(१५) जेव्हा आमच्या स्पष्ट गोष्टी त्यांना ऐकविल्या जातात तेव्हा ते लोक जे आम्हाला भेटण्याची अपेक्षा करीत नाहीत, म्हणतात, ‘‘याच्याऐवजी एखादा अन्य कुरआन आणा अथवा याच्यात काही बदल करा.’’१९ हे पैगंबर (स.)! त्यांना सांगा, ‘‘माझे हे काम नव्हे की मी आपल्याकडून याच्यात काही फेरबदल करावा. मी तर केवळ त्या दिव्य प्रकटनाचे अनुसरण करणारा आहे, जे माझ्याकडे पाठविले जाते. जर मी आपल्या पालनकत्र्याची अवज्ञा केली तर मला एका मोठ्या भयंकर अशा दिवसाच्या यातनेची भीती आहे.’’२०
(१६) आणि सांगा, ‘‘जर अल्लाहची अशीच इच्छा असती तर मी हा कुरआन तुम्हाला कधीच ऐकविला नसता आणि अल्लाहने तुम्हाला याची खबरसुद्धा दिली नसती. तसे पाहिले तर मी यापूर्वी तुमच्यातच आयुष्य व्यतीत केले आहे, काय तुम्ही बुद्धीचा उपयोग करीत नाही?२१
(१७) मग त्याच्यापेक्षा मोठा अत्याचारी अन्य कोण असेल जो एक असत्य गोष्ट रचून अल्लाहशी तिचा संबंध जोडील अथवा अल्लाहच्या सत्य संकेतांना खोटे लेखतो.२२ नि:संशय गुन्हेगार कधीच सफल होऊ शकत नाहीत.’’२३
(१८) हे लोक अल्लाहशिवाय त्यांची उपासना करीत आहेत जे यांना नुकसान आणि फायदादेखील पोहचवू शकत नाहीत आणि म्हणतात की हे अल्लाहच्या येथे आमचे शिफारसी आहेत. हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘तुम्ही अल्लाहला त्या गोष्टीची खबर देता काय जिला तो आकाशांतही जाणत नाही व पृथ्वीवरही?२४’’ पवित्र आहे तो आणि श्रेष्ठ व उच्चतर आहे त्या अनेकेश्वरत्वापासून जे हे लोक करतात.
(१९) प्रारंभी सर्व मानव एकच धर्मसमुदायी होते, नंतर त्यांनी विविध श्रद्धा व पंथ बनविले,२५ आणि जर तुझ्या पालनकत्र्याकडून अगोदरच एक गोष्ट निश्चित केली गेली नसती तर ज्या गोष्टीत ते परस्पर मतभेद करीत आहेत, तिचा निर्णय लावला गेला असता.२६
(२०) आणि हे जे ते सांगत आहेत की या पैगंबरावर याच्या पालनकत्र्याकडून एखादे संकेतवचन का अवतरले गेले नाही.२७ तर यांना सांगा, ‘‘परोक्षचा स्वामी व मुखत्यार तर अल्लाहच आहे, बरे तर प्रतीक्षा करा, मीदेखील तुमच्याबरोबर प्रतीक्षा करीत राहतो.’’२८
१९) प्रथम हेतू त्यांचा हा होता की त्यांचे हे कथन या कल्पनेवर आधारित होते की पैगंबर मुहम्मद (स.) जे काही सांगत आहे ते अल्लाहकडून नाही, ते आपल्या बुद्धीने सर्व सांगत असतात. दुसरा हेतू त्यांचा होता की एकेश्वरत्व, परलोकत्व आणि नैतिक मर्यादांचा विवाद तुम्ही का म्हणून सुरु केला? मार्गदर्शनासाठी तुमची ही धडपड असेल तर असे मार्गदर्शन करा ज्याने राष्ट्रकल्याण होईल आणि देशात सुखशांती लाभेल. तुम्ही तुमच्या या संदेशाला पूर्णत: बदलू शकत नसाल तर त्याला इतके लवचिक तरी करा ज्याने तुमच्यात आणि आमच्यात तडजोडीचे वातावरण निर्माण होईल जेणेकरून आम्ही काही तुमचे ऐकावे आणि तुम्ही काही आमचे ऐकावे.
२०) वरील दोन्ही गोष्टीचे हे उत्तर आहे. यात हेसुद्धा स्पष्ट करण्यात आले आहे की मी या ग्रंथाचा लेखक नाही. हा ग्रंथ दिव्य अवतरणाद्वारे माझ्यापर्यंत अवतरित झाला आहे. यात कोणतेही परिवर्तन करण्याचा मला अधिकार नाही. तसेच याविषयी समझोता करण्याचा संभव नाही की प्रश्नसुद्धा येत नाही. स्वीकार करावयाचा असेल तर या जीवनपद्धतीचा पूर्णत: स्वीकार करा किंवा त्यास पूर्णता रद्द करा.
२१) हा एक प्रबळ पुरावा आहे त्यांच्या विचाराचे पूर्णत: खंडन करण्यासाठी, की पैगंबर मुहम्मद (स.) कुरआनला स्वत: आपल्या मनाने रचून अल्लाहशी जोडत आहेत. आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ की ते स्वत: कुरआनचे रचनाकार नाहीत तर हा ग्रंथ अल्लाहकडून त्यांच्यावर दिव्य अवतरणाद्वारा अवतरित झाला आहे. दुसरे इतर प्रमाण अतिलांबचे होते परंतु पैगंबर मुहम्मद (स.) यांचे जीवन तर त्यांच्या समोरच होते. पैगंबर (स.) यांनी पैगंबरत्वापूर्वी पूर्ण चाळीस वर्षांचा दीर्घकाळ त्यांच्यात राहून व्यतीत केला. त्यांच्याच शहरात जन्माला आले, त्यांच्या डोळयांसमोर बालपण घालवले, तरूण्यात पोहचले आणि आता प्रौढ त्यांच्याच समोर झाले. वागणूक, भेटीगाठी, देवाण-घेवाण, लग्नकार्य इ. सर्व प्रकारचे सामाजिक व्यवहार त्यांच्याशीच होते. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनाचे कोणतेच क्षेत्र या लोकांपासून लपलेले नव्हते. अशाप्रकारचे सुपरिचित पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनव्यवहारांपेक्षा स्पष्ट पुरावा आणखी दुसरा कोणता असू शकतो? पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या जीवनात दोन गोष्टी स्पष्ट होत्या, ज्यांना मक्कानिवासी प्रत्येकजण चांगल्याप्रकारे जाणून होता. एक म्हणजे पैगंबरत्वाच्या पूर्वी पूर्ण चाळीस वर्षाच्या जीवनात त्यांना असे कोणतेच प्रशिक्षण, ज्ञान अथवा सोबती मिळाले नाहीत ज्यामुळे त्यांना अशाप्रकारची माहीती व ज्ञान प्राप्त् झाले असते. पैगंबरत्वाच्या दाव्याचे स्त्रोत अचानक पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या मुखातून वाहू लागले. पूर्वी या महान संदेशाविषयीचे संकेत त्यांच्या चाळीस वर्षाच्या काळात लोकांनी ऐकले आणि पाहिले नव्हते. अचानक चाळीसाव्या वर्षी हा महान संदेश देण्यास त्यांनी सुरवात केली. हे याचे स्पष्ट प्रमाण होते की कुरआन पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या बुद्धीची उपज नाही तर बाहेरून त्यांच्या अंत:करणात आलेले आहे. मनुष्य आपल्या जीवनातील उत्तरार्धात असा महान संदेश अचानक देऊ शकत नाही ज्याच्या विकासाचे चिन्ह त्याच्या जीवनाच्या पूर्वार्धात सापडत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या जीवनाच्या सुरवातीच्या काळात अगदी स्पष्ट होती आणि पूर्ण समाजात प्रसिद्ध होती ती म्हणजे पैगंबर मुहम्मद (स.) यांची सच्चई आणि अमानतदारी होय. पैगंबरत्व बहालीपूर्वी (काही वर्षापूर्वी काळा दगड (हजरे अस्वद) स्थानापन्न करण्याविषयी) पूर्ण कुरैश कबिल्यासमोर पैगंबर मुहम्मद (स.) आमीन (अमानतदार) असल्याची साक्ष अल्लाहने त्यांच्याकडून घेतली होती. ज्याने आपल्या जीवनात कधीच असत्य, छळकपट, धोकेबाजीने काम घेतले नव्हते, तो अचानक खोटारडेपणा, धोकेबाजी आणि छळकपट कसा करेल? आपल्या मनाने काही रचून आणि पूर्ण सामर्थ्यानिशी अल्लाहशी तो कसा जोडेल ?
२२) म्हणजे या आयती अल्लाहच्या नाहीत आणि मी स्वत: त्या रचून त्यांना अल्लाहच्या आयती म्हणून लोकांपुढे ठेवत आहे तर माझ्यासारखा मोठा अत्याचारी जगात दुसरा नाही. जर हे सत्य आहे की या अल्लाहच्या आयती आहेत आणि तुम्ही त्यांना नाकारत आहात तर अशा स्थितीत तुमच्या एवढा मोठा अत्याचारी जगात दुसरा कोणी नाही.
२३) म्हणजे `गुन्हेगार सफलता प्राप्त् करू शकत नाहीत' येथे या अर्थाने म्हटले गेले आहे की मी पूर्ण विश्वासाने सांगू इच्छितो की अपराधींना सफलता प्राप्त् होऊ शकत नाही. मी पैगंबरत्वाचा खोटा दावाकरून स्वत: हा अपराध करू शकत नाही. परंतु तुमच्याविषयी मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही खऱ्या पैगंबरांना नाकारत आहात. या अपराधामुळे तुम्हाला सफलता प्राप्त् होणार नाही. `फलाह' (सफलता) हा कुरआनचा एक शब्द आहे. याने तात्पर्य ती सुदृढ सफलता आहे, ज्यात कोणत्याच घाट्याची शक्यता नाही व ती सफलता सदैव राहणारी आहे. जगातील जीवनाच्या या आरंभिक काळात सफलतेची शक्यता असो किंवा नसोत. शक्य आहे की मार्गभ्रष्टतेचे आवाहन करणारा जगात खूप प्रगती करील आणि त्याच्या मार्गभ्रष्टतेला खूप भरभराटी लाभेल, परंतु कुरआनच्या शब्दात यास `फलाह' म्हटले जाणार नाही तर `घाटा' म्हणतात. हे शक्य आहे की सत्याचे आवाहन करणारा जगात अनेक संकटांना सामोरे जातो तसेच अत्याचारी लोकांच्या अत्याचाराला बळी पडतो आणि जगाचा निरोप घेतो. या व्यक्तीला कोणी मानो अथवा न मानो, परंतु कुरआनच्या भाषेत हा घाटा नाही तर साक्षात सफलता आहे.
२४) एखाद्याविषयी अल्लाहच्या ज्ञानकक्षेत नसणे म्हणजे ते प्रारंभापासून अस्तित्वातच नाही कारण सृष्टीत जे काही आहे ते अल्लाहच्या ज्ञानकक्षेत आहे. म्हणजेच शिफारस करणे नाकारण्यासाठी ही सूक्ष्म वर्णनशैली आहे. अल्लाह तर जाणत नाही की जमिनीत व आकाशांत त्याच्यासमोर तुमची शिफारस करणारा आहे. मग तुम्ही कोणत्या शिफारस करणाऱ्यांची अल्लाहला माहिती देत आहात?
२५) तपशीलासाठी पाहा सूरह २, टीप २३०
२६) जर अल्लाहने पूर्वीच हा निर्णय केला नसता की वास्तविकतेला मानव इंद्रियांपासून लपवून त्यांच्या बुद्धीविवेक आणि आंतरात्मा यांना परीक्षेत टाकले जावे तेव्हा या परीक्षेत विफल होऊन जे कोणी चुकीचा मार्ग स्वीकारतात त्यांना या मार्गावर चालण्याची संधी प्राप्त् करून दिली जाईल आणि निर्णय पुनरुत्थानादिनी होईल. अन्यथा आजच वास्तविकतेला उघडे करून सर्व मतभेदांचा निर्णय झाला असता. मोठ्या गैरसमजुतीला नष्ट करण्यासाठी हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सामान्यता आजसुद्धा लोक या गैरसमजुतीत आहेत आणि कुरआन अवतरणसमयीसुद्धा होते. हा गैरसमज म्हणजे जगात अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्म स्वत:लाच सत्यधर्म समजतो. अशा स्थितीत कोण सत्यावर आणि कोण असत्यावर आहे याचा निर्णय कसा घ्यावा? याविषयी स्पष्ट करण्यात येत आहे की धर्मांतील मतभेद ही नंतरची निर्मिती आहे. प्रारंभी सर्वांचा म्हणजे संपूर्ण मानवजातीचा एकच धर्म होता आणि तोच धर्म सत्यधर्म होता. नंतर या सत्यधर्मात मतभेद निर्माण करून लोकांनी वेगवेगळे धर्म आणि विचारधारा निर्माण केल्या. आता धर्मांच्या मतभेदांना बुद्धीविवेकाने परखून सत्यधर्माचा शोध घेणे तुमच्यावर अल्लाहने सोडून दिले आहे. तुम्हाला असे वाटत असेल की सत्याला अल्लाहने लोकांपुढे स्पष्ट करावे तर हे या जगात आता शक्य नाही. हे जगातील जीवन तर मनुष्यासाठी परीक्षा आहे आणि येथे परीक्षा याचीच होत आहे की तुम्ही सत्याला न पाहता आपल्या बुद्धीविवेकाने ओळखता किंवा नाही.
२७) म्हणजे याचे स्पष्ट संकेत की पैगंबर मुहम्मद (स.) सत्यावर आहे आणि जे काही सांगत आहे ते सत्य आहे. येथे हे लक्षात ठेवावे की निशाणीसाठींची त्यांची ही मागणी सत्य संदेश स्वीकारण्यासाठी नव्हती. इस्लामी जीवनपद्धतीचा स्वीकार करून त्यानुसार चारित्र्यघडण करण्यास ते तयार नव्हते. तसेच पैगंबरत्वाची अशी एखादी निशाणी पाहून पैगंबर (स.) यांच्या पैगंबरत्वावर त्यांनी विश्वास ठेवावा हा हेतू त्यामागे नव्हता. खरे तर निशाणी दाखविण्याची मागणी ईमान धारण न करण्यासाठी बहाणेबाजी होती. जे काही त्यांना दाखविले असते, त्यानंतर हे लोक असेच म्हणाले असते की आम्ही अद्याप काहीच पाहिले नाही. या लोकांना खरेतर ईमान धारण करावयाचे नव्हते. ऐहिक जीवनात त्यांना जे स्वातंत्र्य प्राप्त् होते त्यानुसार मन मानेल असे ते वागत. तसेच ज्यात त्यांना फायदा दिसे त्याच्या मागे ते पळत असत. अशा भौतिक फायद्याला सोडून हे लोक एकेश्वरत्व आणि परलोकत्व मान्य करण्यास तयार नव्हते. याचा स्वीकार केल्याने त्यांना आपली पूर्ण जीवनव्यवस्था नैतिक नियमांत जखडावी लागत होती.
२८) म्हणजे जे काही अल्लाहने अवतरित केले आहे ते मी सादर केले आहे आणि जे अल्लाहने अवतरित केले नाही ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी `परोक्ष' आहे. या परोक्षज्ञानावर अल्लाहशिवाय कुणाचाच अधिकार नाही. त्याला वाटले तर अवतरित करील अथवा करणार नाही. जर तुमचे ईमान धारण करणे यावरच आधारित असेल तर जे काही अल्लाहने अवतरित केले नाही ते अवतरित होईपर्यंत तुम्ही वाट पाहावी. मी पण पाहतो की तुमचा हा दुराग्रह पूर्ण होतो किंवा नाही.
Post a Comment