या शब्दाचा उपयोग करत होते. संघाचा तर हा सुद्धा दावा आहे की, शीख धर्म हा हिंदू धर्माचाच एक भाग आहे.
    येणेप्रमाणे दोन समांतर प्रक्रिया एकाच वेळेस सुरू आहेत. एकीकडे अशी पावले उचलली जात आहेत ज्यामुळे मुस्लिम आणि ख्रिश्‍चनांवर प्रश्‍नचिन्ह उभे केले जावू शकतील. राम मंदिर आंदोलन, गोरक्षा, लव जिहाद, घरवापसी, राष्ट्रवाद (पुलवामा-बालाकोट) हे या संबंधीचे मुद्दे आहेत. दुसरीकडे हिंदू राष्ट्राचे सर्वात मोठे ध्वजवाहक सरसंघचालक मोहन भागवत हे मुस्लिम आणि ख्रिश्‍चनांना हिंदू धर्माच्या छत्राखाली आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रीय मुस्लिम मंच आणि याच प्रकारची एक ख्रिश्‍चन संघटना या दोन समुदायामध्ये संघाचे काम करत आहेत.
    सर्व भारतीयांना हिंदू बनविणे म्हणजे त्यांना मुर्ख बनविण्यापेक्षा वेगळे नाही. याला गैर हिंदू लोकांवर हिंदू धर्म लादण्याचा प्रयत्न म्हणूनही पाहता येईल. याउलट संघ सर्व धर्मांना हिंदू म्हणण्यावर अडून बसलेला आहे. जनता याला कोणत्या स्वरूपात घेते हे तर येणारा काळच ठरवेल. मात्र मोदी आणि भागवत यांनी ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त  केलेल्या आहेत यावरून स्पष्ट आहे की, सीएए-एनआरसीच्या अत्याधिक विरोधाने त्यांना आपली पावले मागे घेण्यासाठी बाध्य केलेले आहे.

(सदरील लेख मूळ इंग्रजीतील असून, त्याचा हिंदी अनुवाद अमरिश हरदेनिया यांनी केलेला तर हिंदीतून मराठी अनुवाद एम.आय. शेख, बशीर शेख यांनी केला.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget