Halloween Costume ideas 2015

आत्मविश्वास

स्वत:विषयी जाणवणारा दृढ विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याचं मनोबल. आत्मविश्वास म्हणजेच जगण्यातला आनंद. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याची ऊर्जा. आत्मविश्वास म्हणजेच जगण्याची उमेद! आणि आत्मविश्वास म्हणजेच जगण्यातलं यश.. आत्मविश्वास मूलत: स्वभावात असतोच; तो बोलण्यातून जाणवत असतो आणि कृतीतून दिसत असतो. खरं तर आत्मविश्वास ही स्वत:च्या विचारांची प्रतिक्रिया असते. विचारांमध्येच आत्मविश्वासाचा स्रोत दडलेला असतो. विचारांमधला दृष्टिकोनच मनोबल वाढवत असतो. त्यामुळे स्वत:कडे, वास्तवाकडे, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन विचारांच्या मांडणीसाठी अधिक महत्वाचा ठरतो. म्हणून प्रत्येक कृतीमागचा विचार आणि दृष्टिकोन महत्वाचा असतो. एकदा एक व्यक्ती म्हणून जगायचं ‘कसं’ आणि ‘का’ ठरलं की, आत्मविश्वास अधिकाधिक वृद्धिंगत होत जातो. 

एखाद्या व्यक्तीकडे आत्मविश्वासाचा अभाव असतो म्हणजे नेमकं काय तर त्या व्यक्तीची विचार करण्याची पद्धत बऱ्याचदा नकारात्मक आणि चुकीची असते. कारण अंतर्मनातल्या भीतीचा परिणाम हा विचारांवर होत असतो. प्रत्येक व्यक्तीकडे उपजतच बुद्धिमत्ता, गुणवत्ता आणि क्षमता असून केवळ आत्मविश्वास गमावल्याने काही व्यक्ती अपयशाच्या बळी ठरत असतात. उदा. ‘मी करू शकेन का?’ ही भीती आणि ‘मी करू शकेन’ हा आत्मविश्वास. आत्मविश्वासामध्ये अशक्य ते शक्य करण्याची प्रचंड शक्ती असते. आत्मविश्वासामध्ये स्वप्न साकार करण्याची स्वयंप्रेरणा असते. एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी, सातत्य आणि प्रयत्नांमधूनच आत्मविश्वास जाणवत असतो. व्यक्तिमत्वाचा विकास करणे अनेकांना अवघड बाब वाटते. परंतु, आपल्या दैनंदिन जीवनात आपण जसे वागतो, विचार करतो तसे आपले व्यक्तिमत्व घडते. समाजातील घटनांचाही आपल्या जीवनावर परिणाम होतो. आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचमुळे आपण कमी पडल्याची भावना मनात निर्माण होते. बऱ्याचदा खूप मेहनत आणि नियोजन करूनही ‘यश मिळालं नाही तर..’, ‘हातून चूक झाली तर..’’,  ‘नीट जमलं नाही तर..’ या नकारात्मक विचारांमुळे मनात भीती आणि गोंधळ सतत वाढत असतो. त्यातून नैराश्य येते. त्यामुळे आत्मविश्वास मिळविण्यासाठी मूलत: योग्य पद्धतीनं आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायला हवा.

आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जेव्हा तुम्ही एखादी क्रिया करता, त्यातून एक वेगळी उर्जा उत्पन्न होत असते. ही उर्जा तुमच्यातील आत्मविश्वासाची असते. हा आत्मविश्वास सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात. आपण आपल्या परिस्थितीकडे पाहून रडत असतो. परंतु, आपण इतरांची परिस्थिती पाहिली तर आपण किती सुखात आहोत याचा आपल्याला अंदाज येईल. खरं आहे हे. 

असेच जेव्हा तुम्हाला आपले दु:ख जास्त असल्याचे जाणवेल त्यावेळी तुम्ही तुमच्यापेक्षा अधिक दु:खी असलेल्या एखाद्या व्यक्तीकडे पहा मग तुम्हाला जाणवेल, की त्यापेक्षा तुम्ही अधिक सुखात आहात. म्हणून आपला आत्मविश्वास गमावू देऊ नका. काही झाले तरी केवळ तुम्ही याच बळावर यश खेचून आणू शकता. तुमचे व्यक्तीमत्व जर सुधारायचे असेल तर आधी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे. आयुष्यात घडणा-या अनेक गोष्टींमुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. याचा परिणाम आपल्या दैनंदिन जीवनात व कामाच्या ठिकाणीही होत असतो. तुमचा आत्मविश्वास तुम्हाला समाजात एक मानाचे स्थान मिळवून देतो. त्यामुळे तुमच्या मनावर झालेला आघात कितीही मोठा असला तरी खालील उपाय करा व तुमचा आत्मविश्वास परत मिळवा. 

१. स्वत:ची स्तुती करा - दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवा. व्यवस्थित परिधान करा आणि अप टू डेट राहण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही कामासाठी सवलत घेऊ नका. पर्फेक्ट माइंडसेटने घराबाहेर पडा. दिवसभरात कोणीही तुमची कश्याबद्दलही स्तुती केली तर आभार माना परंतू गर्व बाळगू नका.

२. काळजी सोडा - चेहऱ्यावर प्रसन्नतेचा भाव व तेजस्वी हास्य असू द्या. आतून द्वंद असेल तरी ते भाव चेह-यावर येता कामा नये. सर्वांना मदत करा. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. मात्र, चुकत असलेल्यांना पाठीशी घालू नका. अधिक कठोर नाही तरी योग्यरीत्या त्याला मार्गदर्शन करा.

३. चांगली संगत निवडा - तुमचा आत्मविश्वास आजूबाजूच्या लोकांवरही अवलंबून असतो. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत रहा. जे लोकं तुम्हाला प्रोत्साहित करत असतील व पडत्या काळात तुमची मदत करत असतील असे लोकं योग्य मार्गदर्शन करतात. ती व्यक्ती कुटुंबातील, मित्र किंवा सहकारी असू शकते.

४. स्वत:साठी वेळ काढा - दिवसभराच्या धावपळीत स्वत:ला काय दिले याचा विचार करा. अर्थात स्वत:ला वेळ द्या. थोड्या वेळासाठी एकांत राहा. स्वत:बद्दल विचार करा. मेडिटेशन करा किंवा स्वत:च्या छंदाला वेळ द्या. मग बघा आपला आत्मविश्वास कसा वाढतो ते.

- सुरेश मंत्री

अंबाजोगाई. 

संपर्क- ९४०३६५०७२२


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget