Halloween Costume ideas 2015

धर्मांध शक्तींना वेळीच रोखले पाहिजे

सध्या देशातील वातावरण तापलेले आहे. सामान्य जनतेत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नोटा बंदी, ३७० वे कलम रद्द, राममंदिर यासारखे भावनिक मुद्द्यांमुळे सामान्य  माणूस भयभीत झाला आहे. भावनेना खतपाणी घालणारे मुद्दे सतत चर्चेत आणून सरकारच्या फसलेल्या धोरणांचा जनतेला विसर पडावा असे राजकारण रंगलेले आहे, त्यातच  नागरिकत्व संशोधन विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात पास करून भाजपच्या मोदी सरकारने धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी बाजी मारली आहे. देशभरात अराजकता माजेल असे  चित्र दिसत आहे. सामान्य जनता महागाईने होरपळत असताना ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्याऐवजी सरकारने या विधेयकाला पारीत करून स्वत:चा बचाव केला आहे.
‘‘ज्या देशाला लोकशाही मार्गाने जावयाचे आहे, त्याला सदगुणांची जोपासना करण्यावाचून गत्यंतर नाही. जेथे संयमी, विवेकी, सत्यनिष्ठ, प्रामाणिक, श्रमणारे, दुसऱ्यांची कदर करणारे  लोक असतील, तेथे लोकशाही वाढेल, व्यक्तिस्वातंत्र्यही नीट नांदू शकेल. व्यवहार भ्रष्ट असेल, सार्वजनिक जीवन जर पै किंमतीचे झाले असेल, तर त्या राष्ट्राला कोणती आशा?’’  सध्या देशात चाललेले राजकारण आणि सामाजिक आचरण पाहिले की, कित्येक वर्षांपूर्वी पूज्य साने गुरुजींनी आपल्या देशातील लोकशाही समाज व्यवस्थेविषयी मांडलेला विचार किती  मौलिक होता, याचे प्रत्यंतर येते. महात्मा फुले, राजर्षी शाहू छत्रपतीं, महात्मा गांधी, पूज्य साने गुरुजी, पूज्य विनोबाजी, आप्पासाहेब पटवर्धन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी  देशावर, पर्यायानं महाराष्ट्रावर फार मोठे उपकार केले आहेत. त्यांनी आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनात जी तत्वे आणि मूल्ये अंगीकारली, त्यातील कुठलीही तत्त्वे आणि मूल्ये सद्यस्थितीतील राजकारणात आणि समाजकारणात दिसत नाहीत. त्यांच्या विचारांचा, त्याग व समर्पणाचा केवळ बोलबाला आपण करतो. मात्र त्यातले काहीच आपण स्वीकारले नाही,  स्वीकारत नाही, त्यामुळे समाज भरकटत चालला आहे. हे कुणीही मान्य करील.
प्रत्येकाचा वैयक्तिक हव्यास वाढला आहे. महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. अर्थात संपत्तीचा अतोनात संग्रह करण्याचा छंदही वाढला आहे. उपभोगावर संयम राहिला नाही, चैनीच्या गोष्टी  वाढल्यामुळे नीतिमत्ता लोप पावली. समाजजीवन पूर्णपणे दिशाहीन व संसर्गित झाले आहे. राजकीय क्षेत्र फारच गढूळ झाले आहे, ते हाताबाहेर गेले आहे. आता ते दुरुस्त होण्याची  सुतराम शक्यता दिसत नाही. व्यक्तिगत जीवनात ताणतणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. अनैतिक व्यवहारांचे उदात्तीकरण होते आहे. संपूर्ण समाजजीवन पूर्णपणे बरबटलेले आहे.  समाजव्यवस्था परस्परावलंबी असण्यापेक्षा शोषणप्रधान झाली आहे. ती एका दूषित, दुष्ट व राक्षसी घेऱ्यात सापडली आहे. सुलभ व पोषक शिक्षण आणि मौलिक संस्कार यांचा अभाव  आहे. संस्कारित शिक्षणच दिले जात नाही. सर्वत्र चंगळवाद फोफावला आहे. ज्यांना ओरबडता येते ते ओरबडतात. ज्यांना ते जमत नाही, ते हतबल व असह्य होऊन रहातात. यातले काही आक्रमक भूमिका घेतात. या साऱ्यांमुळे संपूर्ण समाजजीवन काळवंडले आहे. दु:खी आणि निराशाजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे भान कुणालाही नाही. हे या देशाचं  दुर्देव आहे. या देशातील लोकशाही जिवंत राहील की नाही अशा संभ्रमात विचारवंत आहेत. त्यामुळेच महात्मा गांधी आणि पूज्य साने गुरुजी यांच्या सकारात्मक विचार सरणीची नितांत  गरज आहे. नव्या पिढीला त्यांच्या विचारांचा संस्कार होणे अगत्याचे आहे. सामाजिक विषमता आणि भेदाभेद पाहून साने गुरुजीं अस्वस्थ होत होते, विषम रुढी परंपरा उच्चनीच भेद  पाहून ते व्यथित होते, बालपणीच्या संस्कारातून त्यांच्यात मानवी मूल्ये व मानवतावादी विचारांचं बीजारोपण झाले होते. महात्मा गांधींच्या प्रेरणेतून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय  सहभाग घेतला. या चळवळीत त्यांनी कारावास भोगला. तेथे त्यांना पू. विनोबाजींचा सहवास लाभला. ‘जय जगत्’सारख्या नाऱ्यातून उद्घोषित मानव कल्याणाची विनोबांजींची धारणा  त्यांना प्रभावित करुन गेली. तसेच कारावासात असतांनाच बहुभाषिक भारतीय भेटले. त्यामुळे मानवी ऐक्याचा साक्षात्कार झाला. तो त्यांनी ‘आंतरभारती’मध्ये कार्यान्वित केला.  त्यातूनच ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ या काव्यातून अत्यंत समर्पक असे सर्व धर्मांचे सार सांगितले. साने गुरुजींनी आपल्या साहित्यातून जीवनमूल्यांचे यथार्थ आणि  वास्तव चित्रण केले आहे. भारतीय संस्कृतीच्या प्रेरणा आणि प्रभावातून सर्व जीवनमूल्यांचे त्यांनी समर्थन केले आहे. भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा त्यांना नेहमीच प्रभावित करायच्या.  भारतीय संस्कृती या त्यांनी लिहिलेल्या ग्रंथातून अद्वैताचे अधिष्ठान, बुध्दीचा महिमा, वर्ण, कर्म, भक्ती, ज्ञान, संयम, चार आश्रम, स्त्रीस्वरुप, मानवेतर सृष्टीशी प्रेमाचे  संबंध, अहिंसा, ध्येयाची पराकाष्ठा, अवतार कल्पना, मूर्तिपूजा, प्रतीके, मृत्यूचे काव्य आदी प्रकरणातून भारतीय संस्कृतीच्या महान रहस्याचे हृदयस्पर्शी विवेचन केले आहे. इस्लाम  धर्मातील एकता, भाईचारा, शोषणमुक्त समाजवादी विचारसरणीचे चित्रण त्यांनी ‘इस्लामी संस्कृती’ या पुस्तकात मांडले आहे. साहित्य जगतात त्यांचं साहित्य अजरामर झाले आहे. अशा  साहित्यातून देशाला तारणहार असणारे विचार मांडले आहेत. अशा एकात्मतेच्या विचारांचा जागर केला पाहिजे. सध्याच्या धर्माधर्मात, जातीपातीत पूâट पाडणाऱ्या शक्तींना वेळीच रोखले गेले पाहिजे.

– सुनीलकुमार सरनाईक
मो.: ९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने, तसेच दर्पण पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले आहेत.)

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget