सत्तेचा मोह आवरता येत नाही आणि सत्तेशिवाय क्षणभरही राहवत नाही अशी अवस्था झाल्यावर राजकीय पक्षाचे वर्तन कसे होते हे भाजपाच्या सद्यस्थितीकडे पाहिल्यावर आपसुकच लक्षात येते. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून भारतीय जनता पक्षाची मळमळ अधिकच वाढलेली आहे. काहीही करुन राज्यातील महायुतीचे सरकार कसे पायउतार करता येईल यासाठी वेगवेगळी व्युहरचना भारतीय जनता पक्ष आखतो आहे. महाराष्ट्रात सुदैवाने ही व्युहरचना यशस्वी होत नसल्याने भाजपाने आपल्या जुन्या भात्यातील मंदीरांचा हुकमी एक्का चालवण्याचा प्रयत्न चालवला आहे. धार्मीकतेचे राजकारण हा भाजपाचा पिंडच आहे. - (उर्वरित पान 7 वर)
दोन खासदार ते पूर्ण बहुमत या यशात राम मंदीर आंदोलनाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे मंदीरांचा लढा सर्वसामान्यांच्या प्रश्नापेक्षाही भाजपासाठी नेहमीच महत्त्वाचा राहीलेला आहे. तुर्तास राज्यातील मंदीरे भाविकांसाठी सताड उघडी करा अशी आर्ततेची हाक देऊन भाजपाने शंखानाद आंदोलन सुरू केले आहे. ह्या आधीही असेच आंदोलन वंचीत बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वावाखाली पंढरपुरात केलेले होते. तसे प्रकाश आंबेडकरांचे राजकारण हे अलीकडच्या काळात फार गांभीर्याने घ्यावे असे राहीलेले नाही. नेहमीच संदिग्ध भूमीका घेत. नवनवे अयशस्वी प्रयोग करण्यापलीकडे प्रकाश आंबेडकरांच्या हातून फारसे काहीही घडलेले नाही.आणि आता वंचितचा नवा प्रयोग महाराष्ट्रात बाळसे धरेल अशी शक्यता नाही तेव्हा काहीतरी करायचे म्हणून अशी आंदोलने हाती घेणे कितपत योग्य हे ह्या नेत्यांनी एकदा तरी आत्मपरीक्षण करून ठरवावे. ज्या सार्वत्रिक अवकाशात प्रकाश आंबेडकर राजकारण करू पहात आहेत तो अवकाश कधीही महाराष्ट्रात तयार होऊ शकत नाही.असो तर भाजपाचेही हे आंदोलन असंवेदनशीलतेचे लक्षण आहे.
देशभरात दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रकोप महाराष्ट्रात पहायला मिळाला. दरदिवशी ऑक्सीजनविना, बेडविना ,वेळेत औषधोपचार न मिळाल्यामुळे कित्येक नागरीक मरणसुन्न अवस्थेत असताना लोकांसाठी रस्त्यावर यायला हवे असे एकदाही भाजपाला वाटले नाही. दुसरी लाट प्रचंड मानवी हानी करून गेल्यानंतर मात्र हे नेते हळूहळू आपल्या कंपूतुन बाहेर येत आपले अपयश झाकण्यासाठी असे क्षुल्लक विषय घेऊन रस्त्यावर येत आहेत.लोकहितासाठी राजकारण ही कुठल्याही पक्षाची राजकीय भूमिका राहीलेली नाही. एकीकडे इंधन दरवाढीने कळस गाठलेला आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे, रोजगार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा विकणाऱ्याचा प्रतिनिधी म्हणवून घेत सत्ताधारी झाल्यावर चहावाल्या वर्गाच्या हिताची धोरणे आखण्याऐवजी सर्वसामान्य लोकांचे जगणे दरदिवशी कसे अधीक जटील होईल आणि संघाचे राजकीय धोरण कसे यशस्वी होईल हेच पहात आहेत. एकीकडे देशातील सर्वसामान्य लोक उपचारासाठी तडफडत असताना हा लोकसेवक पश्चिम बंगाल निवडणुक घेत होता तेव्हा कोरोनापेक्षाही पक्षीय हित ह्या महाशयांना महत्वाचे वाटत होते.बंगाली जनतेने सपाटून पराभव केल्यानंतर महाराष्ट्रात कसे करून राज्य सरकार खिळखिळे करता येईल यासाठी नवनव्या चौकश्याचे फास मंत्र्यांच्या पाठीमागे लावण्यात आले.भाजपा काही धुतल्या तांदळाऐवढी स्वच्छ नाही. अर्ध्याहून अधिक भ्रष्टाचारी नेत्यांचा भरणा इतर पक्षातून पार्टी विथ डिफरन्स म्हणवून घेणाऱ्या पक्षात झालेला आहे.
नारायण राणे, रामदास आठवले यासारखे नेते केवळ सत्तेसाठी लाचार होऊन भाजपात सामील झालेले आहेत! कोवीड काळात राणेनी लोकासांठी जन आशीर्वाद यात्रा हाती घेतली असती तर लोकांनाही राणेविषयी ममत्व वाटले असते. तसे न होता भाजपाने आपले राजकारण विस्तारण्याच्या धोरणातून त्यांना मंत्रीपद दिल्यानंतर राणेंना जन आशीर्वादाचे वेध लागले आणि त्या मोहातच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एकेरी भाषेत संबोधण्याचे शहाणपण राणेंना सुचले.राणेची शिवसेनेवरील रागाची भावना असेल हे समजू शकतो पण उध्दव ठाकरे हे शिवसेना प्रमुख असले तरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.त्या पदाचा सन्मान तरी राखावा एवढेही शहाणपण माजी मुख्यमंत्र्यांना नसेल तर असे नेते लोकहित काय साधतील ह्याचा विचार न केलेला बरा. तेव्हा राज्यातील भाजपाचे वर्तन हे लोकांना पटलेले नाही.काँग्रेस सत्तेत असताना एक रूपयाची वाढ झाली तरी लाटणे मोर्चा काढणारी भाजपा आता मात्र सोयीस्करपणे मुग गिळून गप्प आहे.
नेहमीच स्वच्छ राजकारणाचा आग्रह धरणारा हा पक्ष आम्हाला बहुमत जनतेने दिलेले आहे. महायुतीचे सरकार हे जनतेचे सरकार नाही अशी बतावणी करताना गोव्यात आणि मध्यप्रदेशात बहुमत नसतानाही कसे सत्ताधारी बनले हे सोयीस्करपणे विसरतो. एवढेच कशाला ज्या देवेंद्र फडणवीसांनी विरोधी बाकावर असताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे देईन अशी घोषणा करून यातील दोषींवर आमचे सरकार सत्तेत आल्यावर कार्यवाही करू असे महाराष्ट्रातील जनतेला आश्वासन दिलेले होते.त्याचे पुढे काय झाले केवळ सत्तेसाठी त्याच अजीत पवार सोबत तुम्ही महाराष्ट्रातील जनता साखर झोपेत असताना पहाटेचा शपथविधी करायला मागेपुढे पाहिलेले नाहीत तेव्हा आम्ही सत्तेसाठी लाचार नाही हे म्हणणे भाजपाचे हास्यास्पद आणि दुटप्पीपणाचे आहे.अगदी कोवीड काळात केंद्र सरकार राज्यासोबत दुजाभाव करीत होते.एकीकडे लोकांना राष्ट्रभक्तीचे डोस द्यायचे आणि आपल्याच देशातील राज्याराज्यांमधील नागरीकांत भेदभाव करायचा हे आता लपून राहीलेले नाही. मी देश विकू देणार नाही म्हणवणारा पंतप्रधान खाजगीकरणाच्या नावाखाली संपूर्ण देशच मोजक्या उद्योगपतींच्या घशात घालतो आहे. अदानी,अंबानी आणि इतर उद्योगपतींना मुक्तसवलती द्यायच्या, बँका लुटणाऱ्या महाभागांना राजकीय संरक्षण द्यायचे आणि पुन्हा देशभक्तीचा शंखनाद करायचा हे ढोंगी राजकारण भारत देशाला दिवसेंदिवस रसातळाला नेत आहे.अर्थव्यवस्थेने तळ गाठलेला आहे, रिझर्व्ह बँकेचा संरक्षित ठेवी सरकार अलगद घशात घालत आहे, अर्थमंत्री केवळ सुधारणांचा पाढा वाचवून सर्वाधीक काळ भाषण केल्याचा इतिहास संसदेत रचत आहेत, लोक हवालदिल झालेले आहेत तरीही प्रधानसेवक भारत देश प्रगतीपथावर आहे हे लाल किल्याच्या प्राचीरवरुन छातीठोकपणे सांगतो आहे हे अस्वस्थ करणारे आहे.भाजपाने सत्तेत आल्यावर देशातील जनतेला काय दिले याचा थोडासा आढावा घेतल्यास काय दिसते तर धार्मीक दहशतीच्या जोरावर अल्पसंख्याक समाजाचे शिरकाण, गोहत्या आणि तत्सम धोरणातून शेतकरी आणि दलित यांची होणारी अमानुष पिळवणूक, गोहत्याबंदीमुळे भाकड जनावरे पोसण्यासाठीची अधिक तजवीज आणि अशी जनावरे पोसणे शक्य न झाल्यावर मोकळे सोडल्यामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी करावी लागणारी अधिकची कसरत, वस्तु व सेवा कर आणि विमुद्रीकरणामुळे वाढलेली महागाई, राम मंदीर निवाडा आणि भाजपाच्या दहशतीने स्तब्ध होऊन मुके झालेले मुस्लीम, न्यायव्यवस्थेतील घटनात्मक चौकटीत हस्तक्षेप करून तिचे स्वतंत्र अस्तित्व संपुष्टात आल्याने भाजपाला अनुकुल असलेले निवाडे देण्याइतपत न्यायव्यवस्थेने दाखवलेली तत्परता व त्यातुन उभी टाकलेली न्यायाधिशांची ऐतिहासिक पत्रकार परीषद, माध्यमांना अंकीत करून त्याद्वारे होणारे चुकीचे वार्तांकण, एकीकडे रुग्णालयांना सुविधा देण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याची बतावणी करायची दुसरीकडे संसदेचे बांधकाम करायला निधी उभारायचा हे सर्व लक्षात घेतल्यावर भाजपाने जे राजकारण आजवर केले त्यातून तिळमात्र देशहित साधलेले नाही! त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपा आंदोलनाचे लोकहित किती हे तपासावे लागेल. सरकार कुठल्या पक्षाचे सत्तेत आहे यापेक्षाही ते कितपत लोकहित साधते हे पहाणे महत्वाचे असते.लोकशाहीत कुठलाही अमूक एक पक्ष कायमच सत्ताधारी राहत नाही.आजचा विरोधी पक्ष उद्या सत्ताधारी होतो तेव्हा सत्तेसाठी कितपत हपापायचे याचाही विचार राजकीय पक्षांनी करायला हवा. सुसंस्कृत पुरोगामी म्हणवल्या गेलेल्या राज्यात अगदीच हिनपातळीवर राजकारण जाउन पोहचलेले आहे.धार्मीक दरी वाढुन जातीय अस्मीता टोकदार बनत आहेत.कधी नव्हे इतकी धार्मीक कट्टरता वाढीस लागत आहे यात सर्वच राजकीय पक्षांचा हातभार आहे.कधी नव्हे इतके जातीचे मोर्चे पहिल्यांदाच महाराष्ट्रात निघाले, बेरोजगार तरूण हवालदिल झालेले आहेत, महिला-बालके यांची सुरक्षितता ऐरणीवर आलेली असताना मंदीरे उघडण्यासाठी आंदोलने हाती घेणारे राजकीय पक्ष संधीसाधू आणि धुर्त असतात ते कदापी जनतेने विसरू नये. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील राजकारण हे केवळ स्वार्थी आणि एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी होत आहे त्यातून तिळमात्रही महाराष्ट्राचे हित जपले जात नाही. एकेकाळी दिल्लीसाठी पर्यायाने संपूर्ण देशासाठी एकदिलाने लढलेला महाराष्ट्र एकविसाव्या शतकात मात्र आपली ही परंपरा विसरताना दिसतो आहे. मनसे सारखे पक्षही आता या आंदोलनात उडी घेऊन आपला राजकीय दबाव वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.शिवसेना कधीही लोकशाही राजकारण करू शकत नाही.रस्त्यावरील आंदोलनातून शिवसेनेचा जन्म झाला असला तरी हा पक्ष आता लोकशाही रूजवून त्यातून काही लोकहित साधताना पहातो आहे. मुख्यमंत्री संयमी आहेत. त्यांनी कोरोनाकाळात जेमतेम कामगिरी कुठलाच अनुभव नसताना पार पाडली. राहीला प्रश्न काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाचा .त्यांनी रूजवलेल्या अनेक चुकीच्या असंसदीय पध्दतीमुळे आणि केलेल्या अनेक चुकांमुळे देशात भाजपाला सत्ताधारी बनने सोपे झाले.तेव्हा नवा राजकीय पर्याय नसल्याने लोक सबका साथ सबका विकास या फसव्या घोषणेला बळी पडले . तेव्हा आगामी काळात राजकारणाला गांभीर्याने घेणे गरजेचे झालेले आहे ते घेतानाच दहीहंडी सारखे सण साजरे करा, मंदीरे उघडा यासाठी आंदोलने करणारे आजचे पक्ष मुलांची शाळा सुरू करा, लोकांना आरोग्य, शिक्षण, रोजगार उपलब्ध करून द्या म्हणून ज्या दिवशी आंदोलने हाती घेतील तो दिवस महाराष्ट्रासाठी सुदीन म्हणावा लागेल.
- हर्षवर्धन घाटे
मो. - 9823146648
(लेखक सामाजीक राजकीय प्रश्नांचे अभ्यासक व विश्लेषक आहेत)
Post a Comment