Halloween Costume ideas 2015

शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी गोरगरिबांना आधार द्या -ऍड. फैसल काझी

कोनगाव (भिवंडी)- इस्लाम वैश्‍विक समानता आणि मानवता जाहीर करतो. समाजात शांतता, सर्वच क्षेत्रातील प्रगती आणि मरणोत्तर जीवनात लाभणारी मुक्ती समजून घेऊन ती आत्मसात करण्याची आज अत्यंत गरज आहे. शांती आणि प्रगती प्राप्त करायची असेल तर समाजातील दारिद्य्रनिर्मूलन करणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून गोरगरिबांना आधार द्यावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध वकील फैसल काझी यांनी येथील पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कायक्रमात केले.
    जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र तर्फे 12 ते 21 जानेवारी दरम्यान ’शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी इस्लाम’ ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत जमाअत-ए-इस्लामी हिंद कोनगाव (जि. ठाणे) शाखेच्या वतीने दि. गुरुवार दि. 19 जानेवारी 2018 रोजी कोनगाव पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ऍड. फैसल काझी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोनगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर मंगेश सावंत होते तर विचारमंचावर कोनगाव पो. स्टे.च्या गुन्हे विभागाचे इन्स्पेक्टर देशमुख आणि इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. ऍड. काझी पुढे म्हणाले, ’इस्लाम’ हा शब्द ’सलाम’पासून आला आहे आणि सलामती म्हणजे शांती म्हणून इस्लामचा अर्थ होतो शांती. या अनुषंगाने त्यांनी ’अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाही व बरकातहु’ या मुस्लिमांद्वारे करण्यात येणार्‍या अभिवादनाचा विस्तृत अर्थ त्यांनी श्रोत्यांना स्पष्ट करून सांगितला. अर्थात ’तुम्हाला शांती लाभो, तुम्हाला सलामती लाभो आणि त्याचप्रमाणे अल्लाहद्वारे तुम्हाला कृपा व भरभराट लाभो’ असा त्याचा थोडक्यात अर्थ त्यांनी या वेळी सांगितला.
    आपल्याला सुदृढ असा समाज उभा करायचा आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला एक असे कुटुंब निर्माण करावयाचे आहे ज्यात बाप-बेटा, आई-मुलगी यांच्यातील नात्याचे बंध उत्तम प्रकारे दृढ झालेले असले पाहिजेत. इस्लामचा दुसरा अर्थ आहे ईश्‍वरापुढे आत्मसमर्पण. म्हणजेच ईश्‍वरी मार्गदर्शनाद्वारे मानवाने आपले जीवन व्यतीत केले पाहिजे. त्याने घातलेल्या मर्यादा ओलांडता कामा नयेत. तेव्हाच त्याची सर्वार्थाने प्रगती शक्य आहे. याविरूद्ध एखादा मुस्लिम व्यक्ती मनाला वाटेल तसे वागत असेल तर तो मुस्लिम होऊच शकत नाही. कारण त्याच्या वागण्यात ईशआदेशाची पायमल्ली होत असते. कारण मुस्लिम म्हणजे ईश्‍वारची आज्ञा पाळणारा आज्ञापालक. म्हणून ईश्‍वराची आज्ञा पाळली तर त्याची कृपा आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि या कृपेमुळेच पारलौकिक जीवनात मानवाला निश्‍चितच मुक्ती अर्थात मोक्ष लाभल्याशिवाय राहणार नाही. विविध क्षेत्रांतील उदाहरणांद्वारे शांती, प्रगती आणि मुक्तीचा अर्थ ऍड. काझी यांनी स्पष्ट करून सांगितला.
सुरूवातीला आदर्श कोचिंग क्लासेसचे अफसर खान यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्याचबरोबर या कार्यक्रमाचा उद्देश आणि वैशिष्ट्य थोडक्यात सांगितले. आजचा मनुष्य तत्त्वत: शांती हिरावून बसलेला आहे. म्हणून जमाअत-ए-इस्लामी हिंद कोनगाव तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास अतिशय महत्त्व प्राप्त झाले असल्याचे खान यांनी स्पष्ट केले.
यानंतर आपल्या प्रास्ताविकपर भाषणात जमाअत-ए-इस्लामी हिंद कोनगावचे अध्यक्ष इंतेखाब आलम यांनी जमाअतच्या विविधांगी कार्याचा आढावा घेतला आणि ही मोहीम राबवित असताना पोलीस खात्यापासून ते सर्वधर्मीय नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर कोनगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारीवर्गाचे आवर्जून आभार मानले.
अशा प्रकारचा कार्यक्रम कोनगाव पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदाच पार पडला. या सोहळ्यात सुमारे 40 पोलीस स्टाफ आणि 20 हून अधिक प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अफसर खान यांनी अतिशय उत्तमरित्या केले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी साप्ताहिक शोधनचे कार्यकारी संपादक शाहजहान मगदुम यांच्यासह इंतेखाब आलम, अफसर खान, डॉ. दानिश खान, मजहर शेख इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget