लेह
लेह-मनाली महामार्गावर बांधण्यात आलेल्या अटल बोगद्यातून जाणाऱ्या वाहनांना आता ‘ग्रीन टॅक्स’ भरावा लागणार आहे. हिमाचल प्रदेशात ९.०२ किलोमीटर लांबीचा हा अत्याधुनिक बोगदा आहे. त्यातून जाणाऱ्या दुचाकीसाठी ५० रुपये, कारसाठी २०० रुपये, एसयूव्हीसाठी ३०० रुपये आणि बस-ट्रकसाठी ५०० रुपये ग्रीन टॅक्स म्हणून भरावे लागणार आहेत. दैनंदिन कामासाठी प्रवास करणाऱ्या वाहनांना कर भरावा लागणार नाही. मात्र त्यासाठी त्यांना विशेष पास घ्यावा लागणार आहे.
अटल बोगद्यातून प्रवास करणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांना, लाहौल, किश्तवाड आणि पंगी येथून जाणाऱ्या वाहनांनाही ग्रीन कर भरावा लागणार आहे. लाहौल येथील ग्रीन टॅक्स विशेष क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून हा ग्रीन कर गोळा केला जाणार आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशातून पर्यटकांसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. याशिवाय या परिसरातील गावांचाही विकास केला जाणार आहे. अटल बोगदा सुरू झाल्यापासून येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. १० हजार फूट उंचीवरील हा बोगदा सर्वात लांब बोगदा आहे. तो खुला झाल्यापासून मनाली आणि लेहमधील अंतर ४६ किलोमीटरने कमी झाले आहे. हे अंतर कापण्यासाठी पूर्वी ४ ते ५ तास लागत होते. हा वेळ आता बोगद्यामुळे वाचला आहे.
Post a Comment