Halloween Costume ideas 2015

जमाअत-ए-इस्लामी हिंदचा शांतिसंदेश प्रत्येक घरात पोहोचल्यास भ्रष्टाचार संपेल – ग्यानी ओमवीरसिंह

चिंचवड (वकार अहमद अलीम) -
    भारतात भ्रष्टाचाराने थैमान घातलेले आहे. देशात सर्वत्र लूटमार चालली आहे. शतकापूर्वी कवी इक्बालने देशाचे गौरवगीत लिहिले होते- ‘‘सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा’’ हे देशगौरवगीत अप्रतिम आहे, यात शंका नाही. पण देशातील सध्याची अशांतता, विद्वेष, हिंसा, भ्रष्टाचार आणि मानवी हक्काधिकारांची पायमल्ली बघितल्यानंतर मन विषन्न होते. अत्यंत दु:खद अंत:करणाने म्हणावे वाटते, ‘‘मुद्दते गु़जरे हैं रंग व सुकन सहते हुवे। अब तो शर्म आती है, वतन को वतन कहते हुवे।’’ असे जळजळीत उद्गार मानसरोवर आश्रम, गुरुद्वारा चिंचवडचे ग्यानीजी ओमवीर सिंह यांनी काढले. पण अजूनही वेळ गेलेली नाही. जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र तर्फे ‘शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम’ या राज्यस्तरीय मोहिमेद्वारा दिला जाणारा शांतीसंदेश प्रत्येक देशवासियाच्या घरात पोहोचला तर निश्चितपणे भ्रष्टाचार संपेल, देशात शांतीचे वातावरण निर्माण होईल, असा आशावादही ग्यानीजींनी या वेळी व्यक्त केला.
    जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र राज्य शाखेच्या १२ ते २१ जानेवारी २०१८ पर्यंत राज्यस्तरीय मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ‘शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी इस्लाम’ हा मोहिमेचा विषय होता. या मोहिमेअंतर्गत सदर कार्यक्रम चिंचवड येथील बीना इंग्रजी माध्यम प्रशालेत जमाअतच्या चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. परिसंवादामध्ये प्रमुख वक्ते म्हणून ग्यानीजी ओमवीरसिंह हे बोलत होते. प्रसिद्ध विचारवंत डॉ. रफीक सय्यद, पारनेरकर यांनी परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषविले.
    मौलाना अ. शकूर नदवी यांच्या अत्यंत सुमधूर कुरआन पठणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
    जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रचे वरिष्ठ सदस्य असलम गाझी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून आपल्या प्रास्त्विकेत सांगितले की, या मोहिमेद्वारे राज्यातील ४ कोटी बंधुभगिनींपर्यंत शांतिसंदेश पोहोचविला गेला. संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिमेतर बंधुभगिनी, विचारवंत, साहित्यिक व सामाजिक संस्थांकडून भरघोस पाठिंबा मिळाला. राज्यात एकाही ठिकाणी विरोध वा निषेध व्यक्त झाला नाही.
    परिसंवादासाठी खास मुंबईहून आलेले विश्वनाथ कामतकर (जीवन विद्या मिशन, मुंबई, प्रमुख) यांनी आपल्या भक्तिरसपूर्ण सत्संगात सांगितले की, नदीचे पाणी सर्वांसाठी, सूर्यप्रकाशही सर्वांसाठी आहे. तद्गत मानवी जीवन हे सर्वांच्या भलाईसाठी असले पाहिजे. ‘तुझा उद्धार तूच कर’ असा हितोपदेश करताना ते म्हणाले की, चांगले आणि वाईट कर्म करण्याची माणसाला ईश्वराने मुभा दिली आहे. माणसाने चांगले कार्य करण्यासाठी प्रयत्न केले तर त्याचे जीवन सफल होऊ शकते. हे स्वत:च्या आयुष्यातील अनुभव व्यक्त केले.
    जगात आणि देशात सर्वत्र अशांती, द्वेष, हिंसेचे प्राबल्य माजले आहे. माणसे स्वैराचारी झालीत. बेलगाम झाली आहेत. सर्व समस्यांचे मूळ कारण चंगलवादी प्रवृत्ती आहे, असा प्रखर हल्ला चढवित प्रसिद्ध विचारवंत डॉ. रफीक सय्यद पारनेरकर यांनी अध्यक्षीय समारोपात स्पष्ट केले.
    `दिव्य कुरआनमधील सूरह तकासूरचे स्पष्टीकरण देताना डॉ. सय्यद म्हणाले, माणूस कबरीमध्ये पोहोचतो पण त्याची इच्छा, आकांक्षा व हाव संपत नाही. माणसाला सोन्याचा एक पर्वत दिल्यास, तो दुसऱ्या पर्वताची अपेक्षा करतो. मानवाचे पोट कधीच भरत नाही. केवळ कबरीतील मातीच त्याचे पोट भरू शकते.
    जीवनाचा उद्देश न समजताच जीवन ज्गमे हाच सध्याचा सर्वांत जटील प्रश्न आहे. ताप आल्यास थर्मामीटरने डॉक्टर ताप किती हे पाहतात, त्यानुसार योग्य निदान करून उपचार करतात. प्रत्येक माणूस आपल्या वृद्ध आईवडिलांशी कसे वर्तन ठेवतो, हे त्याची माणुसकी पाहण्याचे परिमाण आहे. प्रत्येक मानवाला लौकिक जीवनातील प्रत्येक क्षणाचा हिशेब ईश्वरासमोर द्यावा लागणार आहे. ही जाणीवच नष्ट झाली तर माणूस बेलगाम होतो. समस्त सजीवांना दृष्टी देणारा ईश्वर आंधळा नाही, असे स्पष्ट करून डॉ. सय्यद म्हणाले, यावर एकमेव उपाय म्हणजे स्वत:च्या मृत्यूची आठवण ठेवणे, तसेच समस्त मानवाच्या सफलतेसाठी अवतरण झालेल्या दिव्य कुरआनचे मनन, चिंतन करणे होय.
    बीना इंग्रजी माध्यम प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष अलहाज इब्राहीम अहमद खान, जमाअतचे वरिष्ठ सदस्य करीमोद्दीन शेख (पुणे), मुफ्ती अब्दुस्समद, जिल्हा संघटक मेहमूद इब्राहीम शेख, जीवन विद्या मिशनच पिंपरी चिंचवड अध्यश्र बाळासाहेब आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन लांडगे आदी मान्यवरांसह प्रशालेचे सभागृह स्त्री-पुरुषांनी तुडुंब भरले होते. जमाअतचे सदस्य अजीमोद्दीन शेख यांनी अत्यंत भारदस्तपणे सूत्रसंचालन करत उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget