Halloween Costume ideas 2015

अल् बेरुनी-अद्वीतीय तत्वज्ञ,दार्शनिक आणि इतिहासकार

सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर
8624050403
भारतीय इतिहासात अल्बेरुनी आणि त्याच्या ‘तहकीक-मा-लिल-हिन्द” या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. ‘तहकीक - मा - लिल - हिन्द’  चे मूळ शिर्षक “किताब - अबुल - रेहान - मोहम्मद - इब्न - अहमद - अल् - बेरुनी - तहकीक - मा -लिल् - हिन्द ” असे आहे. भारतीय इतिहासात मात्र ‘तहकीक-मा-लिल- हिन्द” या संक्षिप्त नावानेच हा ग्रंथ ओळखला जातो. त्याच्यातील विचारांच्या महानतेने त्या ग्रंथाला ‘किताबुल हिंद’ हे लकब (उपाधी) प्राप्त करुन दिली. 
अलबेरुनी हा मुळचा ख्वारजमचा. 4 सप्टेंबर 973 मध्ये ख्वारजम च्या विरुन या छोट्याशा खेड्यात अलबेरुनीचा जन्म झाला.  अकू शाही इसा उर्फ अबू नासर हे त्याकाळातील प्रख्यात विद्वान, अल बेरुनीच्या प्राथमिक शिक्षणात त्याला शिक्षक म्हणून लाभले. अलबेरुनी त्याच्या उमेदीच्या काळात ख्वारजमच्या शासकाकडे दरबारी अश्रित म्हणून राहिला. ख्वारजम चे शासक देखील त्याच्या विचारांनी मोठे प्रभावित होते. त्यामूळेच त्यांनी आपल्या दरबाराचे शाही सदस्यत्त्व देउन अल्बेरुनीचा सन्मान केला.  “ इ.स. 994-995 मध्ये गुरगंज च्या शासकाने स्वतंत्र राज्याची उद्घोषणा केली. त्यानंतर अलबरुनी गुरगंज मध्ये येउन स्थायिक झाला. गुरगंज मध्येच अल बेरुनीने त्याची इतिहासविख्यात वेधशाळा स्थापन केली.”
गुरगंज येथील वास्तव्यात अलबेरुनीने त्याची विख्यात रचना “अथरल बकीय” लिहून पुर्ण केली. त्यानंतर अल बरुनी ने इ.स. 1009 मध्ये पुन्हा स्थलांतर केले.8 पुन्हा ख्वारजम येथेच त्याने आश्रय घेतला. पुढे इ.स. 1017  मध्ये महमूद गजनवीने ख्वारजम वर आक्रमण करुन सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर परतीच्यावेळी ख्वारजमच्या सर्व विद्वानांना देखील महमूदने गजनीला आपल्यासोबत आणले.  या विद्वानांमध्ये अल्बरुनीचा देखील समावेश होता. 
गजनीत आल्यानंतर अल्बेरुनीचा भारतीय विद्वानांशी संबध आला. भारतीय विद्वानांशी सातत्याने त्याची चर्चा व्हायची. इतिहास, भूगोल, खगोल, ज्योतिषशास्त्र, भारतीय धर्मव्यवस्था आणि परंपरांच्या संदर्भात बरुनीने या विद्वानांकडून बरीच माहिती घेतली. त्यातून मग त्याने स्वतः भारताविषयीच्या माहिती संकलनास सुरवात केली. याच काळात त्याने काही भारतीय ग्रंथाचे संस्कृत भाषेतून अरबी, फारसीमध्ये अनुवाद केले. अलबेरुनीकडे संशोधनाची स्वतंत्र अशी दृष्टी होती. संशोधनाच्या आपल्या दृष्टिकोनाविषयी माहिती देताना बरुनी “तहकीक-मा-लिल्-हिन्द” मध्ये म्हणतो, “ऐतिहासिक अधिकृततेच्या (प्रश्नांच्या) संदर्भात, आपण जे ऐकले ते , आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले त्याची बरोबरी करु शकत नाही, हे कुणीही अमान्य करु शकत नाही. कारण पाहणार्यांनी ज्या काळी पाहिले त्या काळचे आणि ज्या स्थळी पाहिले त्या स्थळाचे संबधित सार त्याची दृष्टी ग्रहण करीत असते. ऐकिवात त्या मानाने बर्याच उणिवा असतात. ”
भारतीय संस्कृतीला वैश्विक ओळख मिळवून देणारा समाजशास्त्रज्ञ
भारतीय लोकजीवन, धर्म, संस्कती, भौगोलिक परिस्थिती, सामाजिक रुढी, चालीरिती, धर्मग्रंथ आणि भारतातल्या विविध विचारधारांविषयी अलबेरुनीच्या पुर्वी कोणत्याच भारतीय किंवा परकीय विद्वानाने त्याच्या इतके समग्र लिखाण केलेले नाही. अल्बेरुनीने  त्याच्या ग्रंथप्रकल्पासाठी संस्कृत भाषा अवगत करुन घेतली. ऐकीव माहिती पेक्षा स्वतः संशोधन करण्याचा मार्ग त्याने चोखाळला.  संस्कृत भाषा शिकणे आणि भारतीय समाजाविषयीचे संशोधन हे कीती  मोठे दिव्य आहे, याविषयी अल्बेरुनी लिहितो, “आपल्या देशामध्ये व इतर कित्येक देशांमध्ये सांस्कृतिक दृष्ट्या बर्याच समान गोष्टी आढळतात तथापि भारत आणि आपला देश या दोहोंमध्ये तुलना केल्यास या दोन्ही देशात कितीतरी बाबतीत वेगळेपण आढळते. या संदर्भात भाषेचा प्रश्न मुख्यत्वेकरुन उपस्थित होतो. भारतीयांची संस्कृत भाषा शिकणे ही वरकरणी वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. संस्कृत भाषेतही अरबी भाषेप्रमाणेच शब्दसंग्रहांचे आणि प्रत्ययांचे वैपुल्य आढळते. संस्कृत भाषेत एकाच वस्तूसाठी कितीतरी संज्ञावाचक शब्दांचा उपयोग केला जातो. कधी-कधी तिच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांकरिता एकाच व्यापक शब्दानेही काम भागविले जाते. अशा ठिकाणी त्या शब्दाचा संदर्भ लक्षात घेतल्याशिवाय त्याचा नेमका अर्थ कळत नाही.” अल्बरुनीने मांडलेले हे विचार त्याच्या प्रगल्भ आणि सर्वव्यापी विद्वेत्तेचा परिचय घडवतात. अल् बेरुनीच्या ‘तहकीक-मा-लिल्-हिन्द’ या ग्रंथात त्याने हाताळलेले विषय त्याच्यातील भौतीकतावादी तत्वज्ञाचा परिचय घडवतात. लिखाणातील सखोलता, विषयाची समग्र मांडणी, विश्लेषण यातून अल्बेरुनीने त्याच्या ग्रंथाचे सौंदर्य आधिकच वाढवले आहे. हिंदू धर्माविषयी लिखाण करताना कित्येक किचकट धर्मग्रंथांचे त्याने वाचन केले आहे. भूगोल आणि गणिताविषयी भारतीयांची मते, ज्योतिषावर असणारी त्यांची श्रध्दा याविषयी कोणतेही पुर्वाग्रह न बाळगता अल् बेरुनीने लिखाण केले आहे. एकुण 80 अध्यायामध्ये त्याने ‘तहकीक-मा-लिल्-हिन्द‘ ची रचना केली आहे. पहिल्या अध्यायात प्रास्ताविकाचा समावेश आहे. दुसर्या अध्यायापासून बाराव्या अध्यायापर्यंत धार्मिक दार्शनिक विषयांचे विवेचन आहे. त्यानंतर च्या सहा अध्यायात साहित्य आणि विभिन्न चालीरितींविषयी माहिती दिली आहे. अठरा ते एकविसाव्या अध्यायापर्यंत भुगोल, गणित आणि पौराणिक कथांविषयी लिखाण केले आहे. यानंतरच्या पुढील 30 अध्यायात ज्योतिष, धार्मिक परंपरा, आणि हिंदू समाजाविषयीची माहिती दिली आहे. 63 व्या अध्यायापासून कायदे, शिष्टाचार, उत्सव, व्रत वैकल्ये यांच्याविषयीचे विचार मांडले आहेत. ग्रंथाचे लिखाण अल् बेरुनीने अत्यंत निष्पक्षपणे केले आहे. आपला धर्म श्रेष्ठ असल्याचा अहंभाव त्याच्या लिखाणात कुठेही आढळत नाही. कोणत्याही मुद्यावरुन आपल्या धर्माशी अकारण त्याने तुलना केलेली नाही. उलट इस्लामी परंपरामध्ये झालेला काहिसा प्रक्षेप देखील त्याने मांडला आहे. हिंदू धर्मशास्त्राविषयी लिहिताना ग्रीक परंपरा, प्लेटोचे कायदेशास्त्र, ग्रीस देशातील धार्मिक नागरी कायदे, इस्लामी शरिया यांच्यातील फरक देखील  अल् बेरुनीने दाखवून दिला आहे.
मुर्तीपुजेविषयी लिहताना अल् बेरुनीने त्यावर टिका केली नाही. तर्काच्या आधारे त्याने मुर्तीपुजेचा उगम शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अल् बेरुनी लिहतो, “आपल्याला ज्यांच्याविषयी आत्यंतिक आदरभाव वाटतो किंवा श्रध्दा वाटते, अशा व्यक्ती प्रेषित, ऋषी व देवता यांची स्मृती त्यांच्यानंतर चिरकाल मनात राहावी, म्हणून लोक त्यांच्या प्रतिमा तयार करतात, स्मारके उभारतात. मुर्तींच्या निर्मितीमागील हिच खरी प्रेरणा आहे.तथापि बराचसा कालावधी लोटल्यावर युगानुयुगे व काही पिढ्या लोटल्यावर लोकांना मूर्तीच्या निर्मितीमागील कारणांचा विसर पडला.”
अल् बेरुनीच्या लिखाणात वैश्विक समाजाची अनेक रुपे
समाजाची कोणतीही अवस्था चिरंतन नाही. समाज नित्य विकसित होत राहतो. प्रगती हा त्याचा स्थायीभाव आहे. भिन्न प्रदेशात वैश्विक समाजाची एकाच काळात वेगवेगळी रुपे पहायला मिळतात. म्हणून विकसित प्रदेशातील कुणी अविकसित प्रदेशातील समाजाला हिणवण्याचे कारण नाही. युरोपीय विद्वान जी वैचारिक सहिष्णूता आधुनिक काळात दाखवू शकले नाहीत, ती अल् बेरुनीने अकराव्या शतकात दाखवली. त्याने भारताचा अभ्यास करताना कुठेही टिका केली नाही. हेटाळणी केली नाही. कि कोणत्याही धार्मिक रुढींची निंदा केली नाही. भारतीय समाजाच्या धर्म, चालीरिती यांचा समाजशास्त्र, तर्कशास्त्र आणि प्रसंगी इतिहासाचा आधार घेउन अर्थ लावण्याचा प्रयत्न केला.
तरीही अल् बेरुनी नुसता समाजाचा अभ्यास करणारा समाजशास्त्रज्ञ नाही. भटकंतीसाठी आलेला प्रवासीही नाही. कुणा राज्यकर्त्यांची खुशामत गाणारा, कवने रचणारा, ग्रंथ लिहणारा दरबारी लेखक नाही.  अल् बेरुनी हा खर्या अर्थाने समाजाचा, राजकारणाचा, कायदेशास्त्राचा अभ्यास करताना एका वेगळ्या तत्वज्ञानाची मांडणी करणारा दार्शनिक आहे.  अल् बेरुनी एखादा विषय मांडताना प्लेटो च्या तत्वज्ञानाला हात घालतो.  कधी ग्रीसचे नागरी समाजाचे कायदे सांगायला लागतो. विवाह विधीचा भारतीय इतिहास सांगताना प्रेषित पुर्व अरबी समाजाच्या विवाहसंस्थेवर भाष्य करतो. ज्यु विवाह पध्दती विषयी विचारांची मांडणी करतो. खगोलशास्त्र सांगताना भिन्न प्रदेशातील अंतराळ विज्ञानावर काही तरी वेगळीच माहिती देउन जातो. इतिहासातील एखादा प्रसंग सांगून आपल्या विचारांना पुष्टी देण्याचे भौतीक उदाहरणशास्त्रही अल् बेरुनीला चांगलेच ज्ञात होते. आलेक्झांडर, कामोडोस, प्रेषित मुसानंतर आलेला मियानस नावाचा राजा, गजनवी कुळातील सरदारांच्या इतिहासातील कित्येक प्रसंग त्याने उदाहरणादाखल नोंदवले आहेत. आणि डेक्रो, सोलोन आणि पायथागोरस सारख्या असंख्य  विद्वानांच्या साहित्यावरही भाष्य केले आहे. संस्कृतचे व्याकरण शास्त्र सांगताना अल् बेरुनी अरबी मात्रादर्शक चिन्हांची संस्कृत मात्रादर्शक चिन्हांशी तुलना करायला लागतो. फारसी, तुर्की भाषेच्या सौंदर्यस्थळांचेही दर्शन घडवतो.  त्यामूळेच अल् बेरुनी हा इब्ने खल्दुनचा पुर्वसुरी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
(संदर्भ ः सरफराज शेख लिखित ‘मध्ययुगीन भारतातील मुस्लीम विद्वान’ या आगामी ग्रंथातून) (लेखक ः इतिहास तज्ज्ञ असून पत्रकारही आहेत.)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget