Halloween Costume ideas 2015

अजान : प्रश्न आणि उत्तरे

-मिनाज शेख, पुणे
    लाऊडस्पीकरवर अजान दिल्याने अल्लाह जास्ती खूश होतो का?
उत्तर-    सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजान ही अल्लाहसाठी नव्हे तर भक्तांना नमाजसाठी बोलविण्यासाठी असते. अल्लाहसाठी ज्या काही उपासना केल्या जातात, उदा॰ नमाज, कुरआन पठण, प्रवचन इ. या सर्व लाऊडस्पीकरशिवाय केल्या जातात आणि हळू आवाजात केल्या जातात. फक्त अजान ही लाऊडस्पीकरवर दिली जाते.
    भक्तांना नमाजसाठी लाऊडस्पीकरशिवाय बोलविले जाऊ शकते का? जसे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात होत असे.
उत्तर-    पूर्वीच्या काळात तंत्रज्ञानाचा विकास होण्यापूर्वी अजान ही एका उंच ठिकाणी उभे राहून दिली जात असे. जे लोक अजान ऐकत होते ते पुढे इतरांपर्यंत पोहचवत होते. परंतु आजच्या काळात अशी स्थिती शक्य नाही. कारण पूर्वी साधी बैठी घरे होती आणि आता मोठमोठ्या इमारती आहेत. तसेच आजकाल गाड्यांचे आवाज, हॉर्नस् या सर्वांपुळे तोंडी अजान दिली तर ती सर्वांपर्यंत पोहचणे अशक्य आहे.
    अजानशिवाय मस्जिदीमध्ये ठरल्या वेळी लोक प्रार्थनेसाठी (नमाज) का येऊ शकत नाहीत?
उत्तर- नमाजच्या सर्व वेळा या सूर्योदय आणि सूर्यास्तावर अवलंबून असतात. प्रत्येक तीन-चार दिवसांनी नमाजच्या वेळांमध्ये काही मिनिटांचा फरक होत असतो. हा फरक आपल्या भौगोलिक ठिकाणांवरही अवलंबून असतो. त्यामुळे सर्वच ठिकाणी आणि रोज एकच ठराविक वेळ नसते. तसेच पहाटेची (फजर) आणि संध्याकाळची (मगरीब) या दोन नमाजांसाठी खूप कमी वेळ असतो. त्यामुळे वेळेत नमाज पूर्ण करण्यासाठी अजान हा सोयीस्कर मार्ग पडतो.
    तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की अजानसाठीकाही अ‍ॅप किंवा बल्क एसएमएस यांचा वापर होऊ शकतो का?
उत्तर-    खरे पाहता, असे अ‍ॅप मोबाईलवर आलेले आहेत. पण जरा विचार करा, प्रत्येक मुस्लिम बांधवाने जर असे अ‍ॅप मोबाईलवर ठेवले तर एकाच वेळी किती अजान सुरू होतील! वर्दळीच्या ठिकाणी, शाळा, दवाखाने, महानगरपालिका, बसस्टॉप, रेल्वे स्टेशन या व अशा अनेक ठिकाणी एवढे मोबाईल वाजणे सुरू होतील की तो एक मोठा प्रश्न होऊन बसेल! त्यापेक्षा मस्जिदीमध्ये एकच मुअजिन (अजान देणारा) जर अजान देतो तर ते जास्त सहज व परिणामकारक ठरते.
    अजानव्यतिरिक्त इस्लाममध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना लाऊडस्पीकरची गरज आहे?
उत्तर-    कोणतीच नाही. कोणतीही प्रार्थना, प्रवचन इथपर्यंत की लग्नांमध्ये आणि वलिमांमध्येदेखील लाऊडस्पीकरची गरज नसते.
    इस्लाममध्ये असे कोणते उत्सव आहेत का ज्यामुळे ध्वनिप्रदूषण किंवा इतर प्रकारचे प्रदूषण होऊ शकते?
उत्तर-    नाही. इस्लाममध्ये फक्त दोनच उत्सव साजरे होतात जे कोणतेही प्रदूषण पसरवित नाहीत. (१) रमजान ईद- यात फक्त प्रार्थना व दानधर्म केला जातो. (२) बकरी ईद- यातसुद्धा मांस हे गरिबांपर्यंत पोहचवून त्यांची भूक भागविली जाते. फटाके वाजवून ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण केले जात नाही किंवा इतर कसल्याही प्रकारचा गाजावाजा केला जात नाही.
    अजानचा कालावधी खरेच इतका जास्त असतो का?
उत्तर-    अजानच्या वेळेचे मूल्यमापन- एक अजान- दीड ते दोन मिनिटे. पाच वेळची अजान- आठ ते दहा मिनिटे. म्हणजे एका दिवसात फक्त १० मिनिटे.
    याचाच अर्थ इतर ध्वनिप्रदूषणांच्या कारणांशी अजानची तुलना केल्यास अतिशय अल्प प्रमाणात म्हणजेच दिवसातून फक्त दहा मिनिटेच अजानचा आवाज ऐकू येतो.
    सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इतक्या वर्षांत त्रासदायक न वाटणारी अजान आजच का त्रासदायक वाटू लागली?
उत्तर-    कारण अजान व संपूर्ण मुस्लिम समाजाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनच बदलविण्यात आला आहे. मतपेटीच्या राजकारणामुळे एका समाजाबद्दल तिरस्काराची भावना पेरण्यात आली आहे आणि म्हणूनच इतकी वर्षे त्रास न देणारी अजान आज अचानक त्रासदायक वाटू लागली. ज्या नेत्यांना समाजातील दारू, बलात्कार, भ्रष्टाचार, नशा, मॉब लिंचिंग, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महागाई, दलितांवर होणारे अत्याचार इ. भयानक घटनांपेक्षा अजानचा आवाज जास्त क्रूर वाटतो. त्यांच्या हेतूंबद्दल हास्यास्पद शंका येणे साहजिक आहे.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget