Halloween Costume ideas 2015

‘जो माणसांना जोडतो, तोच धर्म’

पुणे (वकार अहमद अलीम) 
भारत एक धर्मप्राधान्य देश आहे. येथे धार्मिक ओळखच प्रमुख आधार आहे, सन्मान आहे. जो इन्सानों को जोडता है, वही धर्म है. छुआ-छूत, नफरत फैलानेवाला धर्म ही नहीं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या धार्मिक आस्थेनुसार आचरण करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. हा अधिकार प्रत्येक भारतीयाला संविधानाने दिला आहे. आमच्या विचारप्रणालीमध्ये भिन्नता आहे पण संविधान ने मात्र न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव यावर हक्क आणि अधिकार दिला आहे. याच उदात्त तत्वाला पुढे नेणे गरजेचे आहे. या ठिकाणी वास्तविक भारत दृष्टीस येत आहे. अशाच भारताला आपल्याला पूढे न्यायचे आहे. हाच खराखुरा भारत आहे. इथे सभामंचावर उपस्थित सर्व धर्मीय, जातीय विभिन्न आदरणीय व्यक्तींकडून उपरोक्त प्रत्येक शब्द, जनसामान्यांवर प्रभाव टाकणारा आहे. देशाचा विकास, प्रगती तोपर्यंत होऊच शकत नाही, जोपर्यंत नैतिकतेच्या दृष्टीने  तो उच्चतम होत नाही. नैतिकतेचा र्‍हास हीच देशापुढील सर्वात मोठी चुनौती (आवाहन) आहे. - (उर्वरित पान 7 वर)
यासाठी देशातील समस्त नागरिकांमध्ये परस्पर प्रेम, विश्‍वास, बंधुभाव निर्माण करणे ही काळाची गरज आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद, पुणे शाखा प्रशंसनेस पात्र आहे. त्यांनी सद्भावना मंचची स्थापना करून, देशापुढे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंदतर्फे, संपूर्ण देशात लवकरच एक हजार सद्भावना मंच निर्माण करून, परस्परांविषयी प्रेम आणि बंधुभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. संपूर्ण जगात भारताला एक अनुकरणीय देश बनवावे, अशीच सर्वोच्च अल्लाहकडे दुवा, प्रार्थना करतो, असे अत्यंत तळमळीचे भावनिक आवाहन, जमाअत-ए-इस्लामी हिंदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, मोहम्मद सलीम शेख, इंजिनिअर यांनी येथे केले.
    रविवार, 15 डिसेंबर रोजी पुणे स्थित आजम कॅम्पस येथील असेम्बली हॉल येथे दुपारी 2 ते 4 दरम्यान, सद्भावना मंच स्थापनेच्या वेळी अध्यक्षीय समारोपात इंजी. मो. सलीम हे बोलत होते. यावेळी सभामंचावर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रीय सप्तखंजेरी प्रबोधनकार सत्यपाल महाराज, शिरसालीकर, वारकरी संप्रदायाचे प्रसिद्ध ह.भ.प. रामदास महाराज जाधव पंढरपूर, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जे. कोळसे पाटील, एम.आय.टी. पुण्याचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य मौलाना निजामुद्दीन फखरूद्दीन, एमआयटी पुणेचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, मानसरोवर गुरूद्वारा पुणेचे गुरूग्रंथी हशमतसिंगजी पंजबाबी, जिवन विद्या मिशन पुणेचे संतोषदादा तोतरे, मराठा सेवा संघाचे गंगाधर बनवरे, आदर्शगाव पाटोदाचे सरपंच भास्करराव पाटील, लोकायत पुणेचे नीरज जैन, सत्यशोधक समाज श्रीगोंदाचे अ‍ॅड. संभाजी बोरूडे, एस.एम. जोशी फाऊंडेशन पुणेचे सचिव, प्रा. सुभाष वारे, धम्मविनया सामाजिक संस्था पुणेचे डॉ. भिक्खुणी सुमना, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे हभप माणिक महाराज मोरे, प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता अ‍ॅड. बासंती नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
    भारतीय समाज विभाग, जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्राचे सचिव सद्भावना मंचचे निमंत्रक डॉ. सय्यद रफिक पारनेरकर यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थित जनसमुहाचे स्वागत केले. सद्भावना मंचाची स्थापना का? याचे स्पष्टीकरण करताना, आपल्या प्रास्ताविकेचे सांगितले की, परस्पर सद्भावनेनेच आपण प्रगती करू शकतो व देशात व समाजात शांती ही नांदू शकते. 1450 वर्षापूर्वी दिव्य कुरआनमध्ये म्हटले आहे, ”या अय्युहन्नासु इन्ना खलकानाकूम मिन् अकरींव्व उन्सा” अर्थात, ” हे मानवानों ! आम्ही तुम्हाला एकाच पुरूष व एकाच स्त्रीपासून निर्माण केले आहे.” म्हणजेच समस्त मानवजात एकाच माता-पित्याची संतान आहे व सर्वजण आपापसात बंधू-भगिनी आहेत.
    400 वर्षापूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. ”अवधी एकाचीच वीण, तेथे कैचे भिन्ना-भिन्न!
    समस्त मानवजातीत असलेले हे बंधुत्वाचे नाते व समता, आज 21 व्या शतकात विज्ञानानेही सिद्ध केले आहे. आज आपण अखिल मानवजातीमध्ये रक्तदान करणे, अवयवदान करतो आणि हे जीवनदान ठरत आहे. म्हणजेच आधुनिक विज्ञानानेही समस्त मानवजातीमध्ये रक्ताचे नाते असल्याचे सिद्ध केले आहे.
    मात्र, आज समाजात स्वार्थ, परस्पर द्वेष व जातीयवाद, धर्मभेद काहीसा वाढला आहे. काही समाज विघातकशक्ती आपल्या स्वार्थासाठी जातीयवादाला खतपाणी घालत आहेत. त्यामुळे भारतीय समाजात, परस्पर द्वेष व घृणेचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी देशविघातक शक्ती, प्रसारमाध्यमांचा दुरूपयोग, खोटारडा व विकृत इतिहास पसरविणे याचा वापर करीत आहेत.
    अशा गढूळ वातावरणात समाजाला तारण्यासाठी सर्वधर्मीय सूज्ञजनांनी संघटीतपणे व सातत्याने, प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे. यासाठीच सद्भावना मंचच्या माध्यमाने आपण हेच उदात्त कार्य हाती घेऊन, समाजाला जोडण्याचा, सद्भावना वृद्धींगत करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
    आपल्या महाराष्ट्रात सद्भावनेचा महान वारसा लाभला आहे, असे सांगून डॉ. सय्यद म्हणाले, संत तुकाराम महाराज व शेख अनगढशाह फकीर (रहे.), ह. शेख मुहम्मद (रह.), श्रीगोंद्याचे शेख मुहम्मद महाराज यांचे परस्पर प्रेमाचे संबंध व सलोखा आजही टिकून आहे. तुकोबांची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करताना दरवर्षी पुण्यात अनगढशाह बाबांच्या दर्गाहमध्ये मुक्काम करते तसेच श्रीगोंदास्थित शेख मुहम्मद बाबा (रहे.) समाधीस्थळ वारकर्‍यांचे व सर्वधर्मीय बांधवांचे तीर्थस्थळ आहे. राष्ट्रपिता महात्मा ज्योतीराव फुले यांनी पैगंबरांचे गुणगाण करणारा ”जहाँ मर्द मुहम्मद” हा पोवाडा लिहिला.  सावित्रीबाई फुले बरोबर फातीमा शेख यांनी सहशिक्षिकेचे काम करून, फुले दाम्पत्याला अनमोल सहकार्य केले.
    शिवरायांच्या राज्यातही परस्पर सद्भावना कायम होती. म्हणूनच वामनरावदादा कर्डक म्हणतात, ”शिवरायांच्या पंखाखाली मुळीच नव्हती वाण, आनंदाने नांदत होते, हिंदू - मुसलमान”
    आदरणीय सानेगुरूजींनी पैगंबर ह. मोहम्मद (सल्ल.) यांचे उदात्त चरित्र ”इस्लामी संस्कृती” या ग्रंथाच्या स्वरूपात जगापुढे ठेवले आहे, प्रबोधनकार ठाकरे आपल्या ” हिंदू धर्माचे दिव्य” मध्ये म्हणतात, ” इस्लामचे पैगंबर ह. मुहम्मद (सल्ल.) यांचे आगमन, त्यांची धोरणे कर्तबगारी आणि अल्पावधीत त्यांच्या धर्मानुयायांची झालेली भरभराट इत्यादी गोष्टी इतक्या चमत्कारपूर्ण आहेत की मानवी अंतःकरणाला आश्‍चर्याने थक्क करून सोडणारी यासारखी दूसरी हकीकत जगाच्या उपलब्ध इतिहासात मिळणे शक्य नाही.” बहिष्कृत हितकारणी सभेचे मुखपत्र असलेल्या ”बहिष्कृत भारत” या आपल्या वृत्तपत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजसुधारक लोकहितवादी यांची इस्लामवरील लेखमाला छापली होती. कुरआन हा धर्मग्रंथ अरबी भाषेत असल्याने त्याचा अर्थ सामान्यांना समजत नव्हता. कुरआनातील धर्मतत्वांचा अर्थबोध सामान्यासाठी झाला पाहिजे अशी इच्छा बाळगून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी त्याचे मराठीत भाषांतर करण्याचे कामही सुरू केले होते. त्यासाठी 25 हजार रूपयांची मोठी रक्कमही खर्ची घातली होती. दुर्दैवाने महाराजांच्या अकाली निधनाने हे काम पूर्ण झाले नाही. (संदर्भ - राजर्षी शाहू छत्रपती महाराज स्मारक ग्रंथ डॉ. जयसिंगराव पवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीतेत म्हणतात, ”मुहम्मदाने केली प्रार्थना, विखुरला इस्लाम कराया शहाना, संघटित केले त्याने स्वजना तया काळी,
लोक प्रतिमापूजक नसावे, त्यांनी एका ईश्‍वरासी प्रार्थावे.
हा मुहम्मदांचा उपदेश, नव्हे एकाच देशासाठी.

    शेवटी प्रत्येकाला मृत्यूतर अटळ आहेच. मात्र सद्भावनेचे उदात्तम कार्य करून मरावे की समाजात द्वेष पसरवून मरावे हा निर्णय प्रत्येकाच्या हाती आहे. निश्‍चितच समाज जोडणार्‍यांचा व द्वेष पसरविणार्‍यांचा अंतिम परिणाम एकसारखा कदापी असू शकत नाही.
    म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, ” पेरी कडू जीरे, मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केली कैसी येवी .
आणि पैगंबर मुहम्मद (सल्ल.) म्हणतात, ” यह दुनिया आखिरतकी (पारलौकिक जीवन) की खेती है. सद्भावना वृद्धींगत करण्यासाठी देशातील सर्व सद्भावना प्रिय बांधवांनी सामुहिकपणे व सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. आजचा हा कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे, असेही त्यांनी सांगीतले.
    लोकायत पुण्याचे निरंजन जैन यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की, देशात सध्या जातीयवादी शक्ती ताकतवान होत आहेत. गंभीर प्रश्‍न उद्भवला आहे,  देशाला विभागण्याच्या दिशेने का नेले जात आहे?” भारतीय संविधानाला गुंडाळणे आहे की हिंदू राष्ट्र स्थापन करणे? किंवा विदेशी राष्ट्रांचा गुलाम करणे आहे?
    सत्यशोधक समाजाचे अ‍ॅड. संभाजी बोरूडे यांनी सांगितले की, जगात भारत एकच असा देश आहे, जिथे जास्त प्रमाणात माणसांमध्ये भेद केला जातो. सद्भावना मंचाअगोदर ” सावित्री फातीमा मंच” सुरू झाला. भारतीय राज्यघटनेला आव्हान म्हणजेच सद्भावनेला आव्हान, प्रतिगामी शक्तींना विरोध करण्यासाठीच सद्भावना मंचची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी त्याग करावा लागेल. डॉ. एस.एम. पठाण म्हणाले, देशात शांतता नसेल तर देश मोठा होणार नाही. जमाअत  इतर धर्मीयांना सोबत घेऊन सद्भावना निर्माण करण्याचे कार्य करते, हे स्तुत्य आहे.
    माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील यांनी आपल्या घणाघाती भाषणात सांगितले की, अडीच हजार लोकांनी देशावर पाच हजार वर्षे राज्य केले. पण माणसा-माणसात भेद करून, न्याय, सत्यासाठी आमच्यासारखे लोक रस्त्यावर मरणांसाठी तयार आहोत, पण सहभागी न होणारे लोक, घरात अमर राहणार आहात काय? मुसलमानांची भिती दाखवून दलितांना तुडविले जाते. छत्रपती शिवाजी महाराज मनुस्मृतीला धक्का देणारे पहिले राजा होते. विद्वेषाचे वातावरण भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊ नये म्हणून निर्माण केले जाते. एम.आय.टी.चे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी धीरगंभीर, अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले, इस्लाम म्हणजे शांतीच प्रतीक. धर्मग्रंथ म्हणजे कसे जगावे, कसे जगू नये, हे शिकविले. कुरआनच्या माध्यमाने प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी हेच शिकविले. प्रेषितांनी सांगितले, स्वर्ग (जन्नत) आईच्या पायाच्या तळव्याखाली आहे, वडील स्वर्गाचा द्वार आहे. अत्यंत सुंदर चिंतन आहे यामध्ये सद्भावना. मन की बात नव्हे तर दिल की बात आहे. ” मन जोडना नहीं, दिल जोडना, यही सद्भावना है.
    धर्म ही प्रगल्भ होणारी संकल्पना आहे, अशी व्याख्या करून धम्मविनया सामाजिक संस्था, पुण्याचे अध्यक्ष भिक्खुणी सुमना म्हणाल्या, भारतातील सध्याच्या घडामोडी, आपल्याला पुन्हा गुलाम बनविण्याचे षडयंत्र आहे. हा प्रश्‍न एकत्रितपणे लढल्यास स्वातंत्र्य, समता व बंधुता निर्माण करू शकतो. एकमेकांच्या धर्मावर टिका न करता, त्याचा अभ्यास केला पाहिजे. मौलाना निजामुद्दीन यांनी नफरत की आग में, मुहब्बत के फुल खिलानेवाले सद्भावना के लोगों को मुबारकबाद. सुभाष वारे यांनी सांगितले की, आत्मसन्मानाचा बळी देऊन, सद्भावना निर्माण होऊ शकणार नाही. गंगाधर बनदरे यांनी सांगितले की, ब्राह्मण हिंदू नाहीत पण हिंदूंचे प्रवक्ते आहेत. जीवन विद्याचे संतोषदादा तोतरे म्हणाले, निसर्गाच्या नियमाचे पालन म्हणजे सद्भावना माणसाला बुद्धीचे वरदान ईश्‍वराने दिले, म्हणून विचाराने वागण्याने आनंद दिला पाहिजे.
    राष्ट्रीय सप्तखंजेरी प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी ’आग लग गई इस देश को, अब बचाही क्या? अशी व्यथा मांडून, बच गए हम तो जला ही क्या ? इन्सान की औलाद है, इन्सान ही रहेगा. देशातील घडामोडीवर हल्लाबोल करताना सांगितले की, मंदीर के आगे मूर्ती, मूर्ती के पीछे खुर्ची, प्रेम की गंगा बहाते चलो, सद्भावना को बढाते चलो.
    जमाअते इस्लामी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष जमीर कादरी यांनी सांगितले की, अन्यायाविरूद्ध न्याय प्रस्थापित करणे, त्याशिवाय सद्भावना कायम होऊ शकत नाही. प्रचलित इतिहासाच्या पुर्नलेखनाची आवश्यकता आहे. प्रसिद्धी माध्यमाद्वारे चुकीचा इतिहास शिकविला जात आहे.
    पंढरपूर येथील हभप रामदास महाराज म्हणाले, डॉ. आंबेडकरांची राज्यघटना अतिशय चांगली आहे. त्याची अंमलबजावणी चांगल्याप्रकारे झाली पाहिजे. देशात विद्वेषाची आग लागलेली आहे, एकमेकांशी प्रेम करण्याचे प्रयत्न करा, तरच सद्भावना निर्माण होईल.
     सूत्रसंचालन जमाअतचे दापोडी विभागाचे स्थानिक अध्यक्ष अजीमोद्दीन यांनी केले. शब्बीर अहमद यांनी आभार मानले.     कार्यक्रमास राज्यभरातून सद्भावना प्रेमी, विविध जाती, धर्मांचे मान्यवर आवर्जून उपस्थित होते. दुपारी 1 ते 2 दरम्यान, सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. पुणे जमाअतच्या सर्व पदाधिकार्‍यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अतोनात प्रयत्न केले. कार्यक्रम संपल्यानंतर आजम कॅम्पस मधील विस्तीर्ण मस्जीदमध्ये मगरीबच्या नमाजच्या वेळी सर्व मान्यवर देशबांधवांना मस्जीद परिचय करून देण्यात आला. विविध धर्मियांची मांदियाळी असूनसुद्धा अत्यंत शिस्तबद्धपद्धतीने कार्यक्रम पार पडला.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget