कोळे (ता. कराड, जि. सातारा) येथील समीर व सलमा नदाफ हे दांपत्य मुस्लिम मसाजासाठी आदर्श आहेत, असे त्यांचे कर्तव्य आणि सामाजिक बांधिलकी आहे. त्यांनी तब्बल २४ भीक मागणाऱ्या लहान अनाथ बेवारस मुलांना मांडीवर घेऊन त्यांचे संगोपन केले आहे. दोन दिवसाचे अर्भक उघड्यावर फेकले होते आणि दोन कुत्री त्याचे लचके तोडीत होती, ते दृश्य बघून समीर नदाफ यांच्या आयुष्यालाच कलाटनी मिळाली आणि त्यांनी अनाथ, बेवारस मुलांची ‘परवरीश’ करण्याचा विडा उचलला. २५ एप्रिल २०१५ पासून त्यांनी या ‘सवाब-ए-जारीया’ (निरंतर पुण्यकार्य) ला सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था स्थापन करून अनाथालय सुरू केले. नंतर सातारा, सांगली, कागल, मुंबई, कर्नाटक येथून भीक मागत फिरणारी तब्बल २४ मुले आणली. कोणाची आई मनोरुग्ण आहे, तर कुणाला आईबाप नाहीत, कुणाची माय शरीरविक्रय करणारी अशी वंचित मुले आता समीर-सलमांच्या अनाथालयात राहात आहेत. ही मुले आता शाळा शिकत आहेत. सलमा रोज पहाटे पाच वाजता उठतात व मुलांची काळजी घेतात. रोज सकाळी व रात्री आठ ही मुलांना जेवण देण्याची वेळ त्या नित्यनेमाने पाळतात. मुले भरपेट जेवल्याखेरीज दोघांच्या घशातून अन्नाचा घास खाली उतरत नाही. त्यांची स्वत:ची तीन मुलेही त्यात मिसळून गेली आहेत. अनाथ मुलांना त्यांनी स्वत:चे नाव दिले असून ही मुलेही स्वत:च्या नावापुढे वडील म्हणून समीर यांचे नाव अभिमानाने घेतात. ज्या कोणास समाजातील लोक अशी कामे करतात त्या समाजाला अल्लाहशिवाय कुणीच हटवू वा मिटवू शकत नाही, हाच यातून बोध! - निसार मोमीन, पुणे.
Post a Comment