Halloween Costume ideas 2015

शांती प्रगती व मुक्तीसाठी जनतेला झगडावे लागत आहे ही आमच्या देशाची शोकांतीकाच - डॉ. इकराम काटेवाला

खुल्दाबाद : जातीधर्माच्या नावांवर देशात अशांतता, प्रगतीच्या नावाखाली प्रचंड भ्रष्टाचार आणि अनेक संसार उद्ध्वस्त करणारी दारू, हुंडापध्दत, स्त्रियांची गुलामगिरी व स्त्रीभ्रूण हत्या यासाठी आजही भारत देशातील नागरिकांना आपल्या या मूलभूत अधिकारासाठी झगडावे लागत आहे, ही या देशाची शोकांतिका नाही तर काय आहे? असा जळजळीत प्रश्न जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या जाहीर सभेत अहमदनगरचे इस्लामी विचारवंत व प्रख्यात वक्ते डॉ. इकराम खान काटेवाला यांनी केला.
जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या वतीने राबविण्यात आलेले राज्यव्यापी अभियान ‘इस्लाम : शांती, प्रगती व मुक्तीसाठी’ या निमित्ताने श्री भद्रा मारोती मंदिर परिसरात एका जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी प्रा. अजीज मोहीयुद्दीन, पुणे, हे होते तर प्रमुख अतिथी नगराध्यक्ष मुकीमोद्दीन कमर, अ‍ॅड. कैसरोद्दीन, उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, मंदिर ट्रस्ट सचिव कचरू पाटील, अध्यक्ष मिठू पाटील, काशिनाथ दादा, खंडू पाटील, स्वामी भगवत आनंद गिरी महाराज वेरूळ, नगरसेवक मुनीबोद्दीन आदी उपस्थित होते.
जाहीर सभेची सुरुवात कारी अब्दुल हमीद यांच्या पवित्र कुरआन पठणाने व अब्दुल गनी सर यांच्या मराठी भाषांतराने झाली. कार्यक्रमाचे प्रस्ताविकपर भाषण करतांना शेख इस्माईल रफियोद्दीन यांनी सांगितले की, आजच्या या स्वार्थी जगात माणूस हा माणुसकीचा शत्रू झाला आहे. स्वतःच्या लाभापोटी तो इतरांची हत्या करणे, लुटणे, बलात्कार करणे धोका देणे, बेइमानी करणे, मी व माझाच धर्म कसा दुसऱ्यापेक्षा वरचढ आहे हे दाखवण्यातच धन्य मानत चालला आहे. हे सर्व अशा वेळी घडत असते जेव्हां माणसाच्या मन व मस्तिकातून ईशभय संपते, अशा वेळी माणसाने आपल्या पूर्वी मृत पावलेल्या लोकांची आठवण काढली पाहिजे. कित्येक राजे - बादशाह - इंग्रज पैदा झाले खूप धन संपत्ती लुटली पण मरतांना दोन्ही हातांनी रिकामेच गेले.
यानंतर प्रमुख वक्ते डॉ. इकराम खान काटेवाला यांनी जाहीर सभेला संबोधून सांगितले की, आज विज्ञान युगाने चहूकडे प्रगती केली आहे तरीही आमचे मन अशांतच का आहे? आमच्या मनात, घरात कुटुंबात, समाज व देशातसुध्दा शांती नाही. चहूकडे असुरक्षितता, अविश्वास, अराजकता पसरलेली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. दलित दुर्बल, अल्पसंख्याक समाजावर खुलेआम अत्याचार होत आहेत. त्यांचे मूलभूत अधिकार हिरावून
घेतले जात आहेत. वृध्द आई-बापांना आश्रमात टाकणे, बहिणीला संपत्तीत वाटा न देणे, सख्ख्या भावांना हक्कापासून दूर करणे, इस्लाम या सर्व प्रश्नांचे उत्तरे देत आहे. समाजाची घडी नीट चालावी म्हणून पैगंबरांमार्फत ईश्वराने आपला संदेश म्हणजेच पवित्र कुरआन धरतीवर अवतरीत केले. इस्लाम मनुष्याला उच्च आदर्श आणि त्या आदेशाच्या पूर्तीकरिता स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा देतो. मानवतेच्या विकास प्रगती व शांतीसाठी सलोखा आवश्यक आहे. संघर्ष आणि युध्दाने समाजाच्या विकासामध्ये सदैव अडथळा निर्माण केला आहे. इस्लाम सदैव मानवाचा सहकारी, सोबती, मार्गदर्शक राहिला. मानवजीवनाचा उद्देश त्याच्या प्राप्तीचे विधी समाज नवनिर्माणाचे उद्दिष्ट, कर्मांना मोजण्याचे प्रमाण, पाप आणि पुण्याची संकल्पना, हलाल आणि हरामची संकल्पना, व्याजापासून बचाव, माता-पित्याची सेवा हे समस्त ज्ञान मनुष्याला इस्लाम व्यतिरिक्त कुठूनही प्राप्त होणार नाही. इस्लाम अल्लाह द्वारा प्रदान केलेल्या आदर्श जीवन व्यवस्थेचे नाव आहे. ज्यात शांती, प्रगती व मुक्तीचा राजमार्ग
प्रदर्शित केला गेला आहे.
यानंतर स्वामी भगवत गिरी आनंद महाराज, मंदिर ट्रस्टचे सचिव कचरू पटेल, नगराध्यक्ष मुकीमोद्दीन कमर, अ‍ॅड. कैसरोद्दीन औरंगाबादच्या शाहिस्ता बाजी यांचीही भाषणे झाली.
अध्यक्षीय भाषणात प्रा. अजीज मुहीयुद्दीन यांनी सांगितले की, आजच्या काळात सर्व समाजांच्या लोकांना अशा सभेत एकमेकांना समजण्याची आवश्यकता आहे. सूत्रसंचालन शेख एजाज यांनी तर आभारप्रदर्शन शेख इस्माईल रफियोद्दीन यांनी केले.
जमाअततर्फे दिवसभर मुक्तानंद शाळा, मराठी माध्यमिक शाळा, घृष्णेश्वर विद्यालय,
चिश्तिया महाविद्यालय व अल-इरफान स्कूलमध्ये व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget