Halloween Costume ideas 2015

समस्यांना घाबरून नाही, तर खंबीरपणे तोंड देऊन जगणेच जीवन


जीवनाच्या धावपळीत बहुतेक लोकांमध्ये तणाव, राग, त्रास, भीती, नैराश्याच्या भावना दिसतात, घरात थोडे रागावले किंवा भांडण झाल्यास, पटकन अयोग्य निर्णय घेतात. आजच्या आधुनिक युगात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, शिक्षित आणि श्रीमंत ते गरीब अशा सर्व वर्गात आत्महत्येच्या घटना खूप वाढत आहेत, रोज आत्महत्येच्या बातम्या येत असतात. या समस्येवर, "जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन" दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी जगभरात जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. 2003 पासून जगभरात विविध उपक्रमांसह आत्महत्या थांबवण्यासाठी जागतिक स्तरावर वचनबद्धता आणि कारवाई करण्यासाठी हा एक विशेष दिवस आहे. या वर्षी 2021 ची थीम "कृतीद्वारे आशा निर्माण करणे" आहे. प्रत्येक 40 सेकंदात कोणीतरी स्वतःचा जीव घेतो. दरवर्षी जगात 7-8 लाख लोक आत्महत्येमुळे आपला जीव गमावतात. जागतिक स्तरावर 77% आत्महत्या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. 15-19 वर्षांच्या मुलांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे चौथे प्रमुख कारण आहे. 2012 मधे लॅन्सेटच्या अहवालानुसार, भारतात आत्महत्येचे प्रमाण 15-29 वयोगटात सर्वाधिक होते. भारतात दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो, दररोज सुमारे 28 अशा आत्महत्या होत आहेत.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) द्वारे जारी केलेल्या आकडेवारी प्रमाणे 2019 मध्ये, देशात दररोज सरासरी 381 आत्महत्या झाल्याची नोंद आहे, म्हणजेच वर्षभरात एकूण 1,39,123 मृत्यू झाले, त्यापैकी 67 टक्के 93,061 तरुण प्रौढ (18-45 वर्षे) होते, 2018 च्या (89,407) संख्येच्या तुलनेत भारतातील तरुणांच्या आत्महत्या 4 टक्क्यांनी वाढल्या. 2019 मध्ये, आत्महत्या दर 12.70 टक्के होता ज्यात पुरुष 14.10 टक्के आणि महिला 11.10 टक्के होते. फाशी ही आत्महत्या करण्याच्या प्रयत्नांची सर्वात सामान्य पद्धत मानली गेली. 2019 मध्ये सुमारे 74,629 लोकांनी (53.6 टक्के) फाशी लावून घेतली, 2017 मध्ये देशभरात एकूण 129887 आत्महत्येची नोंद झाली. 2016 मध्ये 9,478 विद्यार्थ्यांनी, 2017 मध्ये 9,905 विद्यार्थ्यांनी आणि 2018 मध्ये 10,159 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. देशात आत्महत्येची काही कारणे व्यावसायिक समस्या, गैरवर्तन, हिंसा, छळ, कौटुंबिक समस्या, आर्थिक नुकसान, अलिप्तपणाची भावना आणि मानसिक विकारामुळे आहे. आत्महत्येचे प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये जास्त आहेत. प्रत्येक आत्महत्या विनाशकारी असते आणि मृतकाच्या संबंधित लोकांवर खोल परिणाम करते. तथापि, जागरूकता वाढवून आपण जगभरातील आत्महत्येच्या घटना कमी करू शकतो.

आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही, आयुष्य हे सतत चालत राहिले पाहिजे ज्यात सुख आणि दु:ख येत राहतात. समस्यांना घाबरणे किंवा त्यापासून पळणे कमकुवतपणा आहे आणि आत्महत्या हे त्याच कमजोरीवर भ्याडपणाचे लक्षण आहे. जनावरे, पक्षी सुद्धा हार मानत नाहीत आणि कधीही आत्महत्या करीत नाही, ते कोणत्याही परिस्थितीत जगायला शिकतात, मग आपण तर माणूस आहोत, आपल्याकडे विवेकबुद्धी विचारशक्ती आहे, आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत, मदत करण्यासाठी कुटुंब, नातलग, संसाधने, संस्था, प्रशासन, नियम, कायदे आणि इतर सुविधा आहेत, मग आपण हार का पत्करायची, धीर का सोडायचा. नेहमी लक्षात ठेवा की संकटाच्या भीती ने आपण कधीच यशस्वी होऊ शकत नाही. काय आपण जगातील सर्वात दुःखी लोक आहोत का? नाही बिलकुल नाही, लोक आपल्यापेक्षा जास्त समस्यांना तोंड देत आहेत. समस्यांमुळे केवळ जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला आहे. जेव्हा आपल्याला लोकांच्या समस्या समजेल तेव्हा कळेल की आपली समस्या इतरांच्या तुलनेत काहीच नाही आणि वेळही कधी एकसारखा राहत नाही.

समस्या वाढवण्यात सर्वात मोठा हात आपलाच आहे, इतरांवर आपला अति विश्वास, अति-अपेक्षा, किंवा अवलंबित्व, आपल्या वर्तनाचा परिणाम, वाईट संगती, वाईट सवयी, लोभ, जागरूक नसणे, नियमांचे उल्लंघन करणे, संयम आणि समाधानाचा अभाव, आत्मचिंतनाचा अभाव, आपल्या लोकांशी समस्या सामायिक न करणे, लोक काय म्हणतील या विचाराने घाबरणे, समाजात खोटा देखावा करणे, वास्तविकता नाकारणे, जबाबदारी आणि कर्तव्यापासून पळून जाणे, नकारात्मक विचारांचे जाळे विणणे, परिस्थितीनुसार जुळवून न घेणे, रागाच्या भरात अयोग्य निर्णय घेणे, एखाद्या न्यूनगंड दडपणाखाली जगणे अशा गुंतागुंती माणसाने स्वतः निर्माण केल्या आहेत, ज्यांना आपण बुद्धी आणि समजुतपणाने सोडवू शकतो. समस्यांपासून पळून जाणे याला भ्याडपणा आणि मूर्खपणा म्हणतात. कोणतीही समस्या भीतीने नाही तर समस्येला मात करून दूर होते. जीवनात कितीही संघर्ष असो जर आपल्याला प्रामाणिकपणाने आणि सत्याने जगायचे असेल तर कधीही लोकांचा विचार करू नका.

अनेक महान समाज सुधारक, क्रांतिकारी, शास्त्रज्ञ, व्यावसायिक ज्याने प्रतिकूल परिस्थितीतही शेकडो समस्यांना तोंड देत यशाचा झेंडा उंचावला, अत्यंत साधे गावकरी दशरथ मांझी यांनी सलग 22 वर्षे नि:स्वार्थीपणे डोंगर फोडून मार्ग काढला आणि माउंटन मॅन नावाने ओळखले गेले, दिव्यांग खेळाडूंनी पॅरालिम्पिकमध्ये पदके जिंकून देशाचे नाव उंचावले, आत्मा थरथरेल अशा काही यशस्वी लोकांच्या संघर्षमय जीवनाचा गोष्टी आहेत, अशी अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्वे आपल्या आजूबाजूला देखील मिळतील जे आजही संघर्षमय जीवन जगून समाजासमोर नवे आदर्श मांडत आहेत. टाळेबंदी मध्ये लाखो लोकांचे हजारो किलोमीटर स्थलांतर आणि जीवनावश्यक वस्तू साठी धडपड, उन्हात पावसात आणि कडक थंडीत देशाचे रक्षण करणारे शूर सैनिक, थोड्याशा पाण्यासाठी दररोज अनेक किलोमीटर प्रवास करणाऱ्या ग्रामीण महिला, अनेक दुर्गम भागात शाळेत जाण्यासाठी जंगले, नद्या-नाले, डोंगरभाग आणि खराब रस्त्यांमधून दररोज जाणारी मुले, दुष्काळ, पूर आणि नैसर्गिक आपत्तीशी झटणारे कष्टकरी शेतकरीही दररोज संघर्षच करतात. आतातर कोरोना आणि महागाईमुळे संघर्ष अधिकच वाढला आहे. दररोज जगभरातील मोठी लोकसंख्या बेघर, निराधार, अनाथांचे, जीवन जगतात ज्यांना पुरेसे अन्न आणि पाणीही मिळत नाही. जगातील अर्धी लोकसंख्या गरिबीत आहे. आजही 75-80 वर्षांची म्हातारी लोक सुद्धा दोन वेळच्या भाकरीसाठी काम करताना दिसतात. इतका त्रास सहन करूनही त्यांचा संघर्ष सुरूच आहे आणि यालाच जिवंतपणा म्हणतात, कारण जीवन अमूल्य आहे, संपूर्ण जगाची संपत्ती विकूनही तुम्ही एका क्षणाचे आयुष्य विकत घेऊ शकत नाही. असे अनेकदा दिसून येते की आर्थिक संकट उद्भवल्यावर संपन्न कुटुंबातील सुशिक्षित व्यक्ती आत्महत्येचा प्रयत्न करतात, परंतु ते परिस्थितीनुसार जुळवून घेत नाहीत, जर श्रीमंतीनंतर गरिबी आली तर काय झाले, लढायला का घाबरता, हे दिवस ही बदलतील, अर्धी लोकसंख्या गरिबीशी लढत आयुष्य जगत आहे.

आत्महत्या रोखणे अनेकदा शक्य होते आणि ते रोखण्यात आपण सर्वजण प्रमुख भूमिका बजावू शकतो. आपल्या कृतीतून, आपण एखाद्याच्या सर्वात वाईट क्षणांमध्ये - समाजाचा एक सदस्य म्हणून, मुलाच्या स्वरूपात, पालक म्हणून, मित्र म्हणून, सहकारी किंवा शेजारी म्हणून बदल घडवू शकतो. थोडीशी काळजी एक जीव वाचवू शकते आणि संघर्ष करणाऱ्या व्यक्तीमध्ये आशेची भावना निर्माण करू शकते. संघर्ष करणाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा, प्रोत्साहन, आत्मविश्वास वाढवून त्यांना मजबूत आणि धैर्यवान बनवायचे आहे. आव्हाने, अपयश, पराभव आणि शेवटी प्रगती तेच आहे जे आयुष्य सार्थकी लावते. कधीही धीर न सोडण्याची सवय जिंकण्याची सवय बनते, त्यामुळे काहीही झाले तरी हार मानू नका आणि जेवढेही आयुष्य मिळाले आहे ते आनंदाने जगा.


-डॉ. प्रितम भि. गेडाम

भ्रमणध्वनी क्र.- 82374 17041


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget