Halloween Costume ideas 2015

भारतीय मदरसे : भ्रम आणि वास्तव

एम.आर.शेख
बातिल जो सदाकत से उलझता है तो उलझे, जर्रों से ये खुर्शिद बुझाया न जाएगा
1923 साली वि.दा. सावरकरांनी हिंदुत्व नावाचे एक पुस्तक लिहिले. ज्यात त्यांनी ’पितृभू व मातृभू’ चा सिद्धांत मांडला. तो सिद्धांत असा की, ज्या लोकांची पितृभू (जन्मभूमी) भारत व पुण्यभू म्हणजेच धार्मिक भूमी भारत आहे तेच या देशाशी एकनिष्ठ राहू शकतात. या सिद्धांतानुसार ज्यांची पितृभू जरी भारत असली, मात्र पुण्यभू मक्का, मदिना किंवा व्हॅटिकन इत्यादी असेल त्यांची निष्ठा आपोआपच संशयास्पद ठरली. हा सिद्धांत एवढा लोकप्रिय झाला की, हिंदुत्ववादी संघटना तर सोडाच स्वतः काँग्रेसने या सिद्धांताची अंमलबावणी आपल्या 65 वर्षाच्या शासन काळात नकळतपणे केली. ज्यांना-ज्यांना हा कृत्रिम सिद्धांत आवडला त्यांनी-त्यांनी स्वातंत्र्योपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात मुस्लिमांनी देशासाठी केलेल्या त्यागाकडे दुर्लक्ष करून या सिद्धांताला खरे ठरविण्यासाठी जीवाचे रान केले. मुस्लिमांच्या निष्ठेभोवती संशयाचे मळभ तयार करण्यासाठी अनेक कपोलकल्पीत कल्पना मांडल्या गेल्या. त्यातील एक कल्पना म्हणजे मदरशांमध्ये देशहिताविरूद्ध शिक्षण दिले जाते, कट्टरवाद शिकविला जातो, किंबहुना आतंकवादाचे प्रशिक्षण दिले जाते ही होय. जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राद्वारे इस्लामः शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग हे अभियान नुकतेच राबविण्यात आले. या अभियानांतर्गत जमाअते इस्लामी लातूर युनिट तर्फे लातूरच्या मदनी व महेबूबिया या दोन मस्जिदींचा परिचय हिंदू बांधवांना करून द्यावा, असा निर्णय घेण्यात आला होता. एबीपी माझाच्या राहूल कुलकर्णी यांच्या मार्फतीने आम्ही तो परिचय करून दिला.      तेव्हा त्यावर अतिशय उत्साहवर्धक अशा प्रतिक्रिया देशबांधवांकडून आल्या. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. म्हणून मदरशासंबंधी सुद्धा पसरलेल्या गैरसमजांना दूर करण्यासाठी हा लेखन प्रपंच वाचकांच्या कोर्टात सादर करीत आहे.
    हिंदू बांधवांच्या मनात मस्जिदींविषयी ज्याप्रमाणे गैरसमज मुद्दामहून पेरले गेले, त्याचप्रमाणे किंबहुना त्यापेक्षा जास्त प्रमाणात गैरसमज मदरशांच्या बाबतीत पेरले गेलेले आहेत. मदरसे दूर कुठेतरी हिमालयात किंवा वाळवंटात चालत नाहीत. आपल्याच गावात चालतात. केव्हावी, कोणत्याही हिंदू बांधवाने मदरशांना भेट द्यावी व तेथे नेमके काय शिकविले जाते? विद्यार्थी कसे घडविले जातात? हे स्वतः पहावे मात्र असे करण्याची तसदी कोणी घेतली नाही. मदरसे चालविणार्यांनीही कधी हिंदू बांधवांना मदरशात बोलावून मदरशांचे ’याची देही याची डोळा’दर्शन घडविले नाही. एकंदरित परिस्थिती अशी झाली की, ’हमसे आया न गया तुमसे बुलाया न गया, फासला प्यार में दोनों से मिटाया न गया.’ यामुळे मीडियाला एकतर्फी दुष्प्रचार करण्याची संधी मिळाली आणि मदरशांभोवती एक गुढ असे कृत्रिम वलय मुद्दामहून निर्माण केले गेले.
तर चला मदरशांचा दौरा सुरू करूया...
ईराणी व भारतीय स्थापत्य कलेवर आधारित मदरशांच्या इमारती बाहेरून जरी भव्य वाटत असल्या तरी त्यात राहणारे विद्यार्थी व शिक्षक अत्यंत गरीबीत असतात. समाजातून मिळणार्या तुटपूंज्या दान निधीवर चालणारे हे मदरसे अतिशय विपन्न अवस्थेत सुद्धा तग धरून आहेत ते केवळ त्यांच्यातील आत्मबलामुळे. हे आत्मबल त्यांना इस्लामी शिकवणीतून मिळते. एल.के. आडवाणी जेव्हा उपपंतप्रधान होते तेव्हा त्यांनी देशातील सर्व मदरशांची सर्व्हेक्षण करून मदरशांमध्ये कुठल्याही प्रकारचे देशविघातक शिक्षण दिले जात नाही, असे निवेदन लोकसभेमध्ये केले होते. एव्हाना, सर्वांना त्याचा विसर पडलेला असेल. तरी सुद्धा मदरशांसंबंधी काही ठळक गोष्टी आपल्यासाठी नमूद करीत आहे.
    1. मदरशांमध्ये शिकणार्या मुलांचे पालक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीचे सर्व कर भरतात. मात्र त्यांच्या शिक्षणाचा भार सरकारवर पडत नाही. 2. मदरशांमधून शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी व्याज निषिद्ध असल्यामुळे बँकामधून व्याजी कर्ज घेत नाहीत. म्हणून माल्यासांरखे ते बँकांना बुडवित नाहीत. 3. अरबी आणि उर्दू भाषेतून शिक्षण घेत असल्यामुळे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजवर त्यांचा भार पडत नाही. 4. मदरशातून बाहेर पडलेले लाखो विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर किंवा स्पर्धा परीक्षा देवू शकत नाहीत. म्हणून बहुजन विद्यार्थ्यांची तेवढीच स्पर्धा कमी होते. 5. सर्वसाधारणपणे मदरशातून कुठल्याही प्रकारचे स्कील डेव्हलपमेंट (कौशल्य विकास) चे प्रशिक्षण दिले जात नसल्यामुळे हे विद्यार्थी आजन्म ग्राहक बनून राहतात. 6. मदरशातून शिकलेले काही विद्यार्थी आपल्या कुटुंबियांपासून दूर खाडींच्या देशामध्ये जाऊन रोजगार मिळवतात व मौल्यवान परकीय चलन आपल्या देशात पाठवतात. 7. सर्वसाधारणपणे हे विद्यार्थी कधीही मोर्चे, धरणे, उपोषण वगैर करीत नाहीत व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करीत नाहीत. त्यामुळे पोलिसांना आणि समाजाला यांच्यापासून कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव होत नाही.
    8. मदरशातून शिकलेल्या विद्यार्थ्यांची नैतिक बैठक अतिशय पक्की असते. ते प्रामाणिक आणि इमानदार असतात. ईशभय बाळगणारे असतात. म्हणून त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवता येतो.
    9. कुरआनचे शिक्षण देतांना जिहादचा फक्त संदर्भ येतो त्यांना त्याचे वेगळे शिक्षण देण्यात येत नाही. म्हणून आतंकवाद काय असतो हे त्यांना माहित नसते. बॉम्ब कशाला म्हणतात याची त्यांना कल्पनाच नसते. त्यांनी आयुष्यात कधी बॉम्ब पाहिलेला नसतो.
    10. मदरशाचे विद्यार्थी सर्व प्रकारच्या भ्रष्ट आचरणापासून मैलोगणिक दूर असतात.
    11. अल्लाहच्या शिकवणीचा नूर (प्रकाश) त्यांच्या हृदयात असल्याने ते सरळमार्गी ईश्वरनिष्ठ व मजबूत चारित्र्याचे असतात.
    12. त्यांची तर्कशक्ती असाधारण असते तर स्मरणशक्ती अप्रतिम असते. आपण 30 ओळींची एखादी कविता मुखोद्गत करू शकत नाहीत. हे 30 पार्यांचा कुरआन लिलया मुखोद्गत करून घेतात.
    13. त्यांची जीवनशैली साधी असते. व्यवहार चोख असतो, आकांक्षा अत्यल्प असतात आणि यांच्यामध्ये प्रचंड परोपकारी प्रवृत्ती असते.
    देशात फक्त दहा ते बारा मोठे मदरसे आहेत. बाकी मदरसे हे छोटे आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मदरशांनी महत्वपूर्ण भूमिका वठविलेली आहे. हाजी इमदादुल्लाह, हुसैन अहेमद मदनी, मुहम्मद अली जौहर, शौकतअली जौहर, ओबेदुल्लाह सिंधी, अंजरशहा कश्मीरी, हिफजुर्रहेमान स्यौहारवी, अबुल हसन नदवी, हसरत मोहानी, शाह वलीउल्लाह सारखे दिग्गज स्वातंत्र्य सैनिक याच मदरशातून घडलेले आहेत. एकंदरित मदरशांमध्ये नितीमान माणसं घडविली जातात.
    मदरशांच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत जर का छोटी-छोटी कौशल्याची कामे शिकविली तर हे विद्यार्थी खर्या अर्थाने देशाची सेवा करतील, याबाबत माझ्या मनामध्ये तरी शंका नाही. बुद्धीवादी, श्रीमंत, समाजस्नेही मुस्लिमांनी पुढाकार घेवून सरकारी योजनेअंतर्गत किंवा स्वतःच्या संस्थांच्या मार्फतीने यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी, असे केल्यास आश्चर्यजनक परिणाम समोर येतील. आज मदरशातून निघालेले बहुसंख्य विद्यार्थी एकतर मस्जिदीमध्ये इमामत करतात किंवा पुन्हा मदरसे उघडतात. याशिवाय, इतर कौशल्याची कामे करण्याचे प्रशिक्षण दिल्यास यांच्या रोजगाराची व्यवस्था होईल व समाजाला चारित्र्यवान लोक प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध होतील. देशामध्ये विविध मदरशांतून शिकून निघणार्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामानाने मस्जिदी अतिशय कमी आहेत. म्हणून सर्वांनाच इमामतचे काम मिळणे शक्य नाही. म्हणून यांच्या प्रशिक्षणाची सर्वात अगोदर सोय करणे एक समाज म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. याची जाणीव अल्लाह आपल्या सर्वांमध्ये निर्माण करो, आमीन.
                                               

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget