Halloween Costume ideas 2015

ईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास शांती, प्रगती आणि मुक्ती लाभेल – हसीब भाटकर

मुंबई : आपल्या निर्मात्याला आपण उत्तरदायी आहोत हा विचार आपल्याला वाईट कृत्यांपासून वाचवतो. एकमेकांबरोबरच्या बंधुभावामुळे समाजात शांतता निर्माण होते, असे विचार जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबईचे सेक्रेटरी मुजफ्फर अन्सारी यांनी व्यक्त केले.
जमाअत-ए-इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेश तर्फे १२ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान ‘इस्लाम : प्रगती, शांती आणि मुक्तीसाठी’ ही राज्यव्यापी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ‘समाजनिर्मितीत धर्माची भूमिका’ या विषयावरील एका कार्यक्रमाचे आयोजन गांधी सेवा हॉल, वांद्रे, मुंबई येथे करण्यात आले होते, त्या वेळी मुजफ्फर अन्सारी बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात कुरआनच्या काही श्लोकांच्या पठणाने झाली. या श्लोकांचे हिंदीमध्ये अनुवाद सादर करण्यात आला. कार्यक्रमास सर्व धर्मांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे निमंत्रक मुजफ्फर अन्सारी यांनी जमाअतच्या राज्यव्यापी मोहिमेचा आढावा उपस्थितांसमोर सादर केला आणि इस्लामच्या दृष्टिकोनातून शांती, प्रगती आणि मुक्तीचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. यानंतर बकर अली यांनी ‘मानवतेची सेवा आणि ईशउत्तरदायित्व’ या विषयावर एक उत्तम हिंदी कविता सादर केली.
वसईहून आलेल्या खिस्ती धर्माच्या प्रतिनिधी सिस्टर क्रिस्टल टुस्टानो म्हणाल्या, भारतात अनेक धर्मांचे लोक राहतात. धर्म लोकांना जोडतो. मात्र काही लोक धर्माच्या नावाने तोडण्याचे काम करतात. कारण त्या लोकांना ‘मानवता’ या धर्माच्या मूळ सूत्राचा विसर पडलेला असतो. एकमेकांच्या धार्मिक श्रद्धेचा अभ्यास करा आणि समाजाच्या सामायिक कार्यासाठी पुढे या, असे आवाहन सिस्टर टुस्टानो यांनी या वेळी श्रोत्यांना केले.
चेंबूर येथील बौद्ध धर्माचे प्रतिनिधी डॉ. वेन भदत राहुल बोधी महाथेरो म्हणाले, आज समाजात जे वातावरण निर्माण झाले आहे ते बदलण्यासाठी आपण सर्वांनी संघर्ष करण्याची गरज आहे. समाजात सलोखा निर्माण करण्यासाठी वाईट विचार, कुप्रथा, घमंड अशा प्रवृत्तींना तिलांजली द्यायला हवी. इस्लामने शांतीचा मार्ग दाखविला आहे, या मार्गाचे अनुसरण करण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.
जैन ब्रह्मकुमारी समाजाचे राजकुमार एस. चपलोत म्हणाले की, जैन धर्मात अहिंसेला फार महत्त्व दिले गेले आहे. लोकांनी धर्माऐवजी मानवतेचा आधारावर ऐक्य प्रस्थापित करण्याची गरज आहे. त्यांनी महावीर यांच्या शिकवणींची या वेळी आठवण करून दिली.
जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या या उपक्रमाची विले पार्ले येथील संन्यास आश्रमचे स्वामी मुक्तेश आनंदजी महाराज यांनी तोंडभरून प्रशंसा केली आणि लोकांनी जमाअतच्या अशा उपक्रमांनी पाठिंबा दिला पाहिजे असे आवर्जून सांगितले. स्वामींनी धर्म, अर्थ आणि कर्म यांची व्याख्या लोकांना स्पष्ट करून सांगितली. एकमेव ईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारण्याची त्यांनी या वेळी आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जमाअतच्या मुंबई विभागाच्या कार्यकारिणीचे सदस्य अब्दुल हसीब भाटकर यांनी सर्व धर्मांच्या शिकवणींचा उहापोह करून स्पष्ट केले की मानवाने धर्मापासून अलिप्त राहून आपल्या अधोगतीला कवटाळले आहे. दहशतवादी कृत्ये करणाऱ्यांचा कोणताही धर्म नसतो. अंतिम ईशवाणी कुरआनमध्ये मानवाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यांचे समाधान असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. आपण सर्वांनी ईश्वराचे उत्तरदायित्व स्वीकारल्यास निश्चितच आपल्याला शांती, प्रगती आणि मुक्ती लाभल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget