Halloween Costume ideas 2015

हिंदू राष्ट्रवाद विरूद्ध मुस्लिम राष्ट्रवाद

एम.आर.शेख
फिर दहेक उठेगी आग हाय,
हमने रो-रो के अभी बुझाई थी

र्मनिरपेक्ष लोकशाही मुल्यांच्या प्रभावाखाली गेली 69 वर्षे राहिल्याने भारतीय मुस्लिम, त्यात ही विशेष करून काही उलेमांनी इस्लामला फक्त निकाह, तलाक, वजू, गुसल, नमाज, रोजे, हज पर्यंतच मर्यादित करून टाकले आहे. यापुढे बोलणार्यांना हे लोक ’दीन में इन्हेराफ (धर्मभ्रष्ट) करणारे’ म्हणून जाहीर करतात. त्यामुळे इस्लामची नैसर्गिक वाढ भारतात होऊ शकली नाही. बहुतेक मुस्लिमांचे चारित्र्य तसे बनू शकलेले नाही जसे की इस्लामला अभिप्रेत आहे. याचा एकत्रित परिणाम असा झाला की मुस्लिमांच्या व्यक्तिगत चारित्र्यात इस्लामी इबादतींमुळे काही अंशी नैतिकता आली परंतु, सार्वजनिक जीवनामध्ये ज्या दर्जाची नैतिकता हवी होती त्या दर्जाची नैतिकता साधारणपणे आलेली नाही. म्हणून वैयक्तिक सद्गुणांपलिकडे मुस्लिमांना जाता आले नाही.
    एक परिपूर्ण जीवन व्यवस्था (दीन) उपलब्ध असतांना सुद्धा आपल्या आचरणाने भारतीय मुस्लिमांनी इस्लामला ईतर धर्मांप्रमाणे एका धर्मात बंदिस्त करून टाकलेले आहे. त्यामुळे भारतात इस्लामची वाढ खुंटलेली आहे. परिणामी, इस्लामबद्दल बहुसंख्य समाजाच्या मनामध्ये अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. त्यापैकी एक मोठा गैरसमज मुस्लिम राष्ट्रवाद हा आहे. भारतातील बहुसंख्य बांधवांना असे प्रामाणिक पणे वाटते की, मुस्लिम राष्ट्रवाद हा त्यांच्या हिंदू राष्ट्रवादासमोर एक मोठे आव्हान आहे. मुस्लिमांची लोकसंख्या वेगाने वाढत आहे व ही वाढती लोकसंख्या त्यांच्या राष्ट्रवादासमोर भविष्यात अडचणीची ठरणार आहे. वेस्टमिनिस्टर पद्धतीच्या संसदीय लोकशाही असणार्या आपल्या या देशात शासन तेच करू शकतात ज्यांची संख्या जास्त आहे. म्हणून बहुसंख्यांकांच्या मनातली भीती ही सार्थ आहे.
    राष्ट्रवाद एक महान विचार आहे यात वाद नाही. राष्ट्रवादातून जी ऊर्जा निर्माण होते ती नागरिकांना आपल्या देशासाठी मोठ्यात मोठा त्याग करण्यासाठी प्रेरित करते यातही वाद नाही. परंतु, याच राष्ट्रवादाचा जेंव्हा अतिरेक होतो तेव्हा आपल्याच देशातले अल्पंसख्यांक, दलित, आदिवासी, शीख, ख्रिश्चन हे आपल्यालाच शत्रुवत वाटू लागतात हे ही विसरून चालणार  नाही. याच राष्ट्रवादाच्या गर्भातून हिटलर, मुसोलिनी सारखे लोक जन्माला आले व त्यांनी मानवतेची कधीही न भरून निघणारी अशी हानी केली हे ही विसरून चालणार नाही. राष्ट्रवादाच्या याच अतिरेकी भुमिकेमुळे निरपराध पॅलिस्टीनीयन मुस्लिमांवर अत्याचार करण्याची प्रेरणा इजराईलला मिळते.
    इस्लाम समोर राष्ट्रवाद एक संकुचित विचार आहे. इस्लामकडे फक्त देशातल्याच नव्हे तर जगातल्या सर्व मानव जातीच्या कल्याणाची योजना आहे. तो फक्त इबादतींपुरता मर्यादित नाही. नैतिकतेवर आधारित इस्लामी जीवन मुल्यांना समाजात प्रत्यक्षरित्या लागू करण्याचे इबादत एक साधन आहे. याचा विसर मुस्लिमांना पडलेला आहे. ते साधनाला साध्य समजून जीवन जगत आहेत. इस्लामी व्यवस्था परिपूर्ण आहे. त्यात आदर्श समाज निर्मितीसाठी आवश्यक असलेली कुटुंब व्यवस्था, नैतिक व भौतिक शिक्षण व प्रशिक्षण व्यवस्था, समाज कल्याण व्यवस्था, राजकीय व्यवस्था, शासन व्यवस्था, अर्थव्यवस्था, न्याय व्यवस्था या सर्व व्यवस्थांचा त्यात समावेश आहे. हे बहुसंख्य बांधवांना पटवून देण्यात आपण अपयशी ठरलोत, याची कबुली द्यावीच लागेल. इस्लाम इतर धर्माप्रमाणे एक धर्म नाही की ज्यात थोड्या फार धार्मिक विधीं (रिचवल्स)वर जोर देऊन बाकी विभांगामध्ये अनुयायांना मोकळे सोडून दिलेले आहे. जमाअते इस्लामी सारखा अपवाद सोडला तर परिपूर्ण इस्लामी जीवन व्यवस्थेवर आधारित विचारांची मांडणी कोणीच करीत नाही. उलट हिंदू राष्ट्रवादाला विरोध म्हणून मुस्लिम राष्ट्रवादाचा पर्याय समोर ठेवण्यात येतो. त्यामुळे दोन्ही समाजात विनाकारण स्पर्धा वाढीस लागते. मुस्लिम राष्ट्रवादाचा विरोध केल्यामुळेच मौलाना अबुल कलाम आझाद, दारूल उलूम देवबंद यांना कवि डॉ. अल्लामा इक्बाल, मुहम्मद अली जीना व मुस्लिम लीगचा प्रचंड विरोध सहन करावा लागला होता.
    भारतात हिंदू राष्ट्रवादाचा सिद्धांत सर्वप्रथम वि.दा. सावरकर यांनी 1923 साली ’हिंदुत्व’ या पुस्तकात मांडला तर त्याच कालखंडात मुस्लिम राष्ट्रवादाची मांडणी सर्वप्रथम कवि इक्बाल यांनी केली. याच विचारांच्या पायावर मुस्लिम लीगची स्थापना झाली. संकुचित विचारांच्या मुस्लिमांचा लीगला पाठिंबा पण मिळाला. काँग्रेस पक्षांतर्गत कोंडी झाल्याने जीना सारख्या इंग्रजांपेक्षा अधिक धर्मनिरपेक्ष व्यक्तीला पक्ष सोडून मुस्लिम लीगच्या आश्रयाला जावे लागले. त्यांचाच वारसा चालविण्याचे काम अलिकडे एमआयएमने सुरू केले आहे.
    एमआयएमचे अध्यक्ष बॅ.ओवेसी यांचे राजबिंडे व्यक्तिमत्व, त्यांना असलेली इस्लामी मुल्यांची जाण, भारतीय मुस्लिमांच्या प्रश्नांची जाणीव, ब्रिटिश शैक्षणिक पार्श्वभूमी, प्रभावी वक्तृत्व, बेजोड तर्क शक्ती, उत्तम मांडणी, राज्यघटनेवरील त्यांची अव्याभिचारी निष्ठा इत्यादी गुणांमुळे ते अल्पावधीतच मुस्लिमांचे राष्ट्रीय नेते म्हणून उदयास आले व मुस्लिम तरूणांच्या गळ्यातले ताईत झाले. मौ. आझाद नंतर राष्ट्रीय पातळीवर दखल घ्यावी असे नेतृत्व म्हणून बॅ. ओवेसींकडे पाहता येईल. सुरूवातीला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न करणार्या मेनस्ट्रीम मीडियाचे आज ते प्रिय पात्र बनलेले आहेत. इंग्रजीपासून हिंदी पर्यंतच्या सर्व वाहिण्यांवर त्यांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यांचे मत म्हणजे भारतीय  मुस्लिमांचे मत असे समजण्याची जणू परंपरा रूढ होऊ पहात आहे. ते मुस्लिम राष्ट्रवादाचे जणू प्रतिक असल्यासारखे वागत आहेत व तशीच सामुहिक समज बनू पाहत आहे. म्हणून या सर्व प्रकाराची दखल घेणे गरजेचे आहे. यासाठीच हा लेखन प्रपंच.
    उत्तर प्रदेशातील एक उजव्या विचारांचे प्रतिनिधीत्व करणारे नेते विनय कटियार यांनी अलिकडेच मुस्लिमांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला. त्यावर प्रामुख्याने दोन प्रतिक्रिया आल्या. एक प्रतिक्रिया डॉ. फारूख अब्दुल्लांची होती. त्यांनी तेवढ्याच तीव्रतेने कटियार यांचा प्रतिवाद केला, जेवढ्या तीव्रतेने कटियार यांनी सल्ला दिला होता. त्यांनी कटियार यांना उद्देशून वक्तव्य केले की, ’ हिंदुस्थान कटियार के बाप का है क्या?’ दूसरी प्रतिक्रिया बॅ.असदोद्दीन ओवेसींची आली. त्यांनी व्यथित अंतःकरणाने सांगितले की, ’ऊठसूठ कोणीही आम्हाला पाकिस्तानला जाण्याचा सल्ला देतोय. हा आमच्या राष्ट्रनिष्ठेचा अपमान आहे. भरपूर सहन केले आता सहन होत नाही. आता वेळ आलेली आहे की, संसदेने असा कायदा करावा की, जो कोणी मुस्लिमांना पाकिस्तानात निघून जा, असे वक्तव्य करील त्याला तीन वर्षाची शिक्षा केली जावी.’ त्यांच्या या वक्तव्याचे समर्थन मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणात, समाज माध्यमांवर केले. बॅ.ओवेसींच्या अलिकडील काही वक्तव्यांनी बुद्धीवादी मुस्लिमांना निराश केलेले आहे. काळजी वाटावी इतपत टोकाची भूमिका अलिकडे बॅ.ओवेसी घेत आहेत. तीन वर्षे शिक्षेची मागणी करणारा कायदा तयार करण्याची त्यांची मागणी किती फोल आहे, याचा मागोवा घेणे त्यामुळेच गरजेचे आहे.
    तीन वर्षाची शिक्षा करणारा कायदा
    आज देशात शेकडो कायदे असे आहेत की, ज्यांच्यावर अमलबजावणी होत नाही. शाहबानो केसनंतर संसदेने मंजूर केलेल्या मुस्लिम महिला हक्क संरक्षण कायद्याची काय वाट लावली गेली, याचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालमजूरीला प्रतिबंधक करणारा कायदा इत्यादी अनेक कायदे आहेत. मात्र त्यांची प्रभावी अंमलबजावणी कधीच शक्य झालेली नाही. आज देशात दलितांना अपमानित करण्याविरूद्ध दोन कायदे अस्तित्वात आहेत. एक पीसीआर अॅक्ट (प्रोटेक्शन ऑफ सिव्हील राईट्स अॅक्ट) व दूसरा अॅट्रॉसिटीज अॅक्ट (अनुसूचित जाती व जमाती यांच्यावरील अत्याचावर प्रतिबंधक कायदा). असे असतांनाही दलितांना अपमानित करण्याच्या घटना बंद झाल्या का? त्यांच्यावरील अत्याचार संपले का? नक्कीच नाही! कायदे करून समाज भावनेला जास्त दाबून ठेवता येत नाही. दोन-दोन कायदे असून जेव्हा दलितांवरील अत्याचार कमी झाले नाहीत तर ओवेसी यांनी मागणी केल्याप्रमाणे जरी कायदा केला  तरी मुस्लिमांचा अपमान व त्यांच्यावर होणारे अत्याचार बंद होतील, याची काय हमी?
     अशा कायद्याची मागणी करणे मुदलातच चुकीची आहे. कारण भारतासारख्या बहुसंख्येने हिंदू असलेल्या देशामध्ये अल्पसंख्यांकांच्या कल्याणाचा एखादा कायदा मंजूर होऊ शकतो. मात्र अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी बहुसंख्यांकांना तुरूंगात टाकणारा कायदा मंजूर होऊ शकत नाही, ही सामान्यज्ञानाची बाब आहे. असे जर शक्य झाले असते तर शिवराज पाटील चाकूरकर केंद्रात गृहमंत्री असतांना व काँग्रेस पक्षाचे संसदेत बहुमत असतांना अल्पसंख्यांकाचे जातीय हिंसेपासून रक्षण करणारा कायदा कधीच मंजूर झाला असता. तो कायदा मंजूर होवू नये यासाठी काँग्रेस पक्षातूनच मोर्चेबांधणी करण्यात आली होती, हा इतिहासही फारसा जुना नाही.
    बॅ.ओवेसींना ही गोष्ट माहित नाही अशातला प्रकार नाही. ते भारतीय राजकारणातील एक मुरलेले नेते आहेत. स्वतः बॅरिस्टर आहेत. ते जाणून बुजून नरेंद्र मोदी यांच्या उग्र हिंदू राष्ट्रवादाच्या विरोधात आपला उग्र मुस्लिम राष्ट्रवाद उभा करू पाहत आहेत. इस्लाम समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतो, हे ही बॅ.ओवेसींना चांगल्या प्रकारे माहित आहे. मात्र ते जाणून बुजून फक्त दलित आणि मुस्लिमांचाच कैवार घेतात. बहुसंख्य हिंदुंच्या बाबतीत ते कधीच कुठलीही भुमिका घेत नाहीत. ही त्यांची इस्लामविरोधी प्रवृत्ती आहे. मोदी मुस्लिम हिताची भाषा बोलत नाहीत किंवा मुस्लिमांचे कल्याण करू इच्छित नाही, ही गोष्ट समजण्यासारखी आहे. कारण की त्यांच्यावर झालेले संस्कार हे संघाच्या संकुचित विचारप्रणालीतून झालेले आहेत. मात्र बॅ.ओवेसींचे असे नाही. ते स्वतः इस्लामचे ध्वजवाहक आहेत. त्यांना अशी संकुचित भूमिका घेवून चालणार नाही. हे माहित असूनसुद्धा ते संकुचित विचार करतात. अशाने त्यांच्यात आणि मोदींमध्ये फरक तो काय राहील? संकुचित विचाराचा व्यक्ती आणि साहेबे शरियत व्यक्ती यांच्यात काहीतरी फर्क असावयास हवा की नाही?
    या समस्येचे समाधान
सबक पढ सदाकत का, शुजाअत का, अदालत का
लिया जाएगा तुझसे काम कौमों की इमामत का
    राष्ट्रवाद फक्त आपल्या लोकांवर प्रेम करणे शिकवितो, मग त्यांचे वागणे चुकीचे का असेना. इस्लाम ठीक याच्याविरूद्ध भूमिका घेतो. तो सर्व मानवतेवर प्रेम करण्याची शिकवण देतो व चुकीचे वागणार्या विरूद्ध ठोस भूमिका घेतो. किंबहुना त्यांच्याविरूद्ध कठोर शिक्षेची तरतूद करतो. मग ते मुस्लिम का असेनात. उग्र हिंदू राष्ट्रवादाला उत्तर उग्र मुस्लिम राष्ट्रवादाने देता येणार नाही. ज्याप्रमाणे रक्ताचे डाग रक्ताने नाही तर पाण्याने धुतले जातात, ठीक त्याच प्रमाणे शत्रुत्वाचे उत्तर शत्रुत्वाने देता येणार नाही. ते मित्रत्वानेच दिल्या गेल्यासच शत्रुत्व संपेल. यासंबंधी कुरआनचे निर्देश स्पष्ट आहेत. अल्लाहने खालील शब्दात मुस्लिमांना निर्देश दिलेले आहेत की, ”आणि हे पैगंबर (स.)! सदाचार आणि दुराचार एकसमान नाहीत. तुम्ही दुराचाराचे त्या सदाचाराने निरसन करा जे अत्युत्तम असेल. तुम्ही पहाल की तुमच्याशी ज्याचे शत्रुत्व होते, तो जिवलग मित्र बनला आहे” (कुरआन ः सुरे हा-मीम-सजदा, आयत क्र. 33-34).
    या संदर्भात जमाअते इस्लामीचे संस्थापक यांचे विचार सुद्धा उद्बोधक आहेत. ते म्हणतात, ” इस्लाम का जो अजीमोश्शान मक्सद हमारे सामने है, जिन जबरदस्त ताकतों के मुकाबले में हमको उठकर इस मक्सद के लिए काम करना है उसका अव्वलीन (प्रथमतः) तकाजा (आग्रह) ये है के, हम में सब्र (धैर्य) हो, तदब्बुर (उच्च विचारशक्ती) और मामला फहेमी (परिस्थितीची जाण) हो और इतना मजबूत इरादा हो के जिससे हम दूररस नतायज (दूरगामी परिणाम) के लिए लगातार अन्थक सई (प्रयत्न) कर सकें. बेसब्री (घाई) के साथ जल्दी-जल्दी नतायज बरामद करने के लिए बहोतसे ऐसे सतही काम (स्तरहीन कार्य) किए जा सकते हैं. जिनसे एक वक्ती (तात्पुर्ती) हलचल बरपा हो जाए, लेकिन उसका कोई हासिल इसके सिवा नहीं है के, कुछ दिनों तक फजा (वातावरण) में शोर रहे और फिर एक सदमे के साथ सारा काम इस तरह बरबाद हो जाए के मुद्दत-हाय -दराज (कित्येक वर्षे) तक उसका नाम लेने के भी कोई हिम्मत न कर सके” (संदर्भ ः रूदाद भाग 1, पान क्र. 88-89).
    मला वाटते की यापेक्षा अधिक टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक बुद्धीमान हिंदू आणि मुस्लिम व्यक्तीने वर नमूद आयात व मौलाना मौदूदी यांच्या वक्तव्याच्या कसोटीवरच हिंदू व मुस्लिम दोघांचा अतीराष्ट्रवाद देशासाठी कितपत योग्य आहे याचा विचार करावा. जय हिंद!

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget