साऱ्या जगात कोणत्या न कोणत्या देशात धार्मिक राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद यांच्यात संघर्ष चालूच आहे. याचे कारण असे की पाश्चात्य विचारवंतांनी विकसित केलेल्या राजकीय संकल्यनांशी धार्मिक मंडळी कधीही सहमत झालेली नाही. धर्मनिष्ठ सामान्य जनतेनेच नव्हे तर विचारवंतांनी देखील धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाला आपली सहमती दर्शवली नाही. याचे मूळ कारण असे की पाश्चात्य राजकीय विचारवंतांनी खरे पाहता एकेकाळी जेव्हा चर्चद्वारे शासन चालवले जात होते, राष्ट्राच्या धार्मिक आणि राजकीय संस्था चर्चद्वारे चालविल्या जात. इतर देशांमध्ये देखील धर्मपंडितांचा राजकीय, सांस्कृतिकच नव्हे तर आर्थिक व्यवस्थेवरही ताबा होता. अशा काळी जेव्हा नवनवीन राजकीय प्रशासकीय विचारांचा उदय झाला त्या वेळी पाश्चिमात्य राष्ट्रांनी चर्चला सत्तेतून हद्दपार केले आणि ज्या धार्मिक निष्ठा चर्चद्वारे नागरिकांवर लादल्या गेल्या होत्या, जे प्रतिबंध घातले गेले होते त्याच निष्ठा या पाश्चात्य राजकारण्यांनी धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेत नागरिकांवर लादल्या. फरक एवढाच की धर्मपंडितांना सत्तेतून बेदखल करून स्वतः सत्तेवर काबिज झाले. सुरुवातीला याचा धर्मनिष्ठ जनतेकडून विरोध करण्यात आला. कट्टरवादाची सुरुवात इथूनच झाली. ख्रिस्ती कट्टरपंथियांनी धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा विरोध केला. ख्रिस्ती धर्माच्या शिकवणींवर त्यांचा आग्रह होता. म्हणून त्यांना कट्टरपंथी किंवा फंडामेंटॅलिस्ट म्हणू लागले. या कट्टरपंथाशी किंवा फंडामेंटॅलिझमशी मुस्लिमांचा दुरान्वयेही संबंध नव्हता.
कालांतराने पाश्चात्य देशांनी जगभर वसाहतवाद पसरवला. एकानंतर दुसऱ्या राष्ट्रावर ताबा मिळवून त्यास आपल्या वसाहतीत सामील करू लागले तेव्हा ख्रिस्ती जगतात आधुनिक राजकीय विचारांना विरोध कमी होत गेला. कारण त्यांना असे समजावून सांगण्यात पाश्चात्य विचारवंत यशस्वी झाले की खरे पाहता जगभर ख्रिस्ती धर्माच्याच वसाहती आहेत, फरक एवढाच की धर्माचे नाव या विचारांमागे न लावता आधुनिक राज्यव्यवस्था आणि लोकशाही असे नाव देण्यात आले आहे. नंतरच्या काळात जेव्हा लोक वसाहतवादाविरूद्ध बंड करू लागले आणि चळवळी ज्या त्या देशात सुरू झाल्या तेव्हा पाश्चात्यांनी ऐहिक स्वातंत्र्य बहाल केले; पण वैचारिक वसाहतवाद जसाच्या तसा आजही चालू आहे. म्हणजे धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद आणि लोकशाही हे त्याच वसाहतवादाचे तंत्र आहेत जो आजही जगभर पसरलेला आहे. एक प्रकारे पाश्चात्य देशांनी जगाला आजही वसाहतवादी व्यवस्थेत जखडून ठेवलेले दिसते. जगभर ख्रिस्ती धर्माचीच व्यवस्था पण आधुनिकतेच्या नावाने.
ख्रिस्ती धर्मियांनी जसे सुरुवातीला आधुनिक धर्मनिरपेक्ष राज्यसत्तेचा विरोध केला होता तसाच पूर्वाश्रमीच्या सोव्हियत महासंघातील पूर्व यूरोपमधील राष्ट्रांनी तसेच पूर्व यूरोपीय राज्यांनीसुद्धा मार्क्सच्या विचारसरणीवर आधारित आधुनिक राष्ट्रवादाचा विरोध केला होता. त्यांच्या मते मार्क्सिझम आणि इतर विचारधारा मानवी संवेदना आणि भावनांना ज्या प्रकारे धार्मिक आणि वांशिक विचार, परंपरा व संस्कृती स्पर्श करतात तसे ते करत नाहीत. युक्रेन राष्ट्राने सुद्धा सुरुवातीला जशा भूमिका आधुनिक राष्ट्रवादाविषयी घेतली होती आजही तो आपल्या भूमिकेवर ठाम आहे. सोव्हियत रशियाशी आजही त्याचा संघर्ष चालू आहे.
धार्मिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेमागे असे विचार मांडले जात आहेत की धर्म आणि धार्मिक संस्कृतीचा अवलंब केल्यानेच माणसाला एक दुसरे आणि खरे जग अनुभवता येते आणि सेक्युलर राष्ट्रवादी विचारांमध्ये माणसाला भावनांमधील अशा विचारांना प्रत्यक्षात आणायची क्षमता नाही. शिवाय धर्माला ज्या प्रकारचे पावित्र्य लाभले आहे आणि त्यामुळेच माणसाला आदराचे स्थान मिळते तशा काही संवेदना सेक्युलर राज्यव्यवस्थेत नाहीत. म्हणजे हे जग नेहमीच कोणत्याही नियमाचे पालन या व्यवस्थेत करताना दिसत नाही. या अनियमिततेपासून नियमित आणि सुरक्षित भविष्य फक्त धार्मिक शिकवणीच देऊ शकतात. दुर्खेम या विचारवंताच्या म्हणण्यानुसार धर्मात आधुनिक विचारांपेक्षा जास्त बळकट सर्वसमावेशक शक्ती असते. या जगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी दैवी शक्ती व्यतिरिक्त दुसरी कोणतीही शक्ती माणसाला आधार देऊ शकत नाही.
मानवी सभ्यतेची सुरुवात एका कुटुंबाने होते, नंतर त्याचे विविध कबिले आणि टोळ्या बनतात. हे सगळे मिळून एका वांशिक समाजाची सुरुवात करतात. समाजातील नाती या सर्व घटकांचे जाळे असतात जे एकमेकांना बांधून ठेवतात आणि पुढे जाऊन एका सभ्यतेला जन्म देतात. धार्मिक शिकवणी आणि परंपरा सभ्यतेला समृद्ध करतात. ही सभ्यता कोणती खऱ्या अर्थाने एका धार्मिक परंपरेवर आधारित मानवी समाज. इथपासूनच धार्मिक राष्ट्रवादाची सुरुवात होते. दुसरीकडे आधुिनक विचारांखाली साकारलेल्या राष्ट्रवादात सभ्यतेचे वरउल्लेखित सगळे घटक अस्तित्वात नसतात म्हणून धार्मिक राष्ट्रवादाची जशी पकड मानवी जीवन आणि त्याच्या भावनांवर असते तशी पकड आधुनिक राष्ट्रवादाची नसते. आधुनिक राष्ट्रे माणसांच्या धार्मिक निष्ठांवर हात घालतात आणि त्याच निष्ठा आपल्या अधिकारांच्या बळावर आधुनिक राज्यव्यवस्थेला व्यक्त कराव्यात अशी मागणी करतात. येथपासून आधुनिक राष्ट्रवाद आणि धार्मिक राष्ट्रवादात कलह निर्माण होतो. हा कलह हाताबाहेर जाऊ नये म्हणून एकापेक्षा एक कडक निर्बंध आधुनिक व्यवस्थेतील सत्ताधारीवर्ग लादण्यास सुरुवात करतो. पाश्चात्य देशांना धर्माचे महत्त्व कळल्याने त्यांनी ख्रिस्ती धर्माच्या शिकवणींचे नाव न घेता आपल्या आधुनिक विचारप्रणालीमध्ये त्यांना प्रमुख घटक मानले आणि हे सगळे त्यांना दोन महायुद्धांना सामोरे गेल्यानंतर कळले, ज्यात कोट्यवधींचे प्राण गेले. तेव्हापासून त्या राष्ट्रांनी आपसात युद्ध करणे बंद करून युद्धभूमी जगातील इतर देशामध्ये हलवली. यामागे पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्या वैचारिक वसाहतवादाच्या विळख्यात साऱ्या जगाला आणायचे होते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आपला हेतू लपवून ठेवला नव्हता. त्यांनी मुस्लिम राष्ट्रांना जाहीरपणे सांगितले होते की एक हजार वर्षांपूर्वीचे धर्मयुद्ध (Crusades) अजून थांवलेले नाही, ते आजही चालू आहे. त्यांनतरच त्यांनी एकानंतर एक अशा मुस्लिम राष्ट्रांना उद्ध्वस्त करून टाकले. धार्मिक राष्ट्रवादींचा सेक्युलर राष्ट्रवादाच्या नावाखाली जगभर माणसांची हत्या करणाऱ्यांविरूद्ध एक आरोप असतो तो असा की त्यांच्याकडे नैतिकता नसते. फक्त एकच गोष्ट या सगळ्या सत्ताधाऱ्यांकडे असते ती म्हणजे ऐहिक आणि नैतिक भ्रष्टाचार. तेच या आधुनिक पाशवी वृत्चीच्या सत्ताधाऱ्यांनी सिद्ध केले- कोट्यवधी निष्पापांची हत्या. त्यांना कुणी एक प्रश्न विचारावा की किती निष्पाप माणसांना ठार करण्याने अमेरिकेतील एका नागरिकाच्या मृत्यूची बरोबरी करता येईल?
धार्मिक राष्ट्रवाद आणि सेक्युलर राष्ट्रवादामधील हा लढा जगभर प्रत्येक देशात वा राष्ट्रात नेहमी चालू असतो. उदाहरणार्थ श्रीलंकेतील सिंहलींविरूद्ध तिथला स्थानिक आधुनिक राष्ट्रवाद. भारतात सध्याच्या भाजप सरकारचे धोरणदेखील हिंदुत्ववादी विचारांवर आधारित आहे. ही संकल्पना सर्वप्रथम सावरकरांनी मांडली होती. भाजपच्या सध्याच्या सेक्युलरवादाविरूद्ध काँग्रेस आणि डाव्या पक्षाशी शाब्दिक स्तरावर चकमक होत असते. पुढे काय होईल माहीत नाही. इस्लामिक रिपब्लिक ऑफ तुर्कमेनिस्तानच्या छायेत इस्लामिक कॉमन मार्केटची स्थापना झाली.
यात इराण, तुर्की, पाकिस्तान, अझरबैजान, उजबेकिस्तान, किरगिस्तान, ताजेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान यांचा समावेश आहे. याची भीती पाश्चात्य देशांना लागली आहे. कारण हे प्रयोग जर सफल झाले तर त्यांचा प्रभाव या उपखंडात कमी होण्याची शक्यता आहे. इराणने आधीच तिथली सेक्युलर राजवट उलथून लावली, याची शिक्षा अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी त्या देशावर निर्बंध लादून दिली आहे आणि आजपर्यंत ती चालू आहे.
इजिप्तमधील एका विचारवंताने असे सांगितले होते की पाश्चात्य देश जसा दावा करत आहेत ते तितके सेक्युलर नाहीत. त्यांनी याचा पुरावा देत म्हटले होते की यूरोपमधील सोशालिस्ट पक्ष ख्रिस्ती धर्माच्या नावाने उल्लेख करत आहेत. याचा पुरावा जॉर्ज बुश यांनी दिला जेव्हा त्यांनी अरबांविरूद्ध पुन्हा ‘क्रुसेड्स’ (धर्मयुद्ध) घडण्याची घोषणा केली होती. इतर जातीधर्मांची राष्ट्रांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी नेशन-स्टेट किंवा राष्ट्र-राज्याची संकल्पना मांडली होती.याचा उद्देश असा होता की जगभरातल्या धार्मिक राष्ट्रवादी विचार ठेवणाऱ्यांना आपसांत विभागून ठेवावे. याची सुरुवात त्यांनी अरबस्थानातून केली होती. यात ते यशस्वीही झाले. त्याचे परिणाम आज उद्ध्वस्त अरब जगताच्या रूपात दिसत आहे. पाश्चात्य लोकशाहीला इस्राईलमधील ज्यू धर्मियसुद्धा नाकारत आहेत. तरी पण पॅलेस्टाईनची कोंडी करण्यासाठी त्यांना पाश्चात्यांच्या साहाय्यतेची गरज असल्याने त्यांनी त्यांच्याविरूद्ध मोर्चा उघडलेला नाही. जर्मनीच्या हिटलरने याच नेशन-स्टेटच्या नावाखाली लक्षावधी निष्पाप ज्यूंची हत्या केली. त्यांनी मानवतेविरूद्ध केलेल्या या गुन्ह्याची शिक्षा अजून मिळायची आहे.
एकंदर असे की धर्मवाद आणि सेक्युलरवादामधील हा लढा थांबणार नाही. धार्मिक राष्ट्रवादाला बांधून ठेवणाऱ्या धार्मिक परंपरा संस्कृतीचा सेक्युलरवाद्यांकडे अभाव असल्याने ते शक्तीच्या जोरावर आपली व्यवस्था राबवित आहेत. अफगाणिस्थान एकमेव देश असा असेल ज्याने पाश्चात्यांच्या भांडवलवादी धर्मनिरपेक्ष शक्तींना आजवर थारा दिलेला नाही. नुकतीच अमेरिकेची त्या देशातून माघार याच दृष्टिकोनातून पाहिली जावे.
- सय्यद इफ्तिखार अहमद
मो.: ९८२०१२१२०७
Post a Comment