Halloween Costume ideas 2015

सूरह यूनुस:ईशवाणी (सुबोध कुरआन)


(३३) (हे पैगंबर (स.)! पाहा) अशाप्रकारे अवज्ञेचा अंगीकार करणाऱ्यावर तुमच्या पालनकत्र्याचे वचन सत्यप्रमाणित झाले, की ते कदापि मान्य करणार नाहीत.४० 

(३४) यांना विचारा तुम्ही ठरविलेल्या भागीदारांपैकी कोणी आहे जो निर्मितीचा प्रारंभसुद्धा करीत असेल आणि मग त्याची पुनरावृत्तीदेखील करीत असेल? सांगा, तो केवळ अल्लाह आहे जो निर्मितीचा प्रारंभही करतो व त्याची पुनरावृत्तीदेखील,४१ मग तुम्ही या कोणत्या उलट्या मार्गावर चालविले जात आहात?४२

(३५) यांना विचारा की तुम्ही ठरविलेल्या भागीदारांपैकी कोणी असा आहे जो सत्याकडे मार्गदर्शन करीत आहे?४३ सांगा, तो केवळ अल्लाहच आहे जो सत्याकडे मार्गदर्शन करतो. मग सांगा, जो सत्याकडे मार्गदर्शन करतो तो याचा अधिक हक्कदार आहे की त्याचे अनुकरण केले जावे अथवा त्याचे ज्याला स्वत:ला मार्ग सापडत नाही, याशिवाय की त्याला मार्गदर्शन केले जाईल? शेवटी तुम्हाला झाले तरी काय आहे, कसले विपरीत निर्णय घेत आहात? 

(३६) वस्तुस्थिती अशी आहे की यांच्यापैकी बहुतेक लोक केवळ अनुमान व कल्पनांच्या पाठीमागे जात आहेत,४४ वास्तविक पाहाता कल्पना, सत्याची गरज यत्किंचितही भागवीत नाही. जे काही हे करीत आहेत अल्लाह ते चांगलेच जाणतो. 

(३७) आणि हा कुरआन ती वस्तू नव्हे जी अल्लाहच्या दिव्य-प्रकटना व ज्ञानाविना रचली जावी. उलट हा तर जे काही पूर्वीच आलेले आहे त्याचे समर्थन आणि त्या विशिष्ट ग्रंथाचा तपशील आहे.४५ यात काहीच शंका नाही की हा विश्वाच्या अधिपतीकडून आहे. 

(३८) हे लोक असे म्हणतात काय की पैगंबरांनी स्वत: हा रचला आहे? सांगा, ‘‘जर तुम्ही या आपल्या आरोपात खरे असाल तर एक अध्याय यासारखा रचून आणा, आणि एक अल्लाहला सोडून इतर ज्यांना ज्यांना बोलविणे शक्य असेल त्यांना मदतीला बोलवा.’’४६ (३९) मुळात असे आहे की जी गोष्ट यांच्या ज्ञानकक्षेत आली नाही आणि ज्याचा शेवटही यांच्यासमोर आला नाही, याला त्यांनी (विनाकारण कल्पना विलासात) खोटे लेखले.४७ अशाच प्रकारे यांच्या पूर्वीच्या लोकांनीदेखील खोटे ठरविले आहे, मग पाहा त्या अत्याचारींचा शेवट कसा झाला.४०) म्हणजे अशा स्पष्ट आणि सर्वांना कळेल असे पुरावे देऊन समजून सांगितले जाते. परंतु ज्यांनी अमान्य करण्याचा निर्णय घेतला आहे ते आपल्या दुराग्रहापासून कधीही हटत नाहीत.

४१) जन्माच्या प्रारंभाविषयी अनेकेश्वरवादी मान्य करीत होते की हे केवळ अल्लाहचे काम आहे. त्यांच्या भागीदारांचे हे काम मुळीच नाही. दुसऱ्यांदा जन्माला घालणेविषयी स्पष्ट आहे, की जो प्रारंभी जन्माला घालणारा आहे तोच जन्माच्या या कार्याला दुसऱ्यांदा घडवू शकतो. परंतु ज्याने पहिल्यांदा जन्माला घातले नाही तो कशाप्रकारे दुसऱ्यांदा जन्माला घालील? ही स्पष्टता बुद्धीला पटणारी गोष्ट आहे आणि स्वत: अनेकेश्वरवाद्यांची मने आतून यास ग्वाही देत आहेत की हे अगदी योग्य आहे. परंतु ते यास स्वीकार करू शकत नव्हते कारण यास मान्य केल्यानंतर परलोक जीवनाला नाकारणे कठीण होऊन बसते म्हणूनच वरील प्रश्नांविषयी अल्लाहने सांगितले की ते स्वत: म्हणतील की ही कामे अल्लाहचीच आहेत. परंतु येथे मात्र पैगंबर (स.) यांना सांगितले जात आहे की तुम्ही स्पष्टपणे उघड उघड घोषणा करा की पहिल्यांदा जन्माला घालणे आणि दुसऱ्यांदा जन्माला घालणे हे काम अल्लाहचेच आहे.

४२) म्हणजे तुमच्या अस्तित्वाची सुरवात अल्लाहच्या हातातच आहे आणि तुमच्या अस्तित्वाचा अंतसुद्धा अल्लाहच्याच हातात आहे. तेव्हा तुम्ही स्वत:चे हितैषी बनून विचार करा की शेवटी तुम्हाला हे काय समजाविले जात आहे, की या दोन्ही टोकांमध्ये (जीवनात) अल्लाहशिवाय इतर दुसऱ्यांना तुमच्या उपासनेचा व भक्तीचा अधिकार पोहचला आहे?

४३) हा एक मोठा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. यास सविस्तरपणे समजून घेतले पाहिजे. जगात मनुष्याच्या गरजांचे क्षेत्र खाने पिणे, कपडालत्ता आणि साधनसामुग्री एवढेच नाही ज्याद्वारा संकटे, यातना आणि नुकसानीपासून तो सुरक्षित राहतो. मनुष्याची सर्वात महत्त्वाची गरज आहे, की जगात त्याला सत्य जीवनपद्धती माहीत व्हावी. तसेच मनुष्याला माहीत व्हावे की स्वत:शी आणि इतरांशी त्याने कशाप्रकारे व्यवहार करावा, ज्यामुळे त्याचे जीवन सफल होईल आणि मनुष्याची शक्ती, प्रयत्न चुकीच्या मार्गात खर्च होऊन विनाशाच्या रूपात समोर येऊ नयेत. याच आदर्श जीवनपद्धतीचे नाव `सत्य' आहे आणि जो मार्गदर्शक या जीवनपद्धतीकडे मनुष्याला घेऊन जातो तोच `सत्यवान मार्गदर्शक' आहे. आता कुरआन सर्व अनेकेश्वरवाद्यांशी आणि त्या सर्व लोकांशी जे पैगंबरांची शिकवण मान्य करीत नाही, विचारु इच्छितो की तुम्ही अल्लाहशिवाय ज्यांची ज्यांची उपासना करता त्यांच्यापैकी कोण आहे जो सत्याचे मार्गदर्शन करतो किंवा करू शकतो? स्पष्ट आहे की याचे नकारात्मक उत्तर आहे, कारण मनुष्य अल्लाहशिवाय ज्यांची उपासना करतो ते दोन प्रकारचे आहेत -

पहिल्या प्रकारात ते देवी-देवता किंवा जिवंत व मेलेली माणसे येतात ज्यांची पूजा केली जाते. यांच्यापुढे मनुष्य याचसाठी झुकतो की अनैसर्गिकपणे व चमत्काराने त्यांनी त्याच्या गरजा पूर्ण कराव्यात, मनोकामनापूर्ती करावी व विघ्नहरण करावे. सत्याचे मार्गदर्शन तर या बनावटी ईश्वरांकडून कधी आले? आणि एखादा अनेकेश्वरवादी कधीही यासाठी त्यांच्यापुढे नतमस्तक झाला? तसेच कोणताच अनेकेश्वरवादी कधीही म्हणत नाही की त्याच्या या या ईश्वराने त्याला चरित्र, आचरण, संस्कृती, सभ्यता, अर्थनीती, राजनीती, कायदे आणि न्यायविषयक नियम शिकविले आहेत.

दुसऱ्या प्रकारात ती माणसे येतात ज्यांच्यातर्फे बनविलेले सिद्धान्त आणि कायद्यांचे पालन आणि त्यांचे आज्ञापालन केले जाते. हे लोक मार्गदर्शक जरूर आहेत. परंतु प्रश्न हा आहे की खरोखरच हे सत्याचे मार्गदर्शक आहेत? काय सत्याचे मार्गदर्शक हे लोक होऊ शकतात? काय यांच्यापैकी एखाद्याचे तरी ज्ञान सर्वव्यापी ज्ञान आहे? मनुष्यजीवनाचे  नियम  बनविण्यासाठी  आवश्यक  जे  आहे  काय यांच्यापैकी   एखाद्याची  दृष्टी  संपूर्ण मनुष्यजीवनावर व्यापलेली आहे? काय यांच्यापैकी एखादा त्या कमजोरी, पक्षपात, स्वार्थ, मनोकामना, झुकावापासून उच्च् आहे जे मनुष्यजीवनाचे सत्य नियम बनविण्यात अडथळे निर्माण करतात? उत्तर होकारार्थी येऊच शकत नाही तर मग हे लोक `सत्यमार्ग दर्शनाचे स्त्रोत' कसे बनू शकतात?

म्हणूनच कुरआन हा प्रश्न करतो, ``लोकांनो! तुमच्या या धार्मिक आणि सांस्कृतिक उपास्यांपैकी कोणी असा आहे की जो सरळमार्गाकडे तुमचे मार्गदर्शन करणारा आहे?'' वरील प्रश्नांबरोबर हा शेवटचा प्रश्न जीवनधर्माचा संपूण निर्णय करतो. मनुष्यांच्या सर्व गरजा दोन प्रकारात मोडतात.

पहिल्या प्रकारच्या गरजा म्हणजे त्याचा कोणी पालनकर्ता असावा, कोणी शरण देणारा असावा, कोणी प्रार्थनेचा स्वीकार करणारा व कामनापूर्ती करणारा असावा. जगात अशक्त व कमजोर सहाऱ्यांच्यामध्ये राहून मनुष्य या भक्कम सहाऱ्याची दृढ इच्छा बाळगून असतो. म्हणून वरील प्रश्नांनी निर्णय केला की या गरजांना पूर्ण करणारा अल्लाहशिवाय दुसरा कोणीही नाही.

दुसऱ्या प्रकारच्या गरजा म्हणजे कोणी असा मार्गदर्शक असावा जो जगात सफल जीवन व्यतीत करण्याच्या आदर्श जीवनपद्धतीकडे मार्गदर्शन करीत असावा आणि जीवनासाठीच्या त्याने दिलेल्या नियमांचे आणि आदेशांचे पालन पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केले जावे. म्हणून या अंतिम प्रश्नाने याचा निर्णय केला की `सत्यवान मार्गदर्शक' केवळ अल्लाहच आहे. यानंतर दुराग्रह आणि हठधर्मीच शिल्लक राहाते ज्याच्यामुळे मनुष्य अनेकेश्वरवादी धर्म किंवा धर्मविहीन सांस्कृतिक नैतिक चरित्र आणि राजनैतिक सिद्धान्ताना कवटाळून बसतो.

४४) म्हणजे ज्यांनी धर्म काढले आणि तत्त्वज्ञान निर्माण केले तसेच जीवनाचे नियम बनविले, त्या सर्वांनी हे सर्व ज्ञानाच्या आधारावर नव्हे तर अनुमानाच्या आणि कलपनेच्या आधारावर केले. ज्यांनी या धर्मगुरुंचे आणि नेत्यांचे आज्ञापालन केले त्यांनीसुद्धा विचारांति नव्हे तर या कल्पना विलासाने अनुकरण केले की असे थोर व महात्मे म्हणतात आणि आपल्या पूर्वजांनी त्यांचे अनुकरण केले व जग त्यांच्यामागे चालत राहिले तर ते निश्चितच योग्य सांगत असतील.

४५) `जे काही यापूर्वी आले त्याची पुष्टी आहे'' म्हणजे प्रारंभापासून जी मूलभूत शिकवण पैगंबरांच्या माध्यमातून मनुष्याला देण्यात आली त्यापासून वेगळे काही कुरआन सांगत नाही, तर त्याचीच पुष्टी आणि समर्थन करीत आहे. जर एखाद्या नवीन धर्म संस्थापकाच्या मानसिक उपजचा परिणाम असता तर यात पूर्वींच्या सत्य गोष्टीत आपले विशिष्ट रंग मिळविण्याचा प्रयत्न करून एक वेगळे अस्तित्व (धर्म) बनविले गेले असते.

``(अल् किताब) विशिष्ट ग्रंथाचे विस्तृत विवेचन (तपशील)आहे'' म्हणजे त्या मूलभूत शिकवणींना ज्या सर्व ईशग्रंथांचा सार (अल् किताब) आहे. यात प्रमाण आणि साक्षींसह तसेच उद्देश आणि समजण्यासह पूर्ण तपशीलासह व्यावहारिकतेवर चरितार्थ करताना सांगितले गेले आहे.

४६) सामान्यत: लोक समजतात की हे आव्हान फक्त कुरआनची सशक्त भाषाशैली आणि साहित्य गुणांच्या दृष्टीने होते. कुरआन एक चमत्कार आहे यासाठी ज्याप्रकारे उल्लेख आला आहे. त्यावरून हा संभ्रम होणे असंभव नाही. कुरआनचे स्थान याहून उच्च्तर आहे की आपल्या अनुपम आणि अपूर्ण गुणांच्या दाव्याचा आधार केवळ शाब्दिक गुणांवर ठेवावा. नि:संदेह कुरआन आपल्या भाषाशैलीत अनुपम आहे. परंतु मनुष्य असा ग्रंथ लिहू शकत नाही कारण याच्या शिकवणीत आणि विषयात चमत्कार आहे. ज्या कारणांनी हा ग्रंथ अल्लाहकडून असल्याचे निश्चित आहे आणि मनुष्याची रचना असणे असंभव आहे, याचा स्वत: कुरआन अनेक ठिकाणी उल्लेख करीत आहे. या सर्वांचा तपशील आपण देत आलो आहोत आणि पुढेसुद्धा देऊ म्हणून दीर्घ तपशीलात न जाता यास येथेच समाप्त् करणे योग्य आहे.

४७) नाकारणे किंवा खोटे लेखणे या आधारावर शक्य होते की या लोकांना हा ग्रंथ एक खोटा ग्रंथ असणे शोध कार्यावर माहीत झाले असते किंवा या आधारावर उचित असते की जे सत्य यात वर्णन केले आहे आणि ज्या सूचना यात दिल्या आहेत, ते सर्व चूकीचे सिद्ध व्हावे. परंतु खोटे लेखण्याच्या या दोन्ही कारणांपैकी येथे कोणतेच कारण विद्यमान नाही. कोणी मनुष्य असे सांगू शकत नाही की ज्ञानाच्या दृष्टीने त्याला माहीत आहे की हा ग्रंथ रचलेला असून तो अल्लाहशी जोडून दिला आहे. कोणी  परोक्षात  डोकावून  पाहिले  की  येथे  अनेक  ईश्वर  आहेत  आणि  हा  ग्रंथ  विनाकारण  एक  अल्लाहची सूचना देत आहे किंवा अल्लाह, देवदूत (फरिश्ते) आणि दिव्य प्रकटन या सर्वांची काही एक वास्तविकता नाही आणि या ग्रंथात विनाकारण ही कहाणी रचलेली आहे. कोणी मृत्यू पावून हे पाहिले नाही की दुसरे जीवन आणि त्याचा हिशेब आणि मोबदला आणि शिक्षेविषयी जी माहिती यात दिली आहे ती सर्व चुकीची आहे. परंतु यानंतरसुद्धा निव्वळ संदेह आणि अनुमानावर या ग्रंथाला खोटे लेखले जात आहे, जणूकाही ज्ञानानुसार त्याचे खोटे असणे सिद्ध झाले आहे.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget