(२१) लोकांची स्थिती अशी आहे की संकटानंतर जेव्हा आम्ही त्यांना कृपेचा स्वाद चाखवितो तेव्हा ते लगेच आमच्या संकेतांच्या बाबतीत क्ऌप्त्या सुरू करतात.२९ यांना सांगा, ‘‘अल्लाह आपल्या चालीत तुमच्यापेक्षा अधिक चपळ आहे, त्याचे फरिश्ते तुमच्या सर्व कुटिलतेची नोंद करीत आहेत.’’३०
(२२) तो अल्लाहच आहे जो तुम्हाला खुष्की व पाण्यावर चालवितो. तद्वतच जेव्हा तुम्ही नौकेत स्वार होऊन अनुकूल वाऱ्यात आनंदी व उल्हसित प्रवास करीत असता आणि मग अकस्मात प्रतिकूल वाऱ्याचा जोर वाढतो आणि सर्व बाजूंनी लाटांचा मारा बसू लागतो आणि प्रवाशांना कळून चुकते की आपण वादळांत वेढले गेलो. त्याप्रसंगी सर्वजण अल्लाहसाठीच आपल्या धर्माला निर्भेळ करून अल्लाहजवळ प्रार्थना करतात, ‘‘जर तू आम्हाला या संकटातून तारलेस तर आम्ही कृतज्ञ दास बनू.’’३१
(२३) परंतु जेव्हा तो त्यांना वाचवितो तर तेव्हा तेच लोक सत्यापासून विमुख होऊन पृथ्वीतलावर बंड करू लागतात, लोकहो! तुमचे हे बंड तुमच्याचविरूद्ध होत आहे.
(२४) या जगातील जीवनाची काही दिवसाची मौजमजा आहे (लुटून घ्या) नंतर आमच्याकडे तुम्हाला परत यावयाचे आहे, त्या वेळी आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की तुम्ही काय काय करीत होता. जगातील हे जीवन (ज्याच्या नशेत मस्त होऊन तुम्ही आमच्या संकेतांकडे दुर्लक्ष करीत आहात) याचे उदाहरण असे आहे की जसे आकाशांतून आम्ही पाण्याचा वर्षाव केला तर जमिनीचे पीक जे माणसे व जनावरे सर्वजण खात असतात खूप घनदाट झाले. मग ऐन वेळी जेव्हा जमीन अत्यंत बहरलेली होती आणि शेते नटून थटून उभी होती आणि त्यांचे मालक अशा कल्पनेत होते की आम्ही आता याचा उपभोग घेण्यास समर्थ आहोत, अकस्मात रात्री किंवा दिवसा आमची आज्ञा आली आणि आम्ही तिला असे नष्ट करून टाकले जणूकाही काल तेथे काहीच नव्हते. अशाप्रकारे आम्ही संकेत उघड करून करून दाखवितो त्या लोकांसाठी जे विचार करणारे आहेत.
(२५) (तुम्ही या नश्वर जीवनाच्या मोहपाशात पडला आहात) आणि अल्लाह तुम्हाला शांतिभुवन (दारुस्सलाम) कडे आमंत्रित करीत आहे.३२ (मार्गदर्शन त्याच्या अधिकारात आहे) तो ज्याला इच्छितो त्याला सरळमार्ग दाखवितो.
(२६) ज्या लोकांनी भलाईची पद्धत अंगीकारली त्यांच्यासाठी भले आहे आणि आणखीन कृपादेखील३३ व त्यांच्या मुखावर काळिमा व मानहानी पसरणार नाही, ते स्वर्गासाठी पात्र आहेत, जेथे ते सदैव राहतील.
(२७) आणि ज्या लोकांनी दुष्कर्म प्राप्त केले त्यांचे जसे दुष्कर्म असेल तसाच त्यांना मोबदला मिळेल.३४ मानहानी त्यांच्यावर पसरली असेल अल्लाहपासून त्यांना कोणीही वाचविणारा असणार नाही. त्यांच्या चेहऱ्यांवर असा काळिमा पसरला असेल३५ जणू रात्रीचे कृष्णपटल त्यांच्यावर पडले असतील. ते नरकाला पात्र आहेत जेथे ते सदैव राहतील.
(२८) ज्या दिवशी आम्ही त्या सर्वांना (आपल्या न्यायालयात) एकत्र जमा करू, मग त्या लोकांना ज्यांनी अनेकेश्वरत्वाचा अंगीकार केला - सांगू, थांबा तुम्ही आणि तुमचे ठरविलेले भागीदारदेखील, मग आम्ही त्यांच्यामधील अनोळखीपणाचा पडदा दूर करू३६ आणि त्यांचे भागीदार म्हणतील, ‘‘तुम्ही आमची भक्ती तर करीत नव्हता.
(२९) आमच्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाहची ग्वाही पुरेशी आहे की (तुम्ही आमची भक्ती करीत असाल तरी) आम्ही तुमच्या त्या भक्तीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होतो.’’३७
(३०) त्या वेळी प्रत्येकजण आपल्या कर्माची फळे चाखील, सर्वजण आपल्या खऱ्या स्वामीकडे परतविले जातील आणि ते सर्व असत्य जे त्यांनी रचले होते हरवतील.
(३१) यांना विचारा, कोण तुम्हाला आकाश व पृथ्वीतून उपजीविका देतो? या ऐकण्याच्या व पाहण्याच्या शक्ती कोणाच्या अधिकारात आहेत? कोण निर्जीवांमधून सजीव आणि सजीवांमधून निर्जीव काढतो? कोण या विश्वव्यवस्थेची उपाययोजना करीत आहे? ते अवश्य म्हणतील की अल्लाह. सांगा, मग तुम्ही (वास्तविकते विरूद्ध चालण्यापासून) परायण का राहात नाही? (३२) तेव्हा हाच अल्लाह तुमचा खरा पालनकर्ता आहे.३८ मग सत्यानंतर पथभ्रष्टतेशिवाय आणखी काय उरले आहे? शेवटी तुम्ही कोठे भरकटविले जात आहात?३९
२९) हा त्याच दुष्काळाकडे संकेत आहे ज्याचा उल्लेख आयत क्र. ११-१२ मध्ये आलेला आहे. म्हणजे तुम्ही निशाणीसाठी मागणी कोणत्या तोंडाने करत आहात. आता जो दुष्काळ नुकताच पडला होता, त्यात तुम्ही तुमच्या त्या उपास्यांकडून निराश झाला होता, ज्यांना अल्लाहजवळ तुम्ही सिफारस करणारे बनवून ठेवले होते, तसेच अमुक वेदी आणि दरगाहवर नियाज आणि नजराने दिल्याने तुमची मनोकामना पूर्ण होत होती असे तुमचे म्हणणे होते, आता या दुष्काळात तुम्ही पाहून घेतले की तुमच्या या उपास्यांच्या (ईश्वरांच्या) हातात काहीच नाही. आणि सर्व अधिकारांचा स्वामी अल्लाहच आहे, म्हणूनच शेवटी तुम्ही अल्लाहचाच धावा केला होता. काय तुमच्यासाठी ही निशाणी पर्याप्त् नाही? पैगंबर मुहम्मद (स.) यांची शिकवण सत्य आहे यावर तुमचा विश्वास बसला असता? परंतु या उघड निशाणीला पाहून व अनुभव घेऊन तुम्ही काय साध्य केले? दुष्काळ जेव्हा नष्ट झाला आणि अल्लाहच्या कृपेचा वर्षाव होऊ लागला तेव्हा तुमच्यावरील संकट टळले. या संकटाचे येणे आणि संकटाचे टळणे याविषयी अनेकानेक बहाणे तुम्ही केले जेणेकरून तुम्हाला एकेश्वरत्वापासून दूर राहाता यावे आणि अनेकेश्वरत्वावर तुम्ही दृढ व्हावेत. आता ज्यांनी आपल्या अंतरात्म्याला इतक्या स्तरापर्यंत खराब केले आहे, त्यांना शेवटी कोणती निशाणी दाखविली जावी? आणि ती दाखविण्याचा काय फायदा?
३०) अल्लाहची चाल म्हणजे तुम्ही सत्याला मानत नाही आणि सत्यानुसार आपले जीवन व्यतीत करीत नाही तर अल्लाह तुम्हाला या विद्रोहपूर्ण रीतीवर चालण्याची सूट देत राहातो. तुम्हाला जीवनात उपजीविका देत राहील ज्यामुळे तुम्ही जीवनात मस्ती करू लागाल. तुमची ही कुकृत्ये अल्लाहचे दोन दूत लिहून ठेवतील. शेवटी अचानक मृत्यूघटिका येईल आणि आपल्या कर्मांचा हिशेब देण्यासाठी तुम्ही पकडले जाल.
३१) एकेश्वरत्व सत्यावर असण्याची निशाणी प्रत्येक मनुष्याच्या मनात आहे. जोपर्यंत परिस्थिती व संसाधन अनुकूल असतात तोपर्यंत मनुष्याला अल्लाहचा विसर पडतो आणि ऐहिक जीवनात तो मस्त व मग्न होतो. जेथे संसाधनांनी आणि ऐहिक सुखांनी मनुष्याची साथ सोडली तेव्हा तर कट्टर नास्तिक आणि अनेकेश्वरवाद्यांच्या मनात एकेश्वरत्वाची कल्पना जागू लागते. त्याला जाणवते की सृष्टीत सर्वशक्तिमान व प्रभावशाली अल्लाह आहे. (पाहा- सूरह ६, टीप २९)
३२) म्हणजे जगात त्या जीवनव्यवस्थेकडे बोलावित आहे ज्यामुळे परलोक साफल्य प्राप्त् होणार आहे व दारुस्सलाम प्राप्त् होणार आहे. दारुस्सलाम म्हणजे जन्नत आणि त्याचा अर्थ होतो 'शांतिभुवन' जेथे काहीच कष्ट, दु:ख आणि विपदा नसणार.
३३) म्हणजे त्यांना केवळ त्यांच्या नेकीनुसार तेवढाच मोबदला मिळणार नाही तर अल्लाह आपल्या कृपेने त्यांना आणखीन पुरस्कार प्रदान करील.
३४) म्हणजे सदाचारींच्या विपरीत दुराचारींना त्यांच्या दुराचारांइतकीच शिक्षा मिळेल. अपराधापेक्षा जास्त शिक्षा दिली जाणार नाही.
३५) तो काळोख जो अपराधींना पकडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर पडतो आणि बचावापासून निराश झाल्यावर पडतो.
३६) अरबीत 'फजय्यलना बैनहुम' वाक्य वापरले आहे. याचा अर्थ काही भाष्यकारांनी ''आम्ही यांचा आपापसातील संबंध तोडून टाकू जेणेकरून या संबंधाच्या आधारे ते एक दुसऱ्याकडे लक्ष देणार नाहीत.'' परंतु हा अर्थ अरबी म्हणीनुसार योग्य नाही. याचा खरा अर्थ, 'आम्ही त्यांच्यामध्ये अंतर निर्माण करू आणि ते एक-दुसऱ्यापासून वेगळे ओळखले जातील.' याच अर्थाला दाखविण्यासाठी आम्ही 'यांच्यामधून अनोळखीपणाचा पडदा हटवून देऊ' अशी वर्णनशैली वापरली आहे. म्हणजे अनेकेश्वरवादी आणि त्यांचे उपास्य समोरासमोर उभे राहतील आणि दोघांच्या ओळखीसाठीची योग्यता एक-दुसऱ्यांना कळून चुकेल. अनेकेश्वरवादीनी जगात ज्यांना उपास्य बनवून होते, त्यांना ओळखतील. तसेच त्यांचे उपास्य जगात त्यांना ज्या लोकांनी उपास्य बनविले होते, त्यांना ओळखतील.
३७) म्हणजे ते सर्व देवदूत ज्यांना जगात देवी आणि देवता बनवून पुजले गेले आणि ते सर्व जिन्न, आत्मा, पूर्वज, बापदादा, पैगंबर, वली, शहीद ज्यांना ईशगुणांत भागीदार ठरवून ते अधिकार त्यांना देण्यात आले जे अधिकार अल्लाहचेच होते. हे सर्व उपास्य तिथे आपल्या भक्तांशी, पुजाऱ्यांशी म्हणतील, ''आम्हाला खबर नव्हती की तुम्ही आमची भक्ती करीत होता, तुमची एखादी प्रार्थना, धावा, नैवेद्य, नियाज तसेच तुम्ही केलेली प्रशंसा, जप, तुम्ही आम्हापुढे नतमस्तक होणे, आमच्या समाधीस्थळाला आलिंगन देणे तसेच दरग्यांना प्रदक्षिणा घालणे आमच्यापर्यंत कधीही पोहचले नाही.''
३८) म्हणजे ही सर्व कामे अल्लाहची आहेत, जसे तुम्ही स्वयम् मान्य करता. मग तर तुमचा खरा पालनकर्ता, स्वामी आणि तुमच्या उपासनेचा व भक्तीचा हक्कदार अल्लाहच आहे. हे दुसरे ज्यांचा या कामांत अजिबात हिस्सा नाही, शेवटी हे तुमचे कसे पालनकर्ते बनलेत?
३९) लक्षात ठेवा की संबोधन सामान्य लोकांशी आहे, त्यांच्याशी हा प्रश्न विचारला जात नाही की तुम्ही कोठे भरकटले जात आहात? तर ''तुम्ही कोठे भरकटविले (वळविले) जात आहात?'' असा प्रश्न विचारला जात आहे. याने स्पष्ट होते की कोणी एखादा मार्गभ्रष्ट करणारा मनुष्य किंवा गट आहे जो लोकांना सत्य मार्गावरून हटवून चुकीच्या मार्गावर चालवत आहे. म्हणून लोकांशी अपील केली जात आहे की तुम्ही आंधळे बनून चुकीचा मार्ग दाखविणाऱ्यांच्या मागे का जात आहात? आपल्या बुद्धीचा वापर करून विचार का करीत नाही की जेव्हा वस्तुस्थिती अशी आहे तर शेवटी हा तुम्हाला कोठे भरकटवित आहे? कुरआनमध्ये अनेक ठिकाणी अशाप्रकारची प्रश्नरूपी वर्णनशैली वापरली आहे. भ्रष्टमार्गावर चालविणाऱ्याचे नामनिर्देश न करता त्यांना 'कर्मवाच्यशैली'च्या पडद्यामागे लपविले गेले आहे. हेतू आहे की त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांनी गंभीरतापूर्ण विचार करावा. तसेच हे सांगून त्यांना उत्तेजित करण्याची व त्यांचे मानसिक संतुलन बिघडविण्याची कुणालाही संधी मिळू नये की त्यांनी सांगावे, ''पाहा हे तुमच्या देवीदेवतांना, पूर्वजांना आणि नेतेगणांना नावे ठेवत आहेत.'' यात प्रचारकार्याचा एक महत्त्वाचा बिंदू लपलेला आहे ज्यापासून गाफील राहू नये.
Post a Comment