देशाला गेल्या दिड दोन वर्षांत कोरोना महामारीने ग्रासले आहे. महाभयंकर अशा संकटांचा सामना करताना देशवासीयांचा जीव मेटाकुटीला आला आहे. विशेष म्हणजे देशांवर आलेल्या या संकटाला परतावून लावण्यासाठी कोरोनाप्रतिबंधक लसीचे उत्पादन झपाट्याने करणे हे मोठे आव्हान होते, मात्र आपल्या देशाने हे आव्हान स्वीकारले आणि लसीकरणाची मोहीम हाती घेतली,ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.
महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचा एक कोटींचा टप्पा ओलांडला आहे. राज्यातील एकूण प्रौढ लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण जेमतेम बारा टक्के आहे; उर्वरित 88 टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. शासनाने शक्य तितक्या लवकर ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, लसीकरणाचा वेग वाढवायला हवा.लसीकरण हाच कोरोनावर एकमेव उपाय असल्याने अनेक देशांनी लसीकरण मोहीमेला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. शिवाय अमेरिकेसारख्या देशात आता १०० टक्के लसीकरण झाल्यामुळे त्यांनी लाॅकडाऊन उठवले आहे, मास्क वापरण्याचे आत्ता तिथे बंधनकारक नाही. आपल्या देशात ही लसीकरणाबाबत जास्तीत जास्त जनजागृती करणे गरजचे आहे. देशात अकरा टक्के जनतेचे पूर्ण लसीकरण झाले असून, 37 टक्के जनतेला लशीचा एक डोस मिळाला आहे. महाराष्ट्रातील प्रमाणही साधारणत: असेच, म्हणजे दोन्ही डोस पूर्ण झालेल्यांचे प्रमाण केवळ बारा टक्के, तर एक डोस घेतलेल्यांचे प्रमाण केवळ 25 टक्के आहे. उत्तर प्रदेशात 4.25 कोटी लोकांचे लसीकरण झाले असले, तरी तिथे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या 73 लाख आहे; त्यामुळे पूर्ण लसीकरणाचा एक कोटीचा टप्पा पार करणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले असून, एकूण 4.17 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लोकसंख्येच्या तुलनेत लसीकरणाच्या प्रमाणात हिमाचल प्रदेशने आघाडी घेतलेली दिसते. तिथे 21.1 टक्के लोकांना दोन्ही डोस, तर 67.7 टक्के लोकांना एक डोस देण्यात आला आहे. बिहारमध्ये हे प्रमाण सर्वांत कमी, म्हणजे अनुक्रमे 4.6 टक्के आणि 25.4 टक्के आहे. देशातील प्रौढांच्या पूर्ण लसीकरणापासून आपण किती दूर आहोत, हे या सर्व आकडेवारीवरून स्पष्ट होते. लशींची उपलब्धता पाहता या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्वांचे लसीकरण होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. जुलै महिन्यात देशात 13.5 कोटी जनतेला लस देण्याचे उद्दिष्ट होते; परंतु या जुलै महिन्यात आतापर्यंत दहा कोटी जनतेचेच लसीकरण झाले आहे, जुलै महिन्यातील उद्दीष्ट अपेक्षित वेग न वाढविल्यामुळे उद्दिष्टपूर्ती होऊ शकली नाही. जुलैमधील उद्दिष्ट पुर्तीसाठी दररोज साठ लाख लोकांचे लसीकरण होणे गरजेचे होते; परंतु संपूर्ण महिन्यात केवळ दोनदाच एवढ्या संख्येने लसीकरण झाले आहे. लसीकरणानंतरही कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असली, तरी जीवितहानी सहसा होत नसल्याने, लस घेणे हाच सध्या पर्याय आहे. परंतु राज्यात सध्या लसीकरणात अनेक अडथळे दिसत आहेत. कुठे लशींचा साठा अपुरा आहे तर कुठे नागरिकांचा प्रतिसाद कमी आहे. जिथे नागरिकांचा प्रतिसाद आहे तिथे लस नाही आणि जिथे लस आहे तिथे नागरिकांचा अल्प प्रतिसाद... यास ऑनलाईन नोंदणीची अडचण किंवा गैरसमज यामुळे अनेक नागरिक लसीकरण केंद्रावर येतच नाहीत. लसीकरण वेगवान करण्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे लसींचा अपुरा पुरवठा हीच आहे. योग्य वेळी योग्य प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास लसीकरणाचा वेग निश्चितच वाढू शकतो. राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून तिसर्या लाटेचा धोका अद्यापही कायम आहे, असे सांगितले जाते. त्यामुळेच तर अजूनही राज्यातील बर्याच ठिकाणी कोरोनाचे निर्बंध कायम आहेत. ग्रामीण भागात लसीकरणाबाबत जनजागृतीही मोठ्या प्रमाणावर होणे गरजेचे आहे. ऑगस्टपासून 12 ते 18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याची केंद्र सरकारची योजना असली तरी ऑगस्टची १५ तारीख झाली तरी घोषणेप्रमाणे योजना कार्यान्वित झालेली नाही, १२ते१८ वयोगटातीलकोरोना प्रतिबंधक मुलांच्या लसीकरणाची मोहीम ही उपायाचा पुढचा टप्पा गाठणारी असली आणि यामुळे शाळा सुरू होण्याचा मार्ग खुला होणार असला, तरी लशींच्या उपलब्धतेवरच योजनेचे यशापयश ठरणारे आहे. आरोग्य कर्मचारी, कोरोना लढ्यामधील कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, 45 वर्षांपुढील नागरिक आणि त्यानंतर 18 वर्षांपुढील सर्व प्रौढ या क्रमाने केंद्राने लसीकरणाचा विस्तार केला असला, तरी लशींच्या उपलब्धतेचे नियोजन फसल्याने अपेक्षित उद्दिष्ट गाठता आले नाही. जुलैअखेर पन्नास कोटी जनतेला लशीचा किमान एक डोस देण्याचे उद्दिष्ट केंद्राने ठेवले होते; हा महिना संपून ऑगस्ट महिना निम्मा संपला तरी प्रत्यक्षात 44.61 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. 45 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याला मे महिन्यात सुरुवात झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांतच गोंधळ उडाला. लसीकरण केंद्रांवर लांबलचक रांगा आणि तेथे मात्र लसी नाहीत, असे चित्र आरंभी होते. सर्वसामान्यांची अक्षरशः कुतरओढ झाली. मुलांच्या लसीकरणात याची पुनरावृत्ती टाळावी, अन्यथा लसीकरणाचा हा सावळागोंधळ कुर्हाडीचा दांडा गोतास काळ ठरल्याशिवाय राहणार नाही.
- सुनिलकुमार सरनाईक
कोल्हापूर
भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मानित असून आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने ही सन्मानित आहेत.)
Post a Comment