Halloween Costume ideas 2015

खरा अल्लाउद्दीन खिल्जी!

एम.आर.शेख
पद्मावत चित्रपटामुळे अल्लाउद्दीन खिल्जीचे नाव नव्याने प्रकाश झोतात आलेले आहे. अभिनेता रणवीरसिंहने रंगवलेला खिल्जी इतिहासाच्या मूळ खिल्जीसारखा नव्हता, असे चित्रपट पाहणाऱ्यांचे मत आहे. काहींचे मत याच्या उलट आहे. अशा या उलट-सुलट मतांमध्ये अल्लाउद्दीन खिल्जी प्रत्यक्षात कसा होता हे पाहणे उद्बोधक ठरेल, त्यासाठी हा लेखप्रपंच.
    अल्लाउद्दीन खिल्जी, खिल्जी वंशाचा दूसरा सम्राट होता. मात्र तो तसा नव्हता जसा संजय लीला भन्साळी ने आपल्या चित्रपटात दाखविलेला आहे. तो विदेशी हल्लेखोर नव्हता किंवा समलैंगिकही नव्हता, असे त्याच्या इतिहासावरून नजर टाकल्यास लक्षात येते. त्याचा जन्म अखंड भारताच्या बंगाल प्रांताच्या बीर भूम जिल्ह्यात (आजचा बांग्लादेश) 1250 मध्ये झाला. त्याचे मूळ नाव जुना उर्फ जान मुहम्मद खिल्जी होते. त्याच्या वडिलांचे नाव शहाबुद्दीन मसूद असे होते. त्याने एकूण तीन लग्ने केली होती. त्याच्या एका पत्नीचे नाव कमलादेवी होते. जी राजा कर्नसिंगची पूर्व पत्नी होती. शिवाय, मलिका-ए-जहाँ (ही जलालुद्दीन खिल्जीची मुलगी), महेरू (दिल्लीच्या एका सरदाराची मुलगी) ही त्याच्या इतर दोन पत्नींची नावे होत.
    मलिक काफूर नावाचा एक किन्नर त्याचा सर-सेनापती होता. त्याच्याशी खिल्जीचे समलैंगिक संबंध होते, असा काही इतिहासकारांनी आरोप केला असला व तसे पद्मावत मध्ये सुद्धा दाखवले असले तरी तो खरा वाटत नाही. कारण की, मलिक काफूर हा अत्यंत धाडसी आणि युद्धनिपुण व खिल्जी एवढाच तुल्यबळ व्यक्ती होता. गुलामापासून सर-सेनापती पर्यंतचा प्रवास त्याने लिलया सर केला होता. त्याने पहिल्यांदा दक्षीण भारतातील देवगिरी (सध्याचे दौलताबाद) व वरंगल (सध्याचा तेलंगना) हे प्रांत जिंकून दिल्लीच्या सत्तेत जोडले होते. शिवाय, अल्लाउद्दीनची हत्या विषप्रयोग करून त्यानेच केली होती.
    अल्लाउद्दीनला एकूण चार मुले होती. कुतूबोद्दीन, शहाबुद्दीन, खिजरखान व शादीखान अशी त्यांची नावे होत. अल्लाउद्दीन खिल्जी निरक्षर मात्र शरिराने धिप्पाड व युद्ध कौशल्य निपुण होता. तो प्रचंड ताकदवान व महत्त्वाकांक्षी होता. तो एक कुशल संघटक होता. म्हणून खिल्जी घराण्याचा पहिला सम्राट जलालुद्दीन याने त्याला आपली मुलगी देऊन कडा व अवध या दोन प्रांतांचा राज्यपाल नियुक्त केला होता. मात्र त्याची महत्वाकांक्षा या दोन प्रांतात मावत नव्हती म्हणून त्याने जलालुद्दीनची परवानगी न घेता दक्षीणेवर स्वारी केली होती व प्रचंड लूट करून दिल्लीला परतला होता.
    जलालुद्दीन खिल्जी ने लहानपणापासूनच स्वतःच्या मुलासारखा अल्लाउद्दीन खिल्जीचा सांभाळ केला होता. जलालुद्दीन खिल्जी हा अल्लाउद्दीन खिल्जीचा चुलता होता. एक दिवस संध्याकाळी असरच्या नमाजनंतर जलालुद्दीन खिल्जी नौकानयन करत कुरआन   पठण करीत होता. तेव्हा अल्लाउद्दीन खिल्जी  त्याला भेटायला गेला. अल्लाउद्दीनला पाहून जलालुद्दीनने नौका किनाऱ्यावर घेतली व तो चालत अल्लाउद्दीन जवळ आला. दोघांनी गळाभेट घेतली. तेवढ्यात अल्लाउद्दीनने इशारा केला आणि महेमूद बिन सालीम आणि इख्तीयारूद्दीन या दोन शिपायांनी ठरल्याप्रमाणे जलालुद्दीनवर तलवारीने हल्ला केला व जलालुद्दीनचे शीर धडावेगळे केले. त्यानंतर लगेच 12 आक्टोबर 1296 रोजी दिल्लीमध्ये तीन दिवसीय राज्य रोहन सोहळा आयोजित करण्यात आला. त्या सोहळ्यात त्याने रितसर भारताचा सम्राट म्हणून सत्ता ग्रहण केली. त्याच्या अखत्यारित पश्चिमेस पंजाब व सिंध, मध्य भारतात गुजरात व उत्तरप्रदेश तर पूर्व भारतात बिहार, माळवा व राजपुताना एवढे प्रांत होते. 1298 मध्ये त्याने गुजरात काबिज केले होते. 1299 मध्ये जेसलमेर, 1301 मध्ये रणथंबोर, 1304 मध्ये जालोर व 1305 मध्ये माळवा या प्रांतांना त्याने ताब्यात घेऊन दिल्लीच्या तख्ताशी जोडले होते. अलाउद्दीन खिल्जी पहिला असा सम्राट आहे ज्याने भारतात सुसंघटित थलसेना (ऑर्गनाईज्ड आर्मी) उभी केली होती. तो जेथे जाई विजयी होवून परत येई. अल्लाउद्दीन आणि विजय असे समीकरणच त्या काळात रूढ झाले होते. म्हणून जनतेचा आणि त्याचा दोघांचा असा समज झाला होता की, अल्लाउद्दीन खिल्जी यास दैवी मदत प्राप्त आहे. असे असले तरी त्याला कश्मीर, नेपाळ आणि आसाम जिंकता आला नाही. त्याच्या काळात मंगोलांनी अनेक वेळेस दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी भारतावर हल्ले केले होते. मात्र प्रत्येकवेळी त्यांना मात खावी लागली होती. शेवटी 1307 मध्ये अलाउद्दीन खिल्जीने मंगोलांचा निर्णायक पराभव केला. त्यानंतर मंगोलांचे भारतावरील हल्ले बंद झाले. अल्लाउद्दीन खिल्जीने 1296 ते 1316 असे एकूण 20 वर्षे शासन केले.
    दक्षीणेतील त्याच्या पहिल्या स्वारीनंतर त्याचा सेनापती मलिक काफूर याने 1306 मध्ये दूसरी स्वारी केली. ज्याची सुरूवात देवगिरी (दौलताबाद महाराष्ट्र) येथून सुरू झाली. त्यात दौलताबादचा राजा रामचंद्र याने मलिक काफूर समोर आत्मसमर्पण केले. 1310 मध्ये मलिक काफूर याने वरंगलकडे मोर्चा वळविला. तेव्हाचा वरंगलचा राजा रूद्रदेव याने स्वतःची सोन्याची मूर्ती तयार करून शंभर हत्ती, 700 घोडे व जड जवाहीरसह मलिक काफूर समोर शरणागती पत्करली व दिल्लीचे मांडलीकत्व स्विकारले. इतिहासकार एकीकडे मलिक काफूरचे शौर्याचे वर्णन करतात तर दूसरीकडे तो किन्नर होता असे लिहितात. असे जरी असले तरी मलिक काफूर हा गुलाम होता एवढे मात्र नक्की. गुजरातच्या मोहिमेमध्ये नुसरतखान नावाच्या सरदारने 1000 दिनारमध्ये खरेदी करून त्याला अलाद्दीन खिल्जीला भेट म्हणून दिले होते. अल्पावधीतच मलिक काफूर आपल्या अंगभूत गुणांच्या व शौर्याच्या बळावर खिल्जीचा सर्वाधिक विश्‍वासपात्र बनला होता. मात्र याच महत्वकांक्षी मलिक काफूरने शेवटच्या काळात विषप्रयोग करून अल्लाउद्दीन खिल्जीची हत्या केली. त्याच्या दोन मुलांचे डोळे काढले व तीन वर्ष वयाचा राजपूत्र शहाबुद्दीन याला गादीवर बसवून शासनाची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली होती. मात्र काही आठवड्यातच अल्लाउद्दीन खिल्जीच्या विश्‍वासपात्र सैनिकांनी मलिक काफूरची हत्या केली. अल्पवयीन शहाबुद्दीनला त्याचाच भाऊ मुबारक शहा ने गादीवरून उतरवून स्वतः राज्य प्राप्त केले. 1316 ते 1320 पर्यंत तो दिल्लीच्या तख्ताचा सम्राट होता. 1320 मध्ये त्याचीही हत्या झाली व खिल्जी वंश समाप्त झाला व तुघलक वंशाची सुरूवात झाली.
अल्लाउद्दीन खिल्जीचे गुण-दोष
    मध्ययुगीन अनेक मुस्लिम सम्राटाप्रमाणे अल्लाउद्दीन खिल्जीही ही एक नाममात्र मुस्लिम सम्राट होता. त्याचा इस्लामशी फारसा संबंध नव्हता. किंबहुना इस्लामच्या विरोधी त्याचे आचरण होते. त्या काळी प्रत्येक राजा युद्ध हे सत्ता, संपत्ती, जमीन यासाठीच करत होता. तसेच अल्लाउद्दीनने जेवढे युद्ध केले ते फक्त जमीन बळकावण्यासाठी व इतर राजांची संपत्ती हडपण्यासाठी केले. सतत मिळत गेलेल्या विजयामुळे त्याची महत्वकांक्षा एवढी वाढली होती की, दिल्लीचे तख्त एखाद्या विश्‍वासपात्र सरदाराच्या स्वाधीन करून मध्यपूर्व, युरोप आणि तुर्कस्तान सुद्धा जिंकण्याचा त्याचा मन्सुबा होता. म्हणूनच तो स्वतःला सिकेंदरे सानी (अ‍ॅलेक्झांडर द्वितीय) म्हणून घेत असे.
    त्याच्या धार्मिक विचारांसबंधी देवबंदचे इतिहासकार मुहम्मद कासीम फरिश्ता हे म्हणतात की, ’तमाम कामियाबीयों के बाद अल्लाउद्दीन के दिल में अजीब-अजीब खयालात आने लगे. उन खयालात में से एक खयाल ये भी था के जिस तरह (अस्तगफिरूल्लाह) हुजूर मुहम्मद सल्ल. ने अपनी कुव्वत से शरियत कायम की और उनके चारों खुलफा (रजि.) ने उस शरियत को मजबूत बनाया ठीक उसी तरह अगर मैं भी अपने उमरा (सरदार) अलमास बेग, अलग खान, मलिक हजबरूद्दीन जफरखान, मलिक नुसरत खान और संजर अलप खान की कुव्वत और सहारे के बलपर एक नया मजहब जारी करूं तो फिर यकीनन रोजे कयामत तक मेरा नाम दुनिया में बाकी रहेगा. अलाउद्दीन महेफिले शराब में अक्सर व बेशतर अपने इसी खयाल का जिक्र करता था और अपने सरदारों से मश्‍वरा किया करता था. अल्लाउद्दीन जाहील महेज था. उसकी सारी जिंदगी जाहील खिल्जीयों में गुजरी. सुलतान अल्लाउद्दीन खिल्जी कभी-कभी इस खयाल का भी इजहार करता था के, मुल्क की हुक्मरानी और बादशाहीयत के निजाम को सिर्फ बादशाह की राय और उसकी मस्लेहतों से ताल्लुक होता है. उन सियासी कामों से खुदावंते ताला की (अस्तगफिरूल्लाह) शरियत का कोई वास्ता नहीं है. मजहबी उलेमाओं का काम सिर्फ इतनाही है के, वो मुख्तलिफ किस्म के मुकद्दमों का फैसला करें, खानदानी झगडों को खत्म करें और खुदावंदे ताला की इबादत के बेहतरीन तरीके बयान करे.’ (संदर्भ ः ’तारीख-ए-फरिश्ता’ पान क्र. 245  )
विकास हेच अल्लाउद्दीनच्या विजयाचे रहस्य होते.
    अलाउद्दीन जरी दारूचा शौकीन होता तरी लवकरच त्याला दारूच्या नुकसाना संबंधींची उपरती झाली व त्याने दिल्ली शहरामध्ये दारूबंदी नुसती केलीच नाही तर ती अमलात सुद्धा आणली. अल्लाउद्दीन खिल्जी भारतीय इतिहासातील पहिला राजा होता ज्याने जीवनावश्यक वस्तूंचे दर निश्चित केले होते. त्यापेक्षा जास्त दरावर व्यापाऱ्यांना वस्तू विकण्यास प्रतिबंध केला होता.  शेतकऱ्यांचा माल त्यांच्या बांधावर जावून खरेदी करण्याची व्यवस्था त्यांनी विकसित केली होती. शासकीय कर्मचारी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जावून त्याच्या गरजेपुरता माल सोडून बाकी मालाचे मुल्य चुकवून शेतातूनच माल उचलून घेवून जात होते. रोजच्या रोज बाजारांमधील मालांच्या मुल्यांचे उतार चढाव बादशाहपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केलेली होती. त्यामुळे कृत्रिम भाव वाढविण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती. कपड्यांच्या किमतीसुद्धा ठरविण्याचा अधिकार व्यापाऱ्यांना नव्हता. त्या किमती शासकीय स्तरावरून ठरविल्या जात होत्या. त्यामुळे कपड्यामध्ये सुद्धा लूट करण्याची व्यापाऱ्यांना संधी नव्हती. घोड्यांच्या वेगवेगळ्या जातींच्या किमती शासकीय स्तरावरून ठरविल्या जात होत्या. इतर पशु जसे गाय, बैल, म्हैस, बकरी यांचेही दर त्यांच्या दर्जाप्रमाणे शासकीय स्तरावर ठरविले जात. अल्लाउद्दीनच्या काळात चांदी, सोन्याचे वेगवेगळे तंगे (नाणे) होते तसेच सोने आणि चांदी यांच्या मिश्रणातून तयार केलेलीही नाणे बाजारात उपलब्ध होती. सोन्याच्या नाण्याला तंगातलाई आणि चांदीच्या नाण्याला तंगा नखराह म्हटले जात होते. या जनहित सुधारणांमुळे जनता सुखात होती. त्यामुळे सैनिक प्रत्येक युद्धात जीवाची बाजी लावून लढत होते. त्यामुळे विजय मिळत होता. अल्लाउद्दीन खिल्जीच्या सातत्यपूर्ण विजयी श्रृंखलेचे हेच रहस्य होते.
बॉलीवुड आणि मुस्लिम
    गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपटांमध्ये ठरवून मुस्लिमांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खलनायक आणि आतंकवाद्यांचे पात्र मुस्लिम रंगविण्याचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. पीके हा चित्रपट जेव्हा आला तेव्हा त्या चित्रपटासाठी आमीर खान या नटाची केवळ तो नावाने मुस्लिम आहे म्हणून आलोचना केली गेली. वास्तविक पाहता त्या चित्रपटाची कथा, पटकथा तथा दिग्दर्शन हे करणारे सर्व बहुसंख्य समाजातील होते. त्यांना कोणी दोष दिलेला नाही. केवळ निर्देशकाने दिलेल्या निर्देशनाप्रमाणे अभिनय केला म्हणून आमीर खानला टार्गेट करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याची पत्नी किरण राव हिचे वाक्य आमीरनेच म्हटले, अशी हाकाटी पिटण्यात आली. मूळ वाक्य (सद्याच्या वातावरणात मला माझ्या मुलांच्या भविष्यासाठी भारतात राहण्याची भीती वाटते.) बोलणारी किरण राव हिला कोणी दोष दिला नाही. एकंदरच बॉलीवुडमध्ये तयार होणाऱ्या प्रत्येक चित्रपटात मुस्लिम व्यक्तीरेखांची निवड करून त्यांना क्रूर, कृतज्ञ, देशद्रोही दाखविण्याची जणू चढाओढच लागलेली आहे. पद्मावत न पाहताच करणी सेनेने जो अभूतपूर्व विरोध केला. तसा विरोध अनेक मुस्लिमांनी चित्रपट पाहूनसुद्धा केलेला नाही. यातच कोणाला राष्ट्रीय संपत्तीची काळजी आहे हे स्पष्ट होते. मुस्लिमांनी सॅटॅनिक व्हर्सेसपासून ते तस्लीमा नसरीन पर्यंतच्या विरोधातून मिळालेल्या अनुभवातून एक धडा नक्कीच शिकलेला आहे. तो म्हणजे असा की, विरोध कधीच उपयोगी पडत नाही. उलट त्यात आपलेच नुकसान होते. म्हणून असे चित्रपट, पुस्तके आणि व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे कधीही चांगले. राहता राहिला प्रश्‍न अल्लाउद्दीन खिल्जीचा तर तो जरी धर्माने मुस्लिम होता तरी त्याचे वर्तन किंवा शासन इस्लामी नव्हते, यात वाद नाही. त्यामुळे त्याचे विकृत चित्रकरण म्हणजे भारतीय मुस्लिमांचा अपमान वगैरे आहे, असे काही नाही. भारतीय मुस्लिमांनी त्याच्या विषयी सहानुभूती बाळगावी, असे काही नाही.
    करनी सेनेने गुरू ग्राममध्ये शाळेच्या बसवर हल्ला करून ज्या पद्धतीने त्या हल्ल्यात मुस्लिमांना गोवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला तो निषेधार्ह आहे. गुरू ग्राम पोलिसांनी वेळीच स्पष्ट केले की, मुलांनी खचाखच भरलेल्या शाळेच्या बसवर हल्ला करणाऱ्या अटक आरोपितांपैकी एकही मुस्लिम नाही. ही संतोषजनक बाब आहे.
    मुळात देशाचे एकंदरित वातावरणच पावणेचार वर्षात मुद्दामहून बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अल्लाहच्या कृपेने हिंदू बांधवांमधूनच काही बांधव मुस्लिमांच्या बाजूने सत्याची लढाई लढत आहेत. म्हणून भारत महान आहे. भारत आपला देश आहे. विविधतेने नटलेला आहे. एकमेकांच्या सुख-दुःखात सामिल होण्याची गंगा-जमनी परंपरा या देशाला आहे. जोपर्यंत हिंदू बांधव मुस्लिमांच्या हक्काची लढाई लढत आहेत तोपर्यंत मुस्लिमांना भय बाळगण्याचं कारण नाही. जय हिंद !

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget