Halloween Costume ideas 2015

मुक्ती - मानवी जीवनाचे परमोच्च ध्येय

- सलीम खान
मनुष्याला जीवन प्राप्त झाले आहे. त्याला या जीवनाची अनुभूती सुध्दा होते. परंतु अशा प्रकारचे लोक फार कमी आहेत की ज्यांनी हे जीवन गंभीरतापुर्वक ग्रहण केले आहे. साधारणपणे मनुष्य एक समतल व वरील स्तरावर जगण्यासाठी व समतल मार्गावर पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्याच्या जीवनात सखोलपणाच्या मार्गाचा लोपच होत असल्याचे दिसून येते. असे का आहे? याची काही ज्ञात-अज्ञात कारणे आहेत.
    हा मनुष्य देह आपल्याला कशासाठी मिळाला आहे? हा जन्म आपल्याला का बरं प्राप्त झाला आहे? आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय काय आहे? मनुष्याच्या जीवनाची अंतिम सफलता कशात दडलेली आहे? वास्तविक पाहता ही गोष्ट आपणास कधीच विसरून चालणार नाही. मुक्ती हेच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य, अंतिम साफल्य आणि अंतिम फलीत आहे.
    वास्तविक पाहता जगातील सर्वच धर्मांमध्ये मुक्ती या संकल्पनेचे वर्णन वेगवेगळ्या पध्दतींनी केले गेले आहे. या मुक्तीलाच कोणी निर्वाण म्हटले तर कोणी कैवल्यावस्था, कोणी मोक्ष म्हटलं तर कोणी स्वानुभव. उर्दू भाषेत यालाच ‘नजात’ असे म्हटले जाते. परंतु आज जरी सर्व धर्मांमध्ये मुक्तीची संकल्पना आढळून येत असली तरी तिच्या अर्थ आणि पाश्र्वभूमी मध्ये कमालीची तफावत आढळून येते. सर्वसामान्यपणे आज जी मुक्तीची संकल्पना आहे तिचा अर्थ केवळ एवढाच समजला जातो की जास्तीत जास्त ऐहिक सुखांची रेलचेल, अधिक धनसंपत्ती कमवणे, मोठी सत्ता हस्तगत करणे. यापूढे जाऊन आम्ही मुक्तीचा खरा अर्थ समजून घेण्याचा अजिबात प्रयत्न करीत नाही.
    खरं बघितले तर मुक्ती ही एक अशी अवस्था आहे की जिच्या प्राप्ती खातर आपण जिवंतपणीच तयारी करायला हवी  व तसे करणे आवश्यक देखील आहे. आपण कोण आहोत? हे शरीर नाश पावल्यावर त्याचे काय होणार आहे? या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी आपण कोठे होतो? कोणत्या अवस्थेत होतो? या सर्व गोष्टींचा वास्तविक बोध होणे म्हणजेच मुक्ती किंवा मोक्ष होय. मुक्ती हा विषय तसा फार गहन आणि गंभीर आहे.
    मनुष्य आज ज्या वातावरण व परिवेशात जीवन जगतो आहे, त्यात प्रचलित क्रियाकल्प, भावना वगैरेंची त्याला अशी काही सवय जडते की सामान्य मार्गावर त्याचे पाय आपोआपच उठू लागतात आणि त्याला याची संधीच मिळत नाही की त्याने जीवनासंबंधीच्या गहन व मौलिक प्रश्नांवर विचार करू शकावे. अशा स्थितीत मनुष्य आपले धैर्य हरवून बसतो की त्याने गंभीरतापुर्वक प्राप्त जीवन व जीवनाशी निगडीत मौलिक प्रश्नांवर विचार करावा.
    आपल्या जीवनाचा मूळ उद्देशच न समजल्यामूळे काही गोष्टी आपल्या जीवनातून गळून पडत आहेत. त्या संलग्न ठेवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनाचा जो मूळ उद्देश आहे त्याचे स्मरण करून देण्याचा प्रयत्न या लेखात केला गेला आहे.
    आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे? आपण कोठून आलो आहोत? व कोठे जाणार आहोत? जीवन आणि मृत्यू दरम्यानच्या या अल्पावधित आम्हाला काय करायचे आहे व काय बनायचे आहे? आपले हे मनुष्य जीवन शापाचे की वरदानाचे फळ आहे? अचानकपणे घडून आलेला योगायोग आहे की जबाबदारी किंवा कर्तव्य आहे? शोध आहे की परिप्राप्ती? आपले हे मनुष्य जीवन स्वत: परिपूर्ण आहे की अपूर्ण? आपल्या निर्मितीमध्ये कुणाची भुमिका आहे की असेच सर्व काही? या जीवनाचा कोणी दाता आहे किंवा नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे कुठे लोप पावली आहेत? ती सर्व उत्तरे कोठे सापडतील? का कोणी आहे जो आपल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल? जर या मनुष्य जीवनाचा कोणी जीवन-दाता असेल तर त्याने या प्रश्नांची उत्तरे तरी दिली आहेत का की जीवन देऊन त्याला मौन धारण करून गप्प बसणेच योग्य वाटले?
    ही काही अशी प्रश्नं आहेत की ज्यांचा मानवी जीवनाशी इतका घनिष्ट संबंध आहे की, मानवी जीवनाची सुरूवात या प्रश्नासोबतच होत असते आणि हेच कारण आहे की मनुष्य या प्रश्नांच्या बाबतीत नेहमी विचार करीत आला आहे.
    मनुष्याजवळ केवळ त्याचे प्राण आणि दैनंदिन जीवनच नसते तर त्या सोबत काही मूलभूत समस्या देखील येतात. या समस्यांचा अनुभव प्रत्येक विचारशील व्यक्तींंना येतच असतो. या मूलभूत समस्यांचे निराकरण ज्या मार्गाद्वारे केले जाते तोच मुक्तीमार्ग होय. हा मुक्तीमार्ग ज्या साधन व साहित्याद्वारे सुगम व सोपा होतो त्यालाच मुक्तीची साधने असे म्हटले जाते.
    सुरूवातीला आपण थोडक्यात मानवी जीवनाचा विचार करू या. मनुष्य हा नेमका कसा आहे. आगोदर हे समजून घेणे आवश्यक आहे. मानवाचे व्यक्तिमत्व तीन वैशिष्ट्यांमध्ये विभागता येते. त्या प्रत्येक वैशिष्ट्या मागे मानवाचे काही विचार आणि धारणा असतात. मनुष्यामध्ये विचार शक्ति बरोबरच भावना ही असतात. या दोन्ही पैलू नंतर मनुष्याची कर्म करण्याची योग्यता हा तिसरा महत्त्वाचा पैलू देखील असतो. मनुष्याच्या जीवनात या तिन्ही पैलूमध्ये सामंजस्य आणि संतुलन असणे फार आवश्यक असते. एवढेच काय तर विचार, भावना व कर्म यांची शुध्दता व त्यांचे कार्यक्षेत्र देखील योग्य आणि उचित असणे आवश्यक आहे. याच्या आभावामूळे मनुष्याचे व्यक्तिमत्व ढिसाळ आणि दुषित होण्याचीच जास्त भिती असते.
    मनुष्य आपल्या बुध्दीच्या बळावर हे जग कसे आहे? काय आहे? हे जाणून घेऊ इच्छितो. त्याच बरोबर तो त्याच्या जीवनाचा मतितार्थ जाणून घेऊ इच्छितो. जीवनाच्या ज्या प्रवासासाठी तो निघाला आहे. त्याचे मुक्कामाचे ठिकाण कोणते? त्याच्या जीवनाचे ध्येय कोणते? तो आपल्या जीवनाचा अर्थ शोधीत असतो.
    या बाबतीत आणखी थोड्या विस्ताराने विचार करू या. मनुष्याला आपल्या सुखासाठी जी लौकिक साधने मिळतात. त्यात धन-संपत्ती वगैरेचा समावेश होतो. त्यामुळे त्याच्या लौकिक सुखात वाढ होते. लौकिक सुखाची साधने कोणत्याही स्वरूपात प्राप्त झाली तरी ती सर्व सुखे अल्पकाळी, नाशिवंत व पुन्हा लौकिक सुखाची हाव वाढविणारी असतात. ती हाव कधी संपतच नसते. उलट वाढतच जाते. त्यामुळे त्याला या मर्यादित आयुष्यात त्याला प्राप्त वस्तुंपासून मिळणाऱ्या सुखात समाधान वाटत नाही. त्याला याही पेक्षा आणखी निराळ्या सुखाची ओढ लागते की जेणेकरून त्याच्या अंतरमनाला समाधान लाभू शकेल.
    आतापर्यंत आपण मानव आणि त्याच्या मूलभूत समस्यांचा विचार केला. वरील सर्व समस्यांचे ज्यांना समाधानकारक उत्तर मिळाले त्याला मुक्तावस्था प्राप्त झाली. आता त्या समस्यांच्या निराकरणासाठी मुक्तिच्या साधनांचा थोडक्यात विचार करू.
    आता फक्त धर्मानेच नव्हे तर मोठमोठ्या विचारवंत आणि आता तर वैज्ञानिकांनीही देखील हे मान्य केले आहे की ईश्वरीय सत्तेचा स्विकार केल्या शिवाय मानवाच्या समस्या सुटूच शकणार नाहीत. परम सत्ता व परम व्यक्तित्व मान्य केल्या शिवाय मानवी समस्यांचे निवारण अजिबात शक्य नाही. ईश्वरीय शक्तिचे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्या अपार शक्तिसमोर नतमस्तक झाल्यानंतर केवळ आमच्या समस्याच सुटणार नाहीत तर त्या समस्याच आमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील. त्या समस्याच आम्हाला मदत करतील. कारण या समस्याच आमचे लक्ष आमच्या ध्येयाकडे वळवतील. ईश्वरापेक्षाही मोठी एखादी शक्ति अस्तित्वात नाही, हेच शाश्वत सत्य आहे.
    परंतु अज्ञानी मानवाची ही दुर्बलता आहे की तो त्याच्या मंदबुध्दीमूळे, आज्ञानामूळे व चुकीच्या संस्कारामूळे ईश्वराच्या मुखदर्शनाची अभिलाषा करतो. ईश्वरीय नित्यानंद जो जगात प्रकाशमान होत आहे, त्याला त्याची मंदबुध्दी पाहू शकत नाही. त्या नित्यानंदाला तो पारखा होतो. त्यामूळे त्याला नेहमीच अडचणी आणि संकटे यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी आमच्या मुक्तिचा पहिला मूलमंत्र हा आहे की आम्हाला आनंदाचे दर्शन घडावे. हा आनंद या संपूर्ण जगाला प्रकाश देतो आहे. या आनंदाचे दर्शन हा अमृत योग आहे. या नाशिवंत आणि मर्यादित जगात त्या अमर्याद ईश्वराचे दर्शन सामावले आहे. म्हणून खऱ्या आनंदाचे दर्शन आम्हाला येथेच मिळू शकते. हे दर्शन सत्याचे दर्शन होय. आपल्या अज्ञानामुळे सत्य आम्हाला पारखे होऊ नये असा प्रयत्न आम्ही नेहमी केला पाहिजे.
    हे विराट जग एका अनुपम काव्या सारखे आहे. या ईश्वरीय काव्याला समजून घेऊन त्यातील अर्थाची चव घेऊन आमचे मन तृप्त होते, तेंव्हा जी भाव समाधी लागते ती एक मुक्तिची अवस्था असते. त्यामूळे संपूर्ण जीवन उजळून निघते. हा प्रकाश मिळविण्यासाठी घराचा त्याग करण्याची, वनवास घेण्याची, जंगल आणि डोंगरात वास्तव्य करण्याची किंवा अंकुचिदार खिळ्यांवर झोपण्याची, किंवा कठीण आणि निरंकारी उपवास करून स्वत:ला अडचणीत आणण्याची आवश्यकता नसते. गरज आहे ती केवळ घराचे बंद दार उघडण्याचीच. या प्रकाशामूळे आमची चेतना जागृत होते. ही चेतनाच प्रेमाला जन्म देते, एवढेच नव्हे तर प्रेम हेच चैतन्याचे पूर्ण रूप असते. याच चेतनेच्या माध्यमाने आपण या मर्यादित जगात अमर्यादित चैतन्याचे, अमृताचे दर्शन घेऊ शकतो. हेच दर्शन ईश्वराचे दर्शन होय. त्याच्या शोधासाठी आम्हाला इतरेतर भरकटत फिरण्याची अजिबात गरज नाही. कारण ईश्वर पवित्र कुरआन मध्ये सांगतो की,
    ‘‘(हे प्रेषित स.) आणि जेंव्हा माझे भक्त तुम्हाला माझ्याबद्दल विचारतील तर (त्यांना सांगा की) मी तर सदैव निकट आहे. धांवा करणारा जेंव्हा माझा धांवा करतो तेंव्हा मी त्याच्या हाकेला प्रतिसाद देतो. तेंव्हा त्याने माझ्या प्रतिसादाचा शोध घ्यावा माझ्यावर श्रध्दा ठेवावी जेणेकरून ते सन्मार्गावर येतील.ङ्ग (कुरआन: २-१८६)
    ईश्वराच्या निर्मितीच्या आनंदाला सहयोग देणे म्हणजेच मुक्ती होय. या मुक्तीतच खरा आनंद आहे. यामूळेच आमचे जीवन सार्थक होते. आम्हास मुक्तीही मिळते. स्वार्थी आणि संकुचित मनामध्ये सत्याचा, प्रेमाचा व आनंदाचा प्रवेश होऊ शकणार नाही. म्हणून या मुक्तीसाठी आम्हाला स्वार्थ आणि अहंकाराचा त्याग करावा लागेल. तसेच पारलौकिक जीवनामध्ये आपल्या पालनकत्र्या ईश्वरा समोर आपल्या कर्मासाठी उत्तरदायित्वाची भावना देखील अंगिकारणे फार आवश्यक आहे कारण जर तो निर्माता आणि पालनकर्ता प्रसन्न झाला तरच आमच्यासाठी मुक्तीची दारे उघडतील. कारण कुठल्याही मनुष्याला नियंत्रणात ठेवणारी गोष्ट म्हणजे त्याच्या मनातील उत्तरदायित्वाची भावना होय. त्यामूळे जोपर्यंत मनुष्य आपल्या पेक्षा श्रेष्ठ आणि सर्वशक्तिमान अस्तित्वाचा स्विकार करीत नाही व जोपर्यंत त्याला हा विश्वास होत नाही की माझ्यावर प्रभुत्व ठेवणारी देखील एक अशी शक्ती आहे की जिच्या समोर आपल्या भल्यावाईट कर्मांचा हिशोब द्यावा लागणार आहे, आणि ज्याच्या हातात एवढी शक्ती आहे की जो आपल्याला याबाबतीत शिक्षा करू शकतो. जोपर्यंत ही भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत मुक्तीच्या मार्गापासून वंचितच राहील.
     आज आम्ही शांती, विकास आणि मुक्ती या संकल्पनांचा संबंध केवळ काही मर्यादित भौतिक सुखा पुरताच समजून घेतला आहे. परिणाम स्वरूप एवढी भौतिक प्रगती करून देखील आज मानवता बेचैन आहे. कसल्याही प्रकारची शांतता जगात दिसून येत नाही. सर्वत्र अराजकता पसरलेली आहे. जोपर्यंत मनुष्याला शांती, विकास आणि मुक्ती या संकल्पनाची खरी ओळख होणार नाही तो पर्यंत मानवतेच्या समस्यांचे निराकरण शक्य नाही.  मूळात इस्लामचा अर्थच समर्पण, शांती, प्रगती आणि सुरक्षा असा होतो. जे काही आदेश इस्लाम धर्माने दिले आहेत त्यात मानवाचे कल्याणच अंतर्भूत असून सर्व प्रकारच्या जोखडातून आणि कर्मकांडातून त्याला मुक्त करणे हाच इस्लामचा उद्देश आहे.
    या जगातील जीवन मनूष्यासाठी परिक्षागृह आहे. या जीवनातील भल्या वाईट गोष्टींबद्दल त्याला पारलौकिक जीवनात जाब द्यावा लागणार आहे. मनुष्याची कर्मे जर उत्तम असली तर त्याचा निर्माता ईश्वर प्रसन्न होईल आणि त्याच्या प्रसन्नतेतच खरी मुक्ती आहे, आणि हेच मानवी जीवनोचे परमोच्च ध्येय देखील आहे. तोच मनुष्य या परिक्षारूपी जीवनात सफल होईल.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget