Halloween Costume ideas 2015

मुसलमानांचे राजकीय आत्मभान

Namaz
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी एनआरसी विरोधी आंदोलनात दिल्या जाणाऱ्या ‘नारा ए तकबीर’ व ‘ला इलाहा इल्ललाह’ या घोषणेवर आक्षेप नोंदवत त्याला कट्टरवादाशी जोडलं  आहे. दुसरीकडे अभिनेत्री फराह खान अली हिनेदेखील या घोषणेला जय श्रीरामशी जोडून आक्षेप नोंदवला. संबंधित वादावर सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. फराह खान व थरूर  संबंधित प्रतिक्रियेवरून ट्रोल झाले. अनेकांनी त्यांना प्रतिप्रश्न विचारत या घोषणांचे राजकीयीकरण करू नका, असा सल्ला दिला.
मुळात ‘ला इलाह इल्ललाह’ आणि ‘नारा ए तकबीर’ या इस्लामिक घोषणा आहेत. त्याचे धर्मप्रसाराशी काही देणंघेणं नाही. धार्मिक मेळाव्यात केवळ वातावरण निर्मिती म्हणून त्याचा  वापर होतो. या उपर त्याचा काहीएक संदर्भ आढळत नाही. पण गेल्या तीसएक वर्षांत मुसलमानांकडून या घोषणा सामाजिक आणि राजकीय पाश्र्वभूमीवर वापरण्यात येताना दिसून येत  आहेत. अर्थातच या घोषणांना धार्मिकतेचा मुलामा चढवत विरोधक मुसलमानांना वेगळे पाडण्यासाठी त्याचा वापर करत आहेत.
नागरिकत्व कायद्याचा विरोध करताना मुसलमान सामूहिक नमाज पठण करून संबंधित कायद्याचा प्रतिकात्मक निषेध नोंदवत आहेत. त्यांच्याकडून आंदोलनस्थळी ठिकठिकाणी  सामूहिक नमाज पठण केली जात आहे. केवळ मुस्लिमच नाही तर अनेक मुस्लिमेतरही या सामूहिक नमाजमध्ये सहभाग घेताना दिसून येत आहेत. आंदोलनातील मृतांना आदरांजली  अर्पण करण्यासाठी काही ठिकाणी अशी सामूहिक नमाज पठण केली गेली. वास्तविक पाहता ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’विरोधी आंदोलनात सामूहिक नमाज हे सरकारच्या निषेधाचे  प्रतिकात्मक साधन म्हणून वापरली जात आहे. त्याला जामियाच्या विद्यार्थी आंदोलनाची पाश्र्वभूमी आहे. १५ डिसेंबरला पोलिसांच्या ताब्यात असताना जामियाच्या काही विद्यार्थ्यांनी  सरकारचा निषेध म्हणून नमाज पठण केली. ही एक सहज कृती होती. त्यात कुठलीही कुरघोडी नाही. (अशा प्रकारची कुरघोडी असते मुळात हेच मुसलमानांना माहीत नाही). कालांतराने  पुढच्या काही मोर्चात सामूहिक नमाज सरकार विरोधाचे प्रतीक म्हणून विकसित झाली. वास्तविक नमाज म्हणजे प्रार्थना असते, अर्थातच ती चांगले काम सुरू करण्यापूर्वी किंवा  शुभकार्य पार पडल्यावर अदा केली जाते. जशी कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमात विघ्नहर्त्याची आरती केली जाते. अगदी त्याप्रमाणे नमाजचेही आहे. कार्यक्रमात कुठलीही विघ्ने येऊ  नय़ेत, हा उद्देश त्यामागे असतो. रविवारी २९ डिसेंबरला पुण्याच्या गोळीबार मैदानात झालेल्या आंदोलनात उलेमांनी एकत्र येऊन मोर्चा शांततेत पार पाडावा म्हणून सामूहिक दुआ पठण  केली होती. त्यामुळे आंदोलनाच्या सुरुवातीला वर उल्लेखित घोषणा दिल्या जात असतील तर त्यात आक्षेपार्ह असे काही नाही.
घोषणा व नारे सांस्कृतिक मूल्यभान जागवणारी साधने असतात. प्रत्येक जाहीर सभा किंवा जनाआंदोलनांना विविध प्रकारच्या घोषणांमुळे बळकटी मिळते. घोषणांचा सामाजिक व  राजकीय संस्कृतीवर खोलवर परिणाम होत असतो. लेके रहेंगे आझादी.. मनुवाद का नाश हो.. इत्यादी घोषणा अलीकडे चांगल्याच प्रसिद्धीस आल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळात  ब्रिटिशांविरोधात अनेक घोषणा दिल्या जात. स्वातंत्र्य आंदोलनात इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा क्रांतिकारी ठरली. त्याचा विस्तार होत जय हिंद, करो या मरो.. सारे जहा से अच्छा...  तुम मुझे खून दो.. जय जवान जय किसान.. मारो फिरंगी को.. भारत छोडो.. वंदे मातरम इत्यादी घोषणा दिल्या गेल्या. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा तर आजही दिली जाते. मुळात  स्वातंत्र्यानंतर भारतीय मुसलमानांमध्ये सामाजिक व सांस्कृतिक प्रतीके विकसित झालेली नाहीत. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर साहजिकच या घोषणा मागे पडल्या. पुढे अशा प्रकारच्या  घोषणांची निर्मिती मुसलमांनाकडून झाली नाही. धार्मिक मोर्चे व जुलूस वगळता मुसलमान अन्य आंदोलनामध्ये फारसा सामील झालेला नाही. त्याला अलिप्तता हे कारण नसून आर्थिक  असुरक्षितता हे महत्त्वाचे कारण आहे. बहुतेक मुस्लिम हे हातावर पोट असणारे आहेत. एखाद्या दिवशी कामावर गेलो नाही की घरात चूल पेटायचे वांदे. शिवाय त्यांना रोजचा भाकरीचा संघर्ष तरी कुठे सुटला आहे.
आता बऱ्याच वर्षांनंतर अस्तित्वाचे संकट निर्माण झाल्याने तो बहुसंख्याक वर्गासमवेत तो भूख-प्यास विसरून नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू झालेल्या आंदोलनात सामील  झालेला आहे. गेल्या ५ वर्षांतील घुसमट, सांस्कृतिक आक्रमणे व सामाजिक अस्वस्थता या आंदोलनाच्या पाठीमागे आहे. केवळ मुसलमानच नाही तर संबंध विवेकवादी भारतीय भाजप  सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे. साहजिकच या पाश्र्वभूमीवर मुसलमानांतील मोठ्या वर्गाचे राजकीय भान जागृत झाल्याने तो आंदोलनात सामील झाला आहे. आंदोलनात  सर्वच वयोगटातील मुस्लिम दिसत आहेत. नव्वदीनंतरच्या मुसलमानातील तरुण पिढीला सामाजिक आंदोलने कशाशी खातात हेच माहीत नाही. पर्यायाने मुसलमानांतील युवावर्ग आपली  सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि तशा प्रकारची भूक भागवण्यासाठी या आंदोलनात सामील झालेला आहे. त्यामुळे त्याला सामाजिक आंदोलनाचे स्वरूप नेमके काय असते, याचे पुरसे ज्ञान  नाही. आम्ही लहानपणी ईद ए मिलादच्या जुलूसमध्ये सहभागी होताना ‘नारा ए तकबीर’ व ‘ला इलाहा इल्ललाह’, ‘अल्लाह.. अल्लाह..’ अशा घोषणा देत असू. आजही याच घोषणा  आमच्या जीभेवर रुळल्या आहेत. कुठलेही मोर्चा, निदर्शने, आंदोलन दिसले की प्रथमत: याच घोषणा आमच्या ओठावर येतात. याला कारण असे की, या दोन घोषणांशिवाय सामान्य  मुसलमानांना अन्य घोषणाच ज्ञात नाहीत. किंवा त्याची तोंडओळखही नाही. त्यामुळे या घोषणा त्यांच्या ओठावर येणे साहजिकच आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. फराह खान आणि  शशी थरूर यांना उपरोक्त घोषणांमुळे भीती वाटते. त्यांना वाटते की या घोषणा कट्टरतेच्या प्रतीक आहेत. माफ करा या घोषणा धार्मिक असल्यातरी त्यात अतिरेक व कर्मठपणा नाही.  तसेच त्यात कट्टर हिंदुत्ववाद्यांसारखा जहालपणा नाही. आज जो जय भगवान राम सामान्य मुसलमानांना दहशतीत लोटतो, तोच राम आम्ही महात्मा गांधीकडून स्वीकारला व मनात  जोपासला आहे. महात्मा गांधींचे हिदुत्व व धर्म सर्वांना मान्य आहे. तसे ते मुसलमांनाही मान्य आहे. संबंधित व्यक्ती अज्ञानातून अलगतेचे राजकारण करत आहेत. अर्थातच हे भय  ब्राह्मणी व्यवस्थेचे पातक आहे. त्यामुळे या घोषणांना धार्मिक व राजकीय रंग कस्रfप मिळता कामा नये. आज भाजपशासित सत्ताकाळात जय श्रीराम या घोषणेला राजकीय महत्त्व  प्राप्त झाले आहे. भगवान रामाच्या नावाने देशातील अल्पसंख्याक समुदायाला दहशतीत लोटण्यासाठी रामाच्या नावाचा वापर केला जात आहे. आज जय श्रीराम शुद्ध स्वरूपात राजकीय  घोषणा म्हणून पुढे आली आहे.काँग्रेसनेही भगवान रामाला राजकीय अस्त्र म्हणून वापरले. शिवसेनेने जय भवानी ही घोषणा राजकीय म्हणूनच प्रसारित केली. अर्थात त्याचाही वापर मुसलमानांविरोधातच केला गेला. वास्तविक सामूहिक नमाज, नारा ए तकबीर असो वा ला इलाह.. या घोषणा धार्मिक मेळाव्यापुरत्याच मर्यादित असाव्यात, त्याचा राजकीय कृतीसाठी  वापर होता कामा नये. सामाजिक आंदोलनासाठी वेगळ्या घोषणा विकसित केल्या पाहिजे. किंवा अन्य सुधारमावादी परंपरेतील घोषणा दिल्या गेल्या पाहिजे. परंतु उपरोक्त घोषणा  जनाआंदोलनाचे प्रतीक म्हणून विकसित होत असतील तर त्याला रोखता कामा नये. बऱ्याच वर्षांनी मुसलमान आपल्या राजकीय़ हक्कासाठी जागृत झालेला आहे. त्याचा राग, त्याची  घुसमट, त्याची उद्विग्नता बाहेर येऊ द्या. त्याला कुठलाही रंग देऊ नका. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय मुसलमानांमध्ये खिलाफत रद्दीकरणाचा रोष होता. अनेक मुस्लिम रस्त्यावर  उतरून आंदोलने करत होते. लोकमान्य टिळक व महात्मा गांधींनी खिलाफतीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. उभय नेत्यांनी कालांतराने मुसलमानांची ही उर्जा स्वातंत्र्य  आंदोलनासाठी वापरली. पुढे या प्रचंड उर्जेतून ब्रिटिशांना देशांतर करावे लागले. हिंदू-मुस्लिमांच्या एकत्र लढ्यामुळे इंग्रजांना भारतात अधिक काळ राहणे अशक्य झाले. शशी थरुर आणि  अभिनेत्री फराह खानला याचे कोणीतरी स्मरण करून द्यावे. भारतीय सभ्यता व प्राचीन संस्कृतीच्या जतन व संवर्धनाचा राष्ट्रवाद घेऊन मुसलमान रस्त्यावर उतरला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याच्या पूर्वजांनी रक्त सांडले. आपले बलिदान दिले. घर-कुटुंबाची पर्वा न करता देशासाठी सर्वांचा त्याग केला. आज तो पुन्हा एकदा देशाच्या बहुसांस्कृतिक रचनेच्या  रक्षणासाठी रस्त्यावर उतरला आहे. त्याने राज्यघटनेच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. बऱ्याच कालावधीनंतर मुस्लिम मुलीदेखील भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या  संरक्षणासाठी दिल्ली ते गल्ली जाम करत आहेत. या तरुणांना मुसलमानांतील धार्मिक नेतृत्वानेसुद्धा अन्य जोखडात अडकवू नये. तसेच सुधारणावादी व विश्लेषकांनीदेखील त्याला रंग  देऊ नये. मुसलमानांमध्ये सांस्कृतिक व राजकीय आत्मभान जागे झाले आहे, त्याच्या भावनांना अभिव्यक्त होऊ द्या. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीविरोधी मोर्चात महात्मा गांधी, आंबेडकर, भगतसिंग आणि मौलाना आजाद मुसलमानांच्या हातात दिसत आहेत. पुण्याच्या मोर्चात अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले व टिळकही दिसले. या आंदोलनाच्या  मांध्यमातून मुस्लिम युवक लोकशाही समाजवादाच्या राष्ट्रवादाचे संरंक्षण करू पाहतोय. त्यासाठी आपल्या जिवाची पर्वादेखील तो करत नाही. उत्तरप्रदेशात भाजप सरकारच्या जुलमांना  न घाबरता तो त्याच्याशी दोन हात करत आहे. सांप्रस्रfयक झालेल्या पोलिसी यंत्रणेच्या छळालादेखील तो जुमानत नाहीये.
बऱ्याच वर्षानंतर मुसलमान आपल्या राजकीय हक्कासाठी सजग झाला आहे. त्याला मुसलमानांतील धार्मिक नेतृत्वानेसुद्धा अन्य जोखडात अडकवू नये. तसेच सुधारणावादी संघटकांनी व  विश्लेषकांनीदेखील त्याला राजकीय व धार्मिक रंग देऊ नये. मुसलमानांमध्ये सांस्कृतिक व राजकीय आत्मभान जागे झाले आहे, त्याच्या भावनांना रस्ता द्या. त्यांना रोखू किंवा अडवू  नका.
(सौजन्य/नजरिया ब्लॉग)

-कलीम अजीम, अंबाजोगाई

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget