Halloween Costume ideas 2015

इतिहासकाराला उच्च आदर्शाचे पालन करावयास हवे : खाफीखान

सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर
8624050403
ईश्‍वरदास नागर याच्या प्रमाणेच भिमसेन सक्सेना याच्या ‘तारिखे दिल्खुशा’ चे ‘मोगल आणि मराठे’ या नावाने भाषांतर केले आहे. 1638 च्या नंतरच्या घटनांची नोंद भाषांतरासाठी घेतली आहे. इश्‍वरदास नागरच्या ग्रंथाचे भाषांतर करताना पगडींनी पान क्रमांकानुसार केले आहे. पण भिमसेन सक्सेनाच्या ग्रंथाचे भाषांतर करताना पगडींनी सरसकट घटनांचे वर्णन केले आहे. कालक्रम देखील मागे पुढे केला आहे. आपल्या सोयीने प्रकरणाची नावे दिल्याचेही त्यांनी भाषांतराच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. एकूण ग्रंथ तीनशे अडुसष्ट पानांचा असून त्यातील 25 पाने वगळल्याचे पगडींचे म्हणणे आहे.6 मात्र पगडींच्या भाषांतरीत ग्रंथाची पाने पाहिल्यानंतर त्यांनी तीनशे पानांचे भाषांतर केल्याचे दिसत नाही.
जी तर्‍हा इश्‍वरदास नागर आणि भिमसेन सक्सेनाच्या ग्रंथाच्या अनुवादाची केली आहे. तीच साकी मुस्तैद खानच्या मासिरे आलगिरीची करण्यात आली आहे. त्यानंतर खाफीखानच्या “मुन्तखुब उल लुबाब” ला तर पगडींच्या संपादनाचा खास फटका बसला आहे. 
मोगल दरबाबरात दररोज इतिवृत्त लिहून ठेवण्याची पध्दत होती. दरबारात आणि इतर ठिकाणी बादशाहने दिलेले आदेश, घेतलेले निर्णय, घडामोडी अखबार मध्ये लिहून ठेवले जात असत. इतिवृत्तकारांच्या तुलनेत या अखबाराला अत्यंत विश्‍वसनीय साधन मानले जाते. इतिवृत्तकारांसोबतच पगडींनी मोगल दरबारची बातमीपत्रे (अखबारात) भाषांतरीत केली आहेत. ती भाषांतरीत करताना देखील पगडींनी संक्षिप्तीकरणाचे शस्त्र वापरले आहे. प्रस्तावनेतच 1685 ते 1699 पर्यंतच्या त्रोटक नोंदी पुढे केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या त्रोटक नोंदींचा आधार घेउन पगडींनी 11 मार्च 1689 ला संभाजी राजांची हत्या करण्याच्या प्रकरणाशी संबधीत एकाही बातमीपत्राचे भाषांतर केले नाही. 25 मे 1685 पासून भाषांतराला सुरुवात करुन पगडी 30 सप्टेंबर 1688 पर्यंतची अखबार भाषांतरीत करतात. त्यानंतर  संभाजीराजांच्या अटकेशी निगडीत असणारा जून 1688 ते मे 1689 पर्यंतचे अखबारात भाषांतरीत करत नाहीत.7 भिमसेन सक्सेना, इश्‍वरदास नागर, खाफीखान साकी मुस्तैदखान वगैरे बरेच इतिहासकार संभाजी राजांच्या हत्या व अटक प्रकरणावेळी बादशाही छावणीत नव्हते. त्यामुळे बादशहाने नेमके काय आदेश दिले किंवा बादशाहच्या दरबारात अटकेनंतर व अटकेआधी काय घडामोडी घडल्या याची माहिती देणारे विश्‍वसनीय साधन फक्त अखबार हेच आहे. पण पगडींनी त्याचेही संक्षिप्तीकरण करुन इतिहासलेखन, भाषांतराच्या तत्वांशी फारकत घेतली.  
इतिहासाची व्याख्या करणार्‍या खाफीखानला ठरवले चोर
पगडींचा खाफीखानवरच खास रोष दिसून येतो. अनेक ठिकाणी ते खाफीखानवर घसरतात. खाफीखानची समिक्षा करताना त्यांनी निंदा आणि घृणेची सिमा ओलांडली आहे. थेट खाफीखानला चोर ठरवले आहे. पगडी म्हणतात,  “आपला ग्रंथ लिहिताना खाफीखानाने कमी दगदगीची पध्दत स्विकारली आहे. त्याने आपले इतिहासग्रंथ, पुर्वीच्या लोकांच्या ग्रंथावरून सरळ सरळ सजविले. शहाजहानचे चरित्र लिहिताना त्याने लाहोरी, कंबू, सादिक इत्यादींच्या ग्रंथाचा सारांशच दिला आहे. तोच प्रकार औरंगजेबाच्या बाबतीत त्याने केल्याचे आढळून येते. औरंगजेबाच्या कारकिर्दीच्या पहिल्या दहा वर्षाच्या कालखंडावर, औरंगजेबाचा आधिकारी मुहंमद काजिम याचा ‘आलमगिरनामा’ हा दिड हजार पानांचा ग्रंथ आहे. त्याचा जवळ-जवळ सारांशच खाफीखानने दिला आहे. याशिवाय औरंगजेबाच्या उत्तरायुष्यातील हकीकतीबद्दल, खाफीखानाने औरंगजेबाचा चरित्रकार साकी मुस्तैदखान, फारसी साहित्यीक नेमतखान इत्यादींच्या ग्रंथाचा उपयोग करुन घेतला आहे. मामूरी नावाच्या एका अज्ञात ग्रंथकाराचा तीन चतुर्थांश ग्रंथ तरी त्याने चोरला असावा”8 
विशेष म्हणजे पगडींनी खाफीखानला ज्या लेखात चोर ठरवले आहे. त्या लेखाचे नाव ‘यशस्वी इतिवृत्तकार खाफीखान’ असे दिले आहे. पुढे देखील त्याच लेखात ते खाफीखानने इतरांपेक्षा वेगळी माहिती दिली म्हणून त्याचे कौतूक करतात.9
ज्या खाफीखानवर पगडींनी आरोपांची सरबत्ती केली आहे. त्याच्याविषयी अन्य इतिहाकारांची मते पगडींपेक्षा भिन्न आहेत. एम.अतहरअली, सतीश चंद्र, ओमप्रकाश प्रसाद खाफीखानला मध्यकालीन भारताचा महत्त्वाचा इतिहासकार मानतात.
एलिएट आणि डाउसनने भाषांतरीत केलेल्या ‘मुंतखब उल लुबाब’ मध्ये खाफीखानचे इतिहासलेखनाविषयीचे विचारही आहेत. तो म्हणतो, “इतिहासकाराला उच्च आदर्शाचे पालन करावयास हवे. इतिहासकाराने सत्यवादी असावे. कोणत्याही लाभाची अपेक्षा करु नये. एका पक्षाप्रती पक्षपात आणि दुसर्‍या पक्षाप्रती द्वेष दर्शवू नये. तथा मित्र आणि अपरिचितांमध्ये कोणतेही अंतर न ठेवता भेदभावाविना लिहिले पाहिजे.”10 याच खाफीखानने त्याच्या ग्रंथाच्या निर्मितीसाठी ज्या ग्रंथकाराच्या ग्रंथांचे संदर्भ दिले आहेत. तरीही पगडी त्याला चोर ठरवतात. ज्या मामूरी नावाच्या कथित अज्ञात इतिहासकाराचा ग्रंथ खाफीखानने चोरल्याचा आरोप पगडी त्याच्यावर लावतात. त्या मामूरीचे नावदेखील पगडींना खाफीखानने उल्लेख केला म्हणून कळू शकले. पण पगडी या गोष्टी लपवून खाफीखानविषयी कृतघ्नता व्यक्त करतात.
उदारमतवादी सुफींना ठरवले कट्टरपंथी
पगडींवर रामदासांचा प्रचंड प्रभाव होता. रामदासांच्या गौरवार्थ त्यांनी ‘श्री समर्थ आणि रामदास सांप्रदाय’ आणि ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ या ग्रंथाची रचना केली आहे. रामदासांना सुफींबद्दल प्रचंड तिटकारा वाटायचा. सुफींबद्दल ते म्हणतात, 
‘कित्येक दावल मलिकांस जाती । कित्येक पिरांस भजती ।
कित्येक तुरुक होती । आपल्या इच्छेने । 11
रामदासांनी व्यक्त केलेला रोष पगडींनीही स्विकारला. त्याच भावनेतून सुफींचा इतिहास त्यांनी चिकित्सेला घेतला. पगडींनी सुफींवर एकाहून एक भयंकर आरोप लावले. सुफींच्या कार्याची बुध्दीप्रामाण्यवादी चिकित्सा त्यांनी नाकारली आहे. चमत्कारांच्या दंतकथांनी सुफींचा इतिहास सजवला आहे. समाजाने टाकून दिलेले, चिलिमफुके, चेडीचपाटीखोर साधू , सत्तेच्या बळावर ऐश्‍वर्यसंपन्न जीवन जगू पाहणारे सरंजामी अशा कित्येक परस्पर विरोधी टोकाच्या प्रतिमा त्यांनी एकाच प्रवृत्तीच्या व्यक्तींसंदर्भात उभ्या केल्या आहेत. पगडी फारसीचे पंडीत होते. त्याआधारे त्यांना मुळ ग्रंथांचा धांडोळा घेउन एक दर्जेदार ग्रंथ बनवता आला असता. पण सुफींना कमअस्सल समाजसुधारक ठरवण्याची पगडींना घाई झाली होती. त्यामूळे साधनांपेक्षा दंतकथा बर्‍या अशा विचाराने त्यांनी लिखाण केले. शुध्द लोणकढी थाप वाटावी इतके बाष्फळ आरोप सुफींवर लावले. सुफींना राजकारणी ठरवण्यासाठी पगडींनी त्यांच्या ग्रंथात ‘सूफींची राजकीय कामगिरी’ हे प्रकरण लिहिले आहे. त्यात त्यांना राजकारणातील सूफींची लूडबूड कशी निषेधार्ह होती हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे सांगताना त्यांनी सूफींनी जनतेच्या हिताचे निर्णय राजकाराण्यांनी करावेत यासाठी कोणते प्रयत्न केले याची माहिती दिली नाही. निजामुद्दीन औलीया यांच्या काळात तुघलक राज्यकर्त्यानी चुकीचे कर लावले म्हणून त्यांनी आंदोलन केले होते. तेंव्हा सुलतानाने त्यांना दिल्ली सोडून जाण्याचा आदेश दिला होता असा महत्त्वाचा प्रसंग दडवून ठेवला आहे. 
सुफींनी अपवाद वगळता भारतीय भाषांमध्ये ग्रंथरचना केली नसल्याचे सांगताना पगडी म्हणतात, “सुफींनी भारतीय भाषांचाही अभ्यास केल्याचे दिसून येत नाही.”12 आणि यानंतर पगडी अमीर खुसरोंसह हिंदी व उर्दूत लिखाण करणार्‍या काही सुफींचा उल्लेख करुन विषय निकाली काढतात. महाराष्ट्रातील अनेक सुफींनी मराठीत ग्रंथरचना केली आहे. मुर्तुजा कादरी उर्फ शहा मुंतोजी बमणी यांचे प्रकाशदिप, सिध्दसंकेत, अंबर हुसेन यांची समश्‍लोकी हि ओवीबध्द रचना, चांद बोधले यांचे ग्रंथ, आलमखान यांच्या कविता अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्राच्या बाबतीत सांगता येतील.
कश्मीर मध्ये देखील कश्मीरी सुफी पंथ हा नवा प्रादेशिक पंथ उदयास आला होता. त्यातील सूफी हे कश्मीरीतून रचना करत होते. सुफी संत ललदीद यांची हि रचना पहा,
“शिव शिवकर इन शिवनोतोशे,
शिव शिव जपने से खुशेनशो”13
कश्मीरीसोबत अनेक सुफींनी पंजाबी, कानडी, तमीळी आणि मल्याळी भाषेत देखील रचना केली आहे. सूफी जिथे जात तिथल्या प्रादेशिक संस्कृतीत समरस होत. सामान्य माणसाच्या हितासाठी कार्य करत. खानकाह चालवत. लंगरखाने,मदरसे (विद्यालये) सुरु करत. सामान्य माणसाच्या दुःखाला आपले दुःख मानत.  त्यामुळे तेथील सामान्य माणूस त्यांच्याविषयी प्रचंड आदर बाळगत असे. पगडी अशा सूफींवर  कट्टरवादाचा आरोप लावताना त्यांना उदारमतवादी म्हणणे योग्य नसल्याचे म्हणतात, “ सूफी हे कर्मठ इस्लामच्या विरोधात होते, हा समज वस्तूस्थितीला सोडून आहे.” यानंतर पगडी पुढे म्हणतात, “हजारो मुस्लीमेतरांना सूफींनी इस्लाम धर्माची दिक्षा दिली. खाजा मोईनोद्दीन चिश्ती, फरिदोद्दीन गंज शक्कर, बू अलि कलंदर पानिपती, हांगिर सम्रानी, शर्फोद्दीन मुनेरी, बुर्‍हाणोद्दीन गरीब शाह, इत्यादी नावे ताबडतोब डोळ्यांसमोर येतात. धर्मप्रसार हे एक महत्त्वाचे कार्य ठरल्यावर त्याबरोबरच अपरिहार्य असलेला आक्रमकपणा आलाच मंदिरे, मठ, जबरदस्तीने ताब्यात घेणे, मूर्तींचा विध्वंस करणे, मंदिराच्या जागेवर मशिद उभारणे किंवा मंदिराचे दगड किंवा मूर्ती मशिदीच्या बांधकामात घालणे हे सगळे प्रकार आपल्याला आढळून येतात. ”14  पगडीं हे आरोप लावताना कुठेही संदर्भ देत नाहीत.
फारसीचे तज्ज्ञ असणार्‍या पगडींना संदर्भ मिळवणे अवघड नव्हते. पण असे संदर्भ उपलब्धच नसल्याने पगडी बाष्फळ आरोप करत राहिले. सूफी चळवळीचे अभ्यासक पगडींसारख्या  इतिहासकारांच्या आरोपाला उत्तर देताना “ आपले इतिहासकार-चरित्रकार, मुसलमानांच्या शासक वर्गाला संपत्ती लुटण्यात आणि  विजयी पताका फडकवण्यात मस्त पाहतात. तेंव्हा ते आपल्या कल्पनेनुसार इस्लामच्या प्रचार आणि प्रसाराला सूफींवर आरोपीत करून त्यांच्या अध्यात्म आणि शांतीसंदेशाला धर्मप्रवर्तनाच्या रुपात प्रस्तूत करतात. धर्माचार्य, शास्त्रार्थी आणि सूफींच्या धर्मप्रसारात मुलभूत अंतर आहे. धर्माचार्य,शास्त्राचार्य आपल्ला तर्क वितर्काने लोकांना पराभूत करुन त्यांना मुसलमान बनवत. परंतू सूफी -संत मुसलमानांसोबत अन्य धर्माच्या अनुयायांना अध्यात्मीक यात्रेत सोबत घेउन चालतात. त्यांच्या मन,मेंदूत धम्मदिप प्रज्वलित करीत.”15 पगडींना हे सारे ज्ञात होते. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या भावना, श्रध्दा, पुर्वाग्रह त्यांच्यावर लादून राज्यकर्त्यांसोबत सूफींचा इतिहास देखील विकृत केला.                                                                                                                                           संदर्भ आणि टिपा,
6)कित्ता पृष्ठ  क्र. 203,04
7)पगडी, सेतू माधवराव, मोगल दरबारची बातमीपत्रे, खंड 1, पृष्ठ क्र. 1 ते 3
8)सेतू माधव पगडी, समग्र वाङमय, खंड 4 था पृष्ठ क्र. 204, हैदराबाद, सन 2010  ( भारतीय मुसलमान शोध आणि बोध या पु्स्तकातील लेख ः यशस्वी इतिवृत्तकार खाफीखान)
9)कित्ता पृष्ठ क्र. 205, (10) इलियट, हेन्री मिअर्स ‘हिस्ट्री ऑफ इंडीया अज टोल्ड बाय ओन हिस्टोरियन’ खंड पहिला, मुन्तखब उल लुबाब, भाग 2, पृष्ठ क्र. 727-37, इसवी सन 1874 कलकत्ता, (11)    ढेरे रा. चिं मुसलमान मराठी संतकवी, पृष्ठ क्र. 144 - 45 पुणे - 2010
12)    पगडी, सेतू माधवराव, समग्र वाङमय, खंड 4 था पृष्ठ क्र. 67, हैदराबाद, सन 2010 ( सुफी संप्रदाय तत्वज्ञान आणि कार्य)
13)    रजा, जफर इस्लामी अध्यात्म सूफीवाद, पृष्ठ क्र. 111, सन 2004 नवी दिल्ली
14)    पगडी, सेतू माधवराव, समग्र वाङमय, खंड 4 था पृष्ठ क्र.65- 67, हैदराबाद, सन 2010 ( सुफी संप्रदाय तत्वज्ञान आणि कार्य
15)    रजा, जफर पुर्वोक्त पृष्ठ क्र. 111     (समाप्त)
 (लेखक हे इतिहासतज्ञ, पत्रकार आहेत.)
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget