वॉशिंग्टन
अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने सरकार स्थापन केले आहे. आता अमेरिकेने अफगाणिस्तान संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून अमेरिकेने अफगाणिस्तानच्या लोकांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने सांगितले की, ते अफगाणिस्तानला $ ६४ दशलक्ष (सुमारे ४७० कोटी रुपये)ची मानवतावादी मदत देण्यास तयार आहेत. यासह या देशाची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने भविष्यात आणखी मदतीचाही विचार केला जाईल, असे संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉम्पसन-ग्रीनफील्ड यांनी सांगितले.
अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉम्पसन-ग्रीनफील्ड यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘मला ही घोषणा करताना गर्व होतोय, अमेरिका अफगाणिस्तानातील लोकांसाठी नवीन मानवतावादी मदत देत आहे. हा नवीन निधी संयुक्त राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांच्या कार्याला पाठिंबा देणारा असेल. आम्ही इतर देशांनाही मदत करण्याचे आवाहन करतो.’ अमेरिकेखेरीज संयुक्त राष्ट्रांनीदेखील अफगाणिस्तानातील मानवतावादी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी २० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे अनुदान जाहीर केले आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंतोनियो गुतेरेस यांनी सोमवारी अफगाणमध्ये मानवीय अभियानाचे समर्थन करण्यासाठी दोन कोटी अमेरिकी डॉलर्सचे वाटप जाहीर केले. ते म्हणाले की, आता आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे. अफगाणच्या लोकांना अन्न, औषध, आरोग्य सेवा, सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेची नितांत गरज आहे. युद्धग्रस्त देशात लोकांना मदत पोहोचवण्यासाठी सहकार्य करण्याचे चन त्यांनी दिले आहे. ते म्हणाले की, ‘अफगाणिस्तानातील लोकांना एका जीवनरेखेची गरज आहे. अनेक दशकांच्या युद्ध, दुःख आणि असुरक्षिततेनंतर त्यांना कदाचित त्यांच्या आयुष्यातील सर्वात धोकादायक काळाचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने आता त्यांच्या पाठिशी उभे राहून त्यांना चांगले आयुष्य जगण्यासाठी सक्षम करणे गरजेचे आहे. दरम्यान, चीनने २०० दशलक्ष युआन (३१ दशलक्ष डॉलर्स)ची आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती. तसेच न्यूझीलंडचे परराष्ट्र मंत्री नानैया महुता यांनी सोमवारी बोलताना म्हटले की, अफगाणिस्तानला मदतीच्या स्वरुपात ३ दशलक्ष डॉलर्स देण्याची घोषणा करत आहे.
Post a Comment