Halloween Costume ideas 2015

आई तू दिवसभर काय करतेस?

नगीना ना़ज साखरकर
9769600126
आपल्या थकल्या भागल्या शरिराचे ओझे उचलून कशीतरी मी घरापासून लांब आले. माझ्याच सारखे अनेक वृद्ध लोक या ठिकाणी आलेल्या बेंचेसवर बसलेले होते. मी सुद्धा एका कोपर्‍यातील बेंचवर स्थिरावले. आज चित्त अस्वस्थ होते. श्‍वासोश्‍वास जोरात चालू होता. कसेतरी श्‍वासावर नियंत्रण मिळवून शांत बसले. माझ्याप्रमाणे येथे बसलेले अनेक लोकसुद्धा आपल्या आयुष्यातील चढ-उताराबद्दल विचार करीत असावेत म्हणूनच तर हे एकांतात येवून बसलेले आहेत. आपल्या जबाबदार्‍यांबद्दल विचार करीत असतील की आपण कुठे कमी पडलो? कुठे समाधानकारक काम केले? या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक जीवाची एक नवीन गोष्ट मिळेल. मी सुद्धा विचारात गर्क होवून गेले. स्वतःशीच प्रश्‍न विचारून स्वतःच उत्तर देत गेले. मावळत्या सूर्याकडे पाहून त्याचे सौंदर्य पाहत-पाहत भूतकाळात रमले. दिवस जसा-जसा मावळत होता, माझ्या मनातही अंधार दाटत होता. आज एक प्रश्‍न माझ्या मनावर सारखे घाव घालत होता. सोसाट्याचा वारा सुरू झाला होता. मी स्थीर बसले होते, पापण्यांनी उघडझाप सुद्धा बंद झाली होती. बेंच्यावर दगडासारखी बसून होते. आज माझ्या मुलीने मला एक प्रश्‍न विचारला होता. ”आई तू दिवसभर काय करतेसू?” किती साधा प्रश्‍न होता तो? हा प्रश्‍न कोणीही कोणाला विचारू शकत होता. पण तिचा हा प्रश्‍न विचारण्याचा अंदाज काही असा होता की, या छोट्याश्या प्रश्‍नाचे उत्तर मला तात्काळ देता आले नाही. याच प्रश्‍नाचे उत्तर मी या एकांतात येवून शोधत बसले. हा साधासा प्रश्‍न माझ्यासाठी मौल्यवान झाला होता. मनात विचार आला की या प्रश्‍नाचे उत्तर प्रत्येक शाळेच्या अभ्यासक्रमात दिले गेले पाहिजे.
    जेव्हा सूर्य किरणे पृथ्वीवर पसरतात, तेव्हा मी जागते.  यासाठी नाही की मला झोप येत नाही. मी यासाठी उठते की, मी तुम्हाला सगळ्यांना उठवू शकेन. तुम्हा सर्वांसाठी न्याहरी तयार करावयाची असते, दूध तापवायचे असते, तुला तयार करून शाळा/कॉलेजात पाठवायचे असते, तुझी शैक्षणिक जबाबदारी तुझी एकट्याची नसून ती माझीही आहे असे मला वाटत असते, म्हणून मी लवकर उठत असते. मी यासाठी तुला शिकवत नाही की उद्या तू मोठी होवून मोठ्या पगाराची नोकरी करशील आणि मला पैसे आणून देशील. माझी तर फक्त एवढी इच्छा आहे की तू शिकून मोठी हो आणि आनंदाने आपले जीवन जग. घरातील सर्वांना एकानंतर एक तुमच्या वेळेप्रमाणे उठवणे, तुमच्या स्वच्छतेची काळजी घेणे, तुम्हाला अंघोळ घालणे, तुमचे दफ्तर तयार करणे, डबा तयार करून दफ्तरमध्ये ठेवणे, तुम्हाला वेळेवर स्कूलबसपर्यंत पोहोचविणे. हे सगळं करत असतांना मी कधी स्वतःच्या न्याहरीकडे तर कधी माझ्या अंगावरच्या कपड्याकडेही लक्ष देवू शकले नाही.
    माझ्या मुलीने हा प्रश्‍न, ’की आई तू दिवसभर काय करतेस?’ तेव्हा-तेव्हा विचारला जेव्हा-जेव्हा मी तिला काही ना काही काम सांगत असते. कॉलेजमधून येवून ती जेव्हा तिचा वेळ स्वतःच्या मर्जीप्रमाणे घालू इच्छित होती तेव्हा मी तिला काही ना काही काम सांगत होते. तिला काम सांगण्यासाठी जेव्हा मी हाक मारते तेव्हा ते काम मला जमत नाही म्हणून मी तिला सांगत नाही. मी यासाठी तिला हाक मारते की आता माझ्या शरिरात शक्ती उरलेली नाही.
    छोटी-छोटी कामे तुझ्याकडून करून घेवून मला तुला पुढच्या आयुष्यात येणार्‍या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करावयाचे असते. मी तुला या कामांची सवय लावून स्वयंपूर्ण करू इच्छिते. तू कितीही शिकली! कितीही कमावती झाली! तरी सुद्धा घरातली कामे, स्वयंपाक पाणी तुझ्या भविष्यातील जीवनाचा अभिन्न अंग राहील, याची मला खात्री आहे. तिथे तू कमी पडू नयेस तुला ती सर्व कामे करता यावीत, यासाठी मी कधी-कधी तुझ्यावर रागावले सुद्धा. कारण मुलींच्या जीवनामध्ये या छोट्या-छोट्या गोष्टींचे किती महत्व आहे हे तुला कळत नाही पण मला कळते. माझे रागावणे तुला आवडत नाही, पण माझ्या मते ही योग्य वेळ आहे, तुला या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. माझ्या लाडक्या मुली! तुला माझ्या या गोष्टी आज ज्या वाईट वाटत आहेत, त्या एकदिवस नक्कीच आठवतील. माझे रागावणे तुझ्या हिताचे होते, हे एक दिवस तुझ्या लक्षात येईल.
    जेव्हा तू स्वतः आई होशील तेव्हा तुला कळेल की या छोट्या-छोट्या गोष्टी किती कठीण आहेत. तू मला विचारत होतीस ना! तुम्ही आमच्या छोट्या-छोट्या गरजा पूर्ण करू शकत नव्हते तर आम्हाला जन्मालाच का घातलं? तेव्हा माझे अश्रुंनी डबडबलेले डोळे कोणी पाहिले नाहीत. मी त्या दिवशीही रडले होते, जेव्हा तू जन्माला यावी यासाठी अल्लाहकडे दुआ केली होती. मी तेव्हाही रडली होती जेव्हा मला तुला जन्माला घालतांना यातना होत होत्या. मी त्या दिवशीही रडले होते जेव्हा तू मला पहिल्यांदा ’मम्मी’ म्हणून हाक मारली होती. मी त्या दिवशीही रडले होते जेव्हा तू पहिल्यांदा शाळेला गेली होती. मी त्या दिवशीही रडले होते जेव्हा तुझा पहिल्या वर्षाच्या निकालाचे प्रगतीपुस्तक आणून दिले होते. त्यात फक्त तूच उत्तीर्ण झाली नव्हती तर त्या दिवशी मलाही उत्तीर्ण झाल्याचा भास झाला होता.
    मध्यमवर्गीय परिवारामध्ये प्राथमिक गरजा पूर्ण करण्यातच सगळं जीवन व्यतीत होवून जाते. कमाविणे आणि खाणे यातच आयुष्य संपून जाते. स्वतःला नवीन कपडे घ्यायचे असतील किंवा आजारी पडल्यास औषध आणायचे असेल तर प्रसंगी ते न आणता तुमच्या शैक्षणिक गरजांवर मी खर्च केला होता. तुमच्यासाठी मी संपूर्ण आयुष्य काटकसरीत घालवलेले होते. काटकसर करणारी आई तुला दिसली नाही, याचेच आश्‍चर्य वाटते. तुझे बाबा थकून भागून रात्री घरी यायचे. झोपेतही विव्हळाचे. दिवसभराचे कष्टाने ज्यांचे पाय दुखत होते. त्यांचे खांदे जबाबदारी वाकून गेले आहेत. ते यासाठी की त्यांनी स्वतःच्या शक्तीपेक्षा जास्त कष्ट उपसलेले आहेत. त्यांना काय आराम नकोसा होता का? ते यासाठी कष्ट करीत होते की, त्यांच्या थोड्या अधिक कष्टाने तुमच्यासाठी काही आनंदाचे क्षण ते जुळवू पाहत होते. काही चांगले कपडे तुमच्यासाठी घेता यावेत, यासाठीच ते कष्ट करीत होते. खरं सांगते! तू खरं सांगत आहेस सगळेच लोक आपापल्या मुलांसाठी कष्ट उपसतात. आम्हीही केलं तर काय मोठं केलं? पण लक्षात ठेव! मुलांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टांना कमी समजू नये. आई-वडिल मुलांसाठी मजबूत किल्ल्याप्रमाणे असतात. ज्यांच्या कुशीत मुलं स्वतःला राजपुत्र किंवा राजकुमारी समजतात. या दोन खांबी किल्ल्याचा एक खांब जरी निखळून पडला तरी संपूर्ण किल्ला गडगडतो. मग त्या किल्ल्यात राहणार्‍यांचे काय हाल होतात हे तुला कळणार नाही. तुला आता वाटत असेल आता मी मोठी झाले, मी स्वतःच्या पायावर उभी आहे. आता मला आई-वडिलांच्या मार्गदर्शनाची गरज नाही. मात्र बेटा एक गोष्ट लक्षात ठेव आमच्या केसात चांदी उतरली आहे, किंवा आमच्या पायामध्ये थरथरी उतरली आहे म्हणून आम्ही निरूपयोगी झालेलो नाहीत. आयुष्यात जेव्हा कधी पोटात हलकेसे दुखू लागेल, किंवा थोडासा खोकला येईल, थोडीशी ताप येईल तेव्हा तुला माझीच आठवण येईल. अंगात ताप असतांना बाबांनी प्रेमाणे डोक्यावून कुरवाळत हात फिरविला होता, त्यातून जे उपचार झाले ते डॉक्टरांच्या औषधांनीही झाले नाहीत हे तेव्हा तुझ्या लक्षात येईल.
    आता तू एका वयाला येवून पोहोचली आहेस परंतु, आजही थंडी लागत असेल तरी तुला माझीच आठवण येईल. आणि जेव्हा कुठल्या अडचणीत येशील तेव्हा बाबाचीच आठवण येईल, एवढे लक्षात ठेव. आज हे जगाचं सौंदर्य जे तुला भुरळ घालत आहे, यौवनाच्या या सुंदर संध्याकाळमध्ये तुझे जे मन रमत आहे, हे सगळे सौंदर्य निसर्गाची देण आहे. अल्लाहने तुला या सगळ्या गोष्टींचा आनंद घेण्यास पात्र बनविले. म्हणून अल्लाहला केव्हाच विसरू नकोस, रात्रं-दिवस अल्लाहची हम्द व सना करीत रहा, त्यानेच तुला जन्माला घातले आहे हे विसरू नको. हे सगळे सौंदर्य अगोदर दाखवून अल्लाहनी तुला विचारले असते, की तुला जन्माला घालू का? तेव्हा तू मला हा प्रश्‍न विचारला नसता की तू आम्हाला का जन्माला घातले?
    मी माझे अनुभव यासाठी तुला सांगत आहे की, तुलाही या सर्व गोष्टींतून जावे लागेल, पुढच्या आयुष्यात तुलाही या प्रश्‍नाचे उत्तर द्यावे लागेल. मुलांना एवढे स्वातंत्र्य आम्ही नक्कीच दिले की त्यांनी मोकळेपणे आम्हाला प्रश्‍न विचारावेत. तू ही तुझ्या मुलांना हे स्वातंत्र्य देशील अशी खात्री आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव स्वातंत्र्य म्हणजे फक्त कपड्यांची फॅशन नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे फक्त फर्राटेदार इंग्रजी बोलत असतांना ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांच्या विषयी हीन भाव बाळगणे नव्हे, स्वातंत्र्य हे बदतमीजी (अशिष्टपणा) चे नाव नाही. मला तर कधी-कधी वाटतं तुमच्या पिढीला स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थच कळत नाही. हे काय कमी आहे का? की आम्ही तुला स्वातंत्र्य देवून चूक केली? तुला उच्चशिक्षित करण्याऐवजी घरात कोंडून ठेवले असते तर तुला स्वातंत्र्याचा अर्थ तरी कळाला असता का? यासाठीच का आम्ही तुला उच्चशिक्षित केले?
    या एकांतस्थळी बसलेली प्रत्येक व्यक्ती हेच प्रश्‍न स्वतःला विचारत असेल. अनेक प्रश्‍न विचारून स्वतःच उत्तर देत असेल. सूर्यही दिवसभर प्रकाश देवून थकून पूर्णपणे मावळला आहे, अंधार पसरत चालला आहे, मी नकळत उठले, घराकडे निघाले, आज जर तू मला विचारले की, आई तू दिवसभर काय केलंस? तर कदाचित मी तुला उत्तर देवू शकेन.
    शायद की यही बातें लगजाए तेरे दिल को,
    इतनीसी समझ रख लो इतनीही हया रखलो.
(उर्दूतून मराठी भाषांतर ः एम.आय.शेख, बशीर शेख)

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget